Sunday, May 31, 2009

नापास झालो! हा हा हा!

लहानपणी दुस-याच्या आठवणी म्हणजे आमच्या गोष्टी असायच्या! त्यात सुद्धा अामची आवड-निवड असायची!
आजोबा नेहमी "मी लहानपणी कावडीने पाणी आणायचो" ही गोष्ट सांगायचे, जी आम्हाला फारशी आवडायची नाही. आजोबांनी खूप कष्टात दिवस काढले. त्यांचे शिक्षण बरेचसे नातेवाईकांच्या घरी काम करत, संकोच करत झाले. पुढे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी क्रांतिका-यांना बरीच मदत केली. चिकूला त्यांच्या बॉम्ब बनवायच्या गोष्टी फार आवडायच्या . पण आमचं आयुष्य कसं छान आहे आणि तरी आम्ही दंगा करतो यासाठी सांगितलेल्या गोष्टी मात्र कुणालाच आवडायच्या नाहीत. पण तरी आजोबा रंगात आले की आमच्या गोलात बसून खूप कहाण्या सांगायचे. तेव्हा वाटायचं, "आपण कधी म्हातारे होणार? मग आपण पण आपल्या नातवंडांना असंच तासंतास उपदेश करू शकू!" कधी कधी आपल्याला पण कावडीने पाणी आणायला लागलं तर किती बरं होईल असंही वाटायचं. म्हणजे आजोबांच्या समोर आपण अगदीच सूक्ष्म तरी वाटणार नाही.
अज्जी मात्र खूप गमती-जमती सांगायची. तिचं माहेर भेंडे गल्लीत होतं! त्यांचा खूप मोठा वाडा होता. अज्जीला पाच भाऊ व दोन बहिणी होत्या. त्या सगळ्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकण्यात वेळ कसा निघून जायचा ते कळायचंच नाही.
मला आणि स्नेहाला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे अज्जीच्या आईचं लग्न. अवघ्या बाराव्या वर्षी तिच्या आईचं लग्न लावून दिलं. पण लग्नात छोट्या नवरीला दिलेला पेहराव आमच्या मनात अगदी कोरला गेला होता. पुढे एकदा त्या लग्नात काढलेला एकमेव फोटो बघायला मिळाला आणि अज्जीच्या वर्णन शैलीचे खूप कौतुक वाटले होते! अर्थात, ह्या गोष्टी अज्जीलाही तिच्या आईनं सांगितल्या होत्या.
छोट्या नवरीला भरजरी साडी नेसवली होती. पण पदर मात्र दिला नव्हता. खणाचं पोलकं होतं व त्यावर पदर लाजेल इतके दाग-दागिने होते. लांब चपलाहार, ठुशी, पाच पदरी जोंधळी पोत आणि त्यातून डोकावणारं मणी-मंगळसुत्र!
हातात पाटल्या, बिलवर आणि अगदी काचेच्या बांगड्यांसारखे पेरलेले गोठ! फोटोत तिचे केस मागून दिसत नव्हते पण अज्जीच्या गोष्टीत तिच्या लांब वेणीच्या प्रत्येक पेडात एक सोन्याचं पाणी दिलेलं चांदीचं फूल होतं! कानात सोन्याचे मोर होते. पायात झुपकेदार पैंजण. आणि फोटोत नवरा एका टोकाला तर नवरी कुणाच्यातरी मांडीवर दुस-या टोकाला!
याशिवाय वाड्याची रचना, वेगवेगळ्या खोल्या, त्यांचे निरनिराळे उपयोग हा सुद्धा आमच्या आवडीचा विषय होता. वाड्यात एक लोणच्यांची व पापडांची खोली होती. बंबाचे जळण ठेवण्यासाठी वेगळी खोली होती.
ताजीच्या माहेरच्या गोष्टी सुद्धा खूप छान असत. तिच्या माहेरी बग्गी होती. बग्गीत बसून शाळेला जायच्या गोष्टी सुद्धा आम्हाला फार आवडायच्या . ताजीला सुद्धा खूप भावंड होती. पण त्यांचा रंगच वेगळा होता.
कुसुम अज्जीचे भाऊ अमेरिकेच्या वा-या करणारे तर ताजीचे भाऊ पंढरपूरच्या. पण दोन्ही बाजूंची नजाकत काही वेगळीच होती. एकीकडे नाजूक लवंग-लतिका बनायच्या तर दुसरीकडे खमंग झुणका.
ताजीच्या बहिणीकडे गेलं की आधी एक घट्ट मिठी आणि शंभर एक पापे मिळायचे! मग मामा लोक शेतावर घेऊन जायचे. तिथे ससे, वासरं, मांजरं असे खूप प्राणी खेळायला मिळायचे. कुसुम अज्जीच्या बहिणीकडे गेलं की मोग-याची फुलं वापरून केलेला चहा मिळयचा! पुस्तकं वाचायला मिळायची आणि वाड्याच्या खूप गोष्टी ऐकायला मिळायच्या. कुणाकडे सतार असायची, कुणाकडे बासरी तर कुणाकडे तबला!
पण आजोबांचा एक अनुभव मात्र मला खूप उपयोगी पडला. एकदा नाचाच्या परिक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे मी परिक्षेला जायला घाबरत होते. नाचाचीच परिक्षा आहे, शाळेची नव्हे म्हणून तिला दांडी मारता येते का याची तजवीज करत होते. पण माझ्या बाबानी त्याला सक्त नकार दिला. म्हणून मी घाबरून कोप-यात बसले होते. तेव्हा आजोबांनी मला त्यांच्या वकिली परिक्षेची गोष्ट सांगितली. त्यांनी वकिलीची परिक्षा एक वर्ष काही अभ्यास न करता दिली. त्यावेळी पास झालेल्या लोकांची नावं वर्तमानपत्रात छापून येत असत. त्यांच्या भोचक शेजा-यानी आधीच पेपर वाचून खात्री करून घेतली होती. अाजोबा गल्लीत परत अाले तेव्हा जोरात अोरडून त्याने विचारले "काय वसंतराव, काय म्हणतो निकाल?"
तसं आजोबांनी उत्तर दिलं, "निकाल काय म्हणणार! नापास झालो!" आणि त्यांच्या रावण हास्याने पूर्णविराम दिला!
अजूनही कधी अपयशी होईन असं वाटलं की मी ही गोष्ट आठवते!
चिकुचं प्रगती-पुस्तक बघून कळवळणारे आजोबा मला खुशाल नापास हो म्हणून सांगायचे! कुठल्याही चाकोरीत न अडकणारा त्यांचा स्वभाव मला खूप दिवस कळलाच नव्हता! पण धीट कसं व्हायचं हे मला आई, आजोबा आणि बाबांनी लहानपणापासून नकळत शिकवलं! तसंच कुसुम अज्जीकडून छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे मोठे आनंद मिळवायला शिकले आणि ताजीने मात्र खूप हसायला शिकवलं!

Friday, May 29, 2009

झोपाळा

आमच्या कोल्हापूरच्या घराचा केंद्रबिंदू म्हणजे स्वयंपाकघर आणि गच्चीच्या मधोमध असलेला झोपाळा. घरची मोठी मंडळी त्या झोपाळ्यावर बसून महत्वाचे निर्णय घेत असत. तसंच आम्ही पोरं त्या झोपाळ्याचा झोपाळा सोडून अजून कसा वापर करता येईल यावर सतत संशोधन करत असू!
चिकू दादाला लहानपणापासून बस कंडक्टर होण्याची भारी हौस होती. त्यामुळे तो खेळात सामील झाला की झोपाळ्याची बस व्हायची! मग कधी त्याला बस चालक व्हायची हुक्की आली की कंडक्टरचे काम मी किंवा स्नेहा करायचो! भाडेकरूंच्या मुलांवर "सत्ता" गाजवायचा हा एक सोपा मार्ग होता. त्यातही चिकू वर्षभर ऐकाव्या लागलेल्या," खालच्या कौस्तुभला बघ नेहमी नव्वद टक्के मिळतात", असल्या वाक्यांचा बदला घ्यायची संधी मिळायची. मग रोज संध्याकाळी शुभंकरोती
म्हणणा-या आणि रामरक्षा घोकणा-या आमच्या गुणी भाडेकरूंना चिकू या ना त्या कारणाने छान धुवून काढत असे!
चिकू खेळात नसला की आम्ही मुली झोपाळ्याचे "घर" करायचो. चारही बाजूंनी अज्जीच्या साड्या लावून आत भातुकली मांडायची! मग शेजारच्या मुली सुद्धा त्यांची भातुकली आणायच्या. मुलींचे खेळ तसे न्याय्य असायचे! जिची भातुकली सगळ्यात जास्त ती घरातले "महत्वाचे" निर्णय घेणार. यात नेहमी स्नेहाच जिंकायची पण कुणी कधी त्यावर आक्षेप घेतला नाही. मग एकीचा फ्रीज,एकीचा मिक्सर अशा विविध उपकरणानी आमचे घर सजायचे. जर भांडण झालं तर रीतसर वाटणी होऊन मुली आपापल्या घरी परतायच्या. आमच्या खेळात नाक मुरडणे, "चोमडी" म्हणणे, किंवा अगदीच टोकाला गेलं तर बोचकारणे या पलीकडे कधी भांडण जायचे नाही.
एकदा मनिमाऊच्या पिल्लाचं बारसं पण घातलं होतं झोपाळ्यावर. मला व स्नेहाला अज्जीने साड्या नेसवून दिल्या. आदल्या दिवशी आम्ही पाळणा पाठ केला! कांदेपोहे, जिलेबी आणि वेफर्स असा बेत होता! चिकूला जिन्यातून येणा-या लोकांना (न मारता) अत्तर लावायचे काम दिले होते. झोपाळ्याला शेवंतीच्या फुलांनी सजवण्यात आलं. मी व स्नेहा "बाळाच्या" दोन आत्या झालो होतो. पण आधी पिल्लू पलंगाखाली जाऊन बसल्यामुळे दोघींच्याही साड्या सुटायची वेळ आली. नंतर बाळ व बाळाच्या आईला आमचे वर्तन न आवडल्यामुळे अर्ध्या बारशातून त्यानी बाहेर धाव घेतली. पण त्या निमित्ताने सगळे भाडेकरू जमले व अज्जीचे खूप कौतुक झाले!
कधी झोपाळ्यावर बसून मी व स्नेहा "अपर्णा तप करिते काननी" हे गाणं म्हणायचो. हे एकच गाणे आम्ही सगळीकडे एकत्र म्हणून दाखवायचो!
पण झोपाळ्याचा सगळ्यात मोठा फायदा पावसाळ्यात व्हायचा. पावसाने पाट कुजू नये म्हणून नरू मामा बॅंकेत जाताना पाट काढून आडोशाला ठेवायचा. मग आम्ही पोरं दुपारी मोठी माणसं झोपली की पावसाच्या पाण्यात साबणचुरा ओतायचो! निसरड्या फरशीवर साखळ्यांना धरून ढकलगाडी खेळायचो! या खेळाने "टेंगूळ" या व्याधीशी आमची छान ओळख करून दिली! असला असुरी खेळ खेळताना आरडा-ओरडा न करणे अशक्य होते. त्यामुळे मामी नेहमी जागी होऊन बाहेर यायची. तिचा साबणचुरा वापरून केलेल्या या उपक्रमामुळे काही विचार न करता आधी चिकूला चार मोठ्ठे धपाटे बसायचे. मग स्नेहाला दोन. मला व इतर मुलांना मार मिळायचा नाही. मग स्नेहा आ वासून रडू लागायची! मलाही धपाटा मिळाला असता तर बरं झालं असतं असं मला नेहमी वाटायचं. पण निदान रडण्यात तरी स्नेहाला मदत करावी म्हणून मी पण भोंगा पसरायचे. या आवाजाने अण्णा अजोबा जागे होऊन बाहेर येत असत.
मग, "काय गं मिने. मुलं आहेत तुझी की माकडं?" असा सवाल व्हायचा. त्यानी मामीचा पारा अजून चढायचा आणि परिणामी चिकूला अजून दोन धपाटे मिळायचे!
अण्णा आजोबा पु.ल. म्हणतात तसं, "भूगर्भशास्त्रापासून ते गर्भशास्त्रापर्येंत" सगळ्या प्रकारचे अपमान करायचे! त्यामुळे त्यांच्याकडून फार लहानपणी मी जसं "वासांसी जीर्णानि" अर्थ माहित नसताना शिकले तसंच "अमकीच्या" "तमकीच्या" सुद्धा काही माहित नसताना शिकले!
चिकूला तर ते काही कारण नसताना "चिक्या ..." म्हणून येता-जाता चोप देत असत. तो सुद्धा यथावकाश बाहेर जाऊन एखाद्या बटूला पकडून "सराव" करीत असे! पण गोब-या गालाचा गोंडस चिकू दादा जेवायला बसला की आजोबांचा राग पळून जायचा ! नातवंडांना जेवताना बघून आजोबांना फार आनंद व्हायचा. त्यामुळे कधी झोपाळ्यावर तूप-साखर पोळी घेऊन वानरसेना जेवायला बसली की दुपारी केलेली खोडी माफ व्हायची !

Monday, May 4, 2009

माऊताई

कुसुम अज्जीला मांजरांचा फार लळा होता. अगदी माझ्या लहानपणीच्या पहिल्या आठवणीत सुद्धा तिची काळीभोर मांजर आहे. तिच्या मागून म्यावत जाणा-या अनेक माऊताया मलाही वेड लावून गेल्या. अज्जीची मांजर मात्र नेहमी "माहेरवाशीण" नाहीतर "बाळंतीण" असायची! मे महिन्याच्या सुट्टीत जर मांजर थोडी आडवी आणि जगाला कंटाळलेली वगैरे दिसली की आमच्या चौकश्या सुरु होत.
"अज्जी माऊला बाळं होणारेत का गं?"
मग उगीच रोज "कधी होणार माऊला बाळ?" हा प्रश्न टाळायसाठी अज्जी आम्हाला थाप मारायची.
"नाही. तिला बरं नाहिये. म्हातारी झालीये ती. त्रास देऊ नका तिला. खेळायला पळा बघू!"
ह्या उत्तराचा अर्थ आमच्या भाषेत, "होय तिला बाळ होणार आहे. पण कधी मला माहित नाही." असा असायचा.
मग रोज एकदा तरी तिची विचारपूस व्हायची. कधी ती ऊन खात निवांत बसली असेल तेव्हा तिच्यासमोर आम्ही दोघी मांडी घालून बसायचो. मग मी हळूच तिच्या पोटावरून हात फिरवायचे. तशी ती डोळे किलकिले करून मला धन्यवाद द्यायची! कधी कधी मात्र तिला आमचा सहवास अगदी नको वाटायचा. मग कुरवाळायला गेलं तरी फिस्सकन अंगावर यायची आणि बोचकारायची! पण आमच्या घरात मांजरीचे बोचकारणे हे गुडघा सोलवटणे, दाराच्या फटीत बोट अडकणे, झोपाळ्यावरून पडून कपाळावर टेंगूळ येणे या सदरात यायचे. त्यामुळे कुठल्याही वेळी हातावर मांजरीच्या बोचकारण्याचे दोन तीन ओरखडे तरी नक्कीच असायचे! आमच्या नाही तर रस्त्यावरच्या!
रोज स्नेहा मला उठवायला अज्जीच्या खोलीत यायची. पण मी काही केल्या दाद द्यायचे नाही. मग तिचा रोजचा खेळ असायचा. "सयडे ऊठ! मांजरीला पाच पिल्लं झालीत! एक पूर्ण पांढरं आहे!"
तशी मी ताडकन उठायचे. पण तिचा रोजचाच खेळ असल्याने नंतर मला त्याची सवय व्हायची. मग एक दिवस रात्री माऊताई घर डोक्यावर घ्यायची! अजोबा आधीच तयार करून ठेवलेलं खोकं बाहेर काढायचे. मी व स्नेहा अज्जी-अजोबाना मदत करायचो. अज्जीची मऊ सुती साडी घालून तिला पलंग करून द्यायचो. मग ती ओरडत ओरडत त्यात जाऊन बसायची. मग अज्जी-अजोबा आमची हकालपट्टी करायचे.
"झोपायला जा आता. उद्या सकाळी पिल्लं तयार होतील."मग आम्ही जिवावर आल्यासारखं झोपायचो. सकाळी उठल्या उठल्या आधी अजोबांच्या खोलीत धाव घ्यायचो. माऊताईच्या खोक्यात चार सुंदर पिल्लं असायची तिला चिकटलेली, डोळे घट्ट मिटलेली! त्यातलं एखादं पाळण्यातच पाय दाखवायचं. सगळ्यांवर हल्ला करून दूध प्यायला पुढे जाणारं! नेहमी एखादं गरीब, अशक्त पिल्लू असायचं ज्याला माऊताई सगळ्यांपेक्षा जास्त सांभाळायची!
मग काय! आमचे सगळे खेळ बरखास्त व्हायचे. आजोबांच्या खोलीत ठाण मांडून अाम्ही पिल्लं काय काय करतात ते बघत बसायचो. अगदी जेवायचं सुद्धा भान नसायचं. अज्जी मुद्दाम आजोबांच्या खोलीत माऊचा दवाखाना थाटायची कारण आजोबांचा आमच्यावर थोडा धाक होता! पण त्यांना व्यायाम करायची सुद्धा पंचाइत व्हायची अामच्या लुडबुडीमुळे!
मग दोन-तीन दिवस माऊताईचा विश्वास कमविण्यासाठी तिला "बेड-मिल्क" मिळायचं आमच्याकडून. दूध प्यायला बाहेर पडली की आधी ती जरा काळजितच असायची. पण मग आम्ही फक्त लांब राहून तिची पिलं पाहतो हे कळल्यावर ती थोडे पाय मोकळे करायला पण जाऊन यायची. तेवढ्यात आम्ही सगळ्या पिलांना उचलून बघायचो. मांजर की बोका हे शोधून काढायचो! मग दंगेखोर नेहमी बोका असायचा आणि नाजूक पण काटक नेहमी छोटी मनिमाऊ असायची. त्यांचे गोरे गोरे पंजे, दुधाळ मिशा, आणि त्यात घट्ट मिटलेल्या डोळ्यांचा तो अवतार बघून खूप गंमत वाटायची. बावीस दिवसांनी पिलांचे डोळे उघडतात. कधी कधी त्याच्या आतच माझी शाळा सुरु व्हायची. मग मला स्नेहाचा खूप राग यायचा. कारण मी गेले कि त्या पिलांवर तिचं राज्य असणार! मला तशी मिटलेली पिलं सोडून जाताना फार फार दु:ख होत असे. तसं दु:ख मला भारत सोडतानासुद्धा झालं नसेल!
पण मग स्नेहा मला छान पत्र लिहायची. त्यात सगळ्या पिलांच्या सगळ्या सवयी सांगायची! फार छान वाटायचं ते पत्र वाचून. शाळेतून जड दप्तर घेऊन घरी आल्यावर तिचं पत्र वाचायला खूप मजा यायची. सुट्टीहून परत आलं की खूप दिवस माझं शाळेत मनच लागायचं नाही. तशा पुण्यातही माझ्या खूप मैत्रिणी होत्या. पण स्नेहाची सर कुणालाच नव्हती. आणि पुण्यात आलं कि मी पण "भरतनाट्यम्" करणारी, भाषणे करणारी, कविता म्हणून दाखवणारी मुलगी व्हायचे. मग शाळेतले चेहरेसुद्धा "बटाट्यासारखा दिसणारा पोहणारा मुलगा", किंवा चोमडी हुषार मुलगी असे वाटायचे. त्यातल्या कुणालाच मी माऊच्या खोक्यापर्येंत नेलं नसतं. पण मग जसा अभ्यास वाढायचा तसा मांजरांचासुद्धा विसर पडायचा. मग पुन्हा डोळे सुट्टिकडे लागायचे!