Wednesday, September 22, 2010

सुट्टी संपली!

गेलं दीड वर्ष उन्हाळ्याची सुट्टी माझ्या डोक्यातला एक कप्पा झाली आहे. या कप्प्यात मला माहिती नसलेले खूप "धडे" लपले होते. ते माझे मलाच या गोष्टी लिहिताना समजले. या ब्लॉगला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद मला अगदीच अनपेक्षित होता. आधी मला मराठीत नीट लिहिता येईल की नाही याचीच मला खात्री नव्हती. त्यामुळे हळू हळू वाचकांच्या प्रतिक्रियांमधून माझी लेखनशैली कशी आहे, ती लोकांना का आवडते (म्हणजे ज्यांना आवडते त्यांना बरं का!) आणि मुख्य म्हणजे या गोष्टी वाचकांना त्यांच्या अनुभवांचीदेखील आठवण करून देतात, हे मला समजलं. पण सुरुवातीला हे लेख लिहिण्यामागे माझा खास असा काहीच हेतू नव्हता. फक्त माझ्या आजारी आजीला माझ्या लहानपणीच्या गोष्टी ऐकून बरं वाटावं हा एक उद्देश होता.
हा ब्लॉग मी माझ्या देशापासून दूर राहात असताना लिहिला. त्यामुळे तो लिहित असताना, माझ्या आजूबाजूचं जग आणि माझ्या गोष्टींमधलं माझं जग यातला मोठा फरक सतत माझ्या डोळ्यांसमोर तरळत असायचा. आणि या प्रक्रियेमुळे मी काही दिवस नकळत मी विद्यार्थी झाले. या विद्यार्थीदशेतल्या उपविद्यार्थी दशेत माझ्या लबच्या बाहेरच्या जगातली गणितं मी माझ्या या सुट्टीच्या शिदोरीने सोडवायचा प्रयत्न केला. त्यात मुख्यत: मला शहाणं असण्यामधला आणि सुशिक्षित (किंवा उच्चशिक्षित) असण्यामधला फरक लक्षात आला. या दोन गोष्टी नेहमी एकत्र दिसतीलच असं नाही. माझ्या आयुष्यात प्रभावी ठरलेली बरीच शहाणी माणसं उच्चशिक्षित नव्हती, पण आजही प्रत्येक अडचणीच्या, आनंदाच्या क्षणी मला त्यांची आठवण येते. माझ्या दोन आज्या माझ्या बालपणीच्या गोष्टींमधल्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. आणि दोघींच्याही भिन्न पण प्रभावी शहाणपणाचा मला अजून उलगडा होतो आहे.
तसंच आनंदी बनण्यासाठी खरं तर कुठलीच गुंतवणूक लागत नाही हादेखील माझ्या सुट्टीमधल्या पात्रांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यामुळे मला अमुक अमुक मिळाल्याने मी खूप आनंदी होईन, असा विचार करण्याची माझी वृत्ती या लेखांमुळे कमी झाली आहे. आणि असा निरुद्देश आनंद, "आनंदी होण्यासाठी" म्हणून आखून ठेवलेल्या त्या ध्येयांकडे जाण्यात खूप उपयोगी पडतो. त्यामुळे हे दीड वर्ष मला खूप काही शिकवून गेलं. हे लेख लिहिण्यासाठी मी माझ्या अभ्यासातून आणि प्रयोगशाळेतल्या कामातून वाचलेला वेळ वापरायचे. त्यामुळे बसमधून घरी येताना, किंवा ट्रेनमध्ये खिडकीबाहेर बघत बघत यातील बरेच पोस्ट मी तयार केले. शक्यतो दर आठवड्यात काहीतरी नवीन लिहायचं असा स्थूल नियम स्वत:ला देऊन मी हे पोस्ट लिहिले. त्यामुळे वेळेच्या नियोजनाचे खूप महत्त्वाचे धडे मला हे लेख लिहिताना मिळाले.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायत्रीसारखी हुशार मैत्रीण माझे लेख तपासून द्यायला पुढे आली. कोल्हापूरबद्दल ऑस्ट्रेलियात बसून मी लिहिणार आणि अमेरिकेत राहणारी दुसरी कोल्हापूर-कन्या ते तपासणार या सोहळ्याचं खूप कौतुक वाटतं. सुट्टीच्या प्रत्येक पोस्टनिशी आमची मैत्री घट्ट होत गेली. गायासारखी मैत्रीण मिळवून दिल्याबद्दलदेखील सुट्टीचे खूप आभार मानावेसे वाटतात. ती उत्तम समीक्षक आहे, पण त्याआधी ती एक प्रामाणिक वाचकदेखील आहे. तिच्यासमोर जे येईल ते ती स्वत:च्या कुठल्याही मताचा चष्मा न लावता वाचते, त्यामुळे मला तिचं मत फार महत्त्वाचं वाटतं. आणि तिच्या दगदगीच्या आयुष्यातून तिनी नेहमी माझ्या लेखनासाठी वेळ काढला यासाठी मी तिची आभारी आहे. केवळ गायत्रीचाच नव्हे तर माझ्या सगळ्या जवळच्या सख्यांचा माझ्या या लेखनात अप्रत्यक्ष सहभाग आहे. चांगल्या मैत्रिणी असणं आणि त्यांचा आयुष्यात सतत स्नेह असणं किती महत्वाचं आहे, हेसुद्धा कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीनेच मला दाखवून दिलं.
गेल्या काही महिन्यांत मला हा ब्लॉग इथेच थांबवावा असं वाटत होतं. पण काही आठवणी मृगजळासारख्या तो निर्णय पुढे ढकलायला लावत होत्या. पण आता तो निर्णय पक्का झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टी इथे संपवत आहे. याचा अर्थ आठवणी संपल्या असा नाही. पण आता आंतरजालावरच्या माझ्या या ओळखीतून बाहेर जाऊन खर्‍या जगातल्या गमतीजमती अनुभवायची इच्छा प्रबळ झाली आहे. तसंच काही पुस्तकं पुन्हा वाचायची आहेत, एखादी नवीन भाषा शिकायचाही बेत आहे. आणि मुख्य म्हणजे पी.एच.डी. संपवून एका खूप शिकवून जाणार्‍या प्रवासाचा शेवट करायचा आहे.
म्हणून सुट्टीची सांगता.
लोभ असावा!
सई

Saturday, September 18, 2010

नरूमामाचा गणपती

या वेळेचा पोस्ट इथे वाचा. मायबोली गणेशोत्सवात माझी ही दुर्वांची जुडी!

Tuesday, September 14, 2010

आई मोठी होत असताना..

मी बारा-तेरा वर्षांची असताना आईनी तिची ’वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मधली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तो घेताना तिनी सगळ्यांचा सल्ला घेतला होता. अण्णा आजोबा, बाबा, तिचे व्यावसायिक भागीदार, माझे मामे आणि परिवारातील इतर मान्यवर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला होता. पण एक दिवस तिने माझ्याकडे येऊन मला, "सई, मी सोडू ना नोकरी? तुला काय वाटतं?" असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ती मला अगदी लहान मुलीसारखी वाटली होती. आणि एवढ्या सगळ्या सल्ल्यानंतरदेखील तिला माझा सल्ला महत्वाचा वाटतो यानी मला नवीन आत्मविश्वास आला होता. अखेर तिनी तिचा निर्णय अमलात आणला आणि १९९५ साली मार्क लॅब्सची स्थापना झाली. आई आणि बाबा दोघेही त्यात गुंतल्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक होती. सुरुवातीला आम्ही आमच्या घराच्या खाली एक दुकान गाळा घेतला. तिथे आईचं पहिलं ऑफिस थाटण्यात आलं. पहिलं वर्ष नक्की काय करायचं, लॅबसाठी कर्ज कुठून घ्यायचं या विचारात निघून गेलं. मग आई-बाबांचा कोल्हापूरचा बालमित्र, विनूकाका मदतीला आला आणि आम्हाला सिंहगड रोडवर जागा मिळाली. तिथे आमच्या लॅबची पहिली इमारत बांधण्यात आली. तेव्हा पाच खोल्यांची बैठी इमारतसुद्धा खूप मोठी वाटायची. आता पंधरा खोल्यांची तीन मजली इमारतसुद्धा लहान वाटते.
सुरुवातीला भांडवल गोळा करण्यासाठी आईनी 'सुक्रोस्कॅन', या साखरेचा रंग मोजायच्या अतिशय सोप्या सिस्टिमची कल्पना सत्यात उतरवली. या मशीनबरोबर कारखान्यांना त्यांच्या साखरेचा दर्जा तपासायला शिकवलं जायचं. हे करण्यासाठी आईला भारतातल्या सगळ्या भागांमध्ये जावं लागायचं. आधी महाराष्ट्रात त्याचा प्रचार केला. तेव्हा मीदेखील सुट्टी असेल तेव्हा आईबरोबर जायचे. कधी अजिंक्यतारा, कधी किसन-अहीर, कधी वारणानगर, सगळीकडे कृती ठरलेली असायची. आधी तासभर अधिकार्‍याची वाट बघायची, मग पुढे त्यांना माहिती द्यायची आणि या मशीननी तुमच्या साखरेचा दर्जा कसा सुधारता येईल याचं प्रात्यक्षिक. तेवढा वेळ मी कारखान्यात फेरफटका मारून यायचे. कधी एखादा चीफ केमिस्ट, "मॅडमच्या मुलीसाठी रस आण जाऊन पटकन" अशी आज्ञा द्यायचा. कधी कधी आई मला गाडीत बस असं सांगून जायची. तेव्हा मी (आमच्या यशोधनमध्ये) कारखान्याच्या मोठ्या गेटातून आत येणार्‍या, उसानी मढलेल्या बैलगाड्या बघत बसायचे. कधी कधी या भेटी आमच्या सुट्टीच्या मध्ये पेरल्या जायच्या. त्यामुळे कारखान्याजवळचा तो मळीचा वास आला की माझी चिडचिड सुरु व्हायची. :)
सुक्रोस्कॅनमुळे लॅबसाठी लागणारं भांडवल उभं राहू लागलं. आईनी केमिटो नावाच्या नाशिकच्या कंपनीशी मशीन बनवून द्यायचा करार केला. आणि त्यांना खास भारतीय साखरेसाठी लागणार्‍या सगळ्या सुविधा त्यात बसवण्याचं प्रशिक्षण दिलं. साखरेचा रंग तपासण्यासाठी लागणारी सगळी रसायनं आई त्या मशीनबरोबर बनवून द्यायची. थोडक्यात साखर कारखान्यांसाठी हे 'मॅगी' बनवण्यासारखं झालं होतं. साखरेचा रंग उसाच्या रसापासून साखरेच्या शुभ्र दाण्यापर्यंत कसा बदलतो यामागे खूप सारं रसायनशास्त्र आहे. भारतीय साखर परदेशी पाठवता यावी यासाठी साखरेचा रंग तपासावा लागतो. आणि एकदा साखर तयार झाली की तिचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे साखर तयार होत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांवर रंग मोजण्याची प्रथा आईने कारखान्यांमध्ये रुजवली. याला तिनी "कलर बॅलन्स स्टडी" असं नाव दिलं होतं! तो अभ्यास करायला वेगवेगळे कारखाने तिला आमंत्रण देऊ लागले. थोडेच दिवसात आईचा हा अभ्यास भारतातल्या इतर कारखान्यांपर्यंत जाऊन पोहोचला. साधारण या काळात भारतात कोका-कोला आणि पेप्सी हे परदेशी शीतपेयांचे उत्पादक दाखल झाले होते. आधी साखरेचा रंग मोजणं, तिच्यातील इतर भेसळयुक्त पदार्थांचा अभ्यास करणं गरजेचं मानलं जात नसे. कारण भारतात साखरेवर सरकारचे नियंत्रण होते. त्यामुळे कारखान्यांमध्ये कुठलीच स्पर्धा नव्हती. पण परदेशी उत्पादक भारतीय बाजारात उतरल्यामुळे साखर उत्पादनात एक नवी क्रांती झाली.
पण क्रांती होत असताना मात्र त्यात भाग घेणार्‍या लोकांची खूप दमछाक होते. तशीच आईचीसुद्धा झाली. त्या काळात आई कधी उत्तर प्रदेश, कधी बिहार, कधी कर्नाटक, कधी तमिळनाडू अशा सगळ्या कारखान्यांमध्ये जायची. अजून सगळीकडे विमानांनी जाण्याइतके पैसे नसल्यामुळे आई रेल्वेनी जायची. त्यात तिच्या चुकणार्‍या गाड्या पकडून देताना आमची खास त्रेधा तिरपीट व्हायची ते वेगळंच! पण कधी वेटिंग लिस्टवर नाव पुढे न सरकल्यामुळे, तर कधी काम वाढून वेळ निघून गेल्यामुळे आईला रात्री अपरात्री एकटीला जनरल डब्यातून परत यावं लागायचं. पण अगदी बिहारच्या खेडेगावातून जाताना देखील तिला नेहमी चांगलीच माणसं भेटली.
मग आईचा दौरा असला की कुसुमअज्जी आमच्याकडे येऊन राहायची. आणि आई कामावर गेली की तिच्या फोनची आम्ही दोघी वाट बघत बसायचो. पण या सगळ्या कष्टातून आमची लॅब मोठी होऊ लागली. मी शाळेतून बाहेर पडल्यावर कधी कधी आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची. आणि कारखान्यात छोटी छोटी कामं मला करायला द्यायची. त्याबद्दल मला पैसे मिळायचे. त्यामुळे मी खूष असायचे. अकरावी बारावीच्या सुट्टीत मला रोज शंभर रुपये अशा बोलीवर तिनी नोकरीला ठेवलं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी तिनी तिच्या स्टाफला मला प्रयोगशाळेतली भांडी घासायला द्या असा आदेश दिला होता. तेव्हा मी फक्त अंती मिळणार्‍या नोटेकडे डोळे लावून ते काम केलं होतं. :)
याच दरम्यान तिला सुक्रोस्कनच्या अभिनव कल्पनेसाठी पारखे पुरस्कार मिळाला. त्यानंतर खर्‍या अर्थाने आमची लॅब सुरु झाली. जागतिक स्तरावर काम करण्यासाठी म्हणून मार्कला आय.एस.ओ १७०२५ मान्यता मिळायला हवी होती. ती सगळ्यांनी मिळून मिळवली. आणि मग कोका-कोला आणि पेप्सी सारख्या उत्पादकांमधला आणि कारखान्यांमधला दुवा मार्क झाली. हळू हळू आमच्याकडचे कर्मचारी वाढू लागले. यातही आई नेहमी खेड्यातून येणार्‍या तरुणांना प्राधान्य देते. त्यांची राहायची व्यवस्था करायला मदत करते आणि त्यांना आय.एस.ओ प्रणालीनुसार प्रशिक्षण देते. आज तिच्याकडे जवळपास चाळीस लोक काम करतात. मार्क लॅब्सबरोबरच मार्क हेल्थ प्रॉडक्टस्‌ सुद्धा सुरु झालं. या उपक्रमातून कनक गूळ पुण्याच्या बाजारपेठेत आला. बाजारातला गूळ सोनेरी दिसावा म्हणून शेतकरी त्यात हायड्रॉस या रसायनाचा मारा करतात. म्हणून आईमाधल्या शास्त्रज्ञ गृहिणीने कनक गूळ तयार करायची कल्पना अमलात आणली. यातही कोल्हापुरातल्या काही शेतकर्‍यांना तो तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. हल्ली साप्ताहिक सकाळमध्ये पुरणपोळीच्या कृतीत, 'अर्धा किलो कनक गूळ' अशी जिन्नस यादीत सूचना असते. ते बघून आईचा खूप अभिमान वाटतो. कनक गुळाच्या प्रचारासाठीदेखील आईनी मला पगार दिला होता. तेव्हा मी अभियांत्रिकीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये होते. ग्राहक पेठ, वेगवेगळी महिला मंडळं, भिशा अशा ठिकाणी मी माझं पुणेरी काकूंच्या सगळ्या खडूस प्रश्नांसाठी तयार केलेलं भाषण घोकून जायचे. आणि बहुतेकवेळा माझ्या तोंडाची भरपूर वाफ दवडूनदेखील मनाजोगता खप व्हायचा नाही. मग आम्ही प्रचारानंतर पाणीपुरी खाऊन आमचं दु:ख विसरायचो.
आईच्या कर्माचार्‍यांमध्ये सत्तर टक्के महिला आहेत. कनक गुळापासून ते थेट लॅबपर्यंत सगळीकडे तरुण मुली काम करताना दिसतात. आणि एखाद्या मोठ्ठ्या परिवारासारख्या सगळ्या एकमेकींना मदत करतात. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्या मुलींना त्यांच्या मुलांसकट कुठेतरी सहलीला जायला मिळतं. महिला दिनानिमित्त मार्क मध्ये एखाद्या पाहुण्या यशस्विनीला बोलावण्यात येतं आणि सगळ्या मुलींना गुलाबाची फुलं देण्यात येतात. आमच्या अभियांत्रिकी गटातल्या चुणचुणीत मुलांनादेखील या दिवशी बक्षीस दिलं जातं. :) आईचं वर्ष दिवाळीनंतर भारत दौ्र्‍यात तर दिवाळी आधी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात वाटलेलं असतं. इकुम्सा या साखर संशोधनाच्या जागतिक कमिटीवर ती भारताचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे साखरेसाठी लागणार्‍या नवनवीन मेथड्सवर ती सतत काम करत असते.
आईबद्दल बर्‍याच मासिकांतून लेख लिहून आले आहेत. पण हे सगळं करताना तिची होणारी घालमेल, तिची चिंता, तिची जिद्द, तिचा साधेपणा मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेला. भूतकाळातील प्रसंग सांगताना नेहमी लोक त्याला वेगवेगळ्या झालरी लावतात. कुणी "पुरुष-प्रधान व्यवसायात पाय रोवून उभी राहिलेली महिला" म्हणतात तर कुणी "यशस्वी महिला उद्योजिका" म्हणतात. पण आई मोठी होताना मात्र, 'महिला', 'उद्योजिका', 'यशस्वी' हे कुठलेही शब्द तिच्या डोक्यात नव्हते. तिच्या समोर फक्त एकच ध्येय होतं. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे. जगात कुठेही वावरताना, 'मला चांगली माणसंच भेटतील' असा आत्मविश्वास बाळगायची ताकद मला आईमुळेच मिळाली.
या महिन्यात माझ्या आईचा वाढदिवस असतो. तिला तिच्या या प्रवासात माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिनी कुठलही काम आनंदाने करण्याच्या मला लावलेल्या सवयीचा मला आजही पावलोपावली उपयोग होतो आहे.
-------
आईबरोबरच माझ्या बाबाला आणि गायत्रीच्या आईला, म्हणजे उमामावशीलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा!! :)

Wednesday, August 25, 2010

फोना-फोनी

साधारण बारावं वर्ष ओलांडल्यानंतर आयुष्यात नवीन-नवीन घडामोडी सुरु होतात. त्यातलीच एक म्हणजे 'फोना-फोनी'. फोन माझ्या ’अल्लड बालिका’ अवस्थेतला फार महत्त्वाचा मित्र होता. आणि अर्थातच माझ्या आई-बाबांच्या ’सुजाण पालक’ अवस्थेतला मोठा शत्रू.
"एवढं काय फोनवर बोलायचं असतं जे शाळेत बोलता येत नाही?"
हा प्रश्न एखाद्या बोचर्‍या कॅक्टस सारखा माझ्या कानाच्या आणि फोनच्या मध्ये उगवायचा. आता या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची झाली तर मला आई-बाबांना एक अख्खी रात्र जागवून माझ्या शाळेतल्या आयुष्यातले सगळे डावपेच समजावून सांगावे लागले असते. आणि तसं करताना माझ्या मैत्रिणींची बरीच गुपितं त्यांना सांगावी लागली असती. त्यामुळे "मी अभ्यासाचं बोलतीये", हे वाक्य ठरलेलं असायचं. आम्ही शाळेतून सायकलवरून एकत्र घरी यायचो. माझ्या घराच्या फाट्यावरून बर्‍याच जणांना वेगळ्या दिशेला जावं लागायचं. त्यामुळे तिथे एका कोपर्‍यावर आम्ही मैत्रिणी घोळका करून थांबायचो. येणार्‍या-जाणार्‍या सुजाण नागरिकांच्या कुजकट नजरा झेलत आम्हाला आमची शेवटची खलबतं करावी लागायची. पण घरी आल्या आल्या मी लगेच अमेयाला फोन लावायचे, किंवा तिचा तरी यायचा.
मग चहा आणि खारी खात असताना फोन वाजला की बाबा, "नक्की अमेयाचा असणार हा फोन. काय एवढं बोलायचं असतं गं? आत्ताच आलीस नं शाळेतून?" असं म्हणत म्हणत फोनकडे जायचा. आणि खरंच तो फोन अमेयाचा असायचा. मग हातात फोनचा रिसीवर धरून बाबा त्याचे मोठे डोळे गोल-गोल फिरवायचा. आपल्याला कशी एखाद्या गोष्टीची सवय होते: कामवाली बाई वेळेवर न येणे, किंवा एखाद्या मैत्रिणीची नेहमी उशिरा यायची सवय, किंवा आजोबांची मोठ्या आवाजात टी.व्ही नाहीतर रेडियो ऐकण्याची सवय, हे सगळं थोडे दिवसांनी दिसेनासं होतं. तशी माझी फोनवर बोलायची सवय कद्धीच दिसेनाशी झाली नाही. उलट दिवसेंदिवस आई-बाबा अजूनच कडक होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या फोनच्या बिलांनी भरलेल्या डोक्यात आम्हाला घरी येऊन लगेच फोन का करावे लागत असतील याचा कुठलाही अंदाज यायचा नाही. त्यांना ते अस्वाभाविक वाटायचं.
पण शाळेत पाच जणींच्या गटात दहा प्रकारे मैत्री होऊ शकते हे आम्ही शाळेतच शिकलो होतो. खरं सांगायचं तर गणितातला तो भाग मला कुणाचं कुणाशी भांडण आहे हे आधी माहिती असल्यामुळे फार सोपा गेला होता. पण खर्‍या आयुष्यात काही पाच मुलींचं कसं जमू शकेल ते बाईंच्या गणितांनी सोडवता यायचं नाही. त्यामुळे कुठल्याही दोन मुली कुठल्याही तीन मुलींच्या विरुद्ध असू शकायच्या. आणि कधी कधी एक विरुद्ध चार अशीही वेळ यायची. त्यामुळे या सगळ्या संभाव्यता लक्षात घेता घरी आल्या आल्या तातडीनी फोन करायला लागणं काही विशेष नव्हतं. त्यात इयत्ता वाढेल तशी गणितंदेखील वाढत गेली. हायस्कूलमध्ये गेल्यावर अचानक मोठे गट तुटून छोटे झाले. आणि मग अंतर्गत भांडणांच्या जोडीला आंतरगट भांडणंदेखील उभी राहिली. त्या कोलाहलात अचानक वर्गातील मुलांशी मैत्री झाल्यामुळे तर परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली. अगदी सुरवातीला आम्ही फक्त कोण बरोबर कोण चूक याचे न्यायनिवाडे करायला फोन वापरायचो. मग शेवटी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फोन करून चूक असलेल्या मुलीची कानउघाडणी करायचा बेत रचायचो. पण नंतर मात्र मुला-मुलींच्या मैत्रीबद्दल इतरांचं काय मत आहे यावर आई-बाबांचे बरेच रुपये खर्ची पडले. मग वर्गातल्या सुंदर मुली आणि त्यांच्यासाठी देवदास बनलेली मुलं याचं बघ्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं विवेचन हा आमचा आवडता खेळ बनला.
मग कुणीतरी विश्वासानी अमेयाकडे सोडलेली मनातली गाठ ती मला विश्वासात घेऊन सांगायची. शाळेपासूनच माझ्याजवळ सगळे गाठी सोडायला यायचे. खरं तर शाळेतल्या या बॉलीवूड सिनेमा युगात माझी कधीच हिरॉईन झाली नाही. पण एकदमच एखादी मैत्रीण मला, "तुला एक गोष्ट सांगू? मी हे अजून कुणालाच सांगितलं नैये..पण.." असं काहीसं अदृश्य पदर हातात खेळवत म्हणू लागली की माझ्या पोटात गोळा यायचा. तसाच एखादा मित्र माझ्या एखाद्या मैत्रिणीवर भाळून कविता वगैरे करू लागायचा. त्यावर अभिप्राय द्यायची जबाबदारीदेखील माझ्यावरच यायची. मग जसे, "सई तो मला असं म्हणाला, मी काय करू?" असे फोन येऊ लागले तसेच मित्रांचे, "सई ती मला असं म्हणाली, याचा मुलींच्या भाषेत अर्थ काय?" असेही फोन येऊ लागले. त्यामुळे मी सायरा बानो झाले नसले तरी तिची घट्ट सलवार घालून सायकल वरून 'खेळायला' जाणारी हुशार मैत्रीण नक्कीच झाले होते. शाळेतल्या एका मुलीवर माझ्या एका मित्राच्या नावानी विनोदी कविता केल्याबद्दल माला मुख्याध्यापिकेच्या समोर उभं करण्यात आलं होतं. त्या कविता वाचून हसू लपवत मला रागावल्या होत्या. आणि त्याच भेटीत असले गुण उधळण्यापेक्षा मी संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता.
पण आमच्या वर्गात अगदी शहाणी, अभ्यासू मुलंदेखील होती. त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी आम्ही आमच्या या टगेपणाला 'समाजात वावरायची हुशारी' असं नाव दिलं होतं. आणि त्यावर आमच्या गटात नेहमी जोरदार चर्चा व्हायची. पण खरं सांगायचं झालं तर मला अभ्यासू लोकांबद्दल मनापासून आदर होता. आणि मी स्वत: अभ्यासू नाही याचं मला थोडं दु:ख व्हायचं. पण अमेया लगेच माझ्या या शंकांचं माझ्यावर दरडावून निरसन करायची. आजही कधी कधी "आपण तेव्हा अभ्यास करायला हवा होता" अशा वाक्यावर आम्ही चुकून येतो. पण त्यानंतर लगेच डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसूदेखील येतं. तेव्हाची फोनवर झालेली चर्चा आठवली की आई-बाबांची खरंच दया येते. का म्हणून त्यांचे एवढे पैसे वाया गेले असतील? आणि तेव्हा देवदास आणि मीना कुमारी झालेली मुलं-मुली आज मस्त सौख्यभरे नांदत आहेत.
तरी माझ्या आई-बाबांच्या पिढीला सेलफोनला चिकटलेली मुलं बघावी लागली नाहीत. आणि फेसबुक, स्काईप असले राक्षसही 'आमच्या काळी' नव्हते. आजची पिढी खलबतं करायला स्काईप कॉन्फरन्स करू शकत असेल त्याचा मला जाम हेवा वाटतो. आमच्या वेळी हे असतं तर सगळी भांडणं एका टिचकीत सोडवता आली असती.
परवा रात्री माझ्या फोनचं बिल पाहून अचानक माझे डोळे पांढरे झाले. एवढे फोन आपण कुणाला केले? आणि आता हे बिल भरून काढण्यासाठी किती तास हमाली करावी लागणार हे शोधून काढताना लक्षात आलं की ते सगळे महागडे फोन आईला केले होते. आणि मग बिलाकडे बघून, "एवढं आपण काय बोललो? आणि आईशी एवढं काय बोलायचं असतं?" असा प्रश्न पडला. आणि दुसर्‍या क्षणी आईचं ते कॅक्टससारखं वाक्य आठवलं आणि खूप छान वाटलं. :)

Saturday, August 21, 2010

आमची यशोधन

मी लहान असताना कधीतरी शाळेतल्या एका अगाऊ पोरानी पुण्यातल्या श्रीमंतीचे स्तर समजावून सांगितले होते.
"ज्यांच्या आजोबांनी बंगला बांधलेला असतो ते गर्भश्रीमंत"
"ज्यांचे बाबा बंगला बांधतात ते खूप जास्ती श्रीमंत"
"ज्यांचे बाबा नवी चार चाकी गाडी घेतात ते खूप श्रीमंत"
"ज्यांचे बाबा सेकंड हॅन्ड चार चाकी गाडी घेतात ते नुसते श्रीमंत"

यात शेवटी "ज्यांचे बाबा गाडी, बंगला सगळं एकदम घेतात ते मराठी नसतात" असं टाकायला हवं होतं त्या पोराच्या बाबांनी. पण ही व्याख्या ऐकून माझ्या वर्गातल्या पोरांचं सामान्य ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही बरीच वर्षं श्रीमंतीच्या या कुठल्याच श्रेणीत नव्हतो. माझ्या बाबाकडे कायनेटिक होंडा होती. त्यावरून आम्ही तिघं मजेत फिरायचो. लहान असताना मला मध्ये बसवून आई-बाबा लांब फिरायला न्यायचे. त्यात फिरण्याची मजा घेण्यापेक्षा आईचं निम्मं लक्ष माझे बूट पायातून निसटून पडणार तर नाहीत, याकडेच असायचं. ही गैरसोय टाळण्यासाठी मला "बुटाचा ड्रेस" आणण्यात आला. त्याला विजारीखाली चिकटवलेले बूट होते. बाहेर जातान मला कपड्यासहित त्या बुटाच्या सुटात कोंबण्यात यायचं. आणि एवढं बांधून ठेवल्यामुळे मी स्कुटरवर बसल्या बसल्या झोपून जायचे. त्यामुळे मग आईचं सगळं लक्ष मला "झोपू नकोस" असं दरडावण्यात जायचं.
पण त्या दशकात मराठी माणूस श्रीमंत झाल्याचं पहिलं लक्षण म्हणजे सेकंड हॅन्ड गाडी. मग तो होतकरू मराठी माणूस नवी गाडी घ्यायचा. पण पहिली गाडी मात्र नवी नसायची. अर्थात माझ्या मित्राच्या व्याख्येनुसार गर्भश्रीमंत लोक नवी फियाट घ्यायचे.

त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या आई-बाबांनीसुद्धा सेकंड हॅन्ड चार चाकी घेतली. पण ती नक्की कितव्या हाती पडली होती हे मात्र गुपित होतं. असेना का! पण प्रश्न तोसुद्धा नव्हता. गाडी किती जुनी आहे यापेक्षा एक अत्यंत बोचरी गोष्ट माझ्या लगेच ध्यानात आली. त्या फियाटवर मागे "यशोधन" असं भगव्या रंगात ठसठशीत अक्षरांत लिहिलं होतं. आता गाडीच्या मागच्या काचेवर असं "यशोधन" का लिहावं? मला वाटलं बाबा ते नक्की काढून टाकेल. आहे काय त्यात? एक काच तर बदलायचीये.

पण गाडी कोल्हापुरात घेतली. त्यामुळे ती घरी आणताच ताजी आणि माझ्या माम्या तिची पूजा करायला आल्या. मग मागे ते लिहिलेलं बघून, "शिरीष हे बदलू नकोस बरंका. ज्या अर्थी असं लिहिलंय, त्या अर्थी नक्की या गाडीच्या पूर्वीच्या मालकाला काहीतरी खूप मोठा लाभ झाला असणार या गाडीमुळे",असं माझ्या तरुण होऊ घातलेल्या मनावर नांगर फिरवणारं मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे पुण्याला येईपर्यंत तरी "यशोधन" तसंच राहणार हे नक्की झालं. मला ना असले शकून बिकून अजिबात आवडत नाहीत. एखादं घर पाहून, "या घरात मला अतृप्त आत्म्यांचा वास येतोय", किंवा "या घरात नक्की गुप्तधन असणार" असं म्हणणारे लोक फार अस्वस्थ करतात. कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं. असू देत अतृप्त आत्मे. मला सांगू नका.

पण गाडीवर असं नाव लिहिलंय याचा मला सोडून कुणालाच त्रास होत नव्हता. स्नेहा सगळ्यांना, "काकी आमची यशोधन बघायला या ना!" म्हणून आमंत्रण देत सुटली. चिकूदादा आमच्याकडे शिकायला होता. तोही, "आत्या आपण पुण्याला यशोधनमधून जायचं?" असं विचारू लागला. त्यामुळे ते नाव हाणून पडायचा माझा बेत डळमळीत होऊ लागला. चार दिवस कोल्हापुरात वेगवेगळ्या देवांना जाऊन आल्यावर "यशोधन" आमच्यातलीच एक झाली. त्यामुळे बाबाला यशोधन नाव काढून टाक हे सांगणं म्हणजे मी किती दुष्ट आणि शिष्ट आहे याचा पुरावा देण्यासारखं झालं असतं. पुण्याला येईपर्यंत बाबासुद्धा, "आधी आपण यशोधनला सिंहगड दाखवूया", वगैरे बोलू लागला. त्यामुळे आपले आई-बाबा नुसत्या श्रीमंतांपासून खूप श्रीमंत होईपर्यंत काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं.

थोडेच दिवसात यशोधनने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. सिंहगडच्या चढावरच तिला पहिला घाम फुटला. मग आईनी गडावरचं मडक्यातलं दही खाऊन झाल्यावर प्यायला आणलेलं उकळलेलं पाणी तिला पाजण्यात आलं. मग प्रत्येक नव्या सफरीत यशोधन नवीन नाटक करू लागली. कधी कधी बाबा उत्साहानी मला शाळेत आणायला येतो म्हणाला की माझ्या पोटात गोळा यायचा. एकतर आमची गाडी उठून दिसायची. आणि एवढी यशोधन लिहिलेली गाडी बंद पडलेली बघायला लोकांना फार मौज वाटायची. ती दुसर्‍याची गाडी असती मलाही वाटली असती!

त्यानंतरच्या काही वर्षांत मोडकी गाडी नवरा-बायकोमध्ये तीव्र मतभेद घडवून आणू शकते याचं आमच्या घरात सातत्याने प्रात्यक्षिक होऊ लागलं. खरं तर नुसतं एका गाडीतून आधी न गेलेल्या ठिकाणी जाणं हेदेखील युद्धाचं कारण होऊ शकतं. त्यात माझी आई काही काही विनोदी प्रश्न विचारून त्या भांडणांमध्ये थोडा खुसखुशीतपणा आणायची.
"मागच्या वेळेस ही इमारत डावीकडे होती! आता उजवीकडे कशी आली?" -आई
"महापालिकेचा वेळ जात नव्हता. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी ती उचलून उजवीकडे ठेवली. पेपरमध्ये नाही का वाचलंस?" - बाबा

एकदा मी आणि बाबा पुण्यातल्या कुठल्यातरी अडचणीच्या पेठेतून चाललो होतो तेव्हा एक सायकलवाला मागून येऊन, "काय राव! एवढी चार चाकी गाडी आणि किती हळू चालवताय!" म्हणून पुढे निघून गेला होता. तेव्हा बराच वेळ बाबाला काय झालं हे नीट समजलंच नव्हतं.

बाबाला गाडीत रेडियो लावून त्याबरोबर गायची सवय आहे. यावरून आमच्या गाडीत खूप मतभेद होतात. शेवटी नेहमी बाबा, "घर की मुर्गी दाल बराबर" हा मुहावरा वापरून गाणं बंद करतो.

मी आणि आईनी यशोधन झेंडे करायचं ठरवलं होतं. जिथे जिथे ती बंद पडेल तिथे तिथे यशोधन झेंडा रोवायचा. आमच्या असल्या कल्पना बाबाला फार दु:खी करायच्या. कारण बाबाचं यशोधनवर फार प्रेम होतं. गाडी बंद पडून धक्का मारायची वेळ आली की ज्या भागात गाडी बंद पडली आहे त्या भागाच्या लोकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करता येतो. पुण्यात गाडी बंद पडली की बाबा बाहेर येऊन काय झालंय हे बघेपर्यंत आजूबाजूला चिक्कार रिकामटेकडे बघे असायचे. पण बाबांनी मदत करायला या अशा अर्थाचे हावभाव केल्याशिवाय कुणीही पुढे यायचं नाही. मदत करतानादेखील त्यांच्या चेहर्‍यावर, "कशाला एवढी गाडीतून फिरायची हौस मग!" असे भाव असायचे.
पण खेडेगावात मात्र गाडी बंद पडली आहे असं लक्षात आल्या आल्या लोक धावून यायचे. आणि आपल्या साथीदारांनाही बोलवायचे. त्यामुळे कधी कधी इतका मोठा धक्का मिळायचा की पहिलं फर्लांग यशोधन धक्क्यावरच चालायची. आणि तिच्या गतीमुळे तिच्यातून उतरलेल्या लोकांना चांगलाच व्यायाम घडायचा. कधी कधी धक्का देणारे लोक आम्हाला त्यांच्या घरात चहाला सुद्धा बोलवायचे. मग बाबा लगेच,

"बघा. गाडी बंद पडल्याची देखील जमेची बाजू आहे. नवीन लोक भेटतात! आपली जर नवी कोरी मारुती (त्या काळी मराठी माणूस मारुतीपलीकडे विचारच करू शकायचा नाही) असती तर आपण या खेड्यातून झुर्र्कन गेलो असतो आणि आपल्याला पाटील दादांना भेटताच आलं नसतं!"
पण आता मात्र मला ही गोष्ट पटते. एका शहरातून दुस-या शहरात झुर्र्कन जाऊच नये.

यथावकाश आम्ही मारुती घेतली. नंतर बदलत्या काळामुळे गाड्यासुद्धा बदलल्या. पण आता गाडी नुसती गाडीच असते. तिला 'यशोधन' असं नाव नसल्यामुळे तिच्याकडे प्रेमानी बघताच येत नाही. आणि कुठेही प्रवासाला जाताना "गाडी बंद पडली तर" हा विचारच होत नाही. यशोधनमुळे गाडी बंद पडली तर काय करायचं याचा खूप सराव झाला होता. त्यामुळे कधी झाडाखाली बसून पुस्तक वाचायचं, कधी जवळच्या कुल्फीवाल्याकडे जाऊन केशर-पिस्ता कुल्फी खायची, कधी गाडी बंद पडल्याचा भावनिक दबाव आणून आईकडून बर्फाचा गोळा उकळायचा, पेरुवाल्या अज्जींची मुलाखत घ्यायची, कुणाच्यातरी शेतात हुरडा खायचा, कासाराकडे बांगड्या भरायच्या, कोकरांशी खेळायचं असले कार्यक्रम करायला वेळच मिळत नाही. :)

आणि गाडी बंद पडल्याच्या या सगळ्या 'जमेच्या बाजू' आता, वेळ वाया घालवायला नको या सदरात येतात. त्यामुळे हल्ली बस उशिरा आली की तेवढा वेळ जास्त पुस्तक वाचायला मिळाल्याचा आनंद होतो. शेवटी सगळा वेळ 'सत्कारणी' लावायची काहीच गरज नसते!

Saturday, July 17, 2010

राजकारण

माझ्या लहानपणी, बाबा आणि त्याचे मित्र नेहमी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी भेटायचे. सारस बागेच्या कोपर्‍यावर कल्पना नावाचं एक हॉटेल आहे. तिथे बाबा, विजूकाका आणि त्यांची टोळी भेटायची. शनिवारी बाबाला सुट्टी असायची. मग तो मला त्याच्याबरोबर सगळीकडे घेऊन जायचा. पण या हॉटेलातल्या भेटी मला फारशा आवडायच्या नाहीत. कारण बाबाचे सगळे मित्र तिथे फक्त राजकारणावर चर्चा करायला जमायचे. पुरुषांना बायकांसारख्या चहाड्या करण्याचं सार्वजनिक स्वातंत्र्य मिळालं नसल्यामुळे, कदाचित त्यांनी सगळ्यांनी राजकारण हा विषय शोधून काढला असेल. पण राष्ट्रीय किंवा जागतिक राजकारणावरून भांडण्यापेक्षा, स्वत:च्या घरातल्या राजकारणावर भांडण करणं जास्त उपयुक्त आहे असं माझं लहानपणी ठाम मत बनलं. आता आई, अज्जी, मीनामामी, ताजी यांचे राजकारणाचे परीघ खूपच सीमित होते. पण त्या सीमित परिघातील प्रत्येक व्यक्ती मी स्वत:च्या डोळ्याने पाहिली असल्याने, घरगुती राजकारण मला लवकर समजू लागलं. पण कुठल्याशा हॉटेलात भेटून कोण डावं, कोण उजवं, कोणाचं सरकार निवडून येणार वगैरे वाद माझ्या बालबुद्धीच्या पलीकडचे होते. त्यामुळे कानावर व्ही.पी सिंग, मंडल आयोग, बोफोर्सच्या तोफा वगैरे शब्द पडू लागले की मी माझं सगळं लक्ष माझ्या साबुदाणा-वड्यात एकवटायचे. बाबा आणीबाणीच्या काळात कॉलेजमध्ये होता. तेव्हा इंदिरा गांधींविरुद्ध होणार्‍या सगळ्या भाषणांना तो आवर्जून जायचा. नंतरच्या जनता पार्टीच्या प्रचारातसुद्धा बाबानी भाग घेतला. त्याचं जनता पार्टीवरचं प्रेम फार कमी दिवस टिकलं.पण त्याला त्याच्या "आणीबाणी लढ्याची" कहाणी सांगायची फार हौस होती. अण्णाआजोबा जसे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गोष्टी सांगायचे, तसाच बाबा आणीबाणीच्या गोष्टी सांगायचा. आजोबांना गोष्टी सांगायला अख्खा स्वातंत्र्यलढा मिळाला होता. पण माझ्यापर्यंत येईपर्यंत सगळेच संग्राम आटोक्यात आले होते. हे लढे आधीच बाबा आणि आजोबांनी लढून ठेवल्यामुळे, मला एकतर माझा स्वत:चा असा लढा शोधून काढणे, नाहीतर मिळालेली शांती गरम गरम साबुदाणा वड्याबरोबर उपभोगणे हे दोनच मार्ग होते. त्यातला मी कुठला निवडला हे उघडच आहे!
पण घरात मात्र आज्ज्या आणि आईच्या गोष्टी ऐकायला मला फार आवडायचं. बायकांचं राजकारण सांभाळण्यात खूप जास्त मुत्सद्दीपणा लागतो, कारण बायकांच्या राजकारणात कधीही उघड विरोधी पक्ष नसतो. राष्ट्रीय राजकारणासारख्याच इथेही ठराविक हेतूसाठी ठराविक युत्या असतात, पण हे सगळं घरातल्या घरात असल्याने सुरळीतपणे चालवणं जास्त अवघड असतं. आता एरवी ताजी आणि कुसुमअज्जी ठाम विरोधी पक्षात असायच्या, पण आजोबांची गार्‍हाणी सांगताना मात्र दोघींची पक्की युती व्हायची. दुपारच्या वेळी माम्या शेंगा फोडायला बसल्या की माझे सगळे मामे कुठे कमी पडतात याचं सखोल पृथक्करण व्हायचं. पण एखाद्या मामानी दिवाळीला त्याच्या बायकोला पैठणी घेऊन दिली की सगळी समीकरणं फिसकटायची, आणि आजोबांच्या विरुद्ध नेहमी मामा आणि मामी एक होत असत. तसंच, आजोबांना काही काही वेळेस एखादाच मामा खूप आवडू लागायचा. तेव्हा आजोबांचा लाडका म्हणून तो सगळ्यांच्या विरोधी पक्षात जायचा! पण आजोबांची आवड रोज बदलत असल्यामुळे कुणीही त्या पदावर चिरकाल टिकून राहिलं नाही.
घरातल्या स्त्रीवर्गाला माहेर आणि सासर हे दोन पक्ष मिळालेले असतात. आणि या दोन्ही पक्षांतील न्यायनिवाडा करायला नवर्‍याची मदत घेतली जाते. पण बिचार्‍या न्यायदेवतेला फक्त माहेरचे दुर्गुण आणि सासरचे सद्गुण या दोनच गोष्टींपुढे अंधत्व बहाल केलं जातं. मग त्यात जर एखादा हंबीरराव मोहिते असेल तर तो, "नसेल पटत तर तुला माघारी पाठवतो. मग तुझ्या लाडक्या भावाला तुझ्यासाठी दुसरा दादला बघाया सांग" म्हणतो. पण असे हंबीरराव, भारतातल्या वाघांसारखेच दुर्मिळ होत चालले आहेत. लहानपणी मला रुसून बसायची सवय होती. तेव्हा बाबा माझं असल्या खंबीर मोहिते-पाटलाशी लग्न व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करायचा. त्यावर आई लगेच, "नको बाई. निदान तिला तरी तिचं सगळं ऐकणारा नवरा मिळू देत" असं खोडसाळ वाक्य टाकायची. मी शाळेत असताना, माझ्या आईचे व्यवसायातील भागीदार, डॉक्टर काका (डॉ. निंबाळकर) मला बारामतीकडची शाहिरी ऐकवायचे. लोकगीतांमध्ये "असावा नसावा" नावाचा एक पोवाडा आहे. त्यात नवरा कसा असावा याचं वर्णन आहे. ते मला जाम अवडलं होतं. त्यात शाहीर म्हणतात,
"मनानं खंबीर| दिसायला गंभीर| नावाचा हंबीर असावा||
गुलूगुलू बोलणार| कुलूकुलू करणार| बायकांत बसणारा नसावा||"
कोल्हापूरकडून पुण्याला येईल तशा बायकांच्या मुठी आवळल्या जायच्या. आणि कदाचित त्यामुळेच माझ्या आईला तिची मूठ कमी पडते आहे असा न्यूनगंड आला असावा. पण तशीच एक "असावी नसावी" सुद्धा रचना आहे त्यात बायको कशी असावी याचंही वर्णन शाहीर करतात,
कामाला दणगट| मजबूत मनगट| नारीला हिम्मत असावी||
दिखाऊ पुतळी| कुजकी सुतळी| कधी कुठेही नसावी||
त्यामुळे थोड्याफार फरकाने आई आणि बाबा दोघेही शाहिरांच्या कवितेत बसत होते. :)
नवरा मुठीत नसणे ही घरगुती राजकारणातील निश्चित पराभव-पावती आहे. काही काही बायकांना मात्र नवर्‍याबरोबर मुलगाही मुठीत ठेवायच्या गगनभरार्‍या घ्याव्याशा वाटतात. अशावेळी घोर अराजकता माजायची चिन्हं दिसू लागतात. आमच्या घरात ही भीषण परिस्थिती कधीच आली नाही, कारण आमच्या घरात सगळे अण्णाआजोबांच्या मुठीत असायचे.
ताजीला कुठेही परगावी जाण्यासाठी आजोबांची परवानगी मागावी लागायची. त्यामुळे तिला तिच्या खेळ्या फार दूरदृष्टीने ठरवाव्या लागायच्या. त्यासाठी आधी आजोबांचे काही गुन्हे माफ केल्याचा मोठेपणा मिळवावा लागायचा. मग त्यांनी काही गुन्हे केलेच नाहीत, तर तिला त्यांचा एखादा पूर्वीचा गुन्हा नीट संदर्भांसहित उकरून काढावा लागायचा. माम्या आणि सासवा विरोधी पार्टीत असल्या, तरी परकीय शक्तींच्या पुढे नेहमी आमचं कुटुंब एकसंघ असायचं. ताजीनी घरात सुनांच्या कितीही बारीक खोड्या शोधून काढल्या तरी कुठल्याही बाहेरच्या सासू-संमेलनात ताजी नेहमी माझ्या माम्यांचं कौतुकच करायची. घरात मात्र सत्ताधारी पक्षावर जशी टीकेची झोड होते तशी सगळ्या सत्ताधारी माणसांवर व्हायची. त्यात आजोबांचा नंबर पहिला. पण आजोबांचा घरगुती लोकशाहीवर अजिबात विश्वास नसल्याने त्यांना कधीही त्यांच्या कुटुंबाच्या अस्मितेचा वगैरे विचार करायची अडचण आली नाही.
मी अगदी लहान असताना, माझ्या बाबाची आई (नानीअज्जी) नेहमी नानाआजोबांना खूप हळू आवाजात काहीतरी सांगत असायची. मी कितीही कानाचं सूप करून ऐकायचा प्रयत्न केला तरी मला काहीही ऐकू यायचं नाही. पण ते दोघं, मी आजूबाजूला असताना हळू आवाजात बोलतात म्हणजे माझ्याबद्दल किंवा माझ्या आईबद्दल असावं, असा माझा अंदाज होता. मग एकदा ते आमच्या घरी राहायला आलेले असताना, ते खोलीत जायच्या आधीच मी कपाटात लपून बसले होते. पण एवढं लपूनही अज्जी त्याच फु्सफुस आवाजात बोलू लागली, आणि काहीही न समजता मला त्या कपाटात फुकट एक तास बसावं लागलं. तेव्हापासून मी हेरगिरी करणं बंद केलं. मोठी झाल्यावर या घरगुती राजकारणातून काहीही निष्पन्न होत नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे या संस्थेत जर आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकानी आपल्या परिस्थितीशी तडजोड करायला शिकलं पाहिजे, हे एकच उत्तर मिळालं. त्यामुळे काही दिवस मी माझी नजर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळवली. पण त्यावर माझं मत व्यक्त करताना अजूनही मला माझ्या साबुदाणावड्याची आठवण होते. आणि घरी बायकोला भयानक घाबरणारे, पण कुठल्याशा हॉटेलात बिचार्‍या दिवंगत जवाहरलाल नेहरूंवर पोटातून चिडून, मुठी आपटणारे बाबाचे मित्र आठवतात.

Friday, July 2, 2010

उशीचा अभ्रा आणि भाजीची पिशवी

कुसुमअज्जीला भाजी आणायला जायची फार हौस होती. रोज सकाळी मंडई उघडण्याची ती अगदी आतुरतेनी वाट बघायची. मंडईत जाण्याच्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असायच्या, की भाजी आणायला जाणे हा तिच्या दिवसातला फार मोठा उत्सव असायचा. मीनामामीला काय हवंय, नरुमामाला कुठली भाजी आवडते, आजोबांना काय खायची इच्छा झालीये, माझी फरमाईश या सगळ्याचा विचार करून ती भाजीला जायची. पण या सगळ्यापेक्षा मोठा मान भाजीच्या पिशवीचा असायचा. मला 'भाजीची पिशवी' हा शब्द लहानपणापासून चिडवतो आहे. कुठेही बाहेर निघालं, की अज्जी, "अगं पिशवी घेऊन जा!" असा सल्ला द्यायची. आणि पिशवी तरी कसली? तिच्या भाजीच्या असंख्य पिशव्यांपैकी एक. अज्जीची कुठलीच भाजीची पिशवी आयती विकत आणलेली नसायची. एखाद्याला जर माझ्या बालपणीच्या कपड्यांचा अभ्यास करायचा असेल (उत्सुक उमेदवार शून्य आहेत हे माहिती असून देखील हा उद्दामपणा), तर त्यानी अज्जीच्या भाजीच्या पिशव्या तपासाव्यात. माझ्या दुपट्यांपासून ते माझ्या चणिया-चोळीपर्यंत सगळ्याच्या पिशव्या तिच्या कपाटात सापडतील. आमच्या घरापलीकडे तिची खास मैत्रीण कलामावशी राहायची. तिच्याकडून पिशव्या, गोधड्या आणि उशांचे अभ्रे अज्जी शिवून घ्यायची. दर वर्षी माझे काही कपडे अज्जी हक्काने ठेवून घ्यायची. यातही तिची खास कृती असायची.
"हा फ्रॉक आता विटका दिसतोय. घालू नकोस"
"कुठे विटका दिसतोय? चांगला तर आहे की! मला आवडतो हा फ्रॉक!"
आठवड्याभरानी पुन्हा तोच संवाद. मग मला खरंच वाटू लागायचं. त्यानंतर आठवड्यानी अज्जी मला नवीन कपडे घेऊन द्यायची. ते घेतानाही, रंग, कापड वगैरे तिच्या पसंतीनी घ्यायची, आणि पुण्याला माझी बोळवण करताना माझे 'विटलेले' कपडे ठेवून घ्यायची. मग पुढच्या सुट्टीत त्या विटक्या कपड्यांची भाजीची पिशवी झालेली असायची. तिनी कधी तिची पिशवी घेऊन जायचा आग्रह केला आणि मी तिच्या पिशवीला नावं ठेवली की तिला मनापासून दु:ख व्हायचं.
"शी! मला नको तुझी ती गावठी पिशवी."
"गावठी म्हणतेस होय गं माझ्या पिशवीला! तुझ्या आईच्या जरीच्या साडीची आहे. त्या साडीला दोन हज्जार रुपये पडले होते!"
आज्जीचा, "किती रुपये पडले?" प्रश्न आई फार चलाखीनी हाताळायची. आईनी जर तिला किंमत दोन हजार रुपये सांगितली असेल, तर नक्कीच त्या साडीची किंमत साडे तीन हजार असणार! आणि मीही ती परंपरा छान चालवली आहे. :)

भाजीला अज्जी रोज वेगळी पिशवी न्यायची. त्यामुळे बाजारात ’फाशनेबल अज्जी’ म्हणून ती प्रसिद्ध असावी. आणि इतक्याही गावठी नसायच्या त्या पिशव्या. एखादीला जरीचे काठ असायचे. पिशवीच्या बंदाला तेच काठ सुबकरीत्या लावलेले असायचे. एखादी माझ्या चिकनच्या फ्रॉकची असायची. तिला आतून माझ्याच फ्रॉकचं अस्तर असायचं, आणि त्यातून अस्तर पुन्हा वापरल्याचा अभिमान ओसंडून वाहायचा. एखादी दोन वेगवेगळ्या साड्यांचे त्रिकोण जोडून बनवलेली असायची. एखाद्या पिशवीला आत छोटा कप्पा असायचा, ज्यात अज्जी सुटे पैसे ठेवायची. कधी कधी तिच्या माहेरच्या आवडत्या बायकांची ओटी भरताना अज्जी नारळ आणि तांदूळ पिशवीसकट द्यायची, आणि त्या पिशवीवर टिप्पणी होणं ती अत्यावश्यक समजायची. नाही झाली तर पुढल्या वेळी फक्त नारळ-तांदूळ मिळायचा.

ही सवय अनुवांशिक असावी. कारण एकीकडे अज्जीला नातीच्या कपड्यांच्या पिशव्या बनवायचं वेड तर दुसरीकडे आईला मुलीच्या कपड्यांचे अभ्रे बनवायचा नाद! त्यामुळे सुट्टीवरून पुण्याला परत येईपर्यंत माझ्या तिकडच्या तथाकथित विटलेल्या कपड्यांचे अभ्रे झालेले असायचे आणि माझ्याच खोलीतली उशी, माझाच एखादा फ्रॉक घालून टुम्म फुगलेली दिसायची! सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे माझे कपडे घेताना आधीच त्यांचे अभ्रे नाहीतर पिशव्या कशा दिसतील याचा विचार व्हायचा. त्यामुळे कधी कधी आपण म्हणजे अज्जी आणि आईचं "पिशव्या आणि अभ्रे स्वस्तात पडायचं" कारण आहोत असं मला वाटू लागायचं. पण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा कल्पकतेने वापरण्यातही कौशल्य असतं. या बाबतीत कदाचित विकतचे अभ्रे स्वस्तात पडले असते, पण भारतीय नारी तिच्या भावनिक निर्णयांमुळे चिनी नारीच्या मागे पडली आहे. आईकडे माहेरून मिळालेली भांडी कशी जगातल्या सगळ्या भांड्यांपेक्षा सरस आहेत याची एकशे एक करणं असतील. अज्जीच्या कपाटातही आईनी दिलेल्या साड्यांसाठी वेगळा कप्पा होता. आणि प्रत्येक साडी नेसताना, ती कुणी दिली, तेव्हा काय झालं होतं, कशाबद्दल दिली याचा तपशील तयार असायचा. मला याची फार गंमत वाटायची.

पण या सवयीतला मला आवडणारा भाग म्हणजे माझ्यासाठी शिवलेल्या रजया! दर वर्षी आई आणि अज्जी त्यांच्या काही सुंदर साड्या 'बाद' करायच्या. कारणं वेगवेगळी असायची. कधी नुसताच कंटाळा, कधी एखाद्या लग्नात मन लावून जेवताना पडलेला तेलाचा डाग, तर कधी साडी दिलेल्या व्यक्तीची आठवण अजरामर करण्यासाठी. रजईवर जाणार्‍या साड्यांनी काहीतरी खास आठवण जागृत केलेली असायची. त्याशिवाय तो मान साड्यांना मिळायचा नाही. नाहीतर त्यांच्या पिशव्या किंवा अभ्रे बनायचे. पण एखादी सुंदर नारायणपेठ, किंवा एखादी मऊ मऊ कलकत्ता, खास आतल्या बाजूसाठी, नेहमी गोधडीसाठी राखून ठेवली जायची. काही काही गोधड्या आतून रंकाच्या तर बाहेरून राजाच्या दिसायच्या. पलंगावर ठेवताना मात्र रेशमी बाजू वर दिसायची. पण कडाक्याच्या थंडीत आत शिरताना मात्र उबदार, सुती बाजूच जास्त उपयोगी पडायची. कधी कधी अज्जी एखाद्या जुन्या, जीर्ण पटोला साडीचे काठ जपून ठेवायची. मग कलामावशीकडून एखाद्या सध्या सुती गोधडीवर ते काठ लावून घ्यायची. तशा गोधड्या, एखाद्या दासीनी राणी नसताना चोरून तिचे बाजूबंद घातल्यासारख्या दिसायच्या. दर वर्षी माझ्या वाढदिवसाला अज्जी मला नवीन गोधडी पाठवायची. आणि कधी कधी मी नाराजीने तिच्या स्वाधीन केलेल्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे तिच्यातून डोकवून मला हसवायचे. एखाद्या कपड्याची पिशवी किंवा अभ्रा न होता त्याला गोधडीचा मान मिळाला की मला फार आनंद व्हायचा.

यावर्षी येताना आईनी मला अज्जीच्या साड्यांची गोधडी दिली. ती मात्र खरंच माझ्या सगळ्या आठवणींचा अर्क आहे. ती पसरून कधी योगासनं करू लागले की माझ्या घर-सख्या त्या दृश्याकडे बघत राहतात. आणि एखाद्या दुर्मीळ सुट्टीच्या दिवशी जेव्हा, अज्जीच्या साड्यांची, आईनी बनवून घेतलेली गोधडी घेऊन मी पहुडते, आणि आमचा ऑस्ट्रेलीयन बोका माझ्या पोटावर बसून गुरगुरू लागतो, तेव्हा आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम एका ठिकाणी आल्यासारखं वाटतं!