माझ्या लहानपणी, बाबा आणि त्याचे मित्र नेहमी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी भेटायचे. सारस बागेच्या कोपर्यावर कल्पना नावाचं एक हॉटेल आहे. तिथे बाबा, विजूकाका आणि त्यांची टोळी भेटायची. शनिवारी बाबाला सुट्टी असायची. मग तो मला त्याच्याबरोबर सगळीकडे घेऊन जायचा. पण या हॉटेलातल्या भेटी मला फारशा आवडायच्या नाहीत. कारण बाबाचे सगळे मित्र तिथे फक्त राजकारणावर चर्चा करायला जमायचे. पुरुषांना बायकांसारख्या चहाड्या करण्याचं सार्वजनिक स्वातंत्र्य मिळालं नसल्यामुळे, कदाचित त्यांनी सगळ्यांनी राजकारण हा विषय शोधून काढला असेल. पण राष्ट्रीय किंवा जागतिक राजकारणावरून भांडण्यापेक्षा, स्वत:च्या घरातल्या राजकारणावर भांडण करणं जास्त उपयुक्त आहे असं माझं लहानपणी ठाम मत बनलं. आता आई, अज्जी, मीनामामी, ताजी यांचे राजकारणाचे परीघ खूपच सीमित होते. पण त्या सीमित परिघातील प्रत्येक व्यक्ती मी स्वत:च्या डोळ्याने पाहिली असल्याने, घरगुती राजकारण मला लवकर समजू लागलं. पण कुठल्याशा हॉटेलात भेटून कोण डावं, कोण उजवं, कोणाचं सरकार निवडून येणार वगैरे वाद माझ्या बालबुद्धीच्या पलीकडचे होते. त्यामुळे कानावर व्ही.पी सिंग, मंडल आयोग, बोफोर्सच्या तोफा वगैरे शब्द पडू लागले की मी माझं सगळं लक्ष माझ्या साबुदाणा-वड्यात एकवटायचे. बाबा आणीबाणीच्या काळात कॉलेजमध्ये होता. तेव्हा इंदिरा गांधींविरुद्ध होणार्या सगळ्या भाषणांना तो आवर्जून जायचा. नंतरच्या जनता पार्टीच्या प्रचारातसुद्धा बाबानी भाग घेतला. त्याचं जनता पार्टीवरचं प्रेम फार कमी दिवस टिकलं.पण त्याला त्याच्या "आणीबाणी लढ्याची" कहाणी सांगायची फार हौस होती. अण्णाआजोबा जसे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गोष्टी सांगायचे, तसाच बाबा आणीबाणीच्या गोष्टी सांगायचा. आजोबांना गोष्टी सांगायला अख्खा स्वातंत्र्यलढा मिळाला होता. पण माझ्यापर्यंत येईपर्यंत सगळेच संग्राम आटोक्यात आले होते. हे लढे आधीच बाबा आणि आजोबांनी लढून ठेवल्यामुळे, मला एकतर माझा स्वत:चा असा लढा शोधून काढणे, नाहीतर मिळालेली शांती गरम गरम साबुदाणा वड्याबरोबर उपभोगणे हे दोनच मार्ग होते. त्यातला मी कुठला निवडला हे उघडच आहे!
पण घरात मात्र आज्ज्या आणि आईच्या गोष्टी ऐकायला मला फार आवडायचं. बायकांचं राजकारण सांभाळण्यात खूप जास्त मुत्सद्दीपणा लागतो, कारण बायकांच्या राजकारणात कधीही उघड विरोधी पक्ष नसतो. राष्ट्रीय राजकारणासारख्याच इथेही ठराविक हेतूसाठी ठराविक युत्या असतात, पण हे सगळं घरातल्या घरात असल्याने सुरळीतपणे चालवणं जास्त अवघड असतं. आता एरवी ताजी आणि कुसुमअज्जी ठाम विरोधी पक्षात असायच्या, पण आजोबांची गार्हाणी सांगताना मात्र दोघींची पक्की युती व्हायची. दुपारच्या वेळी माम्या शेंगा फोडायला बसल्या की माझे सगळे मामे कुठे कमी पडतात याचं सखोल पृथक्करण व्हायचं. पण एखाद्या मामानी दिवाळीला त्याच्या बायकोला पैठणी घेऊन दिली की सगळी समीकरणं फिसकटायची, आणि आजोबांच्या विरुद्ध नेहमी मामा आणि मामी एक होत असत. तसंच, आजोबांना काही काही वेळेस एखादाच मामा खूप आवडू लागायचा. तेव्हा आजोबांचा लाडका म्हणून तो सगळ्यांच्या विरोधी पक्षात जायचा! पण आजोबांची आवड रोज बदलत असल्यामुळे कुणीही त्या पदावर चिरकाल टिकून राहिलं नाही.
घरातल्या स्त्रीवर्गाला माहेर आणि सासर हे दोन पक्ष मिळालेले असतात. आणि या दोन्ही पक्षांतील न्यायनिवाडा करायला नवर्याची मदत घेतली जाते. पण बिचार्या न्यायदेवतेला फक्त माहेरचे दुर्गुण आणि सासरचे सद्गुण या दोनच गोष्टींपुढे अंधत्व बहाल केलं जातं. मग त्यात जर एखादा हंबीरराव मोहिते असेल तर तो, "नसेल पटत तर तुला माघारी पाठवतो. मग तुझ्या लाडक्या भावाला तुझ्यासाठी दुसरा दादला बघाया सांग" म्हणतो. पण असे हंबीरराव, भारतातल्या वाघांसारखेच दुर्मिळ होत चालले आहेत. लहानपणी मला रुसून बसायची सवय होती. तेव्हा बाबा माझं असल्या खंबीर मोहिते-पाटलाशी लग्न व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करायचा. त्यावर आई लगेच, "नको बाई. निदान तिला तरी तिचं सगळं ऐकणारा नवरा मिळू देत" असं खोडसाळ वाक्य टाकायची. मी शाळेत असताना, माझ्या आईचे व्यवसायातील भागीदार, डॉक्टर काका (डॉ. निंबाळकर) मला बारामतीकडची शाहिरी ऐकवायचे. लोकगीतांमध्ये "असावा नसावा" नावाचा एक पोवाडा आहे. त्यात नवरा कसा असावा याचं वर्णन आहे. ते मला जाम अवडलं होतं. त्यात शाहीर म्हणतात,
"मनानं खंबीर| दिसायला गंभीर| नावाचा हंबीर असावा||
गुलूगुलू बोलणार| कुलूकुलू करणार| बायकांत बसणारा नसावा||"
कोल्हापूरकडून पुण्याला येईल तशा बायकांच्या मुठी आवळल्या जायच्या. आणि कदाचित त्यामुळेच माझ्या आईला तिची मूठ कमी पडते आहे असा न्यूनगंड आला असावा. पण तशीच एक "असावी नसावी" सुद्धा रचना आहे त्यात बायको कशी असावी याचंही वर्णन शाहीर करतात,
कामाला दणगट| मजबूत मनगट| नारीला हिम्मत असावी||
दिखाऊ पुतळी| कुजकी सुतळी| कधी कुठेही नसावी||
त्यामुळे थोड्याफार फरकाने आई आणि बाबा दोघेही शाहिरांच्या कवितेत बसत होते. :)
नवरा मुठीत नसणे ही घरगुती राजकारणातील निश्चित पराभव-पावती आहे. काही काही बायकांना मात्र नवर्याबरोबर मुलगाही मुठीत ठेवायच्या गगनभरार्या घ्याव्याशा वाटतात. अशावेळी घोर अराजकता माजायची चिन्हं दिसू लागतात. आमच्या घरात ही भीषण परिस्थिती कधीच आली नाही, कारण आमच्या घरात सगळे अण्णाआजोबांच्या मुठीत असायचे.
ताजीला कुठेही परगावी जाण्यासाठी आजोबांची परवानगी मागावी लागायची. त्यामुळे तिला तिच्या खेळ्या फार दूरदृष्टीने ठरवाव्या लागायच्या. त्यासाठी आधी आजोबांचे काही गुन्हे माफ केल्याचा मोठेपणा मिळवावा लागायचा. मग त्यांनी काही गुन्हे केलेच नाहीत, तर तिला त्यांचा एखादा पूर्वीचा गुन्हा नीट संदर्भांसहित उकरून काढावा लागायचा. माम्या आणि सासवा विरोधी पार्टीत असल्या, तरी परकीय शक्तींच्या पुढे नेहमी आमचं कुटुंब एकसंघ असायचं. ताजीनी घरात सुनांच्या कितीही बारीक खोड्या शोधून काढल्या तरी कुठल्याही बाहेरच्या सासू-संमेलनात ताजी नेहमी माझ्या माम्यांचं कौतुकच करायची. घरात मात्र सत्ताधारी पक्षावर जशी टीकेची झोड होते तशी सगळ्या सत्ताधारी माणसांवर व्हायची. त्यात आजोबांचा नंबर पहिला. पण आजोबांचा घरगुती लोकशाहीवर अजिबात विश्वास नसल्याने त्यांना कधीही त्यांच्या कुटुंबाच्या अस्मितेचा वगैरे विचार करायची अडचण आली नाही.
मी अगदी लहान असताना, माझ्या बाबाची आई (नानीअज्जी) नेहमी नानाआजोबांना खूप हळू आवाजात काहीतरी सांगत असायची. मी कितीही कानाचं सूप करून ऐकायचा प्रयत्न केला तरी मला काहीही ऐकू यायचं नाही. पण ते दोघं, मी आजूबाजूला असताना हळू आवाजात बोलतात म्हणजे माझ्याबद्दल किंवा माझ्या आईबद्दल असावं, असा माझा अंदाज होता. मग एकदा ते आमच्या घरी राहायला आलेले असताना, ते खोलीत जायच्या आधीच मी कपाटात लपून बसले होते. पण एवढं लपूनही अज्जी त्याच फु्सफुस आवाजात बोलू लागली, आणि काहीही न समजता मला त्या कपाटात फुकट एक तास बसावं लागलं. तेव्हापासून मी हेरगिरी करणं बंद केलं. मोठी झाल्यावर या घरगुती राजकारणातून काहीही निष्पन्न होत नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे या संस्थेत जर आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकानी आपल्या परिस्थितीशी तडजोड करायला शिकलं पाहिजे, हे एकच उत्तर मिळालं. त्यामुळे काही दिवस मी माझी नजर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळवली. पण त्यावर माझं मत व्यक्त करताना अजूनही मला माझ्या साबुदाणावड्याची आठवण होते. आणि घरी बायकोला भयानक घाबरणारे, पण कुठल्याशा हॉटेलात बिचार्या दिवंगत जवाहरलाल नेहरूंवर पोटातून चिडून, मुठी आपटणारे बाबाचे मित्र आठवतात.