एका सुट्टीत स्नेहानी नेहमीप्रमाणे हासून माझे स्वागत केले तेव्हा तिचा पुढचा एक दात गायब झाला होता. यानंतर काही वर्षं सगळे दात पडून नवे दात येतात हे आयुष्यातलं "सत्य" मला स्नेहानी सांगितलं. अशी खूप सत्यं स्नेहानी मला पहिल्यांदा सांगितली. माझे आई-बाबा बहुधा, "अजून एका वर्षानी सांगू" म्हणून ज्या गोष्टी मला सांगायचे नाहीत त्या सगळ्या मला स्नेहामुळे कळाल्या. मग त्या सुट्टीत स्नेहाचे दात कसे पडतात याचा अभ्यास करणे माझा आवडता खेळ बनला. ती सुद्धा तिच्या हलणा-या दाताला गोल फिरवून सगळ्यांची करमणूक करीत असे. माझ्या वर्गात अजून कुणाचाच दात पडला नव्हता. त्यामुळे परत जाताना आपण खूप मोठं गुपीत घेऊन परत चाललोय याचा मला फार अभिमान वाटला होता. तसंच "ताई अज्जी आजोबांची पहिली बायको आणि कुसुम अज्जी दुसरी" हे जगाला माहित असलेलं गुपीतसुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. तोपर्यंत घरात दोन अज्ज्या का आहेत याचा फारसा विचार मी केलाच नव्हता. मग मी एक दिवस जाऊन ताजीला विचारलं,"काय ग ताजी? तू आजोबांची पहिली बायको आहेस? मग तू असताना आजोबांनी दुसरं लग्न का केलं?"त्यावर खूप गोड हसून ताजीनी उत्तर दिलं,"अगं मला मुलगी हवी होती. म्हणून दुसरं लग्न केलं! तुझी आई झाली मग! आणि तू पण!"या गोष्टीमुळे खूप वर्षं मला "मुलगी होणे" खूप महत्वाचे आहे असं वाटायचं. आपण आईला झालो त्यामुळे बाबाला दुसरं लग्न नाही करावं लागलं याचा पण आनंद होई. पण मोठी झाल्यावर मात्र असला भोचक प्रश्न विचारल्याची खूप लाज वाटली.पण ताजीच्या आईवरच्या प्रेमाकडे बघून तिनी सांगितलेली गोष्ट मला अजूनही खरी वाटते.आजोबांकडे बंदूक आहे हे "गुपीत" सुद्धा स्नेहाताईंनीच मला सांगितलं. मग आमच्या मुडशिंगीच्या घरी एक दिवस ती बंदूक स्वत:च्या डोळ्यानी बघितल्यावर माझा विश्वास बसला.आजोबांकडे चाबूक पण होता! असल्या शिकारी वस्तू गोळा करायची त्यांना फार हौस होती. त्यांची बंदूक मात्र आयुष्यभर बोलू शकली नाही. मळ्यात माकडांचा सुळसुळाट झाला की आरूमामा तिकडे हवेत दोन-तीन गोळ्या झाडायचा. तेवढाच काय तो तिचा उपयोग. बाकी नुस्ताच धाक!तसंच नरूमामा कुसुमअज्जीचा मुलगा नसून ताजीचा मुलगा आहे हे सुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. मांजराचं पिल्लू गॅलरीतून खाली पडलं तरी चार पायावरच पडतं आणि त्याचा पाय वगैरे मोडत नाही हे सुद्धा मला स्नेहानी सांगितलं. त्यानंतर "अचानक" आमच्या देखत माऊचं एक पिल्लू गॅलरीतून खाली पडलं. त्या एका क्षणात या घटनेबद्दल देव आपल्याला काय शिक्षा करेल याचा विचार डोक्यात येऊन गेला. पण पिल्लू सुखरूप खाली पोहोचलं आणि खाली पडल्यावर वर बघून जोरात फिसकारलं. त्या सुट्टीत मात्र स्नेहाचे एका मागून एक असे सगळे दात हलायला लागले. रोज सकाळी आम्ही पडणा-या दाताची विचारपूस करीत असू. सुट्टी संपेपर्यंत तिचा पुढचा एक दात परत उगवला होता. पण तो पत्त्यांमधल्या "किलवर" सारखा दिसत होता. असे किलवर सारखे दिसणारे दात आपल्यालाही येतील याची मला मनापासून भिती वाटत होती. एक दिवस आम्ही गॅलरीत पोळीची सुरळी चहात बुडवून खात होतो. तेव्हा स्नेहाचा एक हलणारा दात पोळीतच राहिला! त्यानंतर दोन दिवस मला हसण्यापासून थांबवायचे खूप प्रयत्न झाले. शेवटी आजोबांबरोबर रेल्वेतून आठ तासाचा प्रवास करावा लागेल ही धमकी मिळाल्यावर मी घाबरून हसायची थांबले!आई-बाबांनी माझे व स्नेहाचे पडक्या दाताचे खूप फोटो काढलेत. तरी सुद्धा तो पोळीत अडकलेला पडका दात आठवला की डोक्यात बसवलेल्या व्हिडियो कॅमेर्याचा खूप अभिमान वाटतो!
Proofreading: Gayatri :)
=)
ReplyDelete=)
ReplyDeleteYou smile a lot!
Thanks. :)
हाय सई!
ReplyDeleteताजीच उत्तर मला फार आवडल.ती खरोखरच ग्रेट होती.
=)
ReplyDelete@Charu
ReplyDeleteWere you the one who arrived here from Paris? I am guessing so. =)
You smile a lot too! I guess it is an IIT-K thing to smile with an equal to sign for eyes. =P