Monday, March 29, 2010

आनंद आणि अश्रू

एकदा शाळेत मराठीच्या तासाला आम्हांला "आई म्हणोनी कोणी" ही कविता शिकवायला घेतली होती बाईंनी. माझं खरं तर कवितेवर भारी प्रेम. लहानपणापासूनच मी कविता करायचे आणि वाचायचे. त्यात अज्जीचा खूप मोठा हात होता हे सांगायला नकोच! त्यामुळे रसग्रहण मला फार फार आवडायचं. आमच्या मराठीच्या इनामदार बाईसुद्धा खूप मनापासून शिकवायच्या. त्या तासाची मी खूप आतुरतेनी वाट बघायचे नेहमी. पण त्या दिवशी त्यांनी ती कविता शिकवायला घेतली आणि झालं! सगळ्या मुली पाच मिनिटांत मुसमुसून रडू लागल्या. पहिलं कडवं होईपर्यंत रंगानी "जरा उजव्या" असलेल्या सगळ्या मुलींची नाकं लाल झाली होती. मला वाटलं मला जरा उशीरा रडू येईल पण कुठलं काय! मला रडूच येईना. मग दुसरं कडवं सुरु झालं. त्यात "आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी" ही ओळ आली. त्या ओळीवर खिशातून रुमाल बाहेर येऊ लागले. आपल्या वर्गभगिनी किती हळव्या आहेत हे बघून वर्गबंधूंचा आदर वाढू लागला. त्यामुळे भगिनीमंडळाची रडायची मोहीम आणखीनच बळावली. मला फार वाईट वाटू लागलं मनातून. आपण निर्दयी आहोत का? आपल्याला का बरं रडू येईना? इनामदार बाई शांतपणे रसग्रहण करत होत्या. त्या रडायला लागू नयेत एवढी एकच माफक अपेक्षा मी उराशी बाळगून होते. मग पुढे गेलो "ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी". या ओळीला मात्र मला कवीचा राग येऊ लागला. बिचारा देव. आपल्याला काय माहीत त्याला आई आहे की नाही. आणि नसली तरी त्याला असं भिकारी का म्हणावं? पण या तर्कापुढे आजूबाजूची डझनभर नाकं आणि दोन डझन डोळे भारी ठरले. मग मी मनात असले दुष्ट विचार करण्यापेक्षा एकदा शेवटचं रडू येतंय का ते पाहायचा प्रयत्न केला. मनातल्या मनात आई खरंच घरी नाही आणि मी आणि बाबा स्वयंपाक करतोय असं चित्रं उभं केलं. पण त्या चित्रातही आई आली, "शिरीष बाजूला हो. तू फार पसारा करतोस स्वयंपाकघरात" असं म्हणत. मग मी भावनांच्या मागे न लागता शारीरिक माध्यमांनी रडू येतंय का ते पहायचा प्रयत्न केला. डोळ्यांची उघडझाक केली. पण रडू येईच ना! हे होईपर्यंत नुकत्याच "भिकारी" झालेल्या देवालासुद्धा माझी दया आली नाही आणि इनामदार बाईसुद्धा रडू लागल्या. हे फारच झालं!
माझा नेहमीचा गोंधळ आहे. जेव्हा फार गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा मला खूप हसायलाच येतं. हे मी आईकडून घेतलं असावं. आईलापण असं कुठेही हसू येतं. एकदा नुकतंच लग्न झालेलं असताना बाबा आईला त्याच्या नातेवाईकांकडे घेउन गेला होता. तेव्हा तिथे कुणीतरी "अक्कुर्डी" हा शब्द उच्चारला म्हणे. तर माझ्या आईला त्यावर इतकं हसू आलं की बाबाची फजिती झाली. मग त्याला "त्रास" नको म्हणून आई त्यांच्या बाल्कनीत जाउन एकटीच हसत बसली. अशा खूप प्रसंगांमध्ये मी आणि आईनी बाबाला अवघडायला लावलं आहे.
त्यामुळे आपल्याला काही केल्या रडू येत नाही याचं मला हसू येऊ लागलं. तेवढ्यात तासाची घंटा झाली आणि माझी त्या अतिअवघड प्रसंगातून सुटका झाली. त्यादिवशी मी मनाशी पक्कं ठरवलं, लोकांना रडू येईल असं काही लिहायचं नाही. कारण ज्यांना रडू येत नाही त्यांची उगीच पंचाईत होते. योगायोगाने अज्जी तेव्हा पुण्यातच होती. मी घरी येऊन तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती गोड हसून म्हणाली, "अगं एवढंच ना! नाही आलं रडू तर नाही! याचा अर्थ काय तुझं आईवर कमी प्रेम आहे असं नाही काही वेडाबाई. माझी आई मी खूप लहान असतानाच गेली. पण म्हणून काही मला असं वाटलं नाही. आणि माझ्या आईची मला अजूनही आठवण येते. आणि लोकांना रडवणं खूप सोप्पं असतं लाडूबाई. लोकांना हसवायला शिकलीस तर खरी मजा आहे".
आणि हे अज्जीचं म्हणणं मला सोळा आणे पटतं! अज्जी कधी कधी मला "राजहंस माझा निजला" आणि "चिंचेवर चंदू चढला" एका पाठोपाठ एक वाचून दाखवायची. पण राजहंस वाचून झालेलं दु:ख अत्र्यांच्या कवितेने लगेच हलकं व्हायचं. ती आणि ताजी नेहमी परिस्थितीमधला विनोदच शोधायच्या. अज्जी तिच्या साहित्यिक दृष्टीने तर ताजी तिच्या खट्याळ निरागस स्वभावाने. ताजीचा आवडता खेळ म्हणजे ती गेल्यावर कोण कोण कसं कसं रडेल याची नक्कल करून दाखवणे. आजोबांना हा खेळ "अभद्र" वाटायचा. आणि मुलांसमोर मरणाबद्दल बोलू नये असं त्यांना वाटायचं. पण आम्हाला मृत्यूपेक्षा नक्कल करण्यातच रस असायचा.
"आमचा न-या कसा रडेल?" नरूमामाला ताजी लाडानी न-या म्हणायची.
"न-या हळवा आहे पण रडताना देखील भांग विस्कटणार नाही याची काळजी घेईल तो". मग नरू मामा रडतोय आणि हळूच केसांवरून हात फिरवतोय त्याची नक्कल करून दाखवायची. लगेच मुलांमध्ये हशा पिकायचा. :)
"हिराक्का कशी रडेल?"
"ग्येली गं ऽऽ माझी ताईऽऽऽ!" असं दारातूनच ओरडत येणार ती.
"आता कुनाच्या पम्पावर पानी भरू गऽऽऽऽ बाईऽऽऽऽ!!"
हिराक्कासारखी गुडघा मानेत खुपसून बसायची. आणि तिच्या या मरण-काव्यावर आम्ही खूप हसायचो!
"ताजी कुसुम अज्जी कशी रडेल?" - मी (मी नेहमीच अवघड प्रश्न विचारायचे)
"बाई होय! बाई अशा हळू हळू चालत येतील" मग अज्जीच्या पायाचा आवाज न करता चालायच्या सवयीची नक्कल करायची.
"फार चांगल्या होत्या हो ताई! वसूवर आणि सईवर फार जीव होता त्यांचा." अज्जीची मान तिरकी करून बोलायची लकब बरोब्बर टिपायची आणि मग पदर नाकाला लावून कोप-यात उभी राहायची अगदी कुसुम अज्जीसारखी. आणि तिचं नेहमीचं कोल्हापुरी वळण सोडून बामणी बोलायची. यावर बच्चे कंपनी फार खूष व्हायची.
एकदा नरूमामाच्या मित्रांसमोर अशी नक्कल करताना त्यातला एक मित्रं खरच रडायला लागला होता. त्याला ताजीनी जाउन घट्ट मिठी मारली होती.
माझ्या बालपणीच्या या गोष्टी कदाचित नेहमीच्या जगात थोड्या विचित्र वाटतील पण मला भावतो तो त्यामागचा निखळ निरागस उद्देश. ताजी जेव्हा खरंच गेली तेव्हा तिच्या सुतकात आम्ही मुडशिंगीच्या घरात पत्रावळ्या लावत बसायचो. आणि सगळ्यांना तिच्या या नकला आठवायच्या. तेव्हा आम्ही मुली मोठ्या झालो होतो. आणि त्यावेळी मला या सगळ्या विनोदामागचा क्रूर विरोधाभास जाणवला. पण तिची आठवण काढताना त्या सुतकात देखील आम्ही खिदळलो होतो. आणि मग पुन्हा एकमेकींना मिठी मारून रडलो होतो.
मग परीक्षा जवळ आली तेव्हा तोंडी परीक्षेसाठी मी तीच कविता घोकू लागले. इनामदार बाईनी चालपण लावून दिली होती. एका रविवारी मी ती कविता घोकत असताना माझी आई खोलीत आली. आणि माझी ती कविता म्हणण्याची आत्मीयता बघून, माझी चाल ऐकून आणि परीक्षेपुढे मी चारी मुंड्या चीत झालेली बघून की काय आईला हसू जाम आवरेना. आणि प्रत्येक कडव्यानिशी तिचं नेहमीचं खो खो हास्यकारंजं सुरू झालं. आपली आईसुद्धा ही कविता ऐकून हसते आहे हे पाहून माझ्या जीवात जीव आला. :)

Sunday, March 21, 2010

प्रवास

आमच्या ताईअज्जीला प्रवासाची भारी आवड! ती एक आणि सिनेमाची दुसरी. पण कुठेही जायचं म्हटलं की ताजी एका पायावर तयार असायची. मुडशिंगीहून अंकलखोपला जायचं म्हटलं तरी तिचे डोळे चमकायचे. तिच्याबरोबर प्रवासाला जाण्यात खूप मजा असायची, कारण तिथे पोहोचायच्या आधी ती सगळ्याचं वर्णन करायची. कुठल्यातरी गोष्टीच्या पुस्तकाची पानं भराभरा उलटल्यासारखं सगळं वातावरण डोळ्यासमोर उभं करायची.

"सई, आपल्या अंकलखोपला नदी आहे बरंका! आपण गेल्या गेल्या नावाडी आहे का ते बघूया हं. म्हणजे नदीच्या त्या कडेला जाता येईल."
लगेच माझ्या डोक्यात नाव, नावाडी, मग तो गाणं म्हणेल का नुसताच मठ्ठपणे बसून राहील ह्या सगळ्या गोष्टी चमकायच्या. मग कधी कधी कौलावर माकडं येतात हे पण सांगून मला नवीन खेळ द्यायची.
पुण्याला आली की ताजी आणि बाबा एका गटात सामील व्हायचे. बाबापण भटका आहे. त्याला भटकणार्‍यांची संगत मिळाली की तोही खूष असतो. मग आमच्या कायनेटिकवरून बाबा आणि ताजी भरपूर भटकायचे. सातार्‍यापर्यंतच्या परिघात जे जे म्हणून नातेवाईक आहेत त्यांना ताजी कायनेटिकवरून भेटायला जायची. कधी कधी मलाही मध्ये बसवून घेऊन जायची. गाडीवरही आपण कुणाकडे चाललोय, ती माणसं कशासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांचं आणि माझं नक्की नातं काय आहे वगैरे वगैरे गोष्टी माझ्या डोक्यातल्या संगणकाला भरवत जायची. तिच्या त्या प्रस्तावनेमुळे माझी उत्सुकता नेहमी टिकून राहायची. आई-बाबा कुठे जाताना आधी मला, "जास्त प्रश्न विचारायचे नाहीत" अशी ताकीद करून न्यायचे. तरीही तिकडे जाईपर्यंत मी प्रश्न विचारून त्यांची डोकी रिकामी करायचे.
"बाबा आपण चाललोय तिकडे कुत्रा आहे?"
"नाही"
"मग मांजर?"
"नाही"
" ते आपल्याला काय खायला देणार?"
"मला माहीत नाही पिल्लू. पण तू काही मागू नकोस"
"नाही मागणार. पण तरी ते देतीलच ना? आपण पाहुणे आहोत!"
"हो देतील"
"ते उप्पीट नाही ना देणार? दिलं तर मला खावं लागेल का?"
" हो अर्थातच"
"शी बाबा. उप्पीट असेल तर मी थोडंच खाणार हं!"
"त्यांनी मला चहा दिला तर तू त्यांना 'हिला चहा देऊ नका' असा सांगणार का?"
"तू प्रश्न बंद केलेस तरच नाही सांगणार"
"त्यांना माझ्याएवढी मुलगी आहे का?"
"नाही त्यांना दोन मुलं आहेत. एक तुझ्याएवढा आहे"
"शी बाबा. मग मी कुणाशी खेळणार?"
"तुझे एवढे प्रश्न संपण्याइतका वेळ आपण तिथे थांबणार नाहीयोत. त्यामुळे बस कर आता."

मग मी हिरमुसली होऊन उरलेला वेळ गाल फुगवून घालवायचे. ताजी मला प्रश्न विचारायची संधीच द्यायची नाही. त्यामुळे मला तिच्याबरोबर जायला खूप मजा यायची. ताजीची लहान बहीण लीलाअज्जी पुण्याजवळ नीरेला राहायला होती. एकदा मी, ताजी आणि बाबा गाडीवरून तिच्याकडे गेलो. तिच्या घराच्या आजूबाजूला खूप शेळ्या होत्या. त्या दिवशी मी एक कोकरू उचलून घरात आणलं होतं. त्यानी घाबरून घरात उच्छाद मांडला! तो नंतर लीलाअज्जीला निस्तरावा लागला होता. पण अजूनही मला भेटले की ते सगळे त्या दिवसाची आठवण काढतात. ताजीला मात्र माझं त्या दिवशी खूप कौतुक वाटलं होतं. आई असती तर यल्लम्मासारखे मोठ्ठे डोळे करून भीती घातली असती मला!
एकदा मी, ताजी आणि अण्णाआजोबा रेल्वेनी शिर्डीला गेलो होतो. आजोबांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पहिल्या वर्गाचा मोफत पास आहे रेल्वेचा. त्याचा त्यांना फार अभिमान आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर प्रवासदेखील ते रेल्वेनीच करतात. त्यांच्या पासमध्ये दोन लोकांना जायला मिळतं पण मी छोटी असल्याने मलादेखील जाता आलं! आजोबा ताजीच्या मानानी फारच अरसिक. आम्ही गेलो त्या रात्री देवळात कीर्तन होतं. ताजीला ते ऐकायची फार इच्छा होती. पण आजोबांनी, "रात्रीचं कसलं कीर्तन करतात! दहा ही काय कीर्तन करायची वेळ आहे का? गप झोपा खोलीत!" म्हणून धमकी दिली.मग आम्ही दोघी "गप झोपलो". जसा जसा आजोबांच्या घोरण्याचा आवाज वाढू लागला तशी ताजी उठली. मला पण उठवलं. मग आम्ही चपला हातात घेऊन खोली बाहेर आलो. ताजीनी हे आधीच ठरवलं असणार कारण माझा स्वेटर आणि मोजे तिनी तिच्या पिशवीत टाकले होते. मग बाहेर आल्यावर तिनी सरळ खोलीला कडी घातली! मला आजोबांना कोंडल्याचा काय आनंद झाला होता! बाहेर आल्यावर आम्ही भर भर चपला घातल्या. मला आधी मोजे घालून वर चपला घालाव्या लागल्या! देवळाजवळ गेल्यावर दोघींनाही हसू काही केल्या आवरत नव्हतं! त्या रात्री साडे बारापर्यंत आम्ही कीर्तन ऐकलं! आणि परत खोलीत जाऊन होतो तशा झोपलो! सकाळी आजोबांना काही कळलं सुद्धा नाही. दोन दिवसांनी आजोबांचा मूड पाहून ताजीनी त्यांना आमची गम्मत सांगितली. तेव्हा आजोबादेखील खो खो हसले होते!!
खूप वेळा, "कसला जळला मेला यांचा पास! एखादा असता तर दोन्ही बायकांना आलटून पालटून काश्मीर, कन्या कुमारी, माथेरान दाखवलं असतं" म्हणून ताजी रेकोर्ड सुरु करायची. त्यातलं मला दोन बायकांना आलटून पालटून हे खूप भारी वाटायचं!! ताजीचा स्वभावच तसा होता पण.
तिला परदेशी जाण्याचे फार अप्रूप होते. आई अमेरिकेला गेली तेव्हा ताजी मला सांभाळायला आली होती. मग आईचा फोन आला की तिला मी लहान असताना विचारायचे तसेच प्रश्न ताजी विचारायची.
"होय गं वसू (माझ्या आईचे नाव वसुधा आहे) तिकडं रस्ते आपल्यासारखेच असतात?"
"तिकडच्या बायका काय घालतात गं? साडी नसतीलच घालत.!"
आई परत आली तेव्हा तिला माझ्याजोडीला ताजीही प्रश्न विचारून हैराण करायला होती. तिच्या अमेरिकन मैत्रिणीचा फोटो बघून
"काय गं बाई! पुरुषाला उचलून घेईल की गं ही!" असं म्हणून तोंडाला पदर लावून खूप वेळ हसली होती. मुलगी पाच फुटापेक्षा जरा उंच असली की ताजीच्या भाषेत लगेच ती पुरुषी व्हायची!
मी पंधरा वर्षाची असताना अमेरिकेला गेले. खरं तर मी सुट्टीला गेले होते. तरीही ताजीला माझा खूप अभिमान होता.
"एकटी अमेरिकेला गेली माझी नात!" म्हणून येईल त्याला ती सांगायची.
" सईनी हा गुण मात्र माझ्याकडून घेतलाय" असं ती सगळ्यांना सांगायची. आणि खरंच आहे ते. प्रवासाबद्दल माझ्या मनात पहिलं कुतूहल ताजीनीच रुजवलं. कुसुमअज्जीचे प्रवास पुस्तकांतून असायचे. तिला भटकणं फारसं आवडायचं नाही, आणि माझ्यातही कुठेतरी प्रवासाबद्दल तो कंटाळा आहे. पण माझं नशीब नेहमी मला त्यातून खेचून आणतं, आणि प्रत्येक प्रवासात मला माझ्यातली ताजी दिसते.
कुठलाही नवीन देश, नवीन वेश दिसला की मला उगीचच ताजी यावर काय म्हणाली असती याची कल्पना करावीशी वाटते. तिचं ते निरागस पण तितकंच उत्सुक रूप आठवलं की नेहमी ती जिथे आहे तिथे तिला माझा प्रवास दिसू दे अशी प्रार्थना करावीशी वाटते. मग विमानात बसताना ते हवेत झेप घेताना नेहमी आपल्याशेजारी ताजी असती तर काय बहार आली असती असा विचार येतो. तिनं मात्र बैलगाडीपासून ते रेल्वेपर्यंत सगळ्या प्रवासात मला पुढल्या प्रवासाची झलक दाखवत नेलं. तिला एकदातरी विमानातून कुठेतरी दूर नेता आलं असतं तर तिच्याच भाषेत, फिटांफीट झाली असती!

Saturday, March 13, 2010

सुनीताताई

मी दहा वर्षांची असताना सुनीताताई माझ्या आयुष्यात आली. मी दुसरीत असताना आम्ही कोथरूडमध्ये राहायला गेलो. आमच्या पलीकडच्या बिल्डींगमध्ये नरूमामाच्या मॅनेजरचा मुलगा आणि त्याचे काही मित्र राहायला होते. घरात काही खास बेत केला की आई नेहमी मला अजितदादा आणि सुनीलदादासाठी डबा देऊन यायला लावायची. मग एक दिवस अजितदादाचं लग्न ठरलं आणि त्याच्या होणा-या बायकोचा फोटो घेऊन नरूमामा आला. आमचा नरूमामा या बाबतीत नेहमी पुढे असतो. मुलगी बघण्यापर्यंतचे कार्यक्रम त्यांनी त्याच्या मॅनेजर साहेबांसाठी केले. त्या फोटोतून सुनीताताईनी माझ्या आयुष्यात पहिला प्रवेश केला. एका मोठ्याश्या बंगल्याच्या बाहेर, एका गाडीशेजारी, साधा सलवार-कुडता घालून उभी होती त्या फोटोत ती. दाताला नवीन पद्धतीचे कुंपण घातलेली! लग्नाआधी काही दिवस ते कुंपण काढण्यात आलं असावं. माझ्या आयुष्यात दादा लोक बरेच होते. चिकूदादा आमच्याकडेच राहायला होता. अजितदादा, त्याचे मित्र, चिकूदादाचे मित्र, कॉलनीतल्या मैत्रिणींचे मोठे भाऊ असे खूप उमेदवार दादा होते. पण आपल्यापेक्षा चांगली दहा वर्षांनी मोठी, आपल्यासारखेच आई-बाबा असलेली, आपल्याच शाळेत शिकलेली ताई मात्र मला अजून भेटली नव्हती. तशी माझी चुलत बहीण गंधालीताई होती. पण ती पुण्यात नसायची. त्यामुळे आमच्या भेटी नेहमी गट्टी होऊन पुढे जाईतो संपून जायच्या. गंधालीताई लांब नखं वाढवायची. निघताना नेहमी तिला मी, "तुझा नख तुटलं की मला पोष्टानी पाठव" म्हणून सांगून यायचे.
सुनीताताईचं लग्न झालं तेव्हा तिला नुकतं विसावं वर्ष लागलं होतं. घरातल्या सासरच्या माणसांसमोर तिचं (नसलेलं) पाक-कलानैपुण्य दाखवताना तिची जाम तारेवरची कसरत चालली होती. माझ्या आईच्या हे लक्षात आलं असावं. त्यामुळे ती नेहमी सुनीताताईची चौकशी करत असे येता जाता. तसं तिचं घर खालच्या मजल्यावर होतं. त्याला लागून एक छोटी बाग होती. तिच्या पलीकडे आमचं कुंपण होतं. त्यामुळे रोज ऑफिसमधून येताना आईच्या आणि सुनीताताईच्या कुंपणावरून गप्पा रंगायच्या. थोडे दिवसांनी सासरची मंडळी कोल्हापूरला निघून गेली आणि सुनीताताईला रीतसर स्वयंपाक शिकायला उसंत मिळाली. मग काय विचारता? कधी पावभाजी, कधी दहीवडे, कधी पिझ्झा!! आईचं आणि सुनीताताईचं मेतकूट जमलंच पण माझी आणि तिचीही खास मैत्री झाली.

रोज शाळेतून घरी येताना मी कुंपणातून सुनीताताईला हाक मारायचे. ती माझी वाटच बघत असायची.
"सई, इकडे ये आधी. चहा पिऊन जा!".
मग परत माझी वरात तिच्याकडे वळायची. तिच्या घरी जाता यावं म्हणून चिकूनी आणि मी कुंपणाला आमच्या आकाराचं भोक केलं होतं. त्यातून जाता-येता कित्येकवेळा मला तारेनी बोचकारलं जायचं. पण वळसा घालून मोठ्या माणसांसारखं जायला काही मजा वाटायची नाही. आई येईपर्यंत कधी कधी मी सुनीताताईकडेच थांबायचे. ती खूप वेगळी होती. आत्तापर्यंत "लग्न झालं" की बायका आपोआप साड्या नेसायला लागतात, मोठी कुंकवं लावतात, सारख्या रागवू लागतात असं वाटायचं. पण सुनीताताई माझ्यासारखेच पण मोठ्या मुलींच्या मापाचे कपडे घालायची आणि दुपारी घर आवरून फेमिना वाचत बसायची. तिच्याकडे नेहमी छान छान मुलींची मासिकं असायची. पुढे मी पंधरा सोळा वर्षांची झाल्यावर सुनीताताईनी मला पहिलं "मिल्स अँड बून्स" वाचायला दिलं. ते मला आवडलं नाही ही गोष्ट निराळी. :) पण कुठल्याही तारुण्यसुलभ गोष्टीची तिच्याकडे चौकशी करायला मला भय वाटायचं नाही, आणि तिलाही कुणालातरी दीक्षा दिल्याचा बहुमान मिळायचा. माझे कपडे सुनीताताईला आवडावेत असं मला वाटायचं. म्हणजे कदाचित मला ते ज्यांना आवडायला हवेत त्यांनाही आवडतील असं वाटायचं. :) वर्गातल्या एखाद्या मुलाबद्दल मी खूप बोलू लागले की सुनीताताई मला खूप गोड चिडवू लागायची. तिचं चिडवणं वर्गातल्या मैत्रिणींच्या चिडवण्यापेक्षा मला जास्त आवडायचं!
तिनीच मला भुवया कोरण्यात काही "वाईट" नाही हे सांगितलं. आणि पहिल्यांदा भुवया कोरायला मला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली. माझ्या शाळेच्या निरोप समारंभासाठी सुनीताताईनी तिची साडी मला नेसवून दिली. काय भडक दिसेल, काय सुंदर दिसेल या सगळ्याचे निर्णय मी तिच्यावर सोपवले होते. त्या काळात ती माझ्या मुलीकडून युवतीकडे होणा-या प्रवासातली महत्वाची हमसफर झाली होती. या सगळ्याच्या मध्ये तिला आकाश झाला. जेव्हा तिला बाळ होणार हे कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मग तिचे डोहाळे पुरवायला आई जे काही बनवायची ते मी तत्परतेने न सांडता तिला नेऊन द्यायचे. आकाश झाल्यावर मला अचानक ताईपदावर बढती मिळाली. मग त्याची अंघोळ, त्याचं जेवण, त्याचा दंगा सगळं सांभाळण्यात मी सुनीताताईची मदतनीस झाले. ती भेटून सहा वर्षं झाली नसतील तोवर आमची मैत्री वेगळ्याच पातळीवर जाऊन बसली. अचानक तिच्या टेबलवर बसून अर्धा तास एक कप चहा गार करून पिणारी सई तिच्या मनातल्या शंका, अडचणी, राग या सगळ्याची सोबतीण बनू लागली. कॉलेजमध्ये गेल्यावर सुनीताताई अजूनच जिगरी बनली. मग मैत्रीला सृष्ट रूप आलं. ती मला "दम बिर्याणी", "चिकू शेक", "मेदू वडा" असे पदार्थ करायचे धडे देऊ लागली. मैत्रिणींमध्ये "सुनीताताई" चं काय म्हणणं आहे, यावर आमची भांडणं सुटू लागली.
पुढे मी वीस वर्षांची झाल्यावर आम्ही पुन्हा घर बदललं आणि सुनीताताई देखील दुसरीकडे राहायला गेली. मग भेटीगाठी कमी झाल्या पण ज्या व्हायच्या त्या खूप सुंदर असायच्या. आकाशसुद्धा आमच्याच शाळेत जाऊ लगला. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या सुनीताताईची जागा मी त्याच्या आयुष्यात भरू लागले. :) पण अशा सगळ्या छान छान गोष्टींना सोनेरी पंख नसतात. एक दिवस अचानक सुनीताताईला खूप डोकेदुखी सुरू झाली. सगळ्या तपासण्या झाल्यावर तिला कॅन्सर आहे असं निष्पन्न झालं. त्यानंतर जवळपास सात वर्षं तिची झुंज सुरू होती. दर सहा महिन्यांनी तिचा कॅन्सर शरीरातल्या नवीन भागाकडे त्याचा मोर्चा वळवायचा. मग पुन्हा हॉस्पिटल, नवीन किमोथेरपी, नवीन आहार, नवीन आशा! खूप वेळा खचून ती माझ्या आईला फोन करीत असे. किंवा थोडा हुरूप आला की आई-बाबांशी गप्पा मारायला अजितदादा आणि सुनीताताई दोघे यायचे. माझा वाढदिवस ती कधीच विसरली नाही. मीच कधी कधी त्या दिवशी घरी नसायचे. मग परत आल्यावर मला आणलेली फुलं आणि खाऊ मिळायचा. मी ऑस्ट्रेलियाला येताना तिनी माझ्यासाठी वैष्णवदेवीचा प्रसाद आणला होता. तेव्हा सुद्धा ती आजारीच होती. माझ्या आयुष्यात त्या काळात चाललेल्या जलद घटनांमुळे मला तिच्यासाठी तितकं थांबता आलं नाही. याची खंत नेहमीच वाटत राहील. पण ज्या असंख्य गोष्टी हातातून ओढीच्या अभावामुळे गळून गेल्या त्यात सुनीताताई नक्कीच नव्हती. माझ्या आईचा तिला सतत पाठिंबा असायचा. तिला पुस्तकं देणं, तिच्या आहारात काय बदल करता येईल यावर संशोधन करणं हे सगळं माझ्या आईनी तिच्यासाठी अगदी प्रेमानी केलं. मागच्या वर्षीच्या सुट्टीत मी निघायच्या दोन दिवस आधी सकाळी आई खूप अस्वस्थ वाटली. खूप खोदून विचारल्यावर सुनीताताई पुन्हा हॉस्पिटल मध्ये आहे हे तिनी मला सांगितलं. कॅन्सरचा शेवटचा वार तिच्या डोळ्यावर झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिचा डोळा काढून टाकायचं ठरलं. तशा स्थितीत मी तिला बघायला जाऊ नये म्हणून तिनी आईला मी गेल्यावर यायला सांगितलं होतं. हे कळल्यावर मी आईबरोबर लगेच तिला भेटायला गेले. त्या दिवशीसुद्धा ती नेहमीसारखीच बडबडत होती. त्या वीस मिनिटात सुद्धा आम्ही जिवाभावाच्या गप्पा मारल्या. आपण कदाचित परत भेटणार नाही हे दोघींनाही माहीत असूनही त्या दुष्ट सत्याला आम्ही केरसुणीसारखं कोप-यात बसवून ठेवलं. निघताना तिचा हात हातात घेऊन मी तिला, "ही बघ तुझी आयुष्य रेषा! खूप मोठी आहे गं! नको काळजी करूस", असं सांगितलं होतं. मी इथे आल्यावर अवघ्या वीस दिवसात ती गेली. पण तिचं आयुष्य आमच्या सगळ्यांमध्ये वाटून गेली. आता ते मोठं आयुष्य आम्ही सगळे मिळून जगू. तिच्यासाठी.

Friday, March 5, 2010

मोठी झाल्यावर कोण होणार?

"सई, तू मोठी झाल्यावर कोण होणार?" हा प्रश्न मला अगदी चार वर्षांची असल्यापासून विचारण्यात येतोय. हो अजूनही. त्याचं उत्तर मात्र नेहमी बदलतं. हो अजूनही!!
लहानपणी "मोठं होणं" ही एक लठ्ठ काळी कुळकुळीत रेष होती. एक दिवस ती ओलांडायची, मग त्यानंतर आयुष्य खूप सोपं होणार होतं. महत्त्वाचे निर्णय जसं की जेवणाच्या वेळेला उडदाच्या पापडाच्या लाट्या खाव्यात की नाही, किंवा साधारणपणे किती वेळ आजारी न पडता हौदात खेळता येतं वगैरे घेता येणार होते. मोठं झाल्यावर बाबाची अंथरुणातून मला खसकन ओढून बाथरूममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी संपणार होती. तसंच मला पेल्यातलं दूध संपेपर्यंत न उडी मारता येणार्‍या उंच स्टुलावरही बसावं लागणार नव्हतं! आणि "चहा" या नावाखाली एक सहस्त्रांश चहा असलेलं भेसळयुक्त दूधही प्यावं लागणार नव्हतं!!
लहानपणी मला भांडी घासायची आणि धुणं धुवायची फार हौस होती. त्यामुळे पहिली काही वर्षं मला इस्त्रीचं दुकान काढायची इच्छा होती. कित्येक वेळेला आमच्या धुणंवाल्या सुमनमावशीकडे हट्ट करून मी दोन-तीन कपडे धुवायचे नळावर. ती बिचारी, "अगं तुझी आई आली तर मला रागवेल!", असं काकुळतीला येऊन म्हणायची. पण कपडे धुतल्याशिवाय मी गप्पच बसायचे नाही.
शाळेत जायला लागल्यावर खूप वर्षं मला शिक्षिका व्हायचं होतं. दुपारी घरी आले की मी नाडीवाली साडी नेसून, फळ्यावर माझ्या काल्पनिक वर्गाला शिकवायचे. कधी कधी बाबा माझा विद्यार्थी व्हायचा. मग त्याला आधी तो हुषार आहे की मठ्ठ हे सांगायचं, त्याप्रमाणे तो पुढे वागायचा. पण शिक्षिका होण्यासाठी सद्गुणी राहावं लागायचं. त्यामुळे लवकरच मला त्याचा कंटाळा यायचा.
एकदा शाळेत कुंभार आला होता. आम्हाला मातीची भांडी करून दाखवायला. तेव्हापासून मला कुंभार व्हायची फार इच्छा होती. तसे मी बागेत चिखलात प्रयोग सुद्धा केले. माझ्या संध्याकाळच्या ध्यानाकडे बघून आई नेहमी कपाळावर हात मारून घ्यायची. आईला निदान कमी राग यावा यासाठी विमल मावशी खराट्याच्या काडीनी माझी नखं साफ करायची. मी थेट निसर्गाकडे धाव घेऊ नये म्हणून मला आईबाबांनी चिकण माती आणून दिली. त्याला छान वास यायचा आणि खूप सारे रंगसुद्धा होते. पण त्यात काही मजा नाही. दोन दिवसांत मला त्याचा कंटाळा आला.
मग पुढे मला रामायणातली सीता व्हायचं होतं. ते करायला मी शिक्षिकेचीच साडी बिन पोलक्याची (अज्जीचा शब्द) घालायचे. वनवासातली सीता व्हायला. पण त्याचाही कंटाळा आला.
मग माधुरी दीक्षित आली. त्यानंतर खूप वर्षं मला ती व्हायचं होतं. नाच तर मी आधीपासून शिकायचे. तिच्यासारखा नाच करायचा आणि तिच्यासारखी नटी व्हायचं हे मी पक्कं ठरवलं होतं. पुढे नटी नाच बसवणारीचं ऐकते हे कळल्यावर मला सरोज खान व्हायचं होतं. एकदा मी माधुरीला प्रत्यक्ष भेटले. तेव्हा मी तिच्याकडे सरोज खानचा पत्ता मागितला!
लहानपणी मला राजीव गांधी फार म्हणजे फार आवडायचे . अगदी चार वर्षांची असल्यापासून. एकदा मी बाबाला माझ्यातर्फे "माझ्या राजीवला" पत्रं लिहायला सांगितलं. माझी भुणभूण थांबावी म्हणून त्यांनी लिहिलं देखील. मग एक दिवस आमच्या घरी पोस्टमन "पंतप्रधान" अशी मोहोर असलेलं पाकीट घेऊन आला! त्यात काय आहे हे बघण्याची त्याला इतकी उत्सुकता होती की बाबांनी ते उघडेपर्यंत तो तिथेच थांबला. मी तर बाबावर उड्या मारून सगळं घर डोक्यावर घेतलं!! आतमध्ये राजीव गांधींचा सहीवाला फोटो आणि एक खूप गोड पत्रं होतं!! माझ्यासाठी!! मला म्हणून आलेलं ते पहिलं पत्रं असेल!
राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा मी सात वर्षांची होते. सकाळी सकाळी मला झोपेतून उठवून बाबानी बातमी दिली. तेव्हा मी बाबाला मिठी मारून रडले होते!
आता वाटतं खूप वेळा, राजीव गांधी सारखं पुन्हा कुणीतरी आवडावं! पण तेव्हा जसा मला "माझा राजीव" आवडायचा तसा आता कुणीच आवडत नाही. :)
मग शाळा सुरू झाल्यावर सगळ्यांसारखी माझीही स्वप्नं तासली गेली. डॉक्टर, टीचर वगैरे वगैरे. पण मनात नेहमी काहीतरी जगावेगळं असतंच!! कधी मधेच मला स्वयंपाकी (मराठीत शेफ) व्हावसं वाटतं. आपलं हॉटेल असावं. फार मोठं नाही तसं, आटोपशीरच! तिथे लोकांनी गर्दी करावी. :)
किंवा, खूप निवांत वेळ मिळावा आयुष्यात आणि सगळे बांध तोडून लिहायची मुभा मिळावी. किंवा एखाद्या कोपर्‍यात छोटंसं कॉफी-शॉप असावं माझं. आणि तलफेची वेळ संपली की मला लिहिता यावं. :)
पुन्हा नाचता यावं, आणि हो, घराच्या मागल्या बाजूला एका कोपर्‍यात कुंभाराचं चाक असावं. :)