कुसुमअज्जीला भाजी आणायला जायची फार हौस होती. रोज सकाळी मंडई उघडण्याची ती अगदी आतुरतेनी वाट बघायची. मंडईत जाण्याच्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असायच्या, की भाजी आणायला जाणे हा तिच्या दिवसातला फार मोठा उत्सव असायचा. मीनामामीला काय हवंय, नरुमामाला कुठली भाजी आवडते, आजोबांना काय खायची इच्छा झालीये, माझी फरमाईश या सगळ्याचा विचार करून ती भाजीला जायची. पण या सगळ्यापेक्षा मोठा मान भाजीच्या पिशवीचा असायचा. मला 'भाजीची पिशवी' हा शब्द लहानपणापासून चिडवतो आहे. कुठेही बाहेर निघालं, की अज्जी, "अगं पिशवी घेऊन जा!" असा सल्ला द्यायची. आणि पिशवी तरी कसली? तिच्या भाजीच्या असंख्य पिशव्यांपैकी एक. अज्जीची कुठलीच भाजीची पिशवी आयती विकत आणलेली नसायची. एखाद्याला जर माझ्या बालपणीच्या कपड्यांचा अभ्यास करायचा असेल (उत्सुक उमेदवार शून्य आहेत हे माहिती असून देखील हा उद्दामपणा), तर त्यानी अज्जीच्या भाजीच्या पिशव्या तपासाव्यात. माझ्या दुपट्यांपासून ते माझ्या चणिया-चोळीपर्यंत सगळ्याच्या पिशव्या तिच्या कपाटात सापडतील. आमच्या घरापलीकडे तिची खास मैत्रीण कलामावशी राहायची. तिच्याकडून पिशव्या, गोधड्या आणि उशांचे अभ्रे अज्जी शिवून घ्यायची. दर वर्षी माझे काही कपडे अज्जी हक्काने ठेवून घ्यायची. यातही तिची खास कृती असायची.
"हा फ्रॉक आता विटका दिसतोय. घालू नकोस"
"कुठे विटका दिसतोय? चांगला तर आहे की! मला आवडतो हा फ्रॉक!"
आठवड्याभरानी पुन्हा तोच संवाद. मग मला खरंच वाटू लागायचं. त्यानंतर आठवड्यानी अज्जी मला नवीन कपडे घेऊन द्यायची. ते घेतानाही, रंग, कापड वगैरे तिच्या पसंतीनी घ्यायची, आणि पुण्याला माझी बोळवण करताना माझे 'विटलेले' कपडे ठेवून घ्यायची. मग पुढच्या सुट्टीत त्या विटक्या कपड्यांची भाजीची पिशवी झालेली असायची. तिनी कधी तिची पिशवी घेऊन जायचा आग्रह केला आणि मी तिच्या पिशवीला नावं ठेवली की तिला मनापासून दु:ख व्हायचं.
"शी! मला नको तुझी ती गावठी पिशवी."
"गावठी म्हणतेस होय गं माझ्या पिशवीला! तुझ्या आईच्या जरीच्या साडीची आहे. त्या साडीला दोन हज्जार रुपये पडले होते!"
आज्जीचा, "किती रुपये पडले?" प्रश्न आई फार चलाखीनी हाताळायची. आईनी जर तिला किंमत दोन हजार रुपये सांगितली असेल, तर नक्कीच त्या साडीची किंमत साडे तीन हजार असणार! आणि मीही ती परंपरा छान चालवली आहे. :)
भाजीला अज्जी रोज वेगळी पिशवी न्यायची. त्यामुळे बाजारात ’फाशनेबल अज्जी’ म्हणून ती प्रसिद्ध असावी. आणि इतक्याही गावठी नसायच्या त्या पिशव्या. एखादीला जरीचे काठ असायचे. पिशवीच्या बंदाला तेच काठ सुबकरीत्या लावलेले असायचे. एखादी माझ्या चिकनच्या फ्रॉकची असायची. तिला आतून माझ्याच फ्रॉकचं अस्तर असायचं, आणि त्यातून अस्तर पुन्हा वापरल्याचा अभिमान ओसंडून वाहायचा. एखादी दोन वेगवेगळ्या साड्यांचे त्रिकोण जोडून बनवलेली असायची. एखाद्या पिशवीला आत छोटा कप्पा असायचा, ज्यात अज्जी सुटे पैसे ठेवायची. कधी कधी तिच्या माहेरच्या आवडत्या बायकांची ओटी भरताना अज्जी नारळ आणि तांदूळ पिशवीसकट द्यायची, आणि त्या पिशवीवर टिप्पणी होणं ती अत्यावश्यक समजायची. नाही झाली तर पुढल्या वेळी फक्त नारळ-तांदूळ मिळायचा.
ही सवय अनुवांशिक असावी. कारण एकीकडे अज्जीला नातीच्या कपड्यांच्या पिशव्या बनवायचं वेड तर दुसरीकडे आईला मुलीच्या कपड्यांचे अभ्रे बनवायचा नाद! त्यामुळे सुट्टीवरून पुण्याला परत येईपर्यंत माझ्या तिकडच्या तथाकथित विटलेल्या कपड्यांचे अभ्रे झालेले असायचे आणि माझ्याच खोलीतली उशी, माझाच एखादा फ्रॉक घालून टुम्म फुगलेली दिसायची! सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे माझे कपडे घेताना आधीच त्यांचे अभ्रे नाहीतर पिशव्या कशा दिसतील याचा विचार व्हायचा. त्यामुळे कधी कधी आपण म्हणजे अज्जी आणि आईचं "पिशव्या आणि अभ्रे स्वस्तात पडायचं" कारण आहोत असं मला वाटू लागायचं. पण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा कल्पकतेने वापरण्यातही कौशल्य असतं. या बाबतीत कदाचित विकतचे अभ्रे स्वस्तात पडले असते, पण भारतीय नारी तिच्या भावनिक निर्णयांमुळे चिनी नारीच्या मागे पडली आहे. आईकडे माहेरून मिळालेली भांडी कशी जगातल्या सगळ्या भांड्यांपेक्षा सरस आहेत याची एकशे एक करणं असतील. अज्जीच्या कपाटातही आईनी दिलेल्या साड्यांसाठी वेगळा कप्पा होता. आणि प्रत्येक साडी नेसताना, ती कुणी दिली, तेव्हा काय झालं होतं, कशाबद्दल दिली याचा तपशील तयार असायचा. मला याची फार गंमत वाटायची.
पण या सवयीतला मला आवडणारा भाग म्हणजे माझ्यासाठी शिवलेल्या रजया! दर वर्षी आई आणि अज्जी त्यांच्या काही सुंदर साड्या 'बाद' करायच्या. कारणं वेगवेगळी असायची. कधी नुसताच कंटाळा, कधी एखाद्या लग्नात मन लावून जेवताना पडलेला तेलाचा डाग, तर कधी साडी दिलेल्या व्यक्तीची आठवण अजरामर करण्यासाठी. रजईवर जाणार्या साड्यांनी काहीतरी खास आठवण जागृत केलेली असायची. त्याशिवाय तो मान साड्यांना मिळायचा नाही. नाहीतर त्यांच्या पिशव्या किंवा अभ्रे बनायचे. पण एखादी सुंदर नारायणपेठ, किंवा एखादी मऊ मऊ कलकत्ता, खास आतल्या बाजूसाठी, नेहमी गोधडीसाठी राखून ठेवली जायची. काही काही गोधड्या आतून रंकाच्या तर बाहेरून राजाच्या दिसायच्या. पलंगावर ठेवताना मात्र रेशमी बाजू वर दिसायची. पण कडाक्याच्या थंडीत आत शिरताना मात्र उबदार, सुती बाजूच जास्त उपयोगी पडायची. कधी कधी अज्जी एखाद्या जुन्या, जीर्ण पटोला साडीचे काठ जपून ठेवायची. मग कलामावशीकडून एखाद्या सध्या सुती गोधडीवर ते काठ लावून घ्यायची. तशा गोधड्या, एखाद्या दासीनी राणी नसताना चोरून तिचे बाजूबंद घातल्यासारख्या दिसायच्या. दर वर्षी माझ्या वाढदिवसाला अज्जी मला नवीन गोधडी पाठवायची. आणि कधी कधी मी नाराजीने तिच्या स्वाधीन केलेल्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे तिच्यातून डोकवून मला हसवायचे. एखाद्या कपड्याची पिशवी किंवा अभ्रा न होता त्याला गोधडीचा मान मिळाला की मला फार आनंद व्हायचा.
यावर्षी येताना आईनी मला अज्जीच्या साड्यांची गोधडी दिली. ती मात्र खरंच माझ्या सगळ्या आठवणींचा अर्क आहे. ती पसरून कधी योगासनं करू लागले की माझ्या घर-सख्या त्या दृश्याकडे बघत राहतात. आणि एखाद्या दुर्मीळ सुट्टीच्या दिवशी जेव्हा, अज्जीच्या साड्यांची, आईनी बनवून घेतलेली गोधडी घेऊन मी पहुडते, आणि आमचा ऑस्ट्रेलीयन बोका माझ्या पोटावर बसून गुरगुरू लागतो, तेव्हा आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम एका ठिकाणी आल्यासारखं वाटतं!
सई,
ReplyDeleteमस्त :)
अभ्रे नाही होत आता पण आमच्या इथं अजूनही साड्यांच्या रजया होतात
Well, well, well... now the proverbial cat is out of bag...(will it sound more realistic if I say "Australian boka is out of गोधडी"?). We now know why Unhalyachi Suttee is on steroids .....अज्जीच्या साड्यांची आईनी बनवून घेतलेली गोधडी !!!
ReplyDeleteJust curious, while you are doing yoga does your गोधडी fly in the air? (I am sure, it does. Thats how you get such beautiful, out-of-world ideas for Suttee.)
Keep it up!
@Deep,
ReplyDeleteThanks. :)
@Shrirang
=) haha. Suttee on steroids. Hahaha. :) Thats a nice way to put it.
No my godhadi does not fly. I think I am able to escape better when my PhD is at its boring best. :)
SO it is actually my work that makes me write.
Cheers!
Saee
गोधडी असतेस तशी! सहसा गोधड्या घ्ररातल्या आयांची,आज्यांची आठवण घेउनच येतात. या मधे नुसत कापड नसत तर त्या बरोबर प्रेम,वात्सल्य,व असंख्य आठवणींचे कोलाज असतात.
ReplyDeleteकुसूम अज्जीच्या गोधड्या म्हण्जे असेच तिच्या आठ्वणींचे सुंदर कोलज आहेत!
तु लिहेलेला हा लेख देखील असाच एक कोलाज आहे.
थँक्स सई
@ Baba,
ReplyDeleteThanks. :) :)
सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे माझे कपडे घेताना आधीच त्यांचे अभ्रे नाहीतर पिशव्या कशा दिसतील याचा विचार व्हायचा >>>> Hasun hasun gola aala potat..
ReplyDeleteKhup sunder lihila aahes