Monday, August 10, 2009

स्पर्धा

लहानपणी मला स्पर्धा अज्जिबात आवडायची नाही. पुण्यात शाळा सोडून कुठे कुणाशी माझी कधीच तुलना होत नसे. त्यामुळे आपण सगळ्याच बाबतीत "लई भारी" आहोत असा माझा सोयिस्कर गैरसमज होत असे. कोल्हापुरात मात्र चिकू दादा, महेश दादा, अभिजित दादा, स्नेहा, मनिषा आणि गल्लीतली समस्त वानरसेना यांपुढे माझी "शान" म्हणजे अगदीच पुणेरी आळूचं फतफतं असायची. शाळेतल्या केविलवाण्या पी.टी. च्या क्लासमध्ये मला जोरात धावता येत नाही, लंगडी घालता येत नाही, दोरीच्या उड्या मारता येत नाहीत हे कुणाला नीट कळायचे नाही. पण कोल्हापुरात मात्र सगळा दिवस करायला काहीच नाही आणि "बुद्धिजीवी" वगैरे म्हणायची सोय नसल्यावर मला गुमान खेळावे लागे. त्यात नेहमी माझा दणदणीत पराजय होत असे. अज्जीच्या कौतुकामुळे आगीत तेल ओतले जाई आणि सगळी मामे भावंडं कधीकधी माझी कशी जिरते ते बघत असत. अर्थात त्यामुळे माझ्या मनावर विपरीत परिणाम वगैरे बिलकुल झाला नाही. लंगडी घालताना जरी दोन मिनिटांत माझा जीव घशात आला तरी भांडताना मात्र माझी राणी लक्ष्मीबाई होत असे! कधी कधी  गल्लीतली सगळी पोरं "डब्बा ऐसपैस" का असलाच अपभ्रंश असलेला खेळ खेळायची. त्यात नेहमी माझ्यावर राज्य यायचं. म्हणजे कुणी कट कारस्थान न करताच. मला खेळताच यायचं नाही नीट. त्यात नेहमी राज्य आल्याने माझा आत्मविश्वास कमी व्हायचा आणि मग त्यामुळे माझे सगळे बेत फिसकटायचे. मग अगदी चार-पाच वर्षाची असताना मला असा "राज्य" वाला दिवस आला की आईची खूप आठवण यायची. तसं झालं की मी गॅलरीत जाऊन मुळूमुळू रडायचे. 
दुसरी मला अगदी न आवडणारी स्पर्धा म्हणजे "न बोलण्याची". अज्जी नेहमी माझ्यात आणि स्नेहात ही स्पर्धा लावायची. कुणी "बोलू नकोस" असं सांगितलं की मला अजूनच बोलायची इच्छा होत असे. त्यामुळे यातही मी नेहमी हरायचे. "पालक" खायच्या स्पर्धेत मात्र सगळे हरायचे. त्यामुळे मी खूष असायचे. दूध सगळ्ळयात आधी संपवणे हा एक नवीन मनस्ताप असायचा. पुण्यात "दूध" प्यायचे उंच स्टूल होते. त्यावरून मला खाली उतरता यायचे नाही. म्हणून ग्लास संपेपर्यंत मला त्यावर चढवले जाई. पण नंतर माझा धीर बळावला आणि मी तीन तास सलग एकही थेंब दूध न पिता तिथे बसून रहायचे. मग आई-बाबा कंटाळून मला खाली आणायचे व चहा द्यायचे. त्यामुळे दूध न पिण्याची स्पर्धा असती तर मी नक्की जिंकले असते. पण लहानपणी मोठ्या माणसांना आपलं मूल कशात जिंकू शकेल हे कळायला वेळ लागतो बहुतेक. 
का माहित नाही पण मला ज्या गोष्टी नीट यायच्या त्याची कधीच स्पर्धा लागायची नाही. जसं की मी पावसाळ्यात दगडाखालचे गांडुळांचे पुंजके खूप सहज शोधून काढायचे. मला लांबून दगड पाहूनच त्याखाली गांडुळ संकुल असेल की नाही ते सांगता यायचे. पण याचं कुणाला काही विशेष कौतुक नव्हतं. त्या गांडुळांची नंतर मी छान चटणी पण करायचे !
चिखलाची भांडी करायची कला सुद्धा मला अवगत होती. तसेच मला कामवाल्या बाई बरोबर भांडी घासायला पण खूप आवडायचे. पण का कोण जाणे याच्या स्पर्धा कधीच नसायच्या. कैरी खायची स्पर्धा असती तर मी नक्की पहिली आले असते. शेंगदाण्यात गूळ घालून त्याचा लाडू करण्यात पण माझा हात कुणी धरला नसता. पण हे सगळं मोठ्यांना त्यांच्या वयामुळे सुचायचं नाही. 
लोणचं नळाखाली धुवून खायची स्पर्धा असती तर मी त्यात मेडल वगैरे मिळवलं असतं. मी कितीही वेळ आंब्याचं लोणचं खाऊ शकायचे. पाण्याखाली धूवून ते अजुनच छान लागायचं. एकच गोष्ट खूप वेळा ऐकायची स्पर्धा असती तर त्यातही मी जिंकले असते. एकदा कुणीतरी कोकणातल्या पाहुण्यांनी त्यांच्या सतरंजीखाली सकाळी मेलेला साप सापडला ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हा मी तिथे होते. त्यानंतर मी शंभरवेळा सापाऐवेजी  ससा, उंदीर, माकड, बेडूक असे प्राणी बदलून तीच गोष्ट आईला सांगायला लावली. शेवटी एक दिवस "आता सतरंजीखाली सकाळी मेलेला उंट सापडला" असं सांग, या सूचनेनंतर आईने मला कोपरापासून नमस्कार केला.
पण माझ्या या गुणांना फारसा वाव मिळाला नाही. शाळेत मी सगळ्या वक्तृत्व स्पर्धा जिंकायचे. पण त्याची नंतर सवय झाली. सहा महिन्यांपूर्वी पाच किलोमीटर पळायची शर्यत मी पंचवीस मिनिटांत पूर्ण केली. तेव्हा मला माझ्या सगळ्या सवंगड्यांची आठवण आली. पण आता कुणीच पळत नाही!!

5 comments:

  1. सई,
    खुप खुप छान.खुप आनंद देतात तुझे पोस्ट.सारे भावविश्व उभे करतेस. तुझ्याकडून कोल्हापूरच्या पलिकडचंही वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  2. @ Ajay
    Thanks. :)
    I also write at www.randomvichar.blogspot.com
    But in my opinion, I am becoming a little bit boring on that one. But I am attached to it because it is my first attempt at public writing!!
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  3. एक नंबर सई!! खूप दिवसानंतर तुझा blog वाचला.. आणि तो अजून जास्ती बहरतच चालला आहे..great!! :D

    ReplyDelete
  4. प्रसाद,
    धन्यवाद. :)
    पुन्हा भेटू!!

    ReplyDelete
  5. Hi Saee,
    Changla blog ahe tuza.
    Thanks for your comment on my mockingbird blog.
    Ankhee konti pustake wachtes tu?

    ReplyDelete