Thursday, October 29, 2009

कुसूम आणि मालती

कुसुमअज्जी आणि ताईअज्जी दोघी ब-याच बाबतीत सारख्या होत्या पण तो सारखेपणा कधी जाणवलाच नाही. कारण दोघींचे तीच गोष्ट करायचे मार्ग अगदी वेगळे असायचे. ताजी जितकी बोलकी होती तितकी कुसुमअज्जी शांत. दोघींनाही फुलांचं फार वेड होतं. पण ताजीचं बागकाम म्हणजे निम्मं गप्पाकाम असायचं. तिची बाग सकाळी हीराक्काच्या मिशरीबरोबर खुलायची. मग दुपारी आमचा धोंडीराम गवळी आला की त्याच्याकडून कोल्हापुरातल्या बातम्या काढत तिचे वेल मांडवावर चढायचे. संध्याकाळी रॉकेलसाठी आलेल्या बायकांच्या चुगल्यांच्या जोडीनं तिचा अंगणातला सडा व्हायचा. कोणाचा नवरा पिऊन येतो, गावातल्या कुठल्या अल्लड बालिकेचं कुठल्या होतकरू सुकुमाराशी सूत जुळतंय, पाटलाच्या बायकोच्या अंगावरचे किती दागिने खरे आहेत वगैरे खास बातम्या मिळवत तिची बाग उमलायची. त्यात तिच्या बागेत विविध नातेवाईकांकडून आणलेली कलमं असायची. अगदी कुसुमअज्जीच्या माहेरच्यांकडूनही तिनी गुलाब, अनंत, मोगरा, ब्रम्हकमळ वगैरेंची रोपं आणली होती.
कुसुमअज्जीचं बागकाम म्हणजे तिची ध्यान करण्याची पद्धत होती. तिच्याही बागेत सुंदर गुलाब, मोगरा, चाफा, शेवंती असायचे. पण कुणालाही न दिसेल अशा गच्चीच्या एका शांत कोप-यात तिची बाग होती. तिथे ती मन लावून बागकाम करायची. कधी नरूमामाला मदतीला घ्यायची. ती धापा टाकत कुंड्या उकरत असताना तिच्या चेह-यावर एक वेगळीच शांतता असायची. त्यामुळे तिला मदत करायला जावं की नाही असा प्रश्न पडायचा.
ताजी आणि कुसुमअज्जी दोघीही कमालीच्या नीटनेटक्या होत्या. त्यांच्या खोल्यांकडे बघून अण्णाआजोबांच्या निवडीचा हेवा वाटायचा. पण यातही दोघींचे मार्ग वेगळे होते. कुसुमअज्जीच्या नीटनेटकेपणात गांधीजींची अहिंसा होती आणि हिटलरचा आग्रह होता! पुण्यात आई भुंग्यासारखी सारखी मागे लागायची. "सई, अभ्यासाचं कपाट आवरलंस का?"
"ऊठ आत्ता आवर!", अशा वाक्यांमध्ये माझी स्वच्छता चालायची. पण कुसुमअज्जी असं काहीही म्हणायची नाही. सकाळी उठल्यावर माऊची विचारपूस करायला पाच मिनिटं बाहेर जाऊन येईतो माझी रजई घडी घालून ठेवलेली असायची. अंघोळीहून आल्यावर मामीच्या आमटीच्या वासाने कधी पंचा जमिनीवर टाकून स्वयंपाकघरात गेले तर परत आल्यावर पंचा मच्छरदाणीच्या दांडीवर वाळत घातलेला असायचा. त्याची चारही टोकं कुठल्याशा आक्रमक भावनेने एकमेकांना बरोब्बर जुळवलेली असायची. टेबलावर चहा पिताना कपाचा ठसा उठला की अज्जी हातानी तो लगेच पुसायची. तिच्या या अगतिकतेचा मला विलक्षण संताप यायचा. मग तिनं माझं कुठलंही काम करू नये या तिरीमिरीत मीच माझी सगळी कामं तिच्याआधी उरकायचे. तिचा हा गांधीवाद माझ्या आईच्या दटावणीपेक्षा खूप प्रभावी ठरला!
ताजीसुद्धा खूप निटनेटकी होती. पण ती मात्र एकसारखी बोलायची. बाहेरून आलं की आमचे पाय तपासायची. कधी मुडशिंगीत चिंचा-आवळे काढून परत आलो की माझ्याकडे बघून, "काय हे सई! काय अवतार केलायस बघ बरं! एक वेणी सोडलेली तर एक तशीच! काय म्हणतील लोक तुला बघितल्यावर. तूच अरशात बघून ये", असं ऐकवायची.

तिच्या खोलीत मळक्या पायानी गेलो की ती सरळ बाहेर घालवायची.
दोघींनाही साड्या सुंदर घडी घालायची कला अवगत होती. पण ताजीचं घडी घालणं दुपारच्या मालिका बघण्यात, सुनांबरोबर गप्पा मारण्यात असायचं. कुसुम अज्जी मात्र तिच्या खोलीत मन लावून साड्या आवरायची. जणू काही ती देवपूजाच आहे अशा भावनेनं!
बोलणं आणि न बोलणं या एकाच गोष्टीमुळे दोघी खूप वेगळ्या वाटायच्या. ताजीला बोलायला ओळख, वेळ, जात, भाषा, धर्म हे कुठलेही नियम लागू नव्हते. रेल्वे प्रवासात कित्येकवेळा अर्धवट हिंदीत ताजी गुजराथी बायकांशी बोलायची. ओळखी काढायची तिला फार हौस होती. ती एक आणि दुसरी लग्न जमवायची. माझ्या आईच्या कित्येक "कु." मैत्रिणींची लग्न माझ्या बाबाच्या मित्रांशी जमवायचा ताजीने प्रयत्न केला. तिच्या तरुणपणी काही लोकांना घरातून पळून जाऊन लग्न करायलाही ताजीनी मदत केली होती. तरी नशीब तिचा वर जायचा नंबर लवकर लागला नाहीतर आत्तापर्यंत माझं तिनी वीसएकवेळा लग्न ठरवलं असतं. कुसुम अज्जी मात्र या बाबतीत ढ होती. संध्याकाळी ती झोपाळ्यावर बसायची. तेव्हा तिला प्रश्न विचारून त्रास दिला तर ती, "शांत बस जरावेळ. वा-याचा आवाज कसा येतो ते बघ", असं सांगायची. ताजी पण संध्याकाळी झोपाळ्यावर बसायची. पण ती मात्र सगळ्या गावाला घेऊन बसायची.

मला नक्की खात्री आहे की ताजी स्वर्गात गेल्या गेल्या तिथे खूप बदल झाले असणार. सगळ्यात आधी तिनं नारदाला आणि कार्तिकेयाला लग्न करायला भरीस पाडलं असणार.
"मी काय म्हणते नारदमुनी, असं किती दिवस खाली-वर करणार तुम्ही? इकडच्या तिकडं काड्या लावण्यापेक्षा एखादी इंद्राची अप्सरा धरा की! एवढ्या बायका अन् एकटा इंद्र बरं नाही दिसत!"
कार्तिकेयाला लग्नाचा सल्ला देण्याचं धाडस ताजीच करू शकली असेल.
"काय हे कार्तिकस्वामी! तुमचा मोरसुद्धा तुमचा डोळा चुकवून रोज नवीन लांडोर फिरवतोय! निदान तुम्ही लग्न केलंत तर त्याला तरी चोरी होणार नाही! आणि बायकांचा राग वगैरे तुमच्या मनात आहे हो! एकदा संसारात पडलात की सगळं आवडायला लागेल. अगदी बायकोसकट! तुमचा भाऊ बघा कसा दोन दोन बायका घेऊन बसतो! आमच्या ह्यांनी पण दोन केल्या! काही वाईट होत नाही!"

एखाद्यावेळी शंकर नुकताच तांडव करून शांत झाला असताना त्याच्या खोलीत जाऊन त्यालाही शिस्त लावेल.
"काय हे महादेवा! बघ जरा काय अवतार केलायंस! जटा पिंजारल्यास कशा ते तूच बघ. आणि तुझा डमरू एकीकडं, गळ्यातली रूद्राक्षं बघ कशी खोलीभर सांडलीत! गंगेचं पाणी झालंय कसं बघ सगळीकडं. कुणी भेटायला आलं तुला तर घसरेल की नाही तूच सांग. तुझा नागोबा पण पलंगाखाली घाबरून बसलाय. इतका राग बरा नव्हे. आमचे हे पण असेच दंगा करायचे. आता मी पण वर आले आणि कुसुमताईपण नुकत्याच आल्यात. कोण आता त्यांचा दंगा सहन करणार? पार्वती आहे म्हणून तुझे हे असले लाड चाललेत!"
त्याच्या जटांकडे बघून , "आणि काय रे? तुमच्याकडं खोबरेल तेल मिळत नाही? काय अवतार केलायंस केसांचा! उद्या तेल घेऊन येईन. मग तुझ्या डोकीत कडकडीत तेल घालून तुला न्हायला घालीन", असं सुद्धा म्हणाली असेल.
कुसुमअज्जी मात्र एखाद्या इंद्रधनुषी ढगाच्या टोकावर बसून ग्रेस किंवा महानोर वाचत असेल नक्की!

Sunday, October 25, 2009

भातुकली


आई, मला एक पुरी दे ना गं लाटायला!"
"सई, पायात येऊ नकोस माझ्या, पाहुणे येतील आता, त्यात तुझी लुडबूड नको आणि!"
"पण मी एकच पुरी लाटीन! तुझी शप्पथ!!"
"नंतर. एक दिवस सगळा स्वयंपाक तुला देईन. तेव्हा सगळं तूच कर."
"कधी?"
"लवकरच."

आणि माझी आई वचनाची पक्की आहे हे तिनी मला मी पाच वर्षाची असतानाच दाखवून दिलं! एका मे महिन्यात स्नेहा पुण्याला आली होती. तेव्हा माझ्या आईनी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आमच्या घरी "खरी खरी भातुकली" खेळायला यायचं आमंत्रण दिलं! माझी शाळेतली घट्ट मैत्रीण पूजा, माझ्या नाचाच्या क्लासमधली सखी आसावरी, आईच्या मैत्रिणींच्या मुली, माझी मावस-चुलत बहीण लीलावती आणि माझी लाडकी स्नेहा अशी पलटण जमा झाली. आई-बाबा दोघेही या खेळात मॅनेजरची भूमिका सांभाळत होते. आणि ताजी तिच्या नेहमीच्या मजेदार थाटात पर्यवेक्षिकेचं काम करत होती. बाबाला सकाळी सकाळी भाजी आणायला फुले मंडईत पाठवण्यात आले. आमच्या उद्योग बंगल्याच्या बैठकीच्या खोलीत भातुकली कार्यक्रम ठेवला होता. मग दोन-तीन स्टोव्ह, आणि गॅसची शेगडी बाहेरच्या खोलीत जमिनीवरच मांडली आमची उंची लक्षात घेऊन. आगीचं काम मात्र सगळं आईकडे आणि विमलमावशीकडे होतं. त्या बोलीवरच माझी भातुकली सुरू झाली होती. आणि सगळ्या मुलींना सुती कपडे घालून यायचा आदेश होता. मुलींच्या आयांना आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हांला काहीच करायला मिळालं नसतं. तसंच मुलींच्या बाबांनाही आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हाला काहीच खायला मिळालं नसतं! मग नऊच्या आसपास मुली येऊ लागल्या. आम्हाला मधेच भूक लागू नये म्हणून सगळ्यांना आल्या आल्या पोहे खायला मिळाले.
पुरी, बटाट्याची सुकी भाजी, मटकीचा रस्सा, काकडीची कोशिंबीर आणि श्रीखंड असा बेत होता. मग सगळ्या मुलींना आधी बटाटे उकडायचं काम मिळालं. जशी जशी गर्दी वाढली तशी कामं पण वाटून देण्यात आली. मी आणि आसावरीने बटाट्यांच्या भवितव्याची जबाबदारी उचलली. स्नेहाला आणि मला वेगळ्या वेगळ्या गटात मुद्दाम टाकण्यात आलं होतं. बाबा श्रीखंड गटात सामील झाला. बाबाला डायबेटिस आहे. त्यामुळे तो नेहमी श्रीखंड गटाकडेच आकर्षित होतो. गेल्या काही वर्षांत बाबानी "ईक्वल श्रीखंड" या अभूतपूर्व डायबेटिक श्रीखंडाचा शोध लावून ते बनवण्यात प्राविण्य मिळवलं आहे! आई आणि विमल मावशी पुरी गटाचं नेतृत्व करत होत्या. स्नेहाला (अर्थातच) कणीक मळायचं काम मिळालं होतं. तिच्या पाचवीला बहुधा कणीक पुजली गेली असावी चुकून. वयाच्या पाचव्या वर्षी ही कामं करायला मिळणं म्हणजे मला आणि माझ्या मैत्रिणींना, "अजिं म्यां ब्रम्ह पाहिले" सारखं होतं. बटाटे कुकरमध्ये उकडतात, त्यांना गार व्हायला बराच वेळ लागतो, आणि गार न झालेला बटाटा सोलायचा प्रयत्न केला तर हाताला चांगला चटका बसतो, अशा खूप गोष्टी त्या दिवशी आम्हांला समजल्या. फोडणी कशी घालतात याचं आमच्या डोळ्यादेखत झालेलं प्रात्यक्षिक बघून नेहमी आम्हांला ऐकू येणा-या चुरचुरीत आवाजाचं रूप बघायला मिळालं! त्यात आईतली शास्त्रज्ञ या सगळ्या गोष्टी जमेल तितक्या सोप्या करून सांगत होती. आणि या भातुकलीत फक्त मुलीच सामील झाल्या नव्हत्या. चिकूदादा बाबाबरोबर आधुनिक पुरूषांचं प्रतिनिधित्व करत होता! त्याने पुरी गटात मौल्यवान भर टाकली आणि तळून झालेल्या पु-या पंगतीपर्यंत न खाता आमच्या भातुकलीला मोलाचे सहाय्यही केले!
मग काही मुली हळूबाईपणा करू लागल्या की आई त्यांना, "चला आटपा, बारा वाजता पंगत बसणार आहे. उशीर केलात तर तुमचा पदार्थ वाढला नाही जाणार!" असं म्हणून स्पर्धा सुरू करायची. मग खोलीतल्या एका कोप-यात आमचे बटाटे चरचरीत तेलाच्या आणि खरपूस कांद्याच्या फोडणीत पडले. त्याचवेळी खोलीच्या दुस-या टोकाला विमलमावशीच्या देखरेखीखाली मटकीचा रस्साही उदयाला आला. खोलीभर पसरलेल्या घमघमाटामुळे पोरींच्या पोटात कावळे ओरडू लागले. त्या उत्तेजनानीच की काय पुरी गटाचे हात पोळपाटावर गर गर फिरू लागले. पुरी गटाने वाटीचा साचा बनवून मोठ्या पोळीच्या पु-या केल्या होत्या. आणि आई आणि ताजी एकावेळी एका पोळीपासून तयार झालेल्या सगळ्या पु-या तळत होत्या. कोशिंबीर गट त्यांचे काम संपवून इकडे तिकडे नाक खुपसू लागला त्यामुळे त्या गटातल्या मुलींना इतर गटात विलीन करण्यात आले. खोलीच्या मधोमध बाबा आणि त्याचा पूर्ण गट हाऽऽ पसारा मांडून बसला होता. त्यामुळे आई सारखी, "हातासरशी पसारा आवरा" असा संदेश खास त्या गटाच्या पसा-याकडे बघून देत होती. त्याचा बाबावर काहीही परिणाम होत नव्हता. हे असं आमच्याकडे त्यानंतरची सगळी वर्षं चालत आलेलं आहे. श्रीखंड गटानी मात्र काम चोख केलं होतं. चक्का आणि साखर मिसळून तयार होती. त्यात भिजवलेले पिस्ते, काजू, बदाम आणि दुधात केशर घालून तयार केलेला रंग जाऊ लागला होता. सगळ्या गटांची चोरटी नजर श्रीखंड गटाकडे जात होती. सबंध खोलीच्या प्रत्येक कोप-यात आमचे पदार्थ नावारूपाला येत होते. त्यामुळे मिळून केलेल्या या जेवणाकडे सगळ्या मुलींचे डोळे लागले होते.

मग साडेअकराच्या आसपास पसारा आवरायची सूचना झाली. आम्ही भरभर आमच्या भाजीवर "भुरभुरायला" लागणारं खोबरं-कोथिंबीर मिश्रण तयार केलं. मग दोन मुलींनी केरसुणी घेऊन खोली झाडली, दोघींनी फरशी पुसली, उरलेल्या काहींनी ताटं, वाट्या, पेले, चमचे मांडले. खोलीच्या चारही भिंतींना लागून सतरंज्या घालण्यात आल्या आणि सगळ्या मुलींनी त्यांच्या भातुकलीचा आस्वाद घेतला. सगळ्यांचेच पदार्थ छान झाले होते. आणि का कोण जाणे आमचा स्वयंपाक अगदी आईच्या स्वयंपाकासारखा लागत होता!
मनसोक्त श्रीखंड-पुरी खाऊन परत बाबानी आणलेलं कॅन्डी आईस्क्रीमही आम्ही खाल्लं! दुपारी पोटोबा भरल्यावर आमचं फोटोसेशनसुद्धा झालं! बाबानी पाठवलेला हा एक फोटो सुद्धा माझ्याकडे आहे! त्यात सगळ्यांचे ओठ आईस्क्रीममुळे केशरी झाले आहेत! आसावरीच्या गो-या रूपावर तो रंग खूप गोड दिसत होता!

लहानपणी मी साधारण पाच वर्षाची झाल्यावर आईकडच्या मावश्या आणि बाबाकडच्या खाष्ट आत्या नेहमी, "सई मोठी झाली. आता अजून एक भावंड 'झालं पाहिजे'" असा सल्ला द्यायच्या. त्यावर बाबा, "नाही! आम्हांला एकच पुरे आहे." असं सांगायचा. त्यानंतर त्यांचे चेहरे बघायला मला आणि बाबालाही खूप मजा यायची. आई-बाबाच्या या "एकच मुलगी" प्रयोगावर खूप टीका झाली होती. कदाचित त्यामुळेच आई-बाबानी माझ्या लहानपणात मला इतर लोकांबरोबर मिळून करण्यासारखं खूप काही आहे हे सांगायचा इतका प्रयत्न केला!
माझ्या शिशुगटाच्या प्रवेशाच्या मुलाखतीत मला, "तुझ्या घरी कोण कोण असतं?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी, "चित्रे आजोबा, दौलत मामा, विमलमावशी, तिचा मुलगा योगेश, चित्रे अज्जी, संध्या ताई" आशी लांबलचक यादी दिली होती. त्यात आई बाबांचं नाव अगदी शेवटी आलं होतं! माझ्या आईला अजून त्या गोष्टीचं वाईट वाटतं! पण भावंड नसल्यामुळे लहानपणापासूनच सगळ्यांशी मैत्री करायची सवय मला लागली. पुढे शाळेत गेल्यावर मला माझ्यासारख्याच खूप "एकुलत्या एक मुली" भेटल्या. आणि त्यांच्यातच मला माझ्या नसलेल्या सगळ्या बहिणी मिळाल्या.
पण आई बाबाच्या या खेळकर उपक्रमामुळे मला त्या दोघांमध्ये माझे सगळ्यात जवळचे मित्र मिळाले!

Monday, October 19, 2009

चुरमुरे

कोल्हापुरातल्या काही गोष्टी फक्त कोल्हापुरातच बघायला मिळतात. जसं की कोल्हापूरच्या रिक्षा! पुण्यातला रिक्षावाला स्वत:च्या वाहनाकडे अत्यंत अलिप्तपणे बघतो. रिक्षा म्हणजे सकाळी सीटवर (स्वत:च्या पृष्ठभागाला पुरेल एवढं) फडकं मारून बसायचं साधन. मग त्यातून (शक्यतो लोकांना फसवून) जितका पैसा मिळवता येईल तितका मिळवायचा आणि संध्याकाळी तिला खोलीबाहेर ठेवून सरकारमान्य देशीच्या दुकानात जायचं!
कोल्हापुरातले रिक्षावाले सगळे ”देव’-गणावर जन्माला आलेले सत्पुरूष आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या कोल्हापुरातल्या रिक्षेत चढण्यात जी मजा आहे ती मुंबई, लंडन किंवा अगदी ब्रिसबेनमधल्या टॅक्सीतसुद्धा नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे कोल्हापूरचे रिक्षावाले त्यांच्या वाहनाला त्यांच्या बायकोच्या सुंदर सवतीचा दर्जा देतात. पुण्यातला रिक्षावाला (ज्याला माझ्या आजोबांनी ’भामटा’ ही पदवी बहाल केली आहे), तुम्ही रिक्षेत बसलात की नाही ते सुद्धा न बघता फुर्र्रकन रिक्षा पुढे नेतो. कोल्हापूरचे रिक्षावाले आधी, "या या बसा" म्हणतात. त्यांच्या रिक्षा महालासारख्या सजवलेल्या असतात. सकाळच्या वेळी सुरेश वाडकरची ’ओंकार स्वरूपा’ची कॅसेट लावतात, शेजारीच उदबत्ती लावायची सोय असते. कोल्हापूरचे रिक्षावाले कधीही पुण्यातल्या रिक्षावाल्यांसारखे स्टॅन्डवर रिकाम्या वेळात "संध्यानंद" वाचताना दिसत नाहीत. वेळ मिळेल तेव्हा त्यांची रिक्षा चमकवत असतात. आणि त्यांच्या बोलण्यात विलक्षण आपुलकी असते. पुणेरी रिक्षेवाल्यांसारखे वळण सांगायला उशीर झाला तर लगेच अंगावर खेकसत नाहीत तर, "चालायचंच ताई! पुढून हाय की अजून एक टर्नं!" म्हणतात!

कुणाला वाटेल ही कथा, "बाई माझ्या माहेरचाऽऽऽ वैद्य" च्या चालीवर चालली आहे पण ज्या पुण्यातल्या रिक्षा-पीडित बापुडवाण्या व्यक्तीला याची खात्री करून घ्यायची असेल त्यानी लगेच कोल्हापूरच्या एशियाडमध्ये बसावं!
तशीच अजून एक खास कोल्हापूरची गोष्ट म्हणजे चुरमुरे. यावर काही पुण्यात राहणारे लोक, "शी! त्यात काय एवढं विशेष" असं नाक उडवून म्हणतील लगेच पण ज्यानी कोल्हापुरी चुरमु-यांची नजाकत पाहिलीच नाहीये तो त्याच्या अज्ञानात सुखी राहो! राजारामपुरीतल्या तिस-या की चौथ्या गल्लीच्या कोप-यावर एक चुरमु-याचे दुकान आहे. तिथे इतक्या प्रकारचे आणि इतके खमंग चुरमुरे मिळतात की तिथे गेल्यावर "याचसाठी माझा जन्म झाला असेल" असं म्हणावसं वाटतं. चुरमुरेमामा साधारण सात-आठ प्रकारच्या चुरमु-यांच्या पोत्यांच्या वर्तुळामध्ये बसलेले असायचे. चुरमु-यांशेजारीच खारवलेले आणि झणझणीत तिखट लावलेले दाणे असायचे. त्याबरोबरच वेगवेगळ्या चटक-मटक डाळीसुद्धा असायच्या. मी व अज्जी नेहमी खास चुरमुरे आणायला जायचो. मग परत येताना मी रस्त्यातच पुडा फोडून खायला सुरवात करायचे.
दुपारी कुणीच आमच्या भुकेला दाद देईनासं झालं की मी व स्नेहा चुरमु-यांमध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचो आणि गॅलरीच्या फटींमधून पाय खाली सोडून चुरमुरे खायचो. चुरमु-याचा लाडू आमच्या काही आवडत्या विरंगुळा खाद्यांपैकी होता.
पण या सुंदर चुरमु-यांमुळे किती पदार्थ खुलतात! कोल्हापुरी भडंग या चुरमु-यांमुळेच बहरते. पुण्यातल्या मारवाड्याकडे मिळणा-या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या चुरमु-यांची भडंग खाताना नेहमी मला सानेकाकूंनी अचानक गळ्यात मोहनमाळेऐवची घसघशीत कोल्हापुरी साज घातला आहे असं वाटतं. राजाभाऊच्या भेळेचा आत्मा याच चुरमु-यांमध्ये आहे.
कोल्हापूरची भेळही तिथल्या रिक्षावाल्यांसारखीच प्रामाणिक आहे. मामीचा हात भडंग बनवण्यात सरावलेला आहे. ती झोपेतही भडंग बनवू शकेल. तो कार्यक्रम बघायला आम्हाला फार आवडायचं. मोठ्या कढईत आधी तेल तापायचं मग त्यावर चरचरीत लसणीची फोडणी बसायची. आणि त्यात ते खमंग गोजिरवाणे चुरमुरे जायचे. आणि इतक्या घाऊक प्रमाणामध्ये हा प्रकार व्हायचा की दोन मोठाल्या डब्यांमध्ये ती भरली जायची. झाकणाखाली वर्तमानपत्र असायचं त्यामुळे पिठाच्या डब्यांमधून भडंग दुपारी नीट शोधून काढता यायची. मामा बॅंकेतून घरी आला की मोठ्या परातीत भडंग ओतायचा. मग मामी त्याला बारीक कांदा, कोथिंबीर चिरून द्यायची. हे सगळं भडंगेमध्ये घालून त्यावर मामा लिंबू पिळायचा. मग, "हं पोरिन्नो! करा सुरू" म्हणायचा. मामाबरोबर भडंग खायला खूप मजा यायची. परातीतून ताटलीत काढत काढत नंतर आमचे चमचे परातीतच डुबक्या मारू लागायचे. हा सोहळा बघून अज्जीला नेहमी भरून येत असे. मला त्यात एवढं भरून वगैरे येण्यासारखं काय आहे! साधी भडंगच तर खातोय! असं नेहमी वाटायचं. पण तशी भडंग बनवायला मामीचे हात, मामाचा उत्साह, गरम चहाची साथ, उन्हाळी संध्याकाळचा उ:श्वास आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापुरचे चुरमुरे लागतात हे लक्षात आल्यावर मात्र अज्जीच्या भावना समजतात!!

Thursday, October 15, 2009

आईमधला बाबा आणि बाबामधली आई

गेले दोन दिवस मी अाजारी आहे. आजारपणात साधारणपणे आईची आठवण येते सगळ्यांना, पण मला मात्र बाबाची आठवण येते. बाबानी माझी बरीच आजारपणं काढली आहेत. दवाखान्यात नेणे, अौषध देणे, अाल्याचा चहा करून देणे हे सगळे 'आई गुण' माझ्या बाबामध्ये आहेत!
आजाराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच दुर्दैवी आहे. म्हणजे मी सारखी आजारग्रस्त असते असं नाही. पण मला नेमक्या वेळी आजारी पडता यायचे नाही. शाळा सुरू झाली की मी ठणठणीत असायचे. पण सुट्टीत मला नेहमी काहीतरी व्हायचं. शाळेतून सुट्टी मिळण्यासाठी सर्दी ही एकच व्याधी मला लाभली होती. माझ्या सर्दीचा कधी ब्रॉन्कायटीस झाला नाही ,निदान शाळेत असताना तरी. किंवा सर्दी एकदम तिस-या टप्प्यावर जाऊन दोन महिने सक्त आराम असं भाग्य पण मला लाभलं नाही. आमच्या शाळेतल्या कित्येक सदैव शेंबड्या पोरांना टॉन्सिलायटीस झाला होता. त्यांना शस्त्रक्रिया करावी लागे. आणि त्यानंतर म्हणे पथ्य म्हणून त्यांना आईस्क्रीम खायला देत असत. ही सगळी शेंबडी मुलं मी माझ्या कट्टर शत्रूंमध्ये सामील केली. दोन महिने शाळा नाही या एकाच कारणानी त्यांचा मत्सर वाटणे योग्य आहे. पण त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून त्यांच्या पुत्र/पुत्रीव्रता आया माझ्या घरी रोज संध्याकाळी त्यांच्या वह्या पूर्ण करायला येत असत. ते बघून मला माझ्या आईला, "शिका जरा!" असं म्हणावसं वाटत असे. शाळेच्या बाबतीत माझा बाबा माझी आई होता. माझ्या आईने माझ्या शाळेचं तोंड खूप कमी वेळा पाहिलं. मी पहिली-दुसरीत असताना शाळेत खूप प्रसिद्ध होते. कारण मी खूप छान नाच करायचे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये नेहमी माझा खास एकटीचा नाच असायचा किंवा एखाद्या मोठ्या नाचातला महत्वाचा भाग मला मिळायचा. मी अभ्यासातसुद्धा काही वाईट नव्हते. त्यामुळे मुलामुलींच्या आयांमध्ये माझ्याबद्दल नेहमी चर्चा होत असे. त्यात एकदा कुठल्यातरी रिकामटेकड्या आईने, "सईला आई नाहीये", अशी अफवा उठवली होती. कारण सरळ आहे! रोज शाळा सुटली की बाहेर गेटात लूना, कायनेटिक, एम-एटी घेऊन आलेल्या आयांच्या घोळक्यात माझा बाबा उभा असे! पालकसभेत परत बायकांत पुरूष लांबोडा असलेला माझा बाबाच असायचा. माझ्या शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर सहीसुद्धा बाबाचीच असायची. एवढंच नाही तर माझा बाबा माझ्या शाळेतल्या बाईंना ,"मुलांचा अभ्यास कसा घ्यावा", यावर फुकट सल्ला पण द्यायचा. जेव्हा माझ्या आईला ही अफवा समजली तेव्हा माझ्या शाळा-आयुष्याबद्दल सहिष्णुता दाखवायला एक दिवस ती सुट्टी घेऊन मला घ्यायला आली.
बाबा माझ्या अभ्यासावर खूप बारीक लक्ष ठेवायचा. मी परीक्षा देऊन आले की मला तो सगळी प्रश्नपत्रिका मी कशी कशी सोडवली ते विचारायचा. "हं इथे काय केलंस? याचं उत्तर काय आलं?" असले भयावह प्रश्न विचारायचा. खरं तर मला पेपर सगळा तसाचा तसा आठवायचा पण मी उगीच विसराळूपणाचा आव आणून त्याला निम्मी उत्तरं द्यायचेच नाही. पण माझ्या एकूण वागण्याचा अभ्यास करून आणि मी दिलेल्या उत्तरांवरून तो आधीच मला किती मार्क मिळतील ते शोधून काढायचा! मला मूळ परीक्षेपेक्षा ही सत्त्वपरीक्षा जास्त भीतीदायक वाटायची! विशेषत: वार्षिक परीक्षेनंतर या असल्या उलटतपासण्या मला बिलकुल आवडायच्या नाहीत. पण ह्या सगळ्यातून गेलं की बाबातला बाबा पुन्हा समोर यायचा आणि मला बर्फाचा गोळा खायला घेऊन जायचा.
आईनी बाबासारखा माझा अभ्यास घ्यावा ही माझी लहानपणीची इच्छा होती. पण रसायनशास्त्रात पी.एच.डी असलेल्या माझ्या आईने कधीही माझ्या केमिस्ट्रीच्या पुस्तकाला हात सुद्धा लावला नाही. तिनी मला नंतर स्वयंपाकघरात केमिस्ट्रीचे धडे दिले. जसं की, "अळूची भाजी करताना आधी अळूचा पी.एच. नियंत्रित करणे गरजेचे आहे! म्हणून त्यात ताक किंवा चिंच घालायची." कोबी, ढोबळी मिरची, वांगी असल्या भाज्यांमध्ये बदाबदा पाणी घालून त्याची चव बिघडवणा-या बायका आईला अजिबात आवडत नाहीत. आमच्या घरातले स्वयंपाकघर ही आईची घरातली लॅबोरेटरी आहे. तिथे बनणा-या प्रत्येक पदार्थाला जसं बनवलं आहे त्यासाठी ठराविक कारणे असतात. उगीच कुणी सांगितलं म्हणून केसकर मॅडम तसंच्या तसं करीत नाहीत! तसंच स्वयंपाक करणे म्हणजे फक्त चांगले पदार्थ बनवणे नव्हे तर 'प्रयोग' संपल्यावर ओटा किती साफ आहे यावरसुद्धा माझे मार्क अवलंबून असायचे. पहिल्या काही धड्यांमध्ये मला आईने स्वयंपाकातील मूळ क्रिया (अभियांत्रिकी शब्दात युनिट ऑपरेशनस्) शिकवल्या. त्यानंतर मला स्वयंपाकघरात मुक्त विहार दिला. त्यामुळे पहिल्या काही वर्षांत बिचा-या बाबाला माझे असे अनेक स्वैर प्रयोग खावे लागले. मग कधी कधी आई ऑफिसात असताना मी घरी रूचिरा उघडायचे. एक दिवस यात मठ्ठा करायची रेसिपी मी उघडली. त्यात, "ताकाला आलं लावा" असं वाक्य होतं. आता ताकाला आलं कसं लावणार? आलं काय रंग आहे जो ताकाच्या गालावर लावता येईल? मग मी आईला फोन करून ही समस्या विचारली. तेव्हा हसून हसून तिची पुरेवाट झाली.तसंच पिठात मोहन घालणे म्हणजे काय हेसुद्धा मला कोडं होतं. हा कोण मोहन? आणि त्याला बिचा-याला पिठात का घालावं कुणी? पण मोहन म्हणजे गरम तेल हे कळल्यावर मला असले शब्द वापरून मला कोड्यात टाकणा-या रूचिरावालीचा खूप राग आला होता. त्यामुळे मी आई हे एकच दैवत मानलं आणि सगळा स्वयंपाक तिच्याकडूनच शिकले. आता तिच्यासारखीच मीही एखादी गोष्ट आवडली की ती स्वत:च करायचा प्रयत्न करते. पण यातही खूप संशोधन आहे जे करायला मला मजा येते!

अजूनही फोनवर नेहमी तिचा स्वयंपाकासाठीच सल्ला घेतला जातो. फोन ठेवताना मात्र नेहमी, "सई तू रसायनशास्रात पी.एच.डी करते आहेस हे लक्षात आहे ना?" असा टोमणावजा प्रश्न ती विचारते.
आईमधली ही शिक्षिका जेव्हा मला दिसली तेव्हा मला त्या लूनावाल्या काळजी करणा-या आयांपेक्षा ती खूप जास्त आवडली. पण माझी आणि आईची स्वयंपाकघरातली गट्टी जमल्यावर काही वर्षं बाबाला त्याच्या तेथील अस्तित्त्वास मुकावं लागलं. पण अजूनही बाबानी सकाळच्या चहाचा आणि गुबगुबीत ऑमलेटचा मान सोडला नाहीये!
आईमधले खूप गुण मला 'बाबा गुण' वाटायचे. जसं की ती कधीही मला खोटी आशा दाखवायची नाही. मायेपोटी मला कधीही खोटं सांगायची नाही. शाळेतून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की इतर मैत्रिणींपेक्षा माझं वजन जास्त होतं. त्यामुळे त्यांना जसे कपडे घालता यायचे तसे मला यायचे नाहीत. याचा मला खूप त्रास झाला, पण आईने मला अगदी परखडपणे यातून बाहेर यायचा मार्ग सांगितला. तिच्या भाषेत "लाकडाच्या जाडजूड ओंडक्यापासूनच सुंदर शिल्प तयार होतं. त्यामुळे तू शिल्प कुठे आहेस आणि ओंडका कुठे हे तुझे तूच शोधून काढ!". आईचा हा सल्ला मानून मी सोळा -सतराव्या वर्षीच व्यायाम करायला सुरवात केली. त्याबरोबरच रोजचा आहार माझ्या प्रकृतीप्रमाणे बदलावा लागला. मग 'नाइलाजाने' का होईना, मी बाहेर जाऊन तेलकट पदार्थ खाणं बंद केलं. तसंच घरीसुद्धा फळं, भाज्या आणि वेगवेगळ्या कोशिंबीरी करायला शिकले! हे सगळं संतुलन साधून मला शिल्प बनायला चांगली दहा वर्ष लागली! पण दहा वर्षांनी मला माझ्यातल्या शिल्पापेक्षा माझ्या आईतल्या शिल्पकाराची जास्त जाणीव होते!
बाबानी मला शिस्त लावली. जो माझ्या मते 'आई गुण' आहे. सकाळी सहा वाजता उठणे, नियमित नाचाच्या क्लासला जाणे, नियमित अभ्यास करणे, हिशोब ठेवणे (जे मी कधीही नीट केले नाही) या सगळ्या गोष्टींमध्ये मला बाबामधली आई दिसली. आईने मला प्रयोग करायला शिकवले, नापास व्हायला शिकवले आणि नेहमी मी ख-या जगात कुठे आहे याची जाणीव करून दिली. यात मला आईतला बाबा दिसला.
पण आई आणि बाबा या जरी दोन वेगळ्या व्यक्ती असल्या तरी या दोन वृत्तीदेखील आहेत. आणि माझ्या आई-बाबांमध्ये या दोन्ही वृत्ती रसायनशास्त्रात दोन्ही बाजूला बाण काढून दाखवलेल्या संतुलनाप्रमाणे आहेत!
त्यामुळे ही गोष्ट आईतल्या बाबासाठी आणि बाबातल्या आईसाठी!

Tuesday, October 13, 2009

खुळी मायडी

मी पाच वर्षांची असताना पुण्यात हाकामारीची अफवा आली होती. ती म्हणे मुलांना पळवून न्यायची. सगळ्या मुलांनी त्यांच्या घराच्या दारावर फुल्या काढल्या होत्या. त्या फुल्यांना हाकामारी घाबरायची. ती कुठल्यातरी ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात हाक मारायची, आणि आपण कोण आहे बघायला बाहेर गेलो की पोत्यात घालून पळवून न्यायची. शहाण्या आई-बाबांप्रमाणे माझ्या आई-बाबांनी मला "हाकामारी वगैरे काही नसतं" असं सांगितलं होतं, त्यामुळे मी तशी निश्चिंत होते.
त्याच सुट्टीत कोल्हापूरला गेल्यावर मात्र "खुळी मायडी" हे नाव हाकामारीसारखंच स्नेहा घेऊ लागली. खुळी मायडी अख्ख्या कोल्हापुरात कुठेही असायची. तीसुद्धा लहान मुलांना पकडून त्यांना भीक मागायला लावायची. पण अशा खूप गोष्टी प्रचारात होत्या. तिला म्हणे लहानपणी आई-बाबांनी टाकून दिलं होतं. त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला व तिला आई-बाबांजवळ राहणा-या मुलांचा खूप मत्सर वाटू लागला. मनाच्या एका कोप-यात ही थाप आहे हे मला माहीत होतं. पण परगावाहून आलेल्या पाहुणीने यजमान मुलांच्या कुठल्याही मताला विरोध करायचा नसतो असा एक अलिखित नियम आहे. मीसुद्धा स्नेहाला पुण्यात जे काही सांगायचे त्यावर ती विश्वास ठेवायची.
मग आमच्या दुपारी 'मायडी दिसली तर काय करायचं' याच्या तयारीत जायच्या. खरं तर मायडी दिसल्यावर क्षणाचाही उशीर न लावता जमेल तितक्या जोरात पळून जाणे हा एकच मार्ग उपयोगी होता. पण का कोण जाणे तो आमचा अगदी शेवटचा मार्ग होता. खिशात तिखटाच्या पुड्या ठेवणे आणि ती जवळ आली की तिच्या डोळ्यात तिखट फेकणे हा आमचा सगळ्यात आवडता मार्ग होता. पण बाहेर जाताना काही केल्या मामी आम्हाला तिखट द्यायची नाही. त्यामुळे मायडीच्या डोळ्यात तिखट फेकायची आमची मनिषा अपूर्ण राहिली.
'घरात चोर आला तर काय करायचं' हा सुद्धा आमचा आवडता खेळ होता. त्यात तर काहीही उपाय होते. चोराला बसा म्हणायचं आणि तो बसायच्या आधी खुर्चीवर तापलेला तवा ठेवायचा. याही खेळात फोडणीच्या डब्यातल्या ब-याच गोष्टींचा वापर होत असे.
स्नेहानी मायडीला पाहिलं होतं. त्यामुळे ती नेहमी तिचं वर्णन करायची. ती म्हणे खूप जाड होती आणि तिला पूर्ण टक्कल होतं. लहान मुली घालतात तसे कपडे ती घालायची आणि तिच्याकडे नेहमी एक पोतडीसारखी पिशवी असायची. यातच ती मुलं लपवायची. मला हीसुद्धा थाप आहे याची पूर्ण खात्री होती. लहान मुलं नेहमी दुस-यावर छाप पडावी म्हणून थापा मारतात. मीसुद्धा अशीच थापाडी होते. त्यामुळे स्नेहाच्या मायडीबद्दलच्या रम्य कथा मी भक्तिभावाने ऐकायचे. रात्री अज्जीच्या कुशीत झोपताना तिला स्नेहा कशी मला घाबरवायचा प्रयत्न करते आहे पण मी कशी शूर आहे याचे दाखले द्यायचे. अज्जी त्यावर, "हूं आता झोप" यापलीकडे काही बोलायची नाही.
मग एक दिवस आम्ही मामाबरोबर पहिल्या गल्लीच्या बागेत भेळ खायला गेलो होतो. भेळ खायच्या आधी नेहमी मामा पाणीपुरीची भवानी देत असे. तर हातात पाण्याची बशी घेऊन रस्त्याकडे बघत आमचा पाणीपुरी कार्यक्रम चालला होता. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरची चालणारी माणसं अचानक पांगली. त्यांच्या मध्यभागी फ्रीलचा फ्रॉक घातलेली संपूर्ण टक्कल असलेली, आणि खांद्यावर झोळी अडकवलेली बाई आम्हाला दिसली. सगळ्यांकडे बघून ती हातवारे करून जोरजोरात हसत होती. थोड्यावेळानी गर्दी कमी झाली आणि लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. माझी मात्र त्या दिवशी बोबडी वळली होती. त्या रात्री आणि नंतरच्या ब-याच रात्री मला झोपताना नेहमी मायडी आठवायची. आणि जर कोल्हापुरातली मायडी खरी आहे तर पुण्यातली हाकामारी सुद्धा असणार यावर माझा पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर मीसुद्धा यासारख्या सगळ्या अफवांवर मनापासून विश्वास ठेवू लागले!

Friday, October 2, 2009

संध्याकाळ

खूप दिवसांपासून तुम्हांला सगळ्यांना मला मुडशिंगीला न्यायचंय. पण तिकडच्या रस्त्यावर माझे विचार गेले की त्यांना वाटेत ब-याच इतर आठवणी भेटतात. त्यामुळे पुढे जायच्या ऐवजी त्यांच्याच गोष्टी तयार होतात. तसं करत बसलो तर मुडशिंगीला पोहोचायला फार उशीर होईल.

मुडशिंगी, म्हणजे गडमुडशिंगी आमच्या कोल्हापूरच्या घरापासून बरोब्बर सात किलोमीटर दूर आहे. पण तिकडे गेल्यावर आपण दुस-याच कुठल्यातरी जगात आलोय असं वाटतं! तशा मुडशिंगीला जायच्या खूप पद्धती होत्या. नरूमामाच्या स्कूटरवरून जाण्यात आम्हांला सगळ्यात जास्त मजा यायची. मी व स्नेहा दोघी त्यावर मावायचो. पण मीनामामी असेल तर बसनी जावं लागायचं. मग आधी ती तयार व्हायची. कारण तिकडे बाकीच्या दोन माम्या होत्या ना! मग मीनामामी छान साडी नेसायची. पावडर-कुंकू (हा शब्द खास कोल्हापुरातच वापरतात) करून मी, स्नेहा व मामी निघायचो. त्यात अज्जीच्या सूचना सुरू असायच्या, "मुल्लींनो, मळ्याकडं गेलात तर विहिरीपाशी जाऊ नका बरंका!".
कमला कॉलेजच्या समोरच्या बस स्टॉपवर आमची बस यायची. त्या स्टॉपच्या पाठीमागे एक खूप जुना बंगला होता दगडी. मग मी आणि स्नेहा त्या बंगल्यात कशी भुतं राहात असणार याच्या कथा रचायचो फावल्या वेळात. लहानपणी आपली गोष्ट दुस-यापेक्षा जास्त चमत्कारिक असावी यासाठी काहीही गोष्टी बनवायची हौस होती मला. त्यामुळे माझ्या भुताच्या गोष्टी फार विनोदी असायच्या. माझी भुतं रात्री लहान मुलांसाठी आईस्क्रीम विकायची!

मग थोडावेळ वाट बघितली की के.एम.टी यायची. मी पुण्याच्या पी.एम.टी चं अजून दर्शन घेतलं नाही, पण कोल्हापुरात मात्र मी नेहमी बसनी प्रवास करायचे. बसमध्ये चढलं की ही बस मुडशिंगीला जाणार यात काही वादच उरायचा नाही. कारण बसमध्ये सगळे, "काय मीनावैनी!" म्हणून ख्यालीखुशाली विचारायला लागायचे.
"वसुची व्हय?"
"होय."
"चांगली गुटगुटीत झाली की आता!" (’गुटगुटीत’ पासून ते ’अंगानी जरा ज्यास्त’ पर्यंतचा प्रवास मी बरेच मूग गिळून केला होता.)
"ताईस्नी भेटायला चालला व्हंय?"
"होय. म्हंटलं मुलींना जरा घेऊन जावं."
मग अख्खा रस्ता घडघडण-या बसमधून बाहेर बघण्यात जायचा. दहा मिनिटांतच गडमुडशिंगी पंचायतीची कमान यायची. त्यातून आत गेलं की आधी हिराक्काचं घर दिसायचं. तिच्या घराला लागूनच आमचं कुंपण होतं. तिचं घर छोटंसं तर आमच्या घराला मात्र चांगलं मोठ्ठ दगडी फाटक आहे. त्यावर आजोबांचं नाव दगडावरच्या रेषेसारखं लिहिलं आहे!
घराच्या शेजारीच बस थांबते. उतरल्या उतरल्या सगळे, "वसूची काय?" असा प्रश्न विचारायचे. घराच्या अंगणापलीकडे राजामामाचं रेशनचं दुकान आहे. तिथे सगळ्या गावातल्या बायका रॉकेलच्या रांगेत उभ्या असायच्या. आम्हांला बघून त्यांना फार आनंद व्हायचा!
ताजीला आम्ही येणार हे माहीत असायचं. मग ती अंगणातच कुणाशीतरी गप्पा मारत उभी असायची. आमच्याकडे जेव्हा फोन नव्हता तेव्हा मामी गवळ्याबरोबर निरोप पाठवायची. मग ताजीला बघितल्यावर मी व स्नेहा पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारायचो. हिराक्का कुंपणापलीकडून, "सई आली व्हय?" अशी लगेच पृच्छा करायची. ती ताईशी नेहमी कानडीत बोलायची. ताजीच्या माहेरी सगळे कानडी बोलतात. मग मी ताजीला मधे मधे , " अत्ता ती काय म्हणाली?" असे प्रश्न विचारायचे. आमच्या अंगणात पाण्याचा पंप होता. तिथे ताजीच्या "खास" मैत्रिणी धुणं धुवायला यायच्या. हिराक्का तिची खास होती. मग तिचं धुणं चालू असताना माझी एकसारखी बडबड चालू असायची. कुणी खेळायला नसेल, तर मी स्वत:शी बोलायचे! त्यामुळे हिराक्काचं, "वसुची पोरगी लईऽऽऽऽ बडबडती" हे वाक्य अजरामर झालं होतं.
मुडशिंगीच्या घरातसुद्धा झोपाळा आहे. अंगण, पडवी, मग तीन खोल्या, झोपाळ्याची खोली, स्वैयंपाकघर, देवघर, मागे हौद आणि मग परसात छोटीशी बाग! त्या बागेतूनच हिराक्का आणि ताजीच्या गप्पा रंगत असत. बागेच्या एका कोप-यात चूल होती. त्यावर अंघोळीचं पाणी तापायचं. त्या पाण्याला इतका सुंदर सरणाचा वास यायचा की मला साबण लावायला सुद्धा आवडायचे नाही. ताजीच्या खोलीत दोन पलंग होते. तिच्या खोलीला बाहेर उघडणारं एक वेगळं दार होतं. त्या दारात तिनी सुंदर वेल चढवला होता. पावसाळ्यात त्या वेलावर चांदण्यांसारखी फुलं यायची आणि पावसाच्या त्या थंड श्वासामध्ये मिसळून त्यांचा सुगंध संपूर्ण घरात दरवळायचा. कुसुमअज्जीसुद्धा ताजीच्या या वेलावर भाळली होती. पण त्या दोघींच्यात मात्र कधी रुक्मिणी आणि सत्यभामेचा प्रश्न उद्भवला नाही. कारण कदाचित त्यांचं कृष्णापेक्षा पारिजातकावरच जास्त प्रेम होतं!
अरूमामा म्हणजे माझा थोरला मामा. त्याची बायको सुरेखामामी. तिच्या हातची गरम भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी मिळायची! तिच्या भाकरी जादुई असतात. इतकी पातळ आणि गोल भाकरी मी अजून कुठेच बघितली नाहीये. मुडशिंगीत मी सगळ्या भुकेच्या वेळांना दही, ठेचा आणि भाकरी खाते. राजामामाची बायको मधूमामी मला हवा तेव्हा, हवा तेवढा चहा करून द्यायची. दुपारी सगळे झोपले की मी व स्नेहा राजामामाच्या दुकानात जायचो. मग तो सांगेल तशी साखर, गहू मोजून लोकांच्या पिशव्यांमध्ये घालायचो. त्याबद्दल तो लगेच आम्हाला पगार द्यायचा. मी पोत्यांतले कच्चे गहू खायचे. कच्चा गहू थोड्या वेळानी चुईंगम सारखा होतो.
मग उन्हं उतरली की अरूमामा चहा प्यायचा आणि मग आम्हांला मळ्याकडं घेऊन जायचा. ताजी त्याला आम्हांला तिन्हीसांजेच्या आत घरी आणायची सूचना करायची लगेच. त्यावेळी म्हणे दृष्ट, बाधा अशा गोष्टी प्रबळ होतात. त्यावर माझा विश्वास नाही. पण कधी कधी त्या संध्याकाळच्या वेळी उगीच उदास वाटतं हे मला अनुभवानी कळू लागलं!
मामाच्या मळ्यात नेहमी ऊस असायचा. मग ऊस काढून मळा दमला की हरबरा लावायचा. कधी गुलाब असायचे तर कधी वांगी. कधी खास तिखट मिरची. हल्ली हल्ली मामानी केळीची बाग केली आहे. तिथे दुपारी जाऊन झोपण्यात जे सुख आहे ते दुस-या कुठल्याही गोष्टीत नाही. मळ्याच्या मध्यभागी एक छोटी खोली आहे आणि त्याला जोडून गोठा आहे. मामा खूप वेळा त्या खोलीत ताणून देतो. पलिकडच्या खोलीत एक जोडपं राहतं. त्यांच्या छोट्या मुली इकडे तिकडे उड्या मारत असतात.

त्या खोलीला लागूनच आमची सुप्रसिद्ध विहीर आहे. त्या विहिरीवर एका मोठ्या चिंचेच्या झाडानी स्वत:चं अंग टाकलं आहे. त्याच्या फांद्यांवर सुग्रणींची खूप बि-हाडं आहेत. ती बघायला मला फार आवडायचं. कधी कधी मामा माझ्यासाठी पिलं उडून गेलेलं घरटं आणायचा. ते मी पुण्याला घेऊन यायचे. माझ्या वर्गातल्या कुणीच तसं घरटं बघितलेलं नसायचं. पण त्या झाडाच्या चिंचा मात्र आमच्या नशिबात नव्हत्या. पण आम्ही चिंचेची पानं खायचो मग!
कधी कधी मजा म्हणून मामा मला शेतात वांगी तोडायला पाठवायचा. मग सगळ्या बायका माझ्याकडे अगदी कौतुकाने बाघायच्या. मला वेगळी टोपली मिळायची आणि मी त्यांच्यासारखीच वांगी तोडायचे! मग मी तोडलेली वांगी आम्ही घरी घेऊन यायचो. लगेच सुरेखा मामी त्याचा रस्सा नाहीतर भात करायची.
मी खूप लहान असताना राजामामाकडे गाई होत्या. तो धार काढू लागला की मी तिकडे बघायला जायचे. तेव्हा तो माझ्या तोँडावर दुधाची पिचकारी उडवायचा!
खूप लहान असताना उठल्यावर ताजी दिसली नाही की मला खूप घाबरायला व्हायचं. मग मी धावत मागच्या बागेत जायचे. तिथे ती झाडलोट करत असायची. मला बघितल्यावर, "उठलीस? चहा देऊ?" असं विचारायची. मग चहा, खारी खाऊन तिनी तापवलेल्या पाण्यानी अंघोळ करायचे. ताजीला मुलींना नाहायला घालायला फार आवडायचं. ती आमच्या केसांत तेल घालायची, कानात तेल घालायची आणि मग गरम पाण्यानी खूप छान अंघोळ घालायची. पुढे "मोठ्या" झाल्यावरचे सगळे सोपस्कार तिनी एकटीने पाळले आमच्या बाबतीत. आम्हाला साड्या घेऊन दिल्या, न्हाऊ घातलं, पुरणाचे कडबू केले!
मुडशिंगीतली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कासाराकडे जायचं. मामीबरोबर बांगड्या भरायला जायला खूप मजा यायची. कासाराच्या दुकानात बांगड्यांच्या भिंती असायच्या. त्यातल्या हव्या त्या बांगड्या निवडून आम्ही भरून घ्यायचो. मग लाल चुटुक बांगड्या घालून आम्ही दिवेलागणीला घरी यायचो. बांगड्यांचा आवाज व्हावा म्हणून उगीचच हात हलवत रहायचो. सातनंतर मात्र अरूमामाचे सगळे मित्र जमायचे अंगणात. राजकारणावर चर्चा करायचे! कुणी त्यात मामाकडे शेतीविषयक सल्ला मागायला यायचं. पण मुडशिंगीत सात नंतरचा वेळ मला खूप अस्वस्थ करायचा. खेडेगावातल्या संध्याकाळी फार एकाकी असतात. त्या मनापासून आवडायला मनाला थोडं हळू करावं लागतं. रस्त्यावरचा प्रकाश, छोटी छोटी थकलेली घरं, कुणाचातरी पिऊन घरी आलेला दादला, घराघरांतून येणारा भाकरीचा आणि तिखटाच्या फोडणीचा वास, त्यात सातपासूनच मिसळलेला रातकिड्यांचा आवाज. हे सगळं शहरापेक्षा खूप खरं असतं. शहरात संध्याकाळ नेहमी सातच्या मालिकांमध्ये आणि मुबलक विजेच्या दिमाखात झाकोळलेली असायची. त्यामुळे थकलेला दिवस त्याचं जग रात्रीच्या स्वाधीन करून जाताना कुणाला दिसायचाच नाही. ती वेळ फार फार नाजूक असते. कधी कधी माझ्या सहा वर्षाच्या मनातसुद्धा कुठल्यातरी अनामिक भीतीचा सूर खेड्यातली ती संध्याकाळ लावून जायची. त्यामुळे मी सातनंतर ताजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिला गोष्टी सांगायला लावायचे. पण अशा कित्येक संध्याकाळी गेल्यानंतरही तिन्हीसांजेचे ते काजळ डोळे अजूनही तितकेच भुलवतात!

Thursday, October 1, 2009

सायकल

एका सुट्टीत स्नेहाकडे नवीन सायकल आली होती! तिची उंची वाढवायचा हा उपक्रम होता. स्नेहा मोठी असल्यामुळे तेव्हा ती माझ्यापेक्षा तशी उंच होती. पण मग खेळायला गेल्यावर मीही तिची सायकल चालवू लागले. माझ्याकडे पुण्यात छोटी दोन चाकी सायकल होती. मला बाबानी माझ्या पाचव्या वाढदिवसाला ती घेऊन दिली होती. बाबानी मला खूप लहानपणी सायकल चालवायला शिकवली. आधी मी बाजूला दोन "आधार-चाकं" लावून सायकल फिरवायचे. त्या न पडणा-या सायकलीवर मला खूप सुरक्षित वाटायचं. पण दोन-तीन महिन्यांतच बाबानी ती चाकं काढून फेकून दिली माळ्यावर. त्यामुळे मला ख-या ख-या दोन चाकी सायकलीचा सामना करावा लागला. मग मी तिच्यापासून दूर पळू लागले. "आज सायकल चालवलीस का?" असं विचारल्यावर गुळमुळीत उत्तर देऊन पळ काढू लागले. माझी मांजराच्या पिलांना परडीत घालून सायकलीवरून फिरवायची स्वप्नं पण नष्ट झाली या अरिष्टामुळे.
मग बाबानी त्याचा "कोच" अवतार धारण केला! बाबा खूप चिकाटीचा शिक्षक आहे. कितीही मंद विद्यार्थी असला तरी तो तितक्याच उत्साहानी शिकवतो. त्यात तो स्वत: सैनिक स्कूलमध्ये शिकलेला असल्यामुळे त्याला खेळांची आणि व्यायामाची फार आवड आहे. मग त्याने ठरवले की रोज सकाळी पळायला जाताना तो मला घेऊन जाणार. सकाळी सकाळी माझं पांघरूण खसकन ओढून मला थंड फरशीवर तो उभी करायचा. मग एक डोळा बंद आणि एक उघडा अशा अवस्थेत मी सायकलवर चढायचे. बाबाला खुलं मैदान वगैरे मिळमिळीत उपाय अजिबात आवडायचे नाहीत. मी सायकलला घाबरते, पडायला घाबरते म्हणून त्याने भर टिळक रस्त्यात मला सायकल शिकवायचा चंग बांधला. माझ्या सायकलीला मागे धरून तो माझ्याबरोबर पळायचा. बाबानी मागे धरले आहे या विश्वासामुळे मी एका आठवड्यातच रोज लवकर उठू लागले. आमची वरात टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परत येताना बाजीराव रस्त्यावरून जायची. सकाळची रहदारी तितकी भीतीदायक नसायची. पण आम्ही जात असताना शाळेतली पोरं, त्यांच्या आया, रिक्षावाले, दूधवाले आमच्याकडे बघून खूप गोड हसायचे. मग एखादं चालायला जाणारं जोडपं दिसायचं. त्यातली बायको तिच्या ढेरपोट्या नव-याला बाबाकडे बघून कोपरखळी मारायची. मला त्यावेळी बाबाचा खूप अभिमान वाटायचा!
पण पहिला आठवडा गेल्यावर मला "जेव्हा बाबा हात सोडेल" त्या दिवसाची जाम भीती वाटू लागली. एक दिवस घराच्या मागच्या शांत गल्लीत मी बाबाशी कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा करीत असताना त्याला विचारलेल्या प्रश्नाचं तो उत्तरच देईना, म्हणून सहज मागे कटाक्ष टाकला तर बाबा दूर गल्लीच्या कोप-यावरच होता! त्यानी कधी हात सोडला मला कळलंच नाही. पण त्यानी हात सोडलाय हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सरळ गोखल्यांच्या तारेच्या कंपाऊन्डमध्ये जाऊन धडकले. पायात तार बोचली आणि गुढगाही सोलवटला. मग मात्र मला बाबाचा खूप राग आला. घरी येऊन आईला कधी एकदा, "मला आज बाबानी पाडलं" असं सांगते असं झालं. पण आईला ते कळल्यावर ती खूप छान हसली. का कोण जाणे माझं पडणं खूप महत्वाचं होतं!
मग कोल्हापूरची स्नेहाची उंच सायकल मी तिच्यापेक्षा छान चालवू लागले. आम्ही दुपारी सायकल बाहेर काढायचो. आणि भर दुपारच्या उन्हात अगदी एस.टी स्टॅन्डपर्यंत जायचो. स्नेहा रहदारीला घाबरायची पण मी तोपर्यंत खूप शूर झाले होते. कधी आम्ही डबलसीट जायचो तर कधी एक एक करून त्याच रस्त्यावर कोण आधी येतं याची शर्यत लावायचो. कधी गल्लीत अनवाणी खेळत असताना अचानक सायकल सफर करावीशी वाटायची. मग वर जाऊन चप्पल घालून यायचादेखील धीर नसायचा. तसेच सायकलवर चढायचो आणि भटकायला जायचो.
सायकलवरून पडायची भीती गेल्यावर तिचा खरा आनंद मिळू लागला. मग मांजरीचं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू अशी सगळी प्राणी मंडळी माझ्या सायकलवरून जा- ये करू लागली. आणि पडायची भीती खूप वेळा पडूनच गेली! पण अजूनही पहिल्यांदा पडल्याची आठवण मनात ताजी आहे.
बाबानी मला पडायला शिकवल्याचा मला पुढे खूप उपयोग झाला. अजूनही होतोय. पण सगळ्या धडपडीमधून नेहमी काहीतरी खूप सुंदर मिळतं हे आता पक्कं डोक्यात बसलं आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पडताना येणारा पोटातला गोळा लगेच जाणार आहे याची खात्री वाटते!