Monday, May 4, 2009

माऊताई

कुसुम अज्जीला मांजरांचा फार लळा होता. अगदी माझ्या लहानपणीच्या पहिल्या आठवणीत सुद्धा तिची काळीभोर मांजर आहे. तिच्या मागून म्यावत जाणा-या अनेक माऊताया मलाही वेड लावून गेल्या. अज्जीची मांजर मात्र नेहमी "माहेरवाशीण" नाहीतर "बाळंतीण" असायची! मे महिन्याच्या सुट्टीत जर मांजर थोडी आडवी आणि जगाला कंटाळलेली वगैरे दिसली की आमच्या चौकश्या सुरु होत.
"अज्जी माऊला बाळं होणारेत का गं?"
मग उगीच रोज "कधी होणार माऊला बाळ?" हा प्रश्न टाळायसाठी अज्जी आम्हाला थाप मारायची.
"नाही. तिला बरं नाहिये. म्हातारी झालीये ती. त्रास देऊ नका तिला. खेळायला पळा बघू!"
ह्या उत्तराचा अर्थ आमच्या भाषेत, "होय तिला बाळ होणार आहे. पण कधी मला माहित नाही." असा असायचा.
मग रोज एकदा तरी तिची विचारपूस व्हायची. कधी ती ऊन खात निवांत बसली असेल तेव्हा तिच्यासमोर आम्ही दोघी मांडी घालून बसायचो. मग मी हळूच तिच्या पोटावरून हात फिरवायचे. तशी ती डोळे किलकिले करून मला धन्यवाद द्यायची! कधी कधी मात्र तिला आमचा सहवास अगदी नको वाटायचा. मग कुरवाळायला गेलं तरी फिस्सकन अंगावर यायची आणि बोचकारायची! पण आमच्या घरात मांजरीचे बोचकारणे हे गुडघा सोलवटणे, दाराच्या फटीत बोट अडकणे, झोपाळ्यावरून पडून कपाळावर टेंगूळ येणे या सदरात यायचे. त्यामुळे कुठल्याही वेळी हातावर मांजरीच्या बोचकारण्याचे दोन तीन ओरखडे तरी नक्कीच असायचे! आमच्या नाही तर रस्त्यावरच्या!
रोज स्नेहा मला उठवायला अज्जीच्या खोलीत यायची. पण मी काही केल्या दाद द्यायचे नाही. मग तिचा रोजचा खेळ असायचा. "सयडे ऊठ! मांजरीला पाच पिल्लं झालीत! एक पूर्ण पांढरं आहे!"
तशी मी ताडकन उठायचे. पण तिचा रोजचाच खेळ असल्याने नंतर मला त्याची सवय व्हायची. मग एक दिवस रात्री माऊताई घर डोक्यावर घ्यायची! अजोबा आधीच तयार करून ठेवलेलं खोकं बाहेर काढायचे. मी व स्नेहा अज्जी-अजोबाना मदत करायचो. अज्जीची मऊ सुती साडी घालून तिला पलंग करून द्यायचो. मग ती ओरडत ओरडत त्यात जाऊन बसायची. मग अज्जी-अजोबा आमची हकालपट्टी करायचे.
"झोपायला जा आता. उद्या सकाळी पिल्लं तयार होतील."मग आम्ही जिवावर आल्यासारखं झोपायचो. सकाळी उठल्या उठल्या आधी अजोबांच्या खोलीत धाव घ्यायचो. माऊताईच्या खोक्यात चार सुंदर पिल्लं असायची तिला चिकटलेली, डोळे घट्ट मिटलेली! त्यातलं एखादं पाळण्यातच पाय दाखवायचं. सगळ्यांवर हल्ला करून दूध प्यायला पुढे जाणारं! नेहमी एखादं गरीब, अशक्त पिल्लू असायचं ज्याला माऊताई सगळ्यांपेक्षा जास्त सांभाळायची!
मग काय! आमचे सगळे खेळ बरखास्त व्हायचे. आजोबांच्या खोलीत ठाण मांडून अाम्ही पिल्लं काय काय करतात ते बघत बसायचो. अगदी जेवायचं सुद्धा भान नसायचं. अज्जी मुद्दाम आजोबांच्या खोलीत माऊचा दवाखाना थाटायची कारण आजोबांचा आमच्यावर थोडा धाक होता! पण त्यांना व्यायाम करायची सुद्धा पंचाइत व्हायची अामच्या लुडबुडीमुळे!
मग दोन-तीन दिवस माऊताईचा विश्वास कमविण्यासाठी तिला "बेड-मिल्क" मिळायचं आमच्याकडून. दूध प्यायला बाहेर पडली की आधी ती जरा काळजितच असायची. पण मग आम्ही फक्त लांब राहून तिची पिलं पाहतो हे कळल्यावर ती थोडे पाय मोकळे करायला पण जाऊन यायची. तेवढ्यात आम्ही सगळ्या पिलांना उचलून बघायचो. मांजर की बोका हे शोधून काढायचो! मग दंगेखोर नेहमी बोका असायचा आणि नाजूक पण काटक नेहमी छोटी मनिमाऊ असायची. त्यांचे गोरे गोरे पंजे, दुधाळ मिशा, आणि त्यात घट्ट मिटलेल्या डोळ्यांचा तो अवतार बघून खूप गंमत वाटायची. बावीस दिवसांनी पिलांचे डोळे उघडतात. कधी कधी त्याच्या आतच माझी शाळा सुरु व्हायची. मग मला स्नेहाचा खूप राग यायचा. कारण मी गेले कि त्या पिलांवर तिचं राज्य असणार! मला तशी मिटलेली पिलं सोडून जाताना फार फार दु:ख होत असे. तसं दु:ख मला भारत सोडतानासुद्धा झालं नसेल!
पण मग स्नेहा मला छान पत्र लिहायची. त्यात सगळ्या पिलांच्या सगळ्या सवयी सांगायची! फार छान वाटायचं ते पत्र वाचून. शाळेतून जड दप्तर घेऊन घरी आल्यावर तिचं पत्र वाचायला खूप मजा यायची. सुट्टीहून परत आलं की खूप दिवस माझं शाळेत मनच लागायचं नाही. तशा पुण्यातही माझ्या खूप मैत्रिणी होत्या. पण स्नेहाची सर कुणालाच नव्हती. आणि पुण्यात आलं कि मी पण "भरतनाट्यम्" करणारी, भाषणे करणारी, कविता म्हणून दाखवणारी मुलगी व्हायचे. मग शाळेतले चेहरेसुद्धा "बटाट्यासारखा दिसणारा पोहणारा मुलगा", किंवा चोमडी हुषार मुलगी असे वाटायचे. त्यातल्या कुणालाच मी माऊच्या खोक्यापर्येंत नेलं नसतं. पण मग जसा अभ्यास वाढायचा तसा मांजरांचासुद्धा विसर पडायचा. मग पुन्हा डोळे सुट्टिकडे लागायचे!

9 comments:

 1. कसल भन्नाट लिहल आहेस!
  माझ्या डोळ्यासमोर दोन वेण्या घातलेल्या,पेटीकोट घालून मांजरी भोवती फतकल मारून बसलेल्या सई व स्नेहा आल्या.
  सई अजून जरी मला कूठ मांजर दिसल(सुंदर किंवा वेडबिद्र)कि तू तूझ्या "कित्ती गोड" सकट आठवतेस. अजून देखील मांजर दिसल कि तूझे डोळे अगदी लहानपणी चमकायचे तसेच चमकतात!
  शांताबाईच मांजरी वरच पुस्तक मी जेव्हा जेव्हा काढतो तेव्हा मला तूझीच आठवण येते.
  मांजरांचा व तूझा नक्कीच ऋणानुबंध असावा म्हणूनच आँस्ट्रेलियात देखील शेजारणीच माजंर तूझ्याच घरात मुक्काम टाकून बसत!
  तू गेल्या जन्मी मांजरी होतीस का ग?

  ReplyDelete
 2. aaig .. kasla cute lihtes tu!! lahanpani cha sagla innocence dolyasamor yeto ! aflatun ! :)

  ReplyDelete
 3. दंगेखोर नेहमी बोका असायचा अाणि नाजूक पण काटक नेहमी छोटी मनिमाऊ असायची. :) :) too good

  ReplyDelete
 4. >:)<
  कस्लं मऊ मऊ! सयडे ..तुला अंबाबाईच्या देवळातला चिंचेचा गोळा प्रॉमिस.

  ReplyDelete
 5. फारच गोड! "मिटलेली पिलं" वा! काय मस्त शब्दप्रयोग आहे.

  ReplyDelete
 6. Hi Saee!

  U must be knowing "Shabdbandha" the bloggers world wide meet! on 6,7th june 09. I hope you would love to join!:) aankhee ek tuzya babanahee nimtran deshil ka plz.

  Waiting for your positive reply

  Regards,

  Deepak

  maile me at kuldeep1312@gmail.com

  ReplyDelete
 7. आमच्या पण वाड्यात किनै खूप मांजरी होत्या. आणि त्या नेहमी फणसाच्या झाडाखाली पिल्लं द्यायच्या. परत खूपच्या खूप लहान झालो हा लेख वाचून!

  ReplyDelete
 8. @ Shashank.
  Thanks. :)
  I even have one here in Australia.She is really fat and fluffy. :D

  ReplyDelete