लहानपणी माझा असाच एक जिवाचा बाहुला होता. त्याचं नाव चिंटू होतं. लहानपणी "प्रतिभावंत" असण्याचं खूळ अजून डोक्यात पुरतं बसलं नव्हतं त्यामुळे "चिंटू" हे सर्वसामान्य नाव माझ्या सामान्य बाहुल्याला पुरेसं होतं. मला चिंटू फार म्हणजे फार आवडायचा. कितीही सुंदर बाहुल्या मिळाल्या तरी चिंटूची जागा कुणीही भरली नव्हती. स्नेहा पुण्याला आली की मी व ती चिंटूबरोबर खूप खेळ खेळायचो. अगदी मी बाळ असताना सुद्धा मला चटईवर चिंटूसोबत ठेवलं की मी तासंतास छान रमायचे असं अज्जी सांगते. त्यामुळे मी पाच सहा वर्षाची होईतो चिंटूची पार रया गेली होती. त्याच्या बेंबीतून खूप कापूस बाहेर आला होता. त्यामुळे वर गोबरा चिंटू खाली मात्र कुपोषित झाला होता. त्याच्या नाकाच्या जागी नुसताच नाकाचा टण्णू बाकी होता. रंग पार गेला होता. पण कसाही असला तरी मला चिंटू फार प्रिय होता. त्याला काखेत घेऊन मी घरभर फिरायचे. आई कधी कधी त्याला लपवून ठेवायची. पण मी तिचीच मुलगी असल्यामुळे एक-दोन दिवसांत काहीही कांगावा न करता त्याला शोधून काढायचे. मला खात्री होती की मला न सांगता आई त्याला फेकणार नाही. लहानपणी मोठ्यांवर कधी विश्वास ठेवायचा आणि कधी नाही याचे नियम असतात. चिंटूच्या बाबतीत माझं मत घेण्यात येईल असा माझा अंदाज होता.
मग दोन-चार दिवसाच्या अंतरावर चिंटू नेहमीच गायब होऊ लागला. एका रविवारी सकाळी मी व्हरांड्यात चिंटूला घेऊन बसले असताना आई माझ्याकडे खूप "तयारी" ने आली. "हे बघ पिल्लू हा बाहुला आता जुना झालाय. आपण तुला यापेक्षा सुंदर नवा बाहुला आणू", अशी प्रस्तावना ऐकताच मी रणांगणावर उडी घेतली. मग आईनेसुद्धा तिचा ठेवणीतला हिसका बाहेर काढला आणि सरळ चिंटूला माझ्याकडून हिसकावून घेतले. कोल्हापूरकरांना "बालमानसिकता" वगैरे शहरी प्रकार झेपत नाहीत. सर्दी किंवा दर्दी दोन्हीसाठी झणझणीत तांबडा रस्सा हे एकच औषध कोल्हापूरकर देतात. त्या नियमानुसार आईने बळाचा वापर करून चिंटूला हिसकावलं. तिनी पुढचा विचार नीटसा केला नसावा कारण मी तिच्यावर उड्या मारू लागताच तिने त्याला जोरात कुंपणापलीकडे भिरकावलं. आता एरवी, "रस्त्यात सालं टाकू नकोस" असा भुंगा लावणारी आई खुशाल बाहुल्या भिरकावू लागली आहे हे बघून मला दु:खातही हुरूप आला. पण चिंटू थेट एका अनभिज्ञ भंगारवाल्याच्या गाडीवर पडला. अचानक आभाळातून पडलेल्या बाहुल्याकडे पाहून तो ही भांबावला. मग त्या राकट भंगारवाल्यालाही पाझर फुटला. "बाई, तुमच्या मुलीची बाहुली" म्हणून तो चिंटूला घेऊन परत आला. बहुतेक तेव्हापासूनच माझा देवावर विश्र्वास बसला असेल. आईला पण "कर्म नेतं पण देव देतो" वगैरे नेहमीची वाक्य आठवली असावीत कारण तिने मला तो गुमान परत घेऊ दिला.
त्यानंतर कधीतरी आईची चिंटूला नाहीसे करण्याची इच्छा पूर्ण झाली. पण त्या प्रसंगाने मला नंतर "अचानक" गायब झालेल्या कितीतरी जुन्या कपड्यांचे दु:ख माफ करायला शिकवले. काही काही वस्तू आपण काहीही न करता आपल्याजवळ सुखरूप राहतात. जुनी पुस्तकं, जुनी पत्रं, जुन्या वह्या उघडायला मला फार आवडते. त्यात कुठेतरी घाईत कागदाच्या अभावामुळे लिहिलेला नंबर, दुमडलेलं पान, दडपे पोहे खात खात वाचत असताना पडलेला कांदा आणि त्याचं कोरडं रुपांतर हे सगळं सगळं मला आवडतं. जुन्या वस्तू जुन्या आठवणींसारख्याच असतात. नव्या मिळाल्या म्हणून त्यांची किंमत कधीच कमी होत नाही.
Proofreading: Gayatri