Saturday, November 14, 2009

अंकली ते सांगली

उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी आम्ही ताजीच्या बहिणीकडे अंकलीला जायचो. अंकली सांगलीजवळचं छोटंसं गाव आहे. ताजीची बहीण सुमती (सुमा) अज्जी तिथे राहते. तिचं घर, शेत, वीटभट्टी सगळं तिथेच आहे. अंकलीला जाणे म्हणजे आमच्या सुट्टीचा खास भाग असायचा. तिची मुलं, सुना, नातवंडं आणि तिचा चित्रविचित्र प्राणीसंग्रह या सगळ्याचं आम्हांला फार कौतुक होतं. तिचं घरही खूप मजेदार आहे. एका अरूंद पण लांब जागेवर तिचं घर एखाद्या बोगद्यासारखं उभं आहे. दारातून आत गेल्यावर लांबच लांब बोळ आणि त्याच्या एका बाजूला क्रमाने देवघर, बैठकीची खोली, स्वयंपाकघर, न्हाणी अशा खोल्या आहेत. न्हाणीघराच्या दाराशी वर जायचा जिना आहे. तिथे तशाच एकापाठोपाठ एक आणि तीन खोल्या आहेत!

तो बोळसुद्धा जादूच्या गोष्टीतल्या चेटकीणीच्या घरासारखा आहे. कुठल्या खोलीतून कुठला प्राणी बाहेर येईल सांगता येत नाही. तिच्या दारातच पोपटाचा पिंजरा आहे. त्यातला पोपट मुलखाचा शिष्ट. पुण्यात तो पोपट असता तर चितळे आडनावाच्या पोपटिणीच्या पोटीच जन्माला आला असता. कुणी त्याच्याशी बोलायला आलं की सदैव डोळे पांढरे करून, "मला तुमच्याशी बोलण्यात काहीही रस नाही. उगीच इकडे उभे राहून स्वत:चा आणि माझा वेळ वाया घालवू नका", अशा अर्थाचा भाव त्याच्या चेह-यावर असायचा! तिच्या स्वयंपाकघरात चूल होती. तशी बर्शनची शेगडी पण होती, पण सुमा अज्जी जुन्या वळणाची असल्यामुळे ती नेहमी चुलीवरच भाकरी करायची. चुलीवरच्या भाकरीचा सावळा गावरान ठसका गॅसच्या शेगडीवरच्या ऎश्वर्या राय भाकरीला कुठून येणार? तिच्या चुलीशेजारी तिचं एक-कानी मांजर होतं. त्याला चुलीशेजारी बसायची फार हौस होती. एकदा आपण चुलीच्या किती जवळ आहोत याचा अंदाज चुकल्यामुळे त्याला एका कानाला मुकावं लागलं. पण सुमा अज्जी म्हणूनच की काय त्याचे जास्त लाड करायची. तिच्या घरी दिगू नावाचा कुत्रा होता. तो म्हणे दर गुरुवारी उपास करायचा. त्याला जेवायला दिलं तरी जेवायचा नाही. याची शहानिशा करून बघायसाठी मी गुरुवारपर्यंत तिथे रहायचा हट्ट केला होता.
तिला भाकरी करताना बघायला मला फार आवडायचं. तिच्या हातात निदान दोन डझन बांगड्या नेहमीच असायच्या. भाकरी थापताना त्यांचा हलका आवाज व्हायचा. आणि त्या बांगड्यांच्या कुंपणापलीकडे तिचं गोंडस, गोंदलेलं मनगट भाकरीच्या तालावरच नाच करायचं. खेड्यातल्या बायकांचे हात काय काय गोंदण-गोष्टी सांगतात! कुणाचं सालस तुळशी वृंदावन तर कुणाचा दिमाखात मागे वळून बघणारा मोर! आणि ते मऊ गव्हाळ, गोंदलेले हात लपवायला कासभर हिरव्या बांगड्या. मला सगळ्यांची गोंदणं बघायचा नादच होता. अगदी परवा मेल्बर्नमधल्या एका ऑस्ट्रेलियन काकूंच्या हातावर निळा गोंदलेला मोर पाहिला आणि या सगळ्याची आठवण आली.

काहीजणी त्यांच्या नव-याचं नाव गोंदून घेत असत. हे कळल्यावर इकडल्या ब-याच मुली , "ईन्डियन विमेन आर सो सप्रेस्ड!" असे उद्गार काढतात. पण स्वत:च्या नव-याचं नाव हातावर निरागस अभिमानाने लिहिणारी भारतीय नारी मात्र "सप्रेस्ड" आणि साधारणपणे दिसणार नाही अशा ठिकाणी फुलपाखरू काढणारी, आणि मग ते दाखवणारी पाश्चात्य महिला मात्र स्वतंत्र! हल्ली तर पुरुष लोकही त्यांच्या बायकांची नाव गोंदून घेऊ लागलेत! इकडे रस्त्यातल्या दर दुस-या व्यक्तीच्या हातावर गोंदण असतं. त्याला "टॅटू" म्हणतात! पण महानोरांनी बघितलेला तो "गोंदलेला हात मऊ टापटीपीचा" फक्त भारतातच बघायला मिळतो.
आणि सुमा अज्जी कुसुम अज्जीला फार प्रेमाने वागवायची. कुठेही न जाणारी कुसुम अज्जी अंकलीला यायला मात्र नेहमी तयार असायची. एरवी मुख्याध्यापिकेसारखी वागणारी अज्जी सुमा अज्जीच्या स्वयंपाकघरात चुलीशेजारी जमिनीवरच बसून तिच्याबरोबर चहा प्यायची. मला या नात्यांचं खूप अप्रूप वाटतं. माझ्या अज्ज्यांनी किती प्रकारच्या भावनांना प्रेमाचे लगाम लावले होते याचे हिशेब लागता लागणार नाहीत. आणि नात्यांमधले काही त्याग थंड आगीसारखे एकसारखे अहंकाराचे भस्म बनवत असतात. त्यापलीकडे गेलं की सगळंच चैतन्यमयी होऊन जातं. ताजी आणि कुसुम अज्जीची ही बाजू सहसा समोर यायची नाही.

सुमा आज्जीचा मळा मुडशिगीच्या मळ्यापेक्षा खूप जास्त मजेदार होता. तिच्याकडे ससे होते, गायी होत्या वर राखण करायला शिकारी कुत्रा सुद्धा होता. सश्याची पिलं हातात घ्यायला आम्हाला फार आवडायचं. आणि मळ्यातल्या कुणालाच सशांबद्दल आमच्याइतकी आपुलकी नव्हती. त्यांचे लाल-लाल डोळे, आणि गुबगुबीत पाठी फार सुंदर दिसायच्या. मळ्यातून घरी यायला बैलगाडी असायची. यापेक्षा अजून जास्त मजा काय असू शकते?
स्नेहाचं आजोळ सांगलीला आहे. एकदा सुमाअज्जी आणि तिच्या यजमानांबरोबर आम्ही (मी, मीनामामी आणि स्नेहानी) अंकली ते सांगली प्रवास बैलगाडीने केला होता. सकाळी सकाळी सुमाअज्जीने टोपलीत भाकरी, कोरडी मुगाची उसळ, कांदा, ठेचा असा नाश्ता भरून घेतला. मग बाप्पांनी बैलगाडीत आमचं सामान नीट लावलं. मग गाडीच्या चाकांमधल्या घुंगरांच्या तालावर आमची वरात सांगलीला निघाली. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ लागला असला तरी तो प्रवास मी कधीही विसरणार नाही. तसं खास काहीच नव्हतं, पण सगळंच खास होतं. रोजच्या दगदगीत, पळापळीत, जुळवाजुळवीत मला अधूनमधून नेहमी तो प्रवास आठवतो. आणि मग "हे मिळव ते मिळव" करणा-या मनाला त्याची जागा बरोबर दाखवली जाते. तसं जगात काहीच नसतं की जे मिळाल्यावर आपण कायमचे खूष होऊ, पण अशा किती गोष्टी आहेत ज्या इतक्या साध्या असून इतकी वर्षं खूष करतात.
एखाद्या थंडगार झाडाखाली बसून खाल्लेली फटफटीत मुगाची उसळ, मेथीची भाजी आणि त्याबरोबर मुठीने फोडून वाटलेला कांदा. मग त्यानंतर तिथेच काढलेली एक डुलकी! या सगळ्यापुढे आपण कोण आहोत, कुणाचे आहोत, कुठे चाललो आहोत आणि का चाललो आहोत, हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत. पण हे कळायला या सगळ्यापासून दूर जावं लागतं. रविन्द्रनाथ म्हणतात तसं, "सगळ्यात दूरचा प्रवासच आपल्याला स्वत:च्या सगळ्यात जवळ नेतो आणि प्रत्येक प्रवासी खूप अनोळखी दारे वाजवूनच स्वत:च्या आतल्या दाराकडे येऊ शकतो". पण माझ्यामधल्या खूप सा-या प्रवासांचा उदयास्त या अंकली ते सांगली प्रवासात झाला!

Thursday, November 5, 2009

मुद्दा सोडू नका!!

सगळ्या मुडशिंगीकरांना एक सवय आहे. काही खास सांगायचं असेल तर तिथपर्यंत
सरळ रस्त्यानी न जाता जोरदार नागमोडी वळणं घेत जातात. याचा मला
लहानपणापासूनच खूप राग यायचा. या सवयीचे जनक अर्थातच समस्त
मुडशिंगीकरांचे जनक वसंतराव आहेत हे सांगायला नको. पण नंतरच्या पिढीतला
मुद्दा लांबवण्यात पहिला नंबर आरूमामाचा असेल. तो कुठल्याही घरगुती
कहाणीची एकता कपूर सिरीयल करून टाकतो.
"कसं असतंय सई" अशी सुरवात तो करतो. या "कसं असतंय"चा सूर कोल्हापुरात
राहणारे लोकंच नीट वाचू शकतील.
"कसं असतंय" किंवा "त्याचं काय असतंय" याच्यापुढे कोल्हापुरी लोक नेहमी
कुठलंतरी वैश्विक सत्य सांगतात.
त्यामुळे आरूमामाच्या, "कसं असतंय सई" पुढे नेहमी घरातल्या स्त्रीगटाच्या
मानसशास्राचा सखोल अभ्यास करून काढलेला निष्कर्ष असतो. यात नेहमी मधूमामी
(राजामामाची बायको) ताजीला तिच्या बाजूला करून सुरेखामामीविरूद्ध कट करते
याचं विनोदी वर्णन असायचं. त्यात मूळ कटाचा विषय सोडून तो खूप वेळ इकडे-
तिकडे फिरायचा. मग मध्येच मी, "बरं कळलं पुढे काय झालं ते सांग आता" ,असं
म्हणल्यावर तो, "थांब गं !घाई करून माझा मोसम तोडू नकोस", असं म्हणायचा.
'मोसम' तोडणे हा "मोशन तोडणे"चा अपभ्रंश आहे. ट्रकवाले मध्येच गियर
बदलावा लागल्यामुळे कमी झालेल्या वेगाला "मोसम तोडणे" असं म्हणतात. आरूमामा
रोज संध्याकाळी त्याच्या मित्रांच्या गटात प्रवचनकाराची भूमिका
बजावायचा. अर्धा-पाऊण तासच त्याच्याबरोबर घालवायला लागल्यामुळे त्या
सगळ्यांमध्ये तो लोकप्रिय होता!
तसाच नरूमामासुद्धा एखाद्या गोष्टीचं कौतुक करायला लागला की बोलायचा
थांबतच नाही. त्याचं "माझ्याबद्दल" काय मत आहे हे मला पूर्ण ऐकवतसुद्धा
नाही. कारण त्याचं सगळं कौतुक जर खरं मानलं तर मी आत्ता जे काय करते आहे
ते करायला लागणं ही नियतीने माझी केलेली क्रूर चेष्टा आहे असं एखाद्याला वाटेल.
राजामामात आरूमामाचा वर्णनप्रभूपणा नाही किंवा नरूमामाचं मुद्दा सोडून
मार्केटींगसुद्धा नाही. राजामामा फटकळपणात पुढे आहे. कुणाला तो काय बोलेल
याचा काही नेम नाही. आणि माझे सगळे मामा आणि आजोबा फोनवर इतक्या जोरात
बोलतात की फोनशिवायसुद्धा त्यांचं बोलणं पलिकडच्या माणसाला ऐकू येईल.
आईसुद्धा काही खास बातमी असेल की तिला मागे-पुढे मीठ-मसाला लावते. पण
आईला मात्र मी "आई मुद्दा काय आहे? लवकर सांग" असं अगदी न संकोचता
सांगायचे. मग ती कधी कधी तसं केल्याबद्दल रुसून बसायची आणि सांगायचीच
नाही. मग तिची समजूत काढून थोडा मीठ-मसाला सहन करून बातमी काढून घ्यायला
लागायची.
पण सगळ्यात अतिरेकी वर्णन आजोबा करायचे. त्यांचा हस्तसामुद्रिक आणि
कुंडलीशास्त्राचा अभ्यास आहे. त्यामुळे बरेच लोक त्यांच्याकडे भविष्य
सांगून घ्यायला यायचे. पण मोठी होताना मला "ज्योतिष" हा आजोबांचा पिसारा
आहे हे लगेच लक्षात आलं. कुणीही भविष्यासाठी आलं की त्याला त्याचं भविष्य
सोडून सगळं आजोबा सांगायचे. कधी कधी मी "मी गणितात नापास नाही नं होणार?"
वगैरे जुजबी शंका घेऊन त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनी जायचे. मग ते ,
"बघतो हां, माझा पानाचा डबा आण आधी", असा हुकूम सोडायचे. मग अडकित्त्याने
सुपारी कातरत, "त्याचं काय आहे सई..." सुरू व्हायचं.
झालं, ते वाक्य आल्यावर पुढील तीन तासांचा बळी जायचा. हात बघताना ते
नेमक्या वेळेस अशी काही उत्कंठा जागृत करत असत की अगदी मराठी मालिकांच्या
जाहिरातींआधी, "थोड्याच वेळात" च्या चित्रफितीसुद्धा लाजून लाल होतील.
"हे बघ सई, हा गुरूचा उंचवटा बरंका! तुझ्या हातावर या उंचवट्यावर फुली
आहे. आणि हस्तसामुद्रिकांत कुठेही फुली असणे हे फार मोठ्या कुयोगाचे
लक्षण आहे.." तेवढ्यात त्यांच्या तोंडातली सुपारी तंबाखू त्यांना बोलणं
अशक्य करायची. मग ते मोरीकडे जाऊन येईपर्यंत माझ्या हातावरची ती फुली
माझ्या गणिताच्या पेपरावरचा गोळा बनायची.
परत आल्यावर, "हा मी काय म्हणत होतो, फुली इस द वर्स्ट साईन एनीव्हेयर
ऑन द पाम, एक्सेप्ट..." असं म्हणल्यावर त्यांचे डोळे लकाकायचे. क्षणभर
नाट्यमय शांतता आणि, "एक्सेप्ट गुरूचा उंचवटा! इथे फुली म्हणजे राजयोग
बरंका!"
यामुळे माझा जीव भांड्यात पडायचा.मी आजपर्यंत एकदाही माझं "भविष्य"
त्यांच्याकडून ऐकलं नाहीये. पण मी खूपवेळा तासंतास त्यांच्यासमोर
भविष्यासाठी बसलेली आहे. या भविष्याच्या पिसा-याकडे आकर्षित होऊन कित्येक
अजाण लोक त्यांच्या अध्यात्मावरच्या भाषणांचे गिनीपिग झालेत.
ब-याच वेळेस माझ्या अंगठ्याचा ते पाच मिनिटं अभ्यास करायचे. मग सगळ्या
प्रकारच्या अंगठ्यांचे वैशिष्ठ्य सांगायचे. त्यात शेवटी उद्दाम, क्रूर,
जुलमी, उर्मट, हट्टी आणि अप्पलपोटी माणसाचा अंगठा आणि माझा अंगठा सारखा
आहे असं मला सांगायचे. त्यापुढे लगेच हातावरच्या रेषा कर्तृत्ववान
माणसाला कशा बदलता येतात यावर अर्ध्या तासाचं भाष्य व्हायचं आणि त्यानंतर
मी माझा अंगठा कसा बदलू शकेन यावर सूचना!!
आजोबांची नेहमी माझ्याबद्दल एकच तक्रार असायची. मी त्यांना हवी तितकी
विनम्र नव्हते. आणि माझा "मुद्दा सोडू नका" हा मुद्दा त्यांना उर्मटपणा
वाटत असे. कदाचित असेलही तसं. पण आजोबांचं मुद्दा सोडणंही तितकच भीतीदायक
असायचं. एकतर त्यांचा व्यासंग दांडगा. त्यामुळे त्यांची नागमोडी वळणं
उपनिषदांमध्ये जायची. कधी बिचारी संस्कृत भाषाही कमी पडली तर ते अब्राहम
लिंकन, शॉ, चर्चिल या गो-या लोकांनाही मदतीला बोलवायचे. त्यामुळे दोन
तासांच्या अंती मी, "आजोबा आपण माझं भविष्य बघत होतो" अशी आठवण करून
द्यायचे.
चौदा पंधरा वर्षांची झाल्यावर त्यांच्या नकळत मी त्यांची सगळी भविष्याची
पुस्तकं वाचली. मग पुण्याला येऊन मी माझ्याजवळच्या खाऊच्या पैशातून आणि
आई-बाबांच्या भत्त्यातून "नवमांश रहस्य", "सुलभ ज्योतिषशास्त्र" वगैरे
पुस्तकं आणून कुडमुडी ज्योतिषीण झाले. पुढे खूप वर्षं नरूमामा त्याच्या
भविष्योत्सुक मित्रांना आधी माझ्याकडे आणत असे! मग मी त्यांना "काय
प्रश्न आहे तुमचा?" असा एकच प्रश्न विचारून त्याचं एकच उत्तर द्यायचे.
यात मला माझ्या "मुद्दा सोडू नका" आर्जवापासून मोक्ष मिळाला.
पण आता मोठी झाल्यावर समजू लागलं आहे की काही नागमोडी वळणंच मूळ मुद्दा
सुंदर बनवतात. जर सगळेच मुद्दा धरून बोलू लागले तर जगातलं खूप सारं काव्य
कमी होईल. आणि असे खूप मुद्दे असतात जे उत्सुकतेच्या हिरव्या द-यांतून,
विनोदांच्या खळखळणा-या धबधब्यांतून आणि हसून हसून डोळ्यांतून येणा-या
ओलाव्यातूनच जास्त लोभसवाणे वाटतात. त्यामुळे माझ्या नकळत मला गोष्टी
सांगायचे धडे दिल्याबद्दल या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!!