Thursday, September 24, 2009

पाळीव प्राणी

लहानपणी मला एक फार मजेदार सवय होती. कुठल्याही प्राण्याचं पिल्लू दिसलं की लगेच मी ते पाळायची स्वप्नं बघायचे.
अशी मनातल्या मनात मी खूप पिल्लं पाळली होती. बाबाबरोबर पेशवे बागेत गेलं की, "ए बाबा आपण वाघाचं पिल्लू पाळूया ना!" अशी मागणी व्हायची. मग बाबा मला आधी समजावायचा प्रयत्न करायचा. पण माझा एकूण उत्साह बघता, "हो पाळूया हं. आईला विचारू आधी", अशी समजूत घालायचा. केरळमधल्या जंगलात मला हत्तींचा कळप दिसला. लगेच मला हत्तीचं पिल्लू पाळायचे डोहाळे लागले. सोलापुरात गाढवाचं पिल्लू बघूनसुद्धा मी "कित्ती गोड!" म्हणायचे. तसंच काही दिवस मला आपल्या घरात जिराफाचं पिल्लू असावं असंही वाटत होतं!
माझ्या कल्पनेतील 'पाळीव' प्राणी बघून मी वास्तवात फक्त रस्त्यातली कुत्र्याची आणि मांजराची पिल्लं घरी आणू शकते ही माझ्या जन्मदात्यांसाठी खूपच चांगली बातमी होती. रोज संध्याकाळी मी आणलेली पिल्लं विमलमावशीचा नवरा (दौलतमामा) पोत्यात घालून सोडून यायचा. मग सकाळी उठल्यावर माझा पुन्हा प्राणीशोध सुरू व्हायचा.
पण प्राण्यांशी खेळण्यात जी मजा यायची ती मला दुस-या कुठल्याही गोष्टीत सापडली नाही. मांजरीच्या पिल्लासमोर दो-याला बांधलेली बांगडी नाचवायला मला फार आवडायचं. मांजराची पिल्लं तासंतास त्याच गोष्टीशी खेळतात. सुरुवातीला पंज्याने बांगडीला डिवचतात. मग जसजसा खेळ अवघड होत जाईल तसतसे त्यांचे प्रयत्नही बळावतात. कधी कधी माऊचं पिल्लू दोन्ही पंज्यांनी बांगडी पकडायला जायचं आणि तिच्यात अडकून बसायचं. मग अपमान झाल्यासारखं दूर जाऊन बांगडीकडे दुर्लक्ष करायचं. पण डोळ्याच्या कोप-यातून नेहमी तिच्यावर नजर ठेवून असायचं. मग बांगडी जरा सुस्तावली (म्हणजे बांगडीच्या सूत्रधाराला खेळ वाढवायची हुक्की आली) की पिल्लू दबा धरून बांगडीवर चाल करून यायचं. मला ही चाल फार म्हणजे फार आवडायची. त्यात मांजराची गती एखाद्या नर्तिकेसारखी किंवा एखाद्या चढत्या तानेसारखी वाढायची. आणि कधी कधी ते दर्शन मला दिल्याबद्दल मी ती बांगडी सोडून द्यायचे. त्या पिल्लाचा फार हेवा वाटायचा. किती एकाग्र चित्ताने त्या बांगडीचा पाठलाग करायचं ते! इतकी शक्ती, इतकी आशा - ती पण एका फडतूस दो-याला टांगलेल्या बांगडीसाठी! पण त्याची कीव पण यायची. ’काय वेडं बाळ आहे!’ असंही वाटायचं.
नंतर मोठी झाल्यावर असाच एक खेळ खेळताना लक्षात आलं की देवपण आपल्या प्रत्येकाला अशीच एक बांगडी देत असतो, आणि आपल्या एखाद्या अशाच डौलदार चालीसाठी आपल्यावर ती बांगडी आनंदाने भिरकावीत असतो!
जसं मांजराच्या बाळाच्या थिरथिरेपणाचं मला कौतुक वाटायचं तसंच मला राजामामाच्या गोठ्यातल्या गाईच्या संथपणाचंही कौतुक वाटायचं. खूप वर्षं मला गाईलाच का देवाचा दर्जा देतात हा प्रश्न पडला होता. अज्जीने दूध, दही, ताक, लोणी, तूप व त्यातून फुटणा-या चवदार पदार्थांच्या फांद्या मला खूपवेळा समजावल्या होत्या. तसंच बागेतले सुगंधी गुलाब शेणखतामुळे तितके खुलतात हेसुद्धा सांगितले होते. पण मग हे सगळं आऊच्या म्हशीमुळे पण होऊ शकेल असं मला वाटायचं. त्यामुळे माझी गाडी गाय आणि म्हैस या एका फाट्यावर येऊन अडकायची.पण मग अशाच एका निरभ्र दुपारी मामाच्या मळातल्या बोधिवृक्षाखाली मला उलगडा झाला. मामाची गाय तासंतास रवंथ करायची. आपल्यालाही अशी नंतर चावायची सोय असती तर रोज रात्री आईपासून सुटका तरी झाली असती असं मला नेहमी वाटायचं. तिच्या शेपटीवरच्या माश्यांना जमेल तितका वेळ ती तिथे राहू द्यायची. मग शेपटीच्या अगदी हलक्या झटक्याने त्यांना उडवायची. कधी कधी मांडीवरची कातडी दुधावरच्या सायीसारखी हलवून माशा उडवायची. मिळेल तो चारा कुठल्याशा अध्यात्मिक तंद्रीत रवंथ करणारी ती गरीब गाय कुठे आणि आऊच्या नाकी नऊ आणणारी तिची नाठाळ म्हैस कुठे!
आऊच्या म्हशीच्या पायात मोठा ओंडका होता. आऊच्या घराची तटबंदी तोडून कित्येक वेळा तिची म्हैस गाव भटकायला जात असे. बिचारी आऊ मग ज्याला त्याला, "माझी म्हस दिसली का?" म्हणून विचारत जात असे.
त्यामुळे लवकरच मला गाईचा महिमा लक्षात आला!
तसंच पोपटाशी बोलायला मला फार आवडायचं. आमच्या उद्योग बंगल्यात घरमालकांचा पोपट होता. त्याच्याशी बोलण्यात मी मांजराच्या पिल्लाइतकीच चिकाटी दाखवायचे. तो पहिला अर्धा तास कितीही शीळ वाजवली तरी किर्र्र् अशा अंगावर शहारे आणणा-या आवाजाखेरीज काही बोलायचा नाही. पण मग धीर न सोडता शीळ वाजवत राहिलं की अचानक तो तश्शीच शीळ वाजवायचा. त्याच्यामुळे मी खूप लहान वयात छान शीळ वाजवायला शिकले.
एकदा बागेत खेळत असताना मला गुलाबांच्या झुडपांत कबुतराचं एक छोटं पिल्लू जखमी होऊन पडलेलं मिळालं. मग त्यानंतरचे तीन दिवस त्याला कापसात गुंडाळून चमच्यानी भाताची पेज पाजण्यात गेले. आई बाबा पण माझ्या मदतीला आले. पण तिस-या दिवशी पिल्लाने धीर सोडला. त्यानंतर खूप प्राणी आले आणि गेले, पण ते पिल्लू मात्र मला फार लळा लावून गेलं.
अजूनही मी व बाबा बाहेर गेलो आणि रस्त्यात एखादं गाढवाचं किंवा मांजराचं पिल्लू दिसलं की बाबाच "कित्ती गोड!" असं ओरडतो! जर लहानपणी माझे सगळे प्राणीहट्ट पूर्ण केले असते तर आज बाबाला सगळी पेशवे बाग सांभाळायला लागली असती!

Wednesday, September 23, 2009

मदत

मोठ्या माणसांना एक क्रूर सवय असते. लहान मुलं मजेत खेळताना दिसली की त्यांना काम सांगायचं.
मी व स्नेहा अशा कितीतरी प्रसंगांतून पळ काढायचो. पण या कामांतही काही सोपी कामं आम्ही फक्त कौतुक व्हावं या एकाच हेतूने आनंदाने करायचो. त्यात अज्जीची जवळपास सगळी कामं असायची. अज्जी नेहमी साधी कामं सांगायची. कुठेतरी पळत जात असेन तेव्हा तिची, "ए साय", अशी गोड हाक यायची. मग तिच्या खोलीत गेलं की ती सुई-दोरा घेऊन बसलेली दिसायची. "मला एवढा दोरा ओवून दे गं" असं मऊ बोलायची. त्याला नाही म्हणताच यायचं नाही. उलट दोन तीन वेळा दोरा ओवता आला असता तर अजून बरं झालं असतं असं वाटायचं. मग मी अगदी एका क्षणात दोरा ओवून द्यायचे. त्यावर, "तुझे डोळे नुसतेच सुंदर नाहीत, तर किती उपयोगी आहेत!" असं ती सांगायची.
आणखी एक अज्जी-काम म्हणजे झाडांना पाणी घालणे. हे काम मी स्वत:हून करायचे नाही, पण ते सांगितल्यावर करायला ’नाही’सुद्धा म्हणायचे नाही. उन्हाळ्यात सकाळपासून तापलेल्या गच्चीवर पाण्याचा पाईप घेऊन जायला खूप मजा यायची. मग गरम गच्चीवर पहिल्यांदा पाणी ओतलं की सिमेंटचा वास यायचा. मग कुंड्यांमध्ये पाणी घालताना मातीचा! तहानलेली माती सगळं पाणी शोषून घ्यायची. ते पहायला मला फार आवडायचं. गुलाबाच्या फुलांवर पाणी शिंपडून त्यांना तजेलदार बनवायलाही मला खूप आवडायचं.
आजोबांची कामं पण सोपी असायची. ते सकाळी उठल्यापासून खूप वेळा त्यांची जागा बदलत असत. सकाळी झोपाळ्यावर, मग दहाच्या सुमाराला समोरच्या गॅलरीत, दुपारी जेवायला स्वयंपाकघरात, मग संध्याकाळी गच्चीवर. त्यांच्यामागून त्यांचा उकळलेल्या पाण्याचा तांब्या घेऊन जायचं काम आम्हाला मिळायचं. ते करायला काही वाटायचं नाही. ’कधी आजोबा व्याख्यानाला निघाले की त्यांचे बूट आणून द्यायचे’ हेही काम मला खूप आवडायचं. त्यांच्या सुपारीच्या डब्याची ने-आणसुद्धा मी करायचे. मग कधी खूष होऊन ते मला सुपारी अडकित्त्याने कातरून द्यायचे. ते बघायला मला फार आवडायचं. ते नसताना खूप वेळा मी मला अडकित्ता वापरता येतो का ते बघायचे.
पण मीनामामीची कामं मला अजिबात म्हणजे अजिबात आवडायची नाहीत. कारण ती तिला नको असलेली किचकट कामं आमच्या गळ्यात घालते अशी माझी थोड्याच दिवसांत खात्री झाली होती. त्यामुळे तिच्यासमोर मी नेहमी मरगळलेला चेहरा ठेवायचा प्रयत्न करायचे. मी व स्नेहा जरा खुशीत दिसलो की, "काय हासताय गं मुल्लींनो! इकडे या" असा हुकूम व्हायचा!

मग गेलं की , "स्नेहा कणीक मळ आणि सई लसूण सोल" असा आदेश व्हायचा लगेचच!
स्नेहा मला कधीच कणीक मळू द्यायची नाही. त्यामुळे मला नेहमी लसूण सोलायचं काम मिळायचं. आणि हे काम नक्की म्हणजे नक्की मामीच्या "नको" यादीत असणार. हल्ली कशा "ग्रीन हाऊस ढब्बू मिरच्या" असतात तसं तेव्हा नसायचं. त्यामुळे बहुदुधी-आखूडशिंगी लसूण नसायचा. एका लसणाच्या गड्ड्यात तीसएक पाकळ्या असायच्या. त्या पण अगदी चिंगळ्या. त्यांच्यावरची साल गेली की नाही हे कळायला पण काळ लागायचा. परत सोललेली सालं पण जपून ठेवायला लागायची कारण वा-यानी ती उडाली की मग मामीचा पारा चढायचा. मग एका हाताने लसूण सोलायचा आणि दुस-या हाताने सालींचं रक्षण करायचं. नंतर हाताला वास यायचा ते वेगळंच. मी ब-याच वेळेस पाव लसूण सालींमध्ये मिसळून सरळ कच-यात टाकायचे. पण यातही डोकं वापरावं लागायचं. अर्धा लसूण फेकला तर मामीला कळेल!
तसंच चित्रहार बघायला बसलं की "शेंगा फोडायचा" कर भरावा लागत असे. पण यातसुद्धा ’सोललेले दाणे खायचे नाहीत’ ही अट असायची. कोवळे मटार सोलायचे पण खायचे नाहीत! असल्या बोच-या कामांना माझा विरोध होता.
मीनामामी सकाळी उठून खूप वेळ पाणी उकळायची. पंचेचाळीस मिनिटं तिची घागर शेगडीवर असायची. माझ्या बाबानी या अकारण पाणी उकळण्याच्या सवयीचा बिमोड करण्यासाठी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला. पण ती तासभर पाणी उकळायचीच. कधी कधी तिनी उकळलेल्या पाण्याच्या वाफेचे ढग बनून पाऊसही पडून जायचा पण तिचे पाणी उकळणे थांबायचे नाही. हे पाणी गार झाल्यावर फिल्टरमध्ये घालायची जबाबदारी कधी कधी आमच्यावर यायची. तीही मला आवडायची नाही. कारण त्यासाठी मला ओट्यावर चढावे लागे. एवढ्या उकळेल्या पाण्याला परत फिल्टरमध्ये घालून आम्ही बहुधा पेल्यातून पाण्याचा आत्मा पीत असू!

नरूमामा स्कूटर धुवायला आमची मदत घ्यायचा. तो अंगणात आणि नळ गॅलरीत. त्यामुळे 'योग्य वेळी' पाणी सोडणे आणि बंद करणे हे काम आमचे असायचे. मग नरूमामा लाडका असल्याने ते मी मुद्दाम अयोग्य वेळी करायचे आणि त्याला भिजवायचे.
मे महिन्याच्या सुट्टीत हा आमचा उपयोग सिद्ध करायचा मला फार कंटाळा यायचा. कुणी सारखी कामं लावली की "अभ्यास असता तर निदान कारण तरी मिळालं असतं" असं सारखं वाटायचं. पण शाळा सुरू झाल्यावर मात्र रोज लसूण सोलायची पण तयारी असायची. पण आता रोज लसूण सोलताना मीनामामीची आठवण येते. इकडच्या मिरच्या आणि लसूण सोलायला आणि चिरायला सोपे असले तरी कोल्हापुरी मिरचीच्या ठेच्याची सर त्याला कुठली!

Thursday, September 17, 2009

अज्जीचे कपाट

लहानपणीच्या काही उद्योगांपैकी एक म्हणजे कपाटं उघडणे आणि उचकटणे! बाकीची लहान मुलं हे करतात की नाही मला माहीत नाही, पण मी मात्र कपाटोत्सुक असायचे. प्रत्येकाचं कपाट वेगळी गोष्ट सांगायचं. अर्थात हा उद्योग मी घरात एकटी असतानाच करायचे. आईचं कपाट तिच्यासारखंच असायचं. नीट-नेटकं पण काही काही कप्प्यांमध्ये खूप सा-या गमती असलेलं. ती खूप वर्षं चेह-यावर फक्त "वसंत-मालती" का असल्याच कुठल्यातरी नावाचं क्रीम लावायची. त्याच्या न उघडलेल्या बाटल्या तिच्या कपाटात सापडायच्या. माझ्यापासून लपवून ठेवलेली सौंदर्यप्रसाधने मिळायची. तिचे आणि बाबाचे मी कोल्हापूरला असताना केलेल्या सुट्टीचे फोटो मिळायचे. जे बघून संध्याकाळी मी "ब्रूटस तू सुद्धा?" च्या थाटात तिची वाट बघायचे! खालच्या कप्प्यात वेलची, केशर, पिस्ते, अक्रोड असला सुका-मेवा असायचा जो माझ्यापासून आणि कामवाल्या बाईपासून लपवायला तिथे ठेवला जाई. तिचं कपाट उघडताच मंद अत्तराचा वास यायचा. तो वास घेतला की मला आपण आईजवळ आहोत असं वाटायचं.
बाबाचं कपाट उघडताना जरा भितीच वाटायची. आईच्या धाकानी "आवरलेलं" त्याचं कपाट उचकटताना मात्र काही काळजी वाटायची नाही. त्याच्या कपाटात नेहमी सिगारेटचं एक पाकीट असायचं. पहिल्यांदा जेव्हा आपला बाबा सिगारेट ओढतो हे लक्षात आलं तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला होता. का कोण जाणे! त्याच्या कपाटातही माझ्यापासून लपवलेल्या अनेक गोष्टी असत. छोटा टेपरेकॉर्डर. मी तो खूप वेळा बाहेर काढून वाजवून परत होता तसा आत ठेवायचे. बाबाच्या कपाटाची खालची फळी जरा कमकुवत झाली होती. त्याचं खरं कारण मी त्या फळीवर चढून अजून काय काय आहे ते तासंतास बघायचे हे होतं. त्याच्या कपाटात अनेक 'या गोष्टींचं काय करायचं?' या यादीतल्या गोष्टी असायच्या. त्यामुळे ते उचकटायला मजा यायची.
पण सगळ्यात मजेदार कपाट अर्थातच अज्जीचं होतं. तिच्या कपाटात इतक्या मजेशीर गोष्टी होत्या की तिनी नेमून दिलेला "उचकटायचा तास" सोडून सुद्धा तिच्या नकळत खूप वेळा मी त्या कपाटात जायचे. खालच्या कुलूपवाल्या कप्प्यात तिचे व तिच्या आईचे दागिने होते. ते बघायला मला व स्नेहाला खूप आवडायचे. तिच्या आईच्या वेणीत माळण्यासाठी सोन्याचं पाणी असलेली चांदीच्या फुलांची माळ होती. ती फक्त स्नेहाच्या वेणीत शोभून दिसायची. मग तिचे पैंजण,बांगड्या, बिलवर, गोठ, जोंधळी पोत एवढंच काय पण नथसुद्धा मी माझ्या नकट्या नाकात लटकवून बघायचे. त्यानंतरच्या वरच्या कप्प्यात फोटो अल्बम होते. आईच्या लग्नाचा अल्बम बघायला पण मला आणि स्नेहाला खूप आवडायचं. मग, "बाबा किती जाड होता नै?", "अज्जी अण्णा आजोबांचे केस काळे होते की ते कलप लावायचे?" असले भोचक प्रश्न पण विचारले जायचे. त्यावर अज्जी सुद्धा खुसखुशीत उत्तरे द्यायची.
त्यानंतरचा कप्पा आमच्या डोक्यावर होता त्यामुळे तिथे अज्जी सगळ्या दुर्मिळ आणि सुंदर वस्तू ठेवायची. तिच्याकडे जुन्या काळचा एकच रूपाया मावेल असा क्रोशाने विणलेला बटवा होता. त्यातून तो रूपाया बाहेर काढायची सुद्धा एकच छुपी पद्धत होती. एका बाजूला जुन्या काळातला बिस्किटांचा लोखंडी डबा होता. त्यात अज्जी मण्यांच्या माळा ठेवायची. तसाच एक डबा तिच्या शिवणकामाच्या साहित्याचा सुद्धा होता. तो थोडी मोठी झाल्यावर तिने मला दिला. त्यात मी मला आलेली पत्रं ठेवायचे. अजूनही पुण्यात तो उघडला की मला माझं सगळं शाळापण आठवतं. शाळेतली माझी घट्ट मैत्रीण अमेया मला एकाच वर्गात असूनही पत्र लिहायची. ती पत्र आम्ही वह्यांच्या कव्हर मधून लपवून एकमेकींना द्यायचो आमची गुपितं लिहून! ती सगळी पत्र त्या डब्यात आहेत! आता मजा वाटते वाचायला!
सगळ्यात वर, जिथे आम्हाला काही केल्या जाता येणार नाही (अज्जीच्या मते) तिथे "जंगल" होतं. पुठ्ठयाच्या पुस्तकात शेकडो तुकडे जोडून तयार केलेलं जंगल. ते अज्जीच्या भावाने तिला परदेशातून आणलं होतं. पण ते पुस्तक उघडल्यावर सगळं जंगल तयार उभं रहायचं. त्यात जिराफ, माकड, गेंडा, वाघ, पक्षी, हरिण सगळं सगळं होतं. ते जंगल बघण्यात आमची बरीचशी दुपार जायची. त्याच कप्प्यात एक बाहुलीचं पुस्तक होतं. त्यात बाहुलीचा चेहरा आणि पाय तसेच रहायचे पण पानं उलटताना प्रत्येक पान तिचा नवीन पोषाख असायचा. पलिकडल्या पानावर तो पोषाख घालून ती कुठे चालली आहे त्याचं वर्णन पण असायचं. तिच्याकडे अज्जीला भेटायला जायचा वेगळा पोषाख होता. ते वाचून मला नेहमी हसू यायचं, "काय वेडी आहे! अज्जीकडे जायला कशाला हवेत वेगळे कपडे?" हा प्रश्न मला नेहमी पडायचा!
त्याच कप्प्यात मात्र्योष्का बाहुलीसुद्धा होती. एकात एक ठेवलेल्या रशियन बाहुल्या. त्या मला फार म्हणजे फार आवडायच्या. त्या उघडताना देखिल लाकडाचा आवाज यायचा, जो अज्जीला अजिबात आवडायचा नाही कारण त्याने म्हणे तिच्या अंगावर शहारे यायचे. पण मला तो आणि भिंतीवर नखं घासल्यावर येणारा आवाज तेव्हा फार आवडायचा.
तसंच अज्जीने नंतर एक पुस्तकांचं कपाट केलं. त्यात देनिसच्या गोष्टी या नावाचं रशियन पुस्तक मला सापडलं. ते पुस्तक माझ्या आयुष्यात आलं नसतं तर माझं चित्र पूर्ण झालच नसतं. देनिस आणि त्याचा मित्र मिष्का यांच्या गोष्टी ऐकून आणि वाचून मी व अज्जी खूप हसायचो!
अज्जीच्या कपाटातला सगळ्यात निषिद्ध पदार्थ म्हणजे सुपारी. मला येता जाता सुपारीचे बकाणे भरायला फार आवडायचे. त्यामुळे अज्जी तिचा सुपारीचा डबा रोज लपवून ठेवायची. नेहमी सगळ्यात वरच्या कप्प्यात! पण मी आणि स्नेहानी त्यावरही मात केली होती. अज्जी शेजारी पाजारी असेल तेव्हा मी आधी कपाटाशेजारच्या टेबलवर चढायचे. मग तिथून थोडीशी उडी मारून तिस-या कप्प्यावर चढायचे. मग स्नेहा खाली स्टूल बनून थांबायची आणि मी लोंबकाळून एका हातानी सुपारीचा डबा घट्ट धरायचे. मग खाली पडायचे. सुपारी खाऊन हा सगळा प्रकार पुन्हा करायचो आणि डबा वर ठेवायचो.
मी तोतरी होईन अशी भिती दाखवण्यात आली. पण चहा पिऊन मी अजुनही काळीकुट्ट झाले नव्हते त्यामुळे मोठ्यांच्या थापांमध्ये मी तोतरेपणा समाविष्ट केला होता!
अजुनही खूप गमती-जमती होत्या अज्जीच्या कपाटात. कधी कधी माऊ तिच्या कपाटातच पिल्लं द्यायची. अज्जीला याचा खूप मन:स्ताप व्हायचा. पण आम्हाला मात्र त्याच्याइतका दुसरा आनंद कधी व्हायचा नाही!
अज्जीचं कपाट उघडताना आम्ही नकळत खूप कपाटं उघडली. त्याचा उलगडा अजून होतोय. पण कपाटं उघडण्याची जागा आता कामाने, वाचनाने, लेखनाने आणि विचारांनी घेतली आहे. मनातलं एक कपाट उघडलं की अज्जीच्या कपाटासारखी लाखो सुरस आणि चमत्कारिक कपाटं उघडली जातात!

लेख तपासल्याबद्दल गायत्रीचे आभार (आधीच्या सगळ्या लेखांसाठीसुद्धा!)

Sunday, September 13, 2009

उद्योग बंगला

"नेहमी नेहमी काय कोल्हापूर? पुण्याबद्दल लिही की काहीतरी!"- इति आई! पण पुण्यातल्या छान आठवणी लिहायल्या घेतल्या तर अजून एक उन्हाळ्याची सुट्टी तयार होईल! पुण्यातलं माझं लहानपण फार वेगळं होतं. आम्ही शुक्रवार पेठेत एका मोठ्या बंगल्याच्या तळमजल्यावर भाडेकरू म्हणून राहात होतो खूप वर्ष. त्या बंगल्याचं नाव "उद्योग" होतं. त्यामुळे ते नाव पुढे नेत मी उद्योगी झाले. त्या घराच्या आजूबाजूला छान बगीचा होता, अंगण होतं आणि अंगणात छोटासा हौद होता. माझी आई त्या हौदावर डाळी वाळत घालायची. एकदा कुठल्याशा बालिश खेळात मी तिने वाळत ठेवलेली सगळी डाळ हौदात सारली होती. तसं मी का केलं असेल याचं कारण मला आजही माहीत नाही. पण अशा अनेक उद्योगांनी मी आईला हैराण करत असे! एका अशाच निरागस रविवारी दुपारी मी सर्फचा अख्खा पुडा डोक्यावर ओतला आणि नळाखाली उभी राहिले. जेव्हा फेस सीमेपार गेला तेव्हा मात्र घाबरून आईला झोपेतून उठवायला तिच्या खोलीत माझ्या आकाराचा फेसाचा ढग गेला. बाहुल्यांचे केस कापायची मला फार आवड होती. पण माझ्यासारखे त्यांचे केस परत उगवत नाहीत हे कळेपर्यंत ब-याच बाहुल्यांचे बळी गेले!
उद्योग बंगल्यात फक्त मीच उद्योजिका होते. माझी आई अजून उद्योजिका झाली नव्हती. त्यामुळे नुकती लग्न झालेली, कोल्हापुरातून पुण्याला आलेली माझी आई खूप खूप साधी होती. तशी ती अजूनही तशीच आहे. पण तेव्हा ती सगळे रविवार माझ्यासाठी कपडे शिवण्यात घालवायची. त्यात तिची सगळी कला-कुसर दिसायची. कॅम्पमध्ये जाऊन ती सुंदर लेस, तलम कापड, छान छान बटणं घेऊन यायची आणि मग सगळी दुपार तिच्या छोट्या मशीनवर माझ्यासाठी कपडे शिवायची. कापड उरलं तर माझ्या बाहुलीलाही तसेच कपडे शिवायची. माझ्या वर्गातल्या सगळया मुलींमध्ये सगळ्यात सुंदर आणि कल्पक कपडे माझे असायचे.
आई सोमवारी ऑफिसला जाऊ लागली की मी रडून तिच्यासमोर लोटांगण घालायचे. रविवारचा अख्खा दिवस तिच्या आजूबाजूला बागडत घालवल्यावर सोमवार मला अगदीच रूक्ष वाटायचा. मग मी रविवारी संध्याकाळी तिला म्हणायचे,"आई तू उद्या जाऊ नकोस कामाला. उद्याच्या दिवस आपण गरीब-गरीब राहू." तशी आई खुदकन हसायची. पण सोमवारी माझ्या या प्रतिभावंत वाक्याचा काही उपयोग व्हायचा नाही.
आमच्या पुण्याच्या घरात पण झोपाळा होता. त्यावर मी व बाबा बसून खूप गाणी म्हणायचो. बाबा पण माझ्याबरोबर गाणं शिकायला यायचा. त्यामुळे तो माझ्याकडून कधी कधी झोपाळ्यावर "रियाज" करून घेत असे. कधी कधी रविवारी आई चिकन बनवायची. मग सकाळपासून मी तिच्या आजूबाजूला मांजरीसारखी घुटमळायचे.
"चिकन झालं?"
हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून तिला भंडावून सोडायचे.
पण रविवारचा सगळ्यात सुंदर उपक्रम म्हणजे सकाळी सकाळी पर्वतीवर जाणे. मी, आई आणि बाबा लवकर उठून पर्वती चढायचो. तिथे वरती पारिजातकाचं झाड होतं. त्याची फुलं वेचून ती नंदीवर वाहायला मला फार आवडत असे. खूप लवकर गेलं की तो सडा अजून कुणीच पाहिला नसायचा. त्यामुळे तशा पारिजातकाची फुलं वेचण्यात वेगळीच मजा असे. बाबा खूप वेळा पर्वती चढायचा. मग मी आणि आई त्याची वाट बघत बसायचो. त्याचं झालं की मिळून खाली यायचो. मग पॅटीस आणि क्रीमरोल घ्यायचो. तसं बघायला गेलं तर ही अगदी साधी रविवार सकाळ आहे. पण आता उगीचच ती साधी सकाळसुद्धा खूप महत्वाची वाटते! आई तेव्हा जशी होती तशी ती आता नाही, बाबा पण नाही आणि मी ही! त्यामुळेच कदाचित त्या सकाळी आता खूप मौल्यवान वाटतात!
आमच्या शेजारी चित्रे आजोबा-आजी रहायचे. मी त्यांच्या घरात हळू हळू शिरकाव केला आणि नंतर त्यांच्यातलीच एक झाले. चित्रे आजोबा माझे सवंगडी होते. त्यांच्यामुळे मला कधीच मित्र-मैत्रिणींची कमी भासली नाही. ते माझ्याबरोबर भातुकलीपासून रंगपंचमीपर्यंत सगळे खेळ खेळायचे. त्यांच्या बिचा-या चार केसांच्या वेण्या घातल्याचेही माझ्या लक्षात आहे! त्यांच्या घरी जेवायला मला खूप आवडायचे. आईला मात्र या गोष्टीचा फार संकोच वाटायचा. त्यामुळे सकाळी ती माझ्या नकळत भाजी-पोळी त्यांच्याकडे ठेवायची, त्या नको म्हणत असतानासुद्धा. पण जेवायला बसलं की मला माझ्या आईचा स्वैपाक लगेच ओळखू यायचा. त्यामुळे बरेच दिवस माझ्या आईला "माझ्या पोरीला माझा स्वैपाक आवडत नाही" या गोष्टीचा खूप त्रास झाला. एरवी अन्नपूर्णेनंतर पहिलं नाव तिचं घेतलं जातं. त्यामुळे हा आघात तिने तसा अध्यात्मिकतेने घेतला असावा.
आमच्या घरासमोर व्हरांडा होता. त्याला लागून तीन पाय-या होत्या. संध्याकाळी सहा वाजता मी व चित्रे बाबा त्या पाय-यांवर आईची वाट बघायचो. मग कोप-यावर आईची एका बाजूला झुकलेली मान दिसायची. मी लगेच गेटकडे धाव घ्यायचे. मला आईवर माकडासारखी उडी मारताना बघून रोज चित्रे बाबांच्या डोळ्यात तस्सच हासू येत असे. आई घरी आली की चित्रे बाबा हळूच त्यांच्या घरी परत जायचे. मला मात्र आई आल्याच्या आनंदात ते कधीच जाणवले नाही.
आशी किती माणसं हळूच आली आणि हळूच गेलीही! कधी कायमची तर कधी मोठ्या माणसांच्या भांडाभांडीत. कधी गाव बदलला, तर कधी देश. कधी माझ्याच जुन्या कपड्यांमध्ये मी मावेनाशी झाले. पण जाणारी प्रत्येक व्यक्ती एक खण करून जाते. आणि मग एक दिवस अचानक आपल्या हातात खूप रंगीबेरंगी खणाच्या बांगड्या आहेत असं लक्षात येतं!
अशीच ही एक बांगडी, पुण्याची!

Thursday, September 3, 2009

कुसूम अज्जी

आजपर्यंत कुसुम अज्जी खूप वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीवर डोकावली आहे. पण आज मात्र तिच्यासाठी खास ही जागा. काही काही माणसांचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व मोठं होताना नेहमी आठवतं. ती माणसं त्या वेळेस, त्या ठिकाणी नसती तर कदाचित आपण जसे आहोत तसे झाले नसतो. आणि त्या माणसांबरोबरच ती वेळही महत्वाची असते. तसंच माझं बालपण होतं. अज्जीचा अज्जीपणा मी जितका अनुभवला तितका कदाचित माझ्या आईनेही तिच्या या आईचा "आईपणा" अनुभवला नसेल. तसं तिचं नाव घेतलं की काय काय आठवतं. तिचे हात आठवतात. तिची बोटं लांब आणि कमालीची लवचिक होती. त्या हातानी ती दिलरूबा वाजवायची. त्याच्या राकट तारेवरून तिची बोटं फिरताना दिसली की आम्हाला फार मजा वाटायची. दुपारच्या वेळात खूपवेळा मी व स्नेहा तिचा दिलरूबा वाजवायचो. कुणाला हे वाद्य माहित पण नसेल. त्याला व्हॉयलिनसारखी एक लांब काठी होती. जिच्यावर हरणाच्या शेपटीचे केस लावले होते. तिला आम्ही गारगोट्यांनी साफ करायचो.
तिचे हात रोज सकाळी ताक करायचे. तिला ताक करायला फार आवडायचे. आणि ते आग्रहाने सगळ्यांना द्यायला त्याहूनही जास्त. ताकातलं लोणी काढून काढूनच कदाचित तिचे हात इतके मऊ झाले असावेत. मी भोकाड पसरून रडू लागले की, "रडू नकोस", म्हणून माझे ती त्या साय हातांनी डोळे पुसायची. मला ती लाडानी "साय" म्हणायची. मुलीची मुलगी म्हणजे दुधावरची साय, आणि माझं नावही सई!
तिनी मला जितक्या गोष्टी सांगितल्या, तितक्या बाबानी पण नसतील सांगितल्या. इसापनिती, पंचतंत्र, अरेबियन नाईट्स, रविंद्रनाथ टागोर या सगळ्यांची माझ्याशी ओळख कुसुम अज्जीने करून दिली. अज्जीची "राईचरण" मला अजुनही तशीच्या तशी आठवते. ती रविंद्रनाथांनी लिहिली आहे हे कळायलाही बरेच दिवस लागले. कुसुमाग्रज, भा.रा.तांबे, बालकवी, सुरेश भट आणि मोठी झाल्यानंतर आरती प्रभू या सगळ्यांशी माझा परिचय अज्जीने करून दिला. पण तिचा हा गुण चोरगुण होता. कारण मला या सगळ्या कविता कशा आवडायला लागल्या हे मला तिच्यापासून फार दूर गेल्यावर समजलं. तिनी हळूच जे माध्यमाचं काम केलं ते कदाचित तिला स्वत:ला सु्द्धा जाणवलं नसावं. कोल्हापुरातल्या तिच्या उबदार खोलीत पहाटे डोळे उघडताच ती योगासने करताना दिसायची. मग मी पण दात न घासताच तिच्या पावलावर पाऊल ठेवून आसने करू लागायचे. ती प्राणायाम करताना मात्र तिची नक्कल करू लागले की तिला मनापासून हसू येत असे. तिच्या मागून तिच्या मांजरीसारखीच मी सगळीकडे जायचे. मग एका मोठ्या कपात ती मला लवंग घातलेला चहा द्यायची. सकाळी तसा चहा प्यायला मला अजूनही आवडते.
अज्जी खूप विद्वान होती. नेहमी तिला तिच्यासारख्या लोकांची संगत मिळाली नाही. पण मग ती तिच्या खोलीत, तिच्या विश्वात खूप रमायची. वाचन करायची, तिच्या दूर देशातल्या भावंडांना पत्र लिहायची. त्यांच्या मुलांची खुशाली विचारायची. तिला तिच्या माहेरच्या लोकांचा फार लोभ होता. तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना कधी कधी तिचे डोळे पाणावायचे. मग मला उगीच अज्जीला ह्या गोष्टी सांगायला लावल्या असं वाटायचं. पण तसं म्हणताच, "नाही गं वेडाबाई, तुला नाही सांगणार ह्या गोष्टी तर कुणाला सांगणार मी?", असं म्हणून डोळे पुसायची. तिचे सगळे भाऊ अमेरिका, रशिया, इंग्लंडला जाऊन आले होते. त्यांची पत्र तिनी कपाटात जपून ठेवली होती. कधी कधी मला ती जुनी पत्र दाखवत असे. त्यातल्या मजकुरापेक्षा त्यातील कलाकृती बघण्यासारखी असायची. दादा मामा (अज्जीचे थोरले भाऊ) नेहमी काहीतरी गंमत करून पत्र पाठवायचे. कधी कागद गोल कापून त्यावर पत्र लिहायचे, कधी पूर्ण पत्र एक मोठी कविता असे! मला हे बघायला फार आवडायचे. पण त्या पत्रांमधून अज्जीचे आयुष्यभराचे शल्य पण परदेशी जात असे. ते मला आजकालच जाणवू लागले होते.
मला व स्नेहाला रोज दुपारी अज्जी साड्या नेसवून द्यायची. सहावारी साडी वरून दुमडून आमच्या छोट्याशा देहावर छान बसवून द्यायची. मग आमची भातुकली रंगली की अज्जी निवांतपणे झोपायची. एकदा तर बाहुला बाहुलीचं लग्न सुद्धा लावलं होतं. माझा बाहुला (पम्पकिन) आणि स्नेहाची बाहुली (रत्नावली) अशी जोडी होती. माझा बाहुला लठ्ठ आणि नकटा होता पण स्नेहाची बाहुली मात्र खूप देखणी होती. मग कुठेतरी समतोल साधावा म्हणून माझा बाहुला डॉक्टर आहे असं जाहीर करण्यात आलं. लग्नाची तारीख ठरली. त्या दिवशी आम्ही दोघी अज्जीबरोबर मंडईत गेलो. शेवंतीची खूप फुलं आणली व त्यांचे गजरे केले. मग नवरा-नवरीच्या डोक्याचे माप घेऊन त्यांच्यासाठी फुलांच्या मुंडावळ्यासुद्धा केल्या. अज्जीकडे तिच्या कुठल्याशा भाचीच्या लग्नातल्या मुंडावळ्या होत्या. त्या ही तिनी आमच्यासाठी तिच्या कपाटातल्या चोरकप्प्यातून बाहेर काढल्या. आदल्या दिवशी मला व स्नेहाला मंगलाष्टकं शिकवली. ती आम्ही घोकून पाठ केली. मग लग्नादिवशी बाहुलीला व आम्हाला अज्जीनेच साड्या नेसवून दिल्या! पम्पकिनला फेटा बांधण्यात आला. अंतरपाटावर मी व स्नेहानी स्वस्तिक काढले. मग सगळ्या शेजा-यांच्या साक्षीने आमचे, "लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा" सुरू झाले.
सुट्टी संपल्यावर मात्र सासूच्या नात्याने तिची बाहुली पुण्याला घेऊन जायचा बेत केल्यावर स्नेहाताईंनी माझ्याशी कडाक्याचं भांडण केलं!
अज्जीचा हा रसिकपणा तिच्या आयुष्यातील घडामोडी बघता फार आश्चर्यकारक होता. आईच्या लहानपणीची "दुसरी बायको" म्हणून त्रासलेली अज्जी माझ्या लहानपणी मात्र खूप शांत आणि रसिक झाली. सकाळी ती परडीभरून फुलं वेचायची. मग बाजारात जायची. कोवळे दोडके, नाजूक भेंडी, अळू, ताजा मुळा अशा त-हेत-हेच्या भाज्या आणायची. मग ताक करायची. दुपारी माझ्यासाठी खूप वेळ खमंग बेसन भाजून लाडू करायची. नेहमी आम्हांला अंबाबाईच्या देवळात घेऊन जायची. परत येताना आमचे सगळे बालहट्ट पूर्ण करायची. तिच्या आयुष्यातील हा नियमितपणासुद्धा कदाचित तिच्या रसिकतेचे कारण असावा. तिला मी कधीच दु:खी पाहिले नाही. तशी तिची कुणाकडून फारशी अपेक्षाही नसे. तिच्या खोलीतले तिचे आयुष्य ती नेमाने आणि आनंदाने जगायची.
कधी कधी गॅलरीत मी व अज्जी संगीत शारदा वाचायचो. त्यातलं "म्हातारा इतुका" मला फार आवडत असे. ती आईच्याच शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यामुळे तिच्या व आईच्या मजेदार गोष्टी सुद्धा ती खूपवेळा सांगायची. एकदा आईने वर्गातल्या दोन मुलींच्या वेण्या एकमेकींना घट्ट बांधून ठेवल्या. त्या कुणालाच सोडवता येईनात. तेव्हा आईला सगळ्या वर्गासमोर छान धम्मकलाडू मिळाला होता. ती गोष्ट अज्जीकडून ऐकायला मला फार आवडायचे.
तिला फुलांचं फार वेड होतं. तिच्या खोलीत एका उथळ बशीत कधी जाई, कधी सोनचाफा तर कधी बकुळीची माळ ठेवलेली असायची. मला देखील नकळत ही सवय लागली. मी सुद्धा माझ्या खोलीत अशी फुलं ठेवते.
अज्जीने खूप गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या शाळेचा, पुस्तकांचा खर्च अज्जी कुठलाही गाजावाजा न करता करीत असे. कित्येकवेळा आमच्या गवळ्याच्या मुलाच्या शाळेचे पैसे हळूच त्याला देताना मी अज्जीला बघितले आहे. कामवाल्या बाईला स्वत: चहा करून देणे, त्यांना पैशाची मदत करणे, वेळ प्रसंगी त्यांना मुलीला शाळेत घालण्यासाठी खडसावणे हे सगळे उपदव्याप स्नुषारोष पत्करून अज्जी करीत असे.
पण हे सगळं करूनही तिच्यात एक सुप्त विरक्ती होती. वैराग्य होतं. जे मला मोठी होताना कळू लागलं. तिचा कशावरही हक्क नव्हता. असेलही कदाचित. पण तो तिनी स्वत:हून सोडला होता. जे होईल त्यातून शांतपणे जायचा तिचा निग्रह होतो. तो तिनी शेवटपर्यंत कायम ठेवला. तिच्या शेवटच्या काही दिवसांत ती माझ्या आई-बाबांकडे होती. शेवटी शेवटी ती माझ्या आईला "आई" आणि बाबाला "बाबा" म्हणू लागली. लहानपणी आई माझ्यासमोर "हट्ट करायचा.." असं म्हणाली की मी ते वाक्य "नाही ssssss", म्हणून पूर्ण करायचे. तसंच अज्जीला तिच्या शेवटच्या दिवसांत आईने अशी खूप वाक्य पूर्ण करायला शिकवले. तिच्या सेवेसाठी खूप बायका ठेवल्या, तिच्या सगळ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण केल्या. आईस्क्रीम, पापड, मिरचीचा ठेचा, मोदक, शास्त्रीय संगीत, काव्य, नवीन कपडे असल्या सगळ्या छोट्या गोष्टींतून तिचं बालपण पुन्हा जागं झालं. आणि जशी माझी अज्जी थोडी लहान झाली तसे आई-बाबा अचानक मोठे झाले!
काल तिनी शेवटचा घास घेतला आणि या जगाचा सांगून निरोप घेतला. पण याला मरण म्हणता येणार नाही. "उन्हाळ्याच्या सुट्टीची" कल्पना मला अज्जीच्या आजारपणाने दिली. तिला तिच्या काही आठवणी गोष्टींमधून सांगायचा हा कार्यक्रम होता! पण ती जाताना मला इतक्या आठवणी देऊन गेली की आता तिच्या आठवणींसाठी ही जागाही अपुरी पडेल.
आमच्या घरात नेहमी अज्जीच्या लग्नाबद्दल खूप मतं व्यक्त केली जातात. कुणाच्या दु:खाचं तर कुणाच्या अपयशाचं ते कारण ठरतं. या सगळ्या व्यर्थ कोलाहलापासून तिची कायमची सुटका झाली. या लग्नानी ताजीला त्यागाची मूर्ती बनवले. कुसुम अज्जीच्या माहेरच्यांनीसुद्धा ताजीच्या या त्यागाचा खूप गौरव केला. आजोबांना लक्ष्मी मिळाली, सखी मिळाली, लेखनिक मिळाली, मानसिक आधार मिळाला, विद्वान श्रोता मिळाला. त्यांचा अभिमान, दुराभिमान जपणारी अर्धांगिनी मिळाली. पण अज्जीला मात्र या लग्नामुळे मोक्ष मिळाला. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टीच आपल्याला मोठे आनंद देऊ शकतात याचे जिवंत प्रतीक अज्जी बनली. राग, अश्रू,पश्चाताप या सगळ्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मला अज्जीने न बोलता दिली. तिच्या माझ्या आयुष्यातील या भूमिकेसाठी मी तिची आजन्म ऋणी राहीन.