आमच्या कोल्हापूरच्या घराचा केंद्रबिंदू म्हणजे स्वयंपाकघर आणि गच्चीच्या मधोमध असलेला झोपाळा. घरची मोठी मंडळी त्या झोपाळ्यावर बसून महत्वाचे निर्णय घेत असत. तसंच आम्ही पोरं त्या झोपाळ्याचा झोपाळा सोडून अजून कसा वापर करता येईल यावर सतत संशोधन करत असू!
चिकू दादाला लहानपणापासून बस कंडक्टर होण्याची भारी हौस होती. त्यामुळे तो खेळात सामील झाला की झोपाळ्याची बस व्हायची! मग कधी त्याला बस चालक व्हायची हुक्की आली की कंडक्टरचे काम मी किंवा स्नेहा करायचो! भाडेकरूंच्या मुलांवर "सत्ता" गाजवायचा हा एक सोपा मार्ग होता. त्यातही चिकू वर्षभर ऐकाव्या लागलेल्या," खालच्या कौस्तुभला बघ नेहमी नव्वद टक्के मिळतात", असल्या वाक्यांचा बदला घ्यायची संधी मिळायची. मग रोज संध्याकाळी शुभंकरोती
म्हणणा-या आणि रामरक्षा घोकणा-या आमच्या गुणी भाडेकरूंना चिकू या ना त्या कारणाने छान धुवून काढत असे!
चिकू खेळात नसला की आम्ही मुली झोपाळ्याचे "घर" करायचो. चारही बाजूंनी अज्जीच्या साड्या लावून आत भातुकली मांडायची! मग शेजारच्या मुली सुद्धा त्यांची भातुकली आणायच्या. मुलींचे खेळ तसे न्याय्य असायचे! जिची भातुकली सगळ्यात जास्त ती घरातले "महत्वाचे" निर्णय घेणार. यात नेहमी स्नेहाच जिंकायची पण कुणी कधी त्यावर आक्षेप घेतला नाही. मग एकीचा फ्रीज,एकीचा मिक्सर अशा विविध उपकरणानी आमचे घर सजायचे. जर भांडण झालं तर रीतसर वाटणी होऊन मुली आपापल्या घरी परतायच्या. आमच्या खेळात नाक मुरडणे, "चोमडी" म्हणणे, किंवा अगदीच टोकाला गेलं तर बोचकारणे या पलीकडे कधी भांडण जायचे नाही.
एकदा मनिमाऊच्या पिल्लाचं बारसं पण घातलं होतं झोपाळ्यावर. मला व स्नेहाला अज्जीने साड्या नेसवून दिल्या. आदल्या दिवशी आम्ही पाळणा पाठ केला! कांदेपोहे, जिलेबी आणि वेफर्स असा बेत होता! चिकूला जिन्यातून येणा-या लोकांना (न मारता) अत्तर लावायचे काम दिले होते. झोपाळ्याला शेवंतीच्या फुलांनी सजवण्यात आलं. मी व स्नेहा "बाळाच्या" दोन आत्या झालो होतो. पण आधी पिल्लू पलंगाखाली जाऊन बसल्यामुळे दोघींच्याही साड्या सुटायची वेळ आली. नंतर बाळ व बाळाच्या आईला आमचे वर्तन न आवडल्यामुळे अर्ध्या बारशातून त्यानी बाहेर धाव घेतली. पण त्या निमित्ताने सगळे भाडेकरू जमले व अज्जीचे खूप कौतुक झाले!
कधी झोपाळ्यावर बसून मी व स्नेहा "अपर्णा तप करिते काननी" हे गाणं म्हणायचो. हे एकच गाणे आम्ही सगळीकडे एकत्र म्हणून दाखवायचो!
पण झोपाळ्याचा सगळ्यात मोठा फायदा पावसाळ्यात व्हायचा. पावसाने पाट कुजू नये म्हणून नरू मामा बॅंकेत जाताना पाट काढून आडोशाला ठेवायचा. मग आम्ही पोरं दुपारी मोठी माणसं झोपली की पावसाच्या पाण्यात साबणचुरा ओतायचो! निसरड्या फरशीवर साखळ्यांना धरून ढकलगाडी खेळायचो! या खेळाने "टेंगूळ" या व्याधीशी आमची छान ओळख करून दिली! असला असुरी खेळ खेळताना आरडा-ओरडा न करणे अशक्य होते. त्यामुळे मामी नेहमी जागी होऊन बाहेर यायची. तिचा साबणचुरा वापरून केलेल्या या उपक्रमामुळे काही विचार न करता आधी चिकूला चार मोठ्ठे धपाटे बसायचे. मग स्नेहाला दोन. मला व इतर मुलांना मार मिळायचा नाही. मग स्नेहा आ वासून रडू लागायची! मलाही धपाटा मिळाला असता तर बरं झालं असतं असं मला नेहमी वाटायचं. पण निदान रडण्यात तरी स्नेहाला मदत करावी म्हणून मी पण भोंगा पसरायचे. या आवाजाने अण्णा अजोबा जागे होऊन बाहेर येत असत.
मग, "काय गं मिने. मुलं आहेत तुझी की माकडं?" असा सवाल व्हायचा. त्यानी मामीचा पारा अजून चढायचा आणि परिणामी चिकूला अजून दोन धपाटे मिळायचे!
अण्णा आजोबा पु.ल. म्हणतात तसं, "भूगर्भशास्त्रापासून ते गर्भशास्त्रापर्येंत" सगळ्या प्रकारचे अपमान करायचे! त्यामुळे त्यांच्याकडून फार लहानपणी मी जसं "वासांसी जीर्णानि" अर्थ माहित नसताना शिकले तसंच "अमकीच्या" "तमकीच्या" सुद्धा काही माहित नसताना शिकले!
चिकूला तर ते काही कारण नसताना "चिक्या ..." म्हणून येता-जाता चोप देत असत. तो सुद्धा यथावकाश बाहेर जाऊन एखाद्या बटूला पकडून "सराव" करीत असे! पण गोब-या गालाचा गोंडस चिकू दादा जेवायला बसला की आजोबांचा राग पळून जायचा ! नातवंडांना जेवताना बघून आजोबांना फार आनंद व्हायचा. त्यामुळे कधी झोपाळ्यावर तूप-साखर पोळी घेऊन वानरसेना जेवायला बसली की दुपारी केलेली खोडी माफ व्हायची !
mastch ahe ...
ReplyDeletehi
ReplyDeletei visited first time on your blog .
This is really one of the great work , i came across. I really liked this post and i remembered my visit to kolhapur.
mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.
thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com
regards
vijay
आत्ता घरात झोपाळा नाही पण तुझा हा लेख वाचून मी झोपाळ्या वाचून झूलायला लागलो आहे!
ReplyDeleteअज्जी(तूझा शब्द) व आईला मी लेख वाचून दाखवला.
"पण आधी पिल्लू पलंगाखाली जाऊन बसल्यामुळे दोघींच्याही साड्या सुटायची वेळ आली. नंतर बाळ व बाळाच्या आईला आमचे वर्तन न आवडल्यामुळे अर्ध्या बारशातून त्यानी बाहेर धाव घेतली. पण त्या निमित्ताने सगळे भाडेकरू जमले व अज्जीचे खूप कौतुक झाले!"
हे वाचल्या वर अज्जी खूदकन हसली.
बाबा
ReplyDeleteधन्यावाद! अज्जीला लेख अावडला यापेक्षा काय जास्त हवं?
मी अजून एक पोस्ट लिहित अाहे. लवकरच पूर्ण करीन!!
:)
योग अाणि विजय
मनापासून अाभार!
काही क्षण झोपाळ्यावर तुमच्या खेळात सामील झाल्या सारखं वाटलं. मांजराच्या पिल्लाच्या बारशाची कल्पना भारी आवडली पण नावं काय ठेवलंस ते सांगितलं नाहीस!
ReplyDeleteप्रसाद,
ReplyDeleteनाव बहुतेक सोनाली का असंच काही ठेवल होतं. पण अाता आठवत नाही!
धन्यवाद!!
झोपाळा आणी माउताई हे दोन्ही ब्लॉग आवडले. लहानपण आठवले. मुम्बईला घरात झोपाळा आणी माउताई हे दोन्ही होते व सुट्टीसाथी कोल्हापूर हे ठरलेले होते. त्यामुळे लोकेशन्सची अदलाबदल झाली तरी प्रसंग तेच आहेत. लिहिण्याची स्टाइल आवडली.
ReplyDeleteSai,
ReplyDeleteKhup Khup Chhan lihila ahes ga. Tu marathit column lihi ata. This is high time. Tuzya English blogmadhala Aussiesvarcha lekh mala khup awadala. To translate karun tyaveli Ikade prasiddha vhayla hava hota. I'm proud of you, Sai.
- Mukund Taksale
@ Mukund Kaka
ReplyDeleteThanks. A shabbaski from you means a lot to me. :)
Column lihinyaitka sarav ahe ki nai mahit nahi ajun. Baghuya. :)
Saee
i missed this too :( he dhapate prkarn jabreee aahe
ReplyDelete