Monday, July 20, 2009

चिंटू

मला लहानपणापासूनच घरात जुने जुने कपडे घालायची सवय आहे. जुन्या कपड्यांना काही वेगळीच ऊब असते. नव्याला त्याची सर नाही.एखाद्या जुन्या कुडत्यात शरीराचं शरीरपण नाहीसं होतं. मग आपले हात, आपलं पोट, सगळं त्या कुडत्यात विलीन होतं. कुडता व आपण एकमेकांना छान ओळखू लागतो. त्यामुळे जुने कपडे घालून घरात बसून रहायला मला अजुनही खूप आवडते. मग त्याला कुठेतरी एखादं भोक पडलंय, त्याचा रंग फिका झालाय, त्याची मूळ बटणं जाऊन तिथे मिळतील ती, जमतील तशी लावलेली बटणं आहेत हे सगळेच मुद्दे गौण असतात. आईला मात्र माझ्या या सवयीचा अतिशय तिटकारा होता. नव्हे, अजूनही आहे. ती घरी असेल तेव्हा मी शाळेला गेल्या गेल्या माझे न आवडणारे जुने कपडे ती नेस्तनाबूत करायची. मग घरी परत आल्यावर कपाटात ते कपडे मिळाले नाहीत की मी जोरदार भोंगा पसरायचे. या वेळी भारतातून परत येताना मी माझे काही खास जुने कपडे आणले आहेत. परंतु  इथेही माझ्या कुडत्यांना पडलेल्या भोकांना डिवचून त्यांना फाडणारी घर-सखी मला मिळाली आहे. त्यामुळे नशीब कुठेही आपली पाठ सोडत नाही यावर माझा हळू हळू विश्वास बसू लागला आहे. 
लहानपणी माझा असाच एक जिवाचा बाहुला होता. त्याचं नाव चिंटू होतं. लहानपणी "प्रतिभावंत" असण्याचं खूळ अजून डोक्यात पुरतं बसलं नव्हतं त्यामुळे "चिंटू" हे सर्वसामान्य नाव माझ्या सामान्य बाहुल्याला पुरेसं होतं. मला चिंटू फार म्हणजे फार आवडायचा. कितीही सुंदर बाहुल्या मिळाल्या तरी चिंटूची जागा कुणीही भरली नव्हती. स्नेहा पुण्याला आली की मी व ती चिंटूबरोबर खूप खेळ खेळायचो. अगदी मी बाळ असताना सुद्धा मला चटईवर चिंटूसोबत ठेवलं की मी तासंतास छान रमायचे असं अज्जी सांगते. त्यामुळे मी पाच सहा वर्षाची होईतो चिंटूची पार रया गेली होती. त्याच्या बेंबीतून खूप कापूस बाहेर आला होता. त्यामुळे वर गोबरा चिंटू खाली मात्र कुपोषित झाला होता. त्याच्या नाकाच्या जागी नुसताच नाकाचा टण्णू बाकी होता. रंग पार गेला होता. पण कसाही असला तरी मला चिंटू फार प्रिय होता. त्याला काखेत घेऊन मी घरभर फिरायचे. आई कधी कधी त्याला लपवून ठेवायची. पण मी तिचीच मुलगी असल्यामुळे एक-दोन दिवसांत काहीही कांगावा न करता त्याला शोधून काढायचे. मला खात्री होती की मला न सांगता आई त्याला फेकणार नाही. लहानपणी मोठ्यांवर कधी विश्वास ठेवायचा आणि कधी नाही याचे नियम असतात. चिंटूच्या बाबतीत माझं मत घेण्यात येईल असा माझा अंदाज होता. 
मग दोन-चार दिवसाच्या अंतरावर चिंटू नेहमीच गायब होऊ लागला. एका रविवारी सकाळी मी व्हरांड्यात चिंटूला घेऊन बसले असताना आई माझ्याकडे खूप "तयारी" ने आली. "हे बघ पिल्लू हा बाहुला आता जुना झालाय. आपण तुला यापेक्षा सुंदर नवा बाहुला आणू", अशी प्रस्तावना ऐकताच मी रणांगणावर उडी घेतली. मग आईनेसुद्धा तिचा ठेवणीतला हिसका बाहेर काढला आणि सरळ चिंटूला माझ्याकडून हिसकावून घेतले. कोल्हापूरकरांना "बालमानसिकता" वगैरे शहरी प्रकार झेपत नाहीत. सर्दी किंवा दर्दी दोन्हीसाठी झणझणीत तांबडा रस्सा हे एकच औषध कोल्हापूरकर देतात. त्या नियमानुसार आईने बळाचा वापर करून चिंटूला हिसकावलं. तिनी पुढचा विचार नीटसा केला नसावा कारण मी तिच्यावर उड्या मारू लागताच तिने त्याला जोरात कुंपणापलीकडे भिरकावलं. आता एरवी, "रस्त्यात सालं टाकू नकोस" असा भुंगा लावणारी आई खुशाल बाहुल्या भिरकावू लागली आहे हे बघून मला दु:खातही हुरूप आला. पण चिंटू थेट एका अनभिज्ञ भंगारवाल्याच्या गाडीवर पडला. अचानक आभाळातून पडलेल्या बाहुल्याकडे पाहून तो ही भांबावला. मग त्या राकट भंगारवाल्यालाही पाझर फुटला. "बाई, तुमच्या मुलीची बाहुली" म्हणून तो चिंटूला घेऊन परत आला. बहुतेक तेव्हापासूनच माझा देवावर विश्र्वास बसला असेल. आईला पण "कर्म नेतं पण देव देतो" वगैरे नेहमीची वाक्य आठवली असावीत कारण तिने मला तो गुमान परत घेऊ दिला. 
त्यानंतर कधीतरी आईची चिंटूला नाहीसे करण्याची इच्छा पूर्ण झाली. पण त्या प्रसंगाने मला नंतर "अचानक" गायब झालेल्या कितीतरी जुन्या कपड्यांचे दु:ख माफ करायला शिकवले. काही काही वस्तू आपण काहीही न करता आपल्याजवळ सुखरूप राहतात. जुनी पुस्तकं, जुनी पत्रं, जुन्या वह्या उघडायला मला फार आवडते. त्यात कुठेतरी घाईत कागदाच्या अभावामुळे लिहिलेला नंबर, दुमडलेलं पान, दडपे पोहे खात खात वाचत असताना पडलेला कांदा आणि त्याचं कोरडं रुपांतर हे सगळं सगळं मला आवडतं. जुन्या वस्तू जुन्या आठवणींसारख्याच असतात. नव्या मिळाल्या म्हणून त्यांची किंमत कधीच कमी होत नाही.
Proofreading: Gayatri 

Tuesday, July 7, 2009

दात-पडकी म्हातारी

एका सुट्टीत स्नेहानी नेहमीप्रमाणे हासून माझे स्वागत केले तेव्हा तिचा पुढचा एक दात गायब झाला होता. यानंतर काही वर्षं सगळे दात पडून नवे दात येतात हे आयुष्यातलं "सत्य" मला स्नेहानी सांगितलं. अशी खूप सत्यं स्नेहानी मला पहिल्यांदा सांगितली. माझे आई-बाबा बहुधा, "अजून एका वर्षानी सांगू" म्हणून ज्या गोष्टी मला सांगायचे नाहीत त्या सगळ्या मला स्नेहामुळे कळाल्या. मग त्या सुट्टीत स्नेहाचे दात कसे पडतात याचा अभ्यास करणे माझा आवडता खेळ बनला. ती सुद्धा तिच्या हलणा-या दाताला गोल फिरवून सगळ्यांची करमणूक करीत असे. माझ्या वर्गात अजून कुणाचाच दात पडला नव्हता. त्यामुळे परत जाताना आपण खूप मोठं गुपीत घेऊन परत चाललोय याचा मला फार अभिमान वाटला होता. तसंच "ताई अज्जी आजोबांची पहिली बायको आणि कुसुम अज्जी दुसरी" हे जगाला माहित असलेलं गुपीतसुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. तोपर्यंत घरात दोन अज्ज्या का आहेत याचा फारसा विचार मी केलाच नव्हता. मग मी एक दिवस जाऊन ताजीला विचारलं,"काय ग ताजी? तू आजोबांची पहिली बायको आहेस? मग तू असताना आजोबांनी दुसरं लग्न का केलं?"त्यावर खूप गोड हसून ताजीनी उत्तर दिलं,"अगं मला मुलगी हवी होती. म्हणून दुसरं लग्न केलं! तुझी आई झाली मग! आणि तू पण!"या गोष्टीमुळे खूप वर्षं मला "मुलगी होणे" खूप महत्वाचे आहे असं वाटायचं. आपण आईला झालो त्यामुळे बाबाला दुसरं लग्न नाही करावं लागलं याचा पण आनंद होई. पण मोठी झाल्यावर मात्र असला भोचक प्रश्न विचारल्याची खूप लाज वाटली.पण ताजीच्या आईवरच्या प्रेमाकडे बघून तिनी सांगितलेली गोष्ट मला अजूनही खरी वाटते.आजोबांकडे बंदूक आहे हे "गुपीत" सुद्धा स्नेहाताईंनीच मला सांगितलं. मग आमच्या मुडशिंगीच्या घरी एक दिवस ती बंदूक स्वत:च्या डोळ्यानी बघितल्यावर माझा विश्वास बसला.आजोबांकडे चाबूक पण होता! असल्या शिकारी वस्तू गोळा करायची त्यांना फार हौस होती. त्यांची बंदूक मात्र आयुष्यभर बोलू शकली नाही. मळ्यात माकडांचा सुळसुळाट झाला की आरूमामा तिकडे हवेत दोन-तीन गोळ्या झाडायचा. तेवढाच काय तो तिचा उपयोग. बाकी नुस्ताच धाक!तसंच नरूमामा कुसुमअज्जीचा मुलगा नसून ताजीचा मुलगा आहे हे सुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. मांजराचं पिल्लू गॅलरीतून खाली पडलं तरी चार पायावरच पडतं आणि त्याचा पाय वगैरे मोडत नाही हे सुद्धा मला स्नेहानी सांगितलं. त्यानंतर "अचानक" आमच्या देखत माऊचं एक पिल्लू गॅलरीतून खाली पडलं. त्या एका क्षणात या घटनेबद्दल देव आपल्याला काय शिक्षा करेल याचा विचार डोक्यात येऊन गेला. पण पिल्लू सुखरूप खाली पोहोचलं आणि खाली पडल्यावर वर बघून जोरात फिसकारलं. त्या सुट्टीत मात्र स्नेहाचे एका मागून एक असे सगळे दात हलायला लागले. रोज सकाळी आम्ही पडणा-या दाताची विचारपूस करीत असू. सुट्टी संपेपर्यंत तिचा पुढचा एक दात परत उगवला होता. पण तो पत्त्यांमधल्या "किलवर" सारखा दिसत होता. असे किलवर सारखे दिसणारे दात आपल्यालाही येतील याची मला मनापासून भिती वाटत होती. एक दिवस आम्ही गॅलरीत पोळीची सुरळी चहात बुडवून खात होतो. तेव्हा स्नेहाचा एक हलणारा दात पोळीतच राहिला! त्यानंतर दोन दिवस मला हसण्यापासून थांबवायचे खूप प्रयत्न झाले. शेवटी आजोबांबरोबर रेल्वेतून आठ तासाचा प्रवास करावा लागेल ही धमकी मिळाल्यावर मी घाबरून हसायची थांबले!आई-बाबांनी माझे व स्नेहाचे पडक्या दाताचे खूप फोटो काढलेत. तरी सुद्धा तो पोळीत अडकलेला पडका दात आठवला की डोक्यात बसवलेल्या व्हिडियो कॅमेर्‍याचा खूप अभिमान वाटतो!
Proofreading: Gayatri :)