Sunday, April 26, 2009

खिडकी

कुसुम अज्जीची खोली फार सुंदर अाहे. अामचं कोल्हापुरचं घरच खूप सुंदर अाहे मुळी. लहानपणापासून "२०४९ रुद्रांबिका, राजारामपुरी, अकरावी गल्ली कोल्हापूर 0८" असा पत्ता पाठ होता मला. साधारण शंभर वर्षापूर्वी हा दुमजली वाडा बांधला असेल. त्याला अण्णा अाजोबांनी "रुद्रांबिका" हे नाव दिलं. मग त्यात मामा लोकांनी अजून सुधारणा केल्या. पण पूर्वी खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना होता. खालचा मजल्यात चार बि-हाडं असायची. अंगणात बि-हाडकरूंच्या सायकली, गाड्या अाणि उनाड पोरं असायची! दारात जुईचा वेल होता. नरूमामानी गेटावर लोखंडी कमानीत तो वेल सजवला होता. त्यावर नेहमी शुभ्र चांदण्यासारखी फुलं असायची! 
लाकडी जिन्यावरून (पायाचा अावाज न करता) वरती गेलं कि मोठा दिवाणखाना होता. पण तिथे फक्त अाजोबांचे पाहुणे बसायचे. बाकी सगळे लोक थेट स्वयंपाकघरात हजर व्हायचे! दिवाणखान्याला अाणि त्याला लागून असलेल्या मामाच्या खोलीला जोडणारी लाकडी गॅलरी होती. गलरीतून समोरचा रस्ता दिसायचा. तिला लागून तुतूचा वेल होता. रोज काळ्या तुतूंसाठी माझं अाणि स्नेहाचं भांडण होत असे. मग मी मोठा गळा काढून जिंकत असे! 
दिवाणखान्याच्या अातल्या बाजूला एक लांब अरुंद बोळ होता अाणि त्याला लागून एक लाकडी पार्टिशन होतं. त्या पार्टिशन पलिकडली जागा म्हणजे "अज्जीची खोली"! बोळाच्या पलिकडच्या बाजूला मात्र भिंत होती. त्या भिंतिपल्याड समस्त मुडशिंगीकरांचा अड्डा जमत असे. कारण त्या खोलीत टी.व्ही. या अराध्य दैवताची प्रतिष्ठापना झाली होती!  घराच्या अगदी शेवटी मोठंसं स्वयंपाकघर होतं अाणि त्याला लागून अाजोबांची खोली. त्यातच अामच्या घरातला देव्हारा होता. स्वयंपाकघरातून बाहेर गच्चीकडे जायच्या अाधी मोठा झोपाळा होता. त्यावरच अामची बरीचशी करमणूक अवलंबून असायची. मागल्या जिन्यानी खाली गेलं, कि भाडेकरूंचा "चौक" होता. तिथे सगळ्या बायका धुणी-भांडी करायच्या! कोल्हापुरात बायकांची संभाषणे खूप मजेदार असायची. तिथे पुण्याची, "अाज पाव-भाजी केली. त्या निमित्तानी मुलांच्या पोटात दुधी भोपऴा जातो", वगैरे वाक्य नसतात. 
"काय वैनी, धुनं झालं?..बर् त्ये न्हवं, भाजी काय केली अाजच्याला?"
"अाज होय (अामची मामी बामनी बोलते). काल अामचे मोठे भाऊजी अाले होते, त्यांनी वरण्याच्या शेंगा अाणल्या हो! मग अाज त्याचा झणझणीत भात केला. हे फार खूष झाले!"
"त्ये न्हवं, तुमचे सासरे कसे हायेत? अामचा गन्या बगा, अजून तीन वर्साचा न्हाई तर काल म्हन्ला, त्ये मुशिंकर अजोबा लई जोरात बोलत्यात. भांडन झालतं व्हय?" 
"कसलं हो भांडण! नेहमीचच!"
सगळ्यांना सगळं ऐकू येतं. पण उगीच न ऐकून नंतर स्वत:चा पुणेरी मिसळ-मसाला न घालता सरळ विचारतात! मला कोल्हापूरची ही गोष्ट फार अावडते. कुणीही "माय पर्सनल स्पेस" वगैरे तत्व मुळात मानतच नाहीत. त्यामुळे अापली फजिती, प्रगती, अधोगती छान मिळून-मिसळून खाता येते! 
मागल्या दारानी मागच्या बोळात जाता यायचं. पण गॅलरीसमोरचा रस्त्याची शोभा त्या बोळाला नव्हती. गच्चीवर नेहमी पतंग उडवायचा कार्यक्रम व्हायचा. त्यात मी व स्नेहा मांजा धरून "मांजा-डिस्पेन्सर" चे काम करायचो. साधारण अर्धा तास तसं केल्यावर पाच मिनीट पतंग उडवायला मिळायचा. मी या अन्यायाला वाचा फोडायचा खूप प्रयत्न केला पण मला कुणी फारसं महत्व दिलं नाही. तशी लहानपणापासूनच मी खूप बंडखोर होते. पण माझी उंची व चण बघता माझं बंड "भोकाड" या शब्दापलीकडे कधी गेले नाही. मी रडायला लागले कि बाबा माझी समजूत न काढता सगळ्यांसमोर जोरात घोषणा करायचा," अाता लोकहो, अापल्यासमोर येत अाहेत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सई केसकर. त्या सादर करीत अाहेत राग रडदारी. त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करुया." मग सगळे माकडाचा खेळ पाहिल्यासारखे खरंच टाळ्या वाजवायचे!
कधी कधी अज्जी,"नको रे रडवूस तिला" असं कळकळीने म्हणायची! पण बाबा अज्जिबात माझ्या रडण्याला भाव देत नसे!
अज्जीच्या खोलीत एक खोल खिडकी अाहे. त्याला लोखंडी गज अाहेत. त्या खिडकीत मी अजूनही पूर्ण मावते. त्यात बसून बेसनाचा लाडू खायचे मी दुपारी. "गादीवर सांडू नकोस" या सुचनेनंतर उगीच कशाला प्रयोग न सांडायचे म्हणून लाडू मन लावून खाता यावा म्हणून मी खिडकीत बसायचे! त्या खिडकीत सकाळी मऊ ऊन यायचं अाणि रात्री ताटलीसारखा चंद्र दिसायचा! त्या खिडकीवर माझ्या अाईचंही खूप प्रेम होतं.
हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या खिडकीत बसून मी वुडहाऊस वाचलं अाणि अगदी परवाच्या सुट्टीत अमर्त्य सेन! पण स्नेहाची हाक अाली कि लगेच टुणकन उडी मारून बाहेर पळायचे! :)
तिच्याशी भांडले कि रुसून मी खिडकीतच बसायचे. मग ती,"बोल कि गं सयडे", म्हणून मला खूप विनवायची! तसं तीही रुसायची. पण माझं खिडकितलं रुसणं मला फार अावडायचं! अजूनही गेल्या गेल्या अाधी खिडकीचं दर्शन घ्यावसं वाटतं!

Monday, April 20, 2009

फेमिलावाला

कोल्हापुरातली उन्हाळी दुपार स्वत:चं एक छान व्यक्तिमत्व घेऊन यायची. सगळ्या सख्या अाणि अज्ज्या गाढ झोपालेल्या, अाजोबांच्या हलक्या घोरण्याचा अावाज. स्वयपाक घरात नुकत्याच उरकलेल्या जेवणाचा सुगंध! लाकडी जिन्यावरून अाम्ही जशा संध्याकाळी धडाधडा पळायचो, तशी दुपारी पळायची हिम्मतच व्हायची नाही. मग दुपारी अामचे सुद्धा घर-घर, भातुकली, कॅरम असे शांत खेळ रंगायचे! कधी मी व स्नेहा गॅलरीच्या लाकडी गजांमधून अामचे एवढेसे पाय खाली सोडून बसायचो, साबणाचे फुगे उडवत. काचेच्या पेल्यात भरपूर सर्फ, अगदी एकवेळचं धुणं उरकेल एवढं! त्यात फ्रूटी किंवा तसलाच कुठलातरी जपून ठेवलेला स्ट्रॅा! मग दोघी वेगवेगळ्या दिशेला तोंडं करून फुगे उडवायचो. कधी एकमेकींचे फुगे हवेत अापटले की जो काही अानंद व्हायचा तो अोरडून व्यक्त सुद्धा करता यायचा नाही दुपारीमुळे!
पण या निरागस शांततेला एकच अपवाद होता! फेमिलावाला. "फेमिला" नावाच्या हातगाडी मध्ये अाईस्क्रीम घेऊन रोज दुपारी फेमिलावाला यायचा. त्यात पिस्ता, व्हानिला, स्ट्रॅाबेरी असे प्रकार असायचे. तो अाला कि अामचा गुणी शांतपणा एका क्षणात गुल होत असे! मग शक्य तितका कमी पावलांचा अावाज करीत अज्जीच्या खोलीत जायचो. अज्जी दुपारी 
चेह-यावर अोला पंचा टाकून मस्त झोपलेली असायची. क्षणभर माझ्यातल्या सैतानालाही पाझर फुटत असे तिच्याकडे बघून. पण "फेमिलाsss" अशी अारोळी ऐकली कि मग अज्जीला गदागदा हलवून उठवायचो!
 "अज्जी!! ऊठ!! फेमिलावाला अालाय!"
"रोज रोज नाही मिळणार अाईस्क्रीम. झोपू दे मला"
"असं काय गं करतेस! दे की! उद्यापासून नाही मागणार मी."
"असं रोज म्हणतेस. घसा खराब होईल. अाणि पाणी चांगलं नसतं त्यातलं. बर्फ तर अगदी वाईट. गटारातलं पाणी वापरतात ते लोक." (हे असले मन कलुषित करणारे विचार मला अजिबात घाबरवायचे नाहीत)
"असुदेत गटारातलं पाणी. मला नाही काही होत."
" अाई रागावते तुझी मला. तुझे असले लाड केलेले तिला चालत नाहीत."
"पण तू तिची अाई अाहेस ना. मग तू तिला रागवायचंस ना? दे ना गं अज्जी पैसे."

हा सगळा संवाद होईतो फेमिलावाला गल्लीच्या कोप-यावर पोहोचला असायचा. स्नेहा शांतपणे माझा दंगा अाणि हट्ट कधी फळ देईल त्याची वाट बघत बसायची. मग फेमिलावाला पार दिसेनासा झाल्यार अज्जी हळूच पाकिट उघडायची! मला या गोष्टीचा अतिशय राग यायचा. अज्जी खूप चांगली सिनेमा दिग्दर्शक झाली असती. अगदी ट्रेन चौथ्या गिअरमध्ये जाईतो "मत जाअो" अाणि जीव खाऊन पळायला लागेल अशा वेगावर अाली कि "जीले अपनी जिंदगी!".
मग अज्जीनी पैसे दिले कि लगेच अाम्ही पळत सुटायचो! धापा टाकत टाकत फेमिल्याला गाठलं कि दुपारचं सार्थक झाल्यासारखं वाटे! 
मग बराच वेळ गॅलरीतल्या गजांमध्ये पाय लटकवून फेमिलाची कांडी संपवायचो. तोवर चार वाजायचे अाणि अातून मामी-हुकुम यायचा," चहा प्यायला या गं." 
मग चहाबरोबर ,नव्हे चहात चुरडून खारी खायची! कधी चहा कमी पडायचा तर कधी खारी! पण चमच्यानी लगदा खाता येईल इतकी खारी झाली कि परत अामचा मोर्चा गॅलरीकडे!

Saturday, April 18, 2009

निकाल

एखाद्या सुट्टीत माझी परिक्षा आधी संपायची. मग मी स्नेहाची परिक्षा संपायची वाट बघायचे. कोल्हापुरात परिक्षांचं वारं काही वेगळच असायचं. माझा बाबा माझ्या अभ्यासाबद्दल खूप काळजी करायचा. रोज सकाळी सहा वाजता उठवून माझा अभ्यास घ्यायचा. न कंटाळता उजळण्या, पाठांतर सगळं अगदी रोज करून घ्यायचा! शाळेच्या दिवसात कधी मला सात नंतर उठल्याचं आठवत नाही! पण कोल्हापुरात मात्र रोज निलेश, स्नेहा अाणि माझी इतर भावंड नऊ वाजता उठून अकरा वाजता शाळेला पळायची. मला या प्रकाराचा कोण हेवा वाटायचा! पण परिक्षेच्या अादल्या दिवशी मात्र सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे असायचे. अण्णा अजोबा येता जाता पोरांना दम द्यायचे, "चिक्या लेका या वर्षी जर प्रमोट झालास तर शाळाच बंद करीन बघ तुझी". "प्रमोट" हा शब्द मी पहिल्यांदा निलेश उर्फ चिकू याच्या प्रगती पुस्तकात बघितला! काही विषयांमध्ये काठावर पास तर काही विषयांत ३२-३४ मार्क मिळाले कि पुढे ढकलायचे. त्याला "प्रमोट" होणे म्हणत. खूप वर्ष "प्रमोशन" म्हणजे काहितरी वाईट अशीच माझी समजूत होती! 
परिक्षेच्या सकाळी मामी युद्धभूमिवर उतरायची. पोळ्या लाटता लाटता स्नेहाची घोकंपट्टी चालू असायची! कधी कधी स्नेहा गणितं सुद्धा घोकून जात असे! अशी वाईट वेळ नंतर ईंजिनियरींग मध्ये माझ्यावरही अाली. पण शाळेत असताना बाबा घोकंपट्टीच्या अगदी विरोधात होता. कविता सुद्धा तो मला चित्रविचित्र हातवारे करून लक्षात ठेवायला लावायचा! इतिहास शिकताना कधी मला नेहरूंचं "डिस्कव्हरी आॅफ ईन्डिया" वाचून दाखवत असे. भुगोल शिकताना नकाशा घेऊन बसत असे! 
त्यामुळे मला स्नेहा अाणि कंपनीची सरळ साधी घोकंपट्टी फार मजेदार वाटत असे! अामच्या घरातल्या "हुषार" मुलांना ६० टक्क्यांहून जास्त मार्क मिळत! साठच्या वर जायचं हे एकच स्वप्न तमाम मुडशिंगीकर बघत असत. मला मात्र बाबा ९० टक्क्याहून जास्त मार्क मिळायलाच पाहिजेत अशी अट घालत असे! 
निकाल लागायच्या वेळी सगळेच काळजीत असत. त्यातल्या त्यात मी अाणि चिकू दादा (निलेश) जास्त काळजी करत असू! कारण त्याला नापास व्हायचं भय तर मला नौवदीच्या खाली घसरायचं! पहिली काही वर्ष मला नेहमी नंबर मिळायचा. मग हळू हळू मी ८७ टक्क्याच्या घरात अाले!  दर वर्षी निकाल लागला कि बाबाचा हिरमुसला फोन येई. नाही मिळाले ९० टक्के म्हणून. मग मला पण वाईट वाटत असे. एवढसं तोंड करून मी लोकांना निकाल सांगत असे पण स्नेहा मात्र "अामच्या सईला ८७ टक्के मिळाले" म्हणून सगळीकडे भाव मारत असे! तेव्हा मला स्नेहा अापले बाबा असती तर किती छान झालं असतं असं वाटायचं!

माझं गणित अगदी लहानपणापासून कच्चं होतं. गणितात अापल्याला गती नाही हे अंतिम सत्य मला चौथीच्या अासपासच गवसलं होतं. तरी काही ना काही कारणानी त्याला असत्य ठरवायचा अाम्ही खूप प्रयत्न केला! बाबानी खूप उशिरा हार मानली. तोपर्येंत ठोकून ठाकून मला नेहमी ८५ च्या घरात ठेवण्यात अालं! स्नेहा अाणि चिकूच्या अभ्यासाकडून असलेल्या माफक अपेक्षा बघून मला " किती समाधानी पोरं अाहेत ही!" असं कळकळीने म्हणावसं वाटायचं! जशा त्यांच्या शाळेकडून कमी अपेक्षा असायच्या तशाच त्यांच्या इतरांकडूनही असत. त्यांना कधी महागड्या सायकली, खेळातल्या गाड्या मिळाल्या नाहीत पण स्कूटरची टायर, मातीचे किल्ले, साबणाचे बुडबुडे असले खेळ अाम्ही नेहमी हुडकून काढायचो! एक सायकल पाळीपाळीने पार रंकाळ्यापर्येंत फिरवायचो! 
एकदा का निकाल लागला कि अामच्या सुट्टीमध्ये अडकलेला बोळा दूर होई अाणि नवीन वर्षाचे पाणी वाहते होई!

Saturday, April 11, 2009

ताजी

ताई अज्जीचं नाव घेतल्याशिवाय माझी सुट्टी पूर्ण होणं अशक्य अाहे! ताई अज्जी म्हणजे माझ्या आजोबांची पहिली बायको अाणि माझ्या आईची पहिली आई! तसं बघायला गेलं तर स्नेहाचे वडील म्हणजे माझ्या आईचा सावत्र भाऊ. आईचे सगळेच भाऊ सावत्र. पण आमच्या घरात सिंडरेलाच्या गोष्टीतली सावत्र आई कधीच नव्हती. ताई अज्जी माझ्या आईवर अाणि नंतर माझ्यावरही जिवापाड प्रेम करायची. अण्णा आजोबांचे नाव "वसंत" अाहे. त्यांच्या दोन बायका म्हणजे "मालती" (ताई) अाणि कुसूम! 
ताई अज्जी काही कुसूम अज्जीसारखी खूप शिकलेली वगैरे नव्हती. पण तिच्याबरोबर खेळायला वेगळीच मजा येत असे! दुपारी सगळी मोठी मंडळी झोपली कि अाम्ही पोरं अाणि ताजी (मी तिला हे नाव दिलं होतं) काच-कौड्या खेळायचो. काचेच्या बांगड्यांचे तुकडे, खडूने अाखलेला पाट अाणि कौड्या असं साहित्य असायचं. मग प्रत्येकजण एका रंगाच्या सात काचा पहिल्या चौकोनात ठेवत असे. कौड्यांच्या बेरजेप्रमाणे एक-एक काच पुढे सरकत असे! मग खेळ संपला कि हरण्या-जिंकण्यावरून रुसवे-फुगवे! स्नेहाचा मोठा भाऊ निलेश अाम्हाला पाट अाॅईल पेन्ट ने रंगवून देत असे. 
मामीच्या हातातली बांगडी फुटली कि लगेच अामच्या डावासाठी काच म्हणून उचलायचो! ताजीच्या हातातल्या बांगड्या अाम्ही अाधीच बुक करून ठेवायचो! 
कधी कधी ताजी जुन्या आठवणी सांगायची. काही काही गोष्टी अाम्ही रोज ऐकायचो! मामी कपडे वाळत घालता घालता, "कितिदा तेच तेच ऐकता गं पोरींनो" म्हणून रागवायची. ताजी खरं तर मीना मामीची सख्खी अत्या. त्यामुळे सासू-सुनेतली नेहमीची अौपचारिकता त्यांच्यात अजिबातच नव्हती. कधी कधी मामी ताजीला पण, "तू तरी कशी कंटाळत नाहिस गं तेच तेच सांगून" म्हणून रागवत असे! पण ताजी मात्र मुलांमध्ये इतकी खुलायची! 
"ताजी धोंड मामाला मुलगी बघायला जाताना गाडीला आग कशी लागली?"
"ताजी सारदळ अज्जींचा पाय खुर्चीत अडकून कसा मोडला?"
"समोरच्या पश्या दादाच्या प्लॅस्टर मध्ये झुरळ कसं गेलं?"
"ताजी राजामामानं लहानपणी चोर कसा पकडला?"
ह्या सगळ्या गोष्टी शंभर एकवेळा ऐकून झाल्या असतील तरी ती जिवंत असेपर्येंत अामचे समाधान म्हणून झाले नाही.

ताजी नेहमी साध्या सुती साड्या नेसायची. तिच्या साड्यांच्या कपाटात लवंगाची पुडी असायची. त्यामुळे तिला नेहमी लवंगाचा वास यायचा! तिच्या कुशीत खूप छान झोप लागायची. सकाळी अंघोळ झाली कि ताजी तिच्या कपाळावर मेणाने एकसारखा गोल अाखायची. मग हळूच चिमटीत कुंकू घेऊन त्यावर बरोब्बर गोल करून लावायची. जर मेणाच्या हद्दीपलिकडे कुंकवाची पूड गेलीच, तर ती तिच्या छोट्याशा बोटांनी परत गोल अाकारात पुसायची. तिचा खास कुंकवाचा छोटा अारसा होता! ताजी जेव्हा शेवटची घराबाहेर पडली, दवाखान्यात जाताना, तेव्हा तिने अाजोबांकडून कुंकू लाऊन घेतलं! जणू काही तिला माहितीच होतं काय होणार अाहे ते!
तिला कुंकू लावताना बघून वाटायचं अापलं लग्न कधी होणार? मग आपल्यालाही असं मोठ्ठ कुंकू लावता येईल! तिच्या जोडव्या पण काढून घ्यायचो अाम्ही कधी कधी. घरात सवत नांदत असूनही ताजीचा तो एकचित्त कुंकू कार्यक्रम बघून तिच्या भाबडेपणाचे खूप कौतुक वाटायचे! 

तिच्याबरोबर सालपापड्या कारायला सुद्धा खूप मजा यायची.  तांदळाचं पातळ पीठ ताटलीत गोल-गोल फिरवून नाजुक पापड बनवायचा! तो अर्धा अोला असताना खायला खूप धडपडायचो अाम्ही. त्यात ताजी एकटीच अामच्या बाजूने असायची. मग कुसुम अज्जी, "अहो ताई त्यांना सांगा कि चार पापड केले तर एक अोला खायला मिळेल."
मग ताजी कुसुम अज्जीच्या "बामणी" वळणाने तस्संच्या तसं म्हणून दाखवत असे आम्हाला! त्या दोघी मात्र एकमेकींना "अहो" म्हणायच्या! 
कधी कधी मला कांजिण्या किंवा गोवर झाला कि आई ताजीला पुण्याला बोलवायची माझ्याबरोबर रहायला. मग आई आॅफिसला गेली कि दहा वाजता ताजी मला उठवायची. गुलाबाच्या पाण्यानी मला पुसायची. गरम चहा अाणि खारी द्यायची. मग दिवसभर मोरावळा, मऊ भात, चहा करून द्यायची. संध्याकाळी दिवसभर उन्हात तापवलेल्या पाण्याने अंघोळ घालायची. त्यात कधी कडुलिंब, कधी संत्र्याची साल असं घालून मला स्वच्छ करायची! मग आई घरी यायच्या वेळी ताजी अाणि मलूल पण "ताजी"मी तिची वाट बघत दारात बसायचो! 
ती कुठेही गेली कि अाधी शेजा-या पाजा-यांशी दोस्ती करायची. अामच्याकडे अालटून पालटून अाईच्या दोन्ही अाया यायच्या. पण ताजीचा मनमिळाऊपणा अाणि कुसुम अज्जीचा शांतपणा बघून उगिचच लोकांना ताजी माझ्या अाईची अाई अाणि कुसूम अज्जी सासू अाहे असं वाटायचं! 

ती नकला पण करायची. तिची सगळ्यात अावडती नक्कल म्हणजे "मी मेल्यावर कोण कोण कसं कसं रडेल". त्यात नरू मामा कसा रडेल, राजा मामा कसा रडेल या सगळ्याचा तपशील असायचा. ती गेली तेव्हा कुणालातरी रडताना ते अाठवलं! त्या दु:खात सुद्धा सगळे खुदकन हसले! ती गेली तेव्हा खरंच लोक इतके हळवे झाले. अगदी गावातले मिशीवाले पाटील सुद्धा लहान मुलांसारखे रडले! 
माझ्या लहानपणात ताजीने असा काही ताजेपणा घातला कि नुस्ती आठवणही झाली तरी परत लहान झाल्यासारखं वाटतं!
अाणि ह्या आठवणी लिहिताना मला लेखिका म्हणून कुठेच डोकं वापरावं लागत नाही! जसं अाठवतं तसं लिहिते! मग लिहून झालं कि मलाच माझ्या लहानपणीच्या "मी" चा हेवा वाटतो अाणि मग थोडे देवाचे आभारही मानावेसे वाटतात!