Sunday, February 21, 2010

पावसाच्या कला

लहानपणी नेहमी जुलै महिना सुरु व्हायची मी खूप आतुरतेने वाट बघायचे. एकवीस जुलैला माझा वाढदिवस असतो. तो जवळ येईल तशी माझी कळी खुलत जायची. पण जुलैतला पाऊस आईला मात्र बेजार करून टाकायचा. माझ्या वाढदिवसाची तयारी नेहमी लक्ष्मी रोडवरचा चिखल तुडवत सुरू व्हायची. पावसाचं ते बालिश किरकिर करणारं रूप माझ्या मनाच्या कोपर्‍यात खूप खोलवर रुतून बसलं आहे. जशी मी होते तसाच पाऊस होता. मधेच पिरपिर करणारा, मग मनासारखं झालं नाही की बळंच आभाळ काळं करून रुसून बसणारा! कधी आईनी महागाचा फ्रॉक घ्यायला नकार दिला की धो धो कोसळणारा. पण कसाही असला तरी तेव्हा मला पाऊस फार आवडायचा. जुलैच्या एक तारखेपासून डक बॅगचा रेनकोट घालून शाळेत जायची वेगळीच मजा असायची. या महिन्यात आपला वाढदिवस, मग सगळ्या वर्गाला आपण गोळया आणि पेन्सिली वाटणार! आपल्या घरी आपल्या खास मैत्रिणी येणार! या सगळ्या विचारांत ते वीस भिजलेले दिवस भुर्रकन उडून जायचे.
कोल्हापूरचा पाऊस पुण्याच्या पावसापेक्षा खूप वेगळा असायचा. तिकडच्या कौलारू घरांवर तो लावणीतल्या एखाद्या ढोलकीवाल्यासारखा बरसायचा. मग थोडा उघडला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला बुचाच्या फुलांचा सडा पडायचा. अज्जीबरोबर त्या दोन पावसांच्या मधल्या वेळेत बाहेर जायला फार मजा यायची. मग रस्त्याकडेला कुडकुडत बसलेल्या एखाद्या केविलवाण्या कुत्र्याची मला पोटातून दया यायची. आणि, "अज्जी तू इतकी कठोर कशी होऊ शकतेस गं?" या मूलभूत प्रश्नावर आमच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. मग शेवटी कुत्रा मोठा झाला की घरच्या माऊला खाऊन टाकेल या वाक्याने समेट व्हायचा. तो पाऊस मला खूप आवडायचा. तो जर माणसाच्या रूपात आला असता नं तर आमच्या पुण्यातल्या शेजारच्या चित्रे बाबांसारखा असता. खादीचा झब्बा घातलेला, चष्मेवाला आणि खूप खूप प्रेमळ. पुण्यातला पाऊस तसा तुसडा असायचा. रिक्षावाल्यांच्या आणि "पादचार्‍यांच्या" हुज्जतीसारखा! त्याला पडायला अशी मोकळी जागाच मिळायची नाही. मग जिथे पडायचा तिथे गृहपाठाच्या वहीतून फाडलेल्या कागदांच्या बोटी सोडून जायचा बिचारा.
स्नेहानी आणि मी असे किती पावसाळे पहिले एकत्र. पण प्रत्येक वर्षी आमच्याबरोबर पाऊसही मोठा व्हायचा. गॅलरीतल्या पत्र्यावरून पाऊस पकडायचे दिवस सरले आणि त्याच गॅलरीत आम्ही तासंतास पावसाशी गप्पा मारू लागलो, न भेटलेल्या सख्याशी माराव्यात तशा.
लहानपणी चिखलात खेळायला बोलावणारा पाऊस अचानक कविता बनू लागला. कधी खूप दिवसांच्या पावसानंतर कपड्यांना, केसांना तो न सांगता येण्यासारखा थंड वास यायचा. अशावेळी मात्र पाऊस खिन्न वाटायचा. मनात "पाऊस कधीचा पडतो" वाजू लागायचं! आणि मग पावसाच्या गार थेंबामध्ये माझ्या डोळ्यातले गरम थेंब मिसळायचे. पण तो एकाकी कवी पाऊसही मला फार आवडायचा. अशावेळी आल्याचा चहा मनावरचं ते अबोल ओझं घालवायला खूप मदत करायचा.
एखाद्या दिवशी असा पाऊस पडला पुण्यात, की मी कॉलेजला दांडी मारून माझ्या खोलीतल्या खिडकीत वाचत बसायचे पावसाबरोबर. तेव्हा माझ्या पुस्तकातल्या गोष्टीबरोबर पाऊसही हळवा व्हायचा. विसाव्या वर्षापर्यंत पाऊस फार छंदी होता. पुढे पावसाच्या मनस्वीपणाची सवय झाली. आणि पाऊस काहीही म्हणत असला तरी आपलं काम करत राहायची (वाईट) सवय लागली.
तसा भारतातला चार महिने गुंतवणारा व्यावसायिक अभिनेता-पाऊस कुठे आणि ब्रीस्बनमधला उन्हाळ्यात पाट्या टाकायला येणारा पाऊस कुठे! इथला पाऊस मेला अरसिक, आडदांड! नेमका पडायच्या वेळेला पडतो आणि काम चोख करून जातो. पण तो जर मानवी रूपात आला तर इकडच्या धटिंगण कामगारासारखा येईल. तरीही मला तो आवडतोच. त्याच्या रुक्ष रूपातही कुठेतरी लय सापडते आणि मग थेट कोल्हापूरच्या पावसाची आठवण होते.
वाटतं, शेवटी वर्षानुवर्षं पृथ्वीवर तोच पाऊस पडतोय की!! मग आत्ता जो या छत्रीची छेड काढू पाहतोय तो कदाचित कोल्हापूरचाच खट्याळ पाऊस असेल! मला शोधत आलेला. :)

Sunday, February 14, 2010

अमेया

जशी सुट्टी सुंदर असायची तशाच शाळेतल्या काही गोष्टीदेखील होत्या. मी दहा वर्षांची असताना माझी शाळा बदलली. आधीच्या शाळेत माझी खूपच वट होती त्यामुळे अचानक पुन्हा मी "कुणी नाही" या पदावर आल्यामुळे खूप त्रासले होते. तशा मला काही मैत्रिणी होत्या पण अजून जिवाभावाचं कुणीच नव्हतं. नव्या शाळेतली पहिली दोन वर्षं दर सोमवारी माझ्या हृदयावर एक मोठ्ठा दगड येऊन बसायचा. उठल्या उठल्या शाळेला जायचं या विचारानं माझे डोळे भरून यायचे. आणि शाळेची वेळ जशी जवळ यायची तसे माझे पाय कुठल्यातरी अदृश्य ओझ्याने जड व्हायचे. शाळेतला "तिचा" गट मात्र शाळेच्या घंटेची आतुरतेने वाट पहायचा. ती आणि तिच्या पाच "उर्मट" मैत्रिणी. सदैव दंगा करणे, सगळ्यांची टर उडवणे, वर्गात मध्येच फिदीफिदी हसणे, मग बाहेर हकालपट्टी झाली की तिथेही काहीतरी आचरट प्रताप करणे हा त्यांचा दिनक्रम होता. पण अभ्यासात मात्र सगळ्या हुषार!! मला नेहमी वाटायचं आपल्यालाही अशा मैत्रिणी हव्या. त्यातल्या त्यात तिच्यासारखी एक तरी! ती म्हणजे अमेया!!
मग सातवीत गेल्यावर एका सहामाही परीक्षेनंतर मराठी, इंग्लिश, हिंदी या सगळ्या विषयांच्या बाईंनी माझे निबंध वर्गात वाचून दाखवले होते. सगळ्या भाषांत मला खूप छान मार्क होते. त्या दिवशी मी आजाराचं नाटक करून शाळेला गेलेच नव्हते. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्या गेल्या अचानक सगळेजण माझे अभिनंदन करू लागले. अमेयासुद्धा येऊन मला माझे निबंध खूप आवडले असं सांगून गेली! त्या दिवसानंतर हळू हळू खरंच माझी आणि तिची मैत्री जमू लागली. मग सातवीतून आठवीत जाताना समारोपाच्या वेळी मी "अमेयाच्या" गटाबरोबर सगळ्या बाईंसाठी कविता केल्या. आणि आठवीत नव्या शाळेत मात्र मी माझ्या नव्या गटाबरोबर गेले!
मग त्यांच्या दंग्याला एक नवीन साहित्यिक कलाटणी मिळाली!! नाटकं लिहिणे, ती बसवणे यात आमचा वेळ मजेत जाऊ लागला. त्या "कलेच्या" उपासनेपोटी आम्ही वर्गातल्या मुलांशीही दोस्ती केली. :)
आणि अमेया आणि मी हळू हळू खास मैत्रिणी होऊ लागलो. अर्थात आजूबाजूच्या (जालीम) दुनियेला हे आवडलं नाही हे सांगायला नकोच. मग माझ्या कपाळी दोन मैत्रिणींची मैत्री "तोडल्याचा" आरोप होऊ लागला. विविध स्तरांवर शीतयुद्धं सुरु झाली आणि हे ओळखून मी माघार घेतली. :) पण यामुळे एक नवीनच गम्मत झाली. अमेया मला पत्रं लिहू लागली. शाळेत तिला तिच्या "खर्‍या" खास मैत्रिणीला वेळ द्यावा लागे त्यामुळे आम्हांला कधीच फार वेळ बोलता येत नसे. मग ती घरी जाऊन गृहपाठ झाला की मला पत्र लिहायची. मनातल्या सगळ्या चिंता, गुपितं त्या चिठ्ठीत मोकळी करायची. आई कशी धाकात ठेवते, बाबा कसे लाड करतात, अशा अनेक गोष्टी सांगायची. दुसर्‍या दिवशी ती चिठ्ठी वहीच्या कव्हर आणि पुठ्ठ्याच्या मध्ये अलगद सरकवून मला सरळ वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा हातातून पाठवायची. मग मी त्या चिठ्ठीला उत्तर आणि त्यात माझी भर घालून दुसर्‍या दिवशी तीच वही परत करायचे. :) त्या सगळ्या चिठ्ठ्या मी अजून ठेवल्या आहेत. मी कोल्हापूरला गेले की अमेया मला "उघड" पत्र लिहायची. तिचं पत्रं माझ्या कोल्हापूरच्या जगात खूप परकं वाटायचं. पुण्यातल्या कुठल्याही मैत्रिणीला माझ्या त्या जगात जागा नव्हती. आणि अचानक माझ्या दुसर्‍या दुनियेतून आलेलं हे पत्रं बघून स्नेहासुद्धा गाल फुगवून बसायची.
पण आज्जीला मात्र फार फार आनंद व्हायचा.
" ए साय, तुझ्या मैत्रिणीचं पत्रं आलंय बघ!" म्हणून मला ते फुगलेलं फिकट पिवळं पाकीट आणून द्यायची. ते देताना माझ्यापेक्षा तिच्या डोळ्यात जास्त आनंद असायचा. आपल्या तेरा वर्षांच्या नातीला कुणीतरी इतकं मनापासून पत्रं लिहितंय हे बघून कदाचित तिला तिचं आज्जीपण सार्थ झाल्याचा आनंद होत असेल! मग मी ते वाचून कधी कधी विसरून जायचे. आज्जी मग मला आठवण करून द्यायची उत्तर पाठवायची. तो सगळा सोहळा आठवला की अजून डोळे भरून येतात. आज्जीच्या खिडकीत बसून, मिळेल त्या कागदावर पेनाचं झाकण चावत चावत लिहिलेली सगळी पत्रं आठवतात!! मधेच, "अज्जी काच "कवड्या" की "कौड्या" गं?" असे प्रश्न विचारले जायचे. मग नेहमीप्रमाणे मराठीचा कंटाळा करून इंग्लिशमध्ये पूर्ण करायचे. ती ही पत्रं येताना बरोबर घेऊन यायचे. :)
पत्रांच्या साखळ्या फार बिलंदर असतात. आपल्या निरुपद्रवी रूपाने त्या खूप छान भुलवतात. आणि एक दिवस अचानक आपल्याला त्यांनी घट्ट बांधून ठेवलं आहे हे लक्षात येतं. तसंच काहीसं झालं. शाळा सुटली आणि आमच्या खास मैत्रिणींच्या खास असण्याच्या परिभाषाही बदलल्या. पण आमचं पत्रप्रेम काही संपलं नाही. कागदाची जागा नंतर मोबाईल फोनने घेतली. पण फोन करण्यापेक्षा आम्हाला एस एम एस पाठवणेच जास्त प्रिय होते. अजूनही आम्ही पत्रं लिहितो. आता चिंतांचे परीघ वाढले आहेत, आणि स्वप्नांनाही आताशा वास्तवाच्या नाजूक किनारी लागल्या आहेत. पण ते सगळं पत्रांत गुंफणारे हात अजून त्याच उत्कटतेने चालतात. आणि ते वाचणारे डोळेही त्याच हळवेपणाने ओलावतात. अशी मैत्रीण मिळण्यासाठी नक्कीच मागच्या जन्मीचं संचित लागत असणार. हे नातं अनुभवलं की या सगळ्या जन्मोजन्मीच्या नात्यांवर विश्वास ठेवावासा वाटतो.
तिची आठवण येत नाही असा खूप थोडा काळ असतो माझ्या दिवसात. पण तिची आठवण आली की नेहमी मला शांताबाईंची कविता आठवते.
एक तरी मैत्रीण हवी
कधीतरी तिच्यासंगे कडकडून भांडायला
मनामधल्या सार्‍या गमती तिच्यासमोर मांडायला!
एक तरी मैत्रीण हवी
शाळेमधे एका डब्यात एकत्र बसून जेवायला
घासामधला अर्धा घास अलगद काढून ठेवायला!
एक तरी मैत्रीण हवी
झाडाखाली गुलगुल गोष्टी किलबिल किलबिल बोलायला
कधी कधी लाडात येऊन गळ्याची शप्पथ घालायला!

Thursday, February 4, 2010

सुरवंट

या वेळेची उन्हाळ्याची सुट्टी मी कोल्हापुरात आणि पुण्यात घालवली. अज्जी नसेल ही कल्पना होती, पण ती नसल्यामुळेच कदाचित तिचं अस्तित्त्व अजूनच जाणवलं. तिच्या रिकाम्या खोलीत मला माझ्यातली नुकतीच रिकामी झालेली जागा दिसली. तिच्या कपाटावर आजोबांच्या रेल्वे पासची तारीख तिने खडूने लिहून ठेवली होती. ती गेल्यानंतर असंख्य न पुसता येणा-या आठवणींमध्ये ते मोत्यासारखं टपोरं अक्षरही सामील झालं आहे. ते बघून वाटलं, या अक्षरांभोवती लोखंडी कुंपण घालावं, कारण हे काढणारे साय-भाती हात आता कधीच परत येणार नाहीत. तिनं माझ्यासाठी ठेवलेल्या वस्तू मी माझ्याबरोबर घेऊन आले. एकोणीसशे साठ साली आईच्या मामांनी तिला मोस्कॉहून पाठवलेलं आफ्रिकन जंगल आणि एकोणीसशे अडुसष्ठ साली आईच्या मावशीने पाठवलेलं बाहुलीचं पुस्तक! ते उघडताना अजूनही कानात अज्जीचा, "हळू बरंका! खूप जुनं आहे ते!" असा आवाज ऐकू येतो.
तिच्या खोलीत वरती कौलं आहेत. त्या कौलांतून सुरवंट खाली पडायचे. थेट पाठीवरती. मग सकाळी उठल्या उठल्या मी भोंगा पसरायचे. सुरवंटाचे केस टोचले की त्वचेची लाही होते. त्यात जर पाठीवर असेल तर काही विचारूच नका. आमच्या झोपाळ्याच्या समोर एक अपूर्ण भिंत होती. त्यावरच्या रखरखीत दगडांवर पाठ घासून थोडा आराम मिळायचा. तसे नेहमीचे काळे सुरवं आम्ही खूप क्रूरतेने चिरडायचो. पण कधी एखादा हिरवागार सुरवंट यायचा. त्याला लगेच काड्यापेटीत टाकायचो. सुरवंटाचं फुलपाखरू होतं हे अज्जीनीच सांगितलं होतं आम्हांला. मग काड्यापेटीतल्या सुरवंटाचं फुलपाखरू करायची स्वप्नं बघायचो आम्ही. त्याला तुतूची पानं खायला घाल, कधी पिकलेले तुतूही त्याला द्यायचो. पण असं फुलपाखरू होत नाही हे अज्जीनी समजवायचा प्रयत्न केला.
"त्याला स्वत:हून वाटलं पाहिजे गं, की बास झाला आता हा सुरवंटपणा! आता आपण उडायला हवं!"
"पण अज्जी, फुलपाखरू किती सुंदर असतं! मग सुरवंट लवकर का नाही होत फुलपाखरू?"
"जसा पावसाळा येतो खूप मोठ्या उन्हाळ्यानंतर तसंच आहे! ती वेळ यावी लागते!"
मग कधीतरी आम्ही कंटाळून सुरवंटाला विसरून जायचो आणि अज्जी त्याला हळूच सोडून द्यायची.
कधी गांगरलेल्या संध्याकाळी पाठीवरचा सुरवंट डोळ्यावाटे वाहायचा. उगीच का रडतेस? हा प्रश्न सोडवून द्यायचा. कधी कौलांतून पकडलेले सगळे सुरवंट स्नेहाच्या कंपासपेटीत रांगेत झोपायचे. पण बिचारे नुसतेच गुबगुबीत! आमच्यासारख्या बलदंड राक्षसांपासून कोण वाचवणार त्यांना? कधी चुकून कौलातून पडून जो काय त्रास व्हायचा त्यांचा तेवढाच! बाकी आपले मजेत पानं खात जगायचे. पण फुलपाखरांचा काय दिमाख! घामाघूम होऊन मागे धावून फक्त एकदा पंख बोटाला लागायचे. पण तेवढ्यातही बोटांवर पिवळा केशरी रंग सोडून जायचे. परत कधी होणार हाताला पंख स्पर्श या विचारात कितीतरी अधमुरल्या संध्याकाळी निघून जायच्या. आणि जमिनीला घट्ट चिकटलेल्या पायांना ती सगळी मखमली फुलपाखरं वेडावून दाखवायची!
तिच्या खोलीत झोपताना, तिच्या खिडकीत बसताना या सगळ्याची खूप आठवण झाली. आणि वाटलं, अज्जीसुद्धा तिचं सुरवंटपण संपवून फुलपाखरू झाली. तिच्या पंखांचे सात रंग माझ्या बोटांवर सोडून!!