Sunday, February 14, 2010

अमेया

जशी सुट्टी सुंदर असायची तशाच शाळेतल्या काही गोष्टीदेखील होत्या. मी दहा वर्षांची असताना माझी शाळा बदलली. आधीच्या शाळेत माझी खूपच वट होती त्यामुळे अचानक पुन्हा मी "कुणी नाही" या पदावर आल्यामुळे खूप त्रासले होते. तशा मला काही मैत्रिणी होत्या पण अजून जिवाभावाचं कुणीच नव्हतं. नव्या शाळेतली पहिली दोन वर्षं दर सोमवारी माझ्या हृदयावर एक मोठ्ठा दगड येऊन बसायचा. उठल्या उठल्या शाळेला जायचं या विचारानं माझे डोळे भरून यायचे. आणि शाळेची वेळ जशी जवळ यायची तसे माझे पाय कुठल्यातरी अदृश्य ओझ्याने जड व्हायचे. शाळेतला "तिचा" गट मात्र शाळेच्या घंटेची आतुरतेने वाट पहायचा. ती आणि तिच्या पाच "उर्मट" मैत्रिणी. सदैव दंगा करणे, सगळ्यांची टर उडवणे, वर्गात मध्येच फिदीफिदी हसणे, मग बाहेर हकालपट्टी झाली की तिथेही काहीतरी आचरट प्रताप करणे हा त्यांचा दिनक्रम होता. पण अभ्यासात मात्र सगळ्या हुषार!! मला नेहमी वाटायचं आपल्यालाही अशा मैत्रिणी हव्या. त्यातल्या त्यात तिच्यासारखी एक तरी! ती म्हणजे अमेया!!
मग सातवीत गेल्यावर एका सहामाही परीक्षेनंतर मराठी, इंग्लिश, हिंदी या सगळ्या विषयांच्या बाईंनी माझे निबंध वर्गात वाचून दाखवले होते. सगळ्या भाषांत मला खूप छान मार्क होते. त्या दिवशी मी आजाराचं नाटक करून शाळेला गेलेच नव्हते. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्या गेल्या अचानक सगळेजण माझे अभिनंदन करू लागले. अमेयासुद्धा येऊन मला माझे निबंध खूप आवडले असं सांगून गेली! त्या दिवसानंतर हळू हळू खरंच माझी आणि तिची मैत्री जमू लागली. मग सातवीतून आठवीत जाताना समारोपाच्या वेळी मी "अमेयाच्या" गटाबरोबर सगळ्या बाईंसाठी कविता केल्या. आणि आठवीत नव्या शाळेत मात्र मी माझ्या नव्या गटाबरोबर गेले!
मग त्यांच्या दंग्याला एक नवीन साहित्यिक कलाटणी मिळाली!! नाटकं लिहिणे, ती बसवणे यात आमचा वेळ मजेत जाऊ लागला. त्या "कलेच्या" उपासनेपोटी आम्ही वर्गातल्या मुलांशीही दोस्ती केली. :)
आणि अमेया आणि मी हळू हळू खास मैत्रिणी होऊ लागलो. अर्थात आजूबाजूच्या (जालीम) दुनियेला हे आवडलं नाही हे सांगायला नकोच. मग माझ्या कपाळी दोन मैत्रिणींची मैत्री "तोडल्याचा" आरोप होऊ लागला. विविध स्तरांवर शीतयुद्धं सुरु झाली आणि हे ओळखून मी माघार घेतली. :) पण यामुळे एक नवीनच गम्मत झाली. अमेया मला पत्रं लिहू लागली. शाळेत तिला तिच्या "खर्‍या" खास मैत्रिणीला वेळ द्यावा लागे त्यामुळे आम्हांला कधीच फार वेळ बोलता येत नसे. मग ती घरी जाऊन गृहपाठ झाला की मला पत्र लिहायची. मनातल्या सगळ्या चिंता, गुपितं त्या चिठ्ठीत मोकळी करायची. आई कशी धाकात ठेवते, बाबा कसे लाड करतात, अशा अनेक गोष्टी सांगायची. दुसर्‍या दिवशी ती चिठ्ठी वहीच्या कव्हर आणि पुठ्ठ्याच्या मध्ये अलगद सरकवून मला सरळ वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा हातातून पाठवायची. मग मी त्या चिठ्ठीला उत्तर आणि त्यात माझी भर घालून दुसर्‍या दिवशी तीच वही परत करायचे. :) त्या सगळ्या चिठ्ठ्या मी अजून ठेवल्या आहेत. मी कोल्हापूरला गेले की अमेया मला "उघड" पत्र लिहायची. तिचं पत्रं माझ्या कोल्हापूरच्या जगात खूप परकं वाटायचं. पुण्यातल्या कुठल्याही मैत्रिणीला माझ्या त्या जगात जागा नव्हती. आणि अचानक माझ्या दुसर्‍या दुनियेतून आलेलं हे पत्रं बघून स्नेहासुद्धा गाल फुगवून बसायची.
पण आज्जीला मात्र फार फार आनंद व्हायचा.
" ए साय, तुझ्या मैत्रिणीचं पत्रं आलंय बघ!" म्हणून मला ते फुगलेलं फिकट पिवळं पाकीट आणून द्यायची. ते देताना माझ्यापेक्षा तिच्या डोळ्यात जास्त आनंद असायचा. आपल्या तेरा वर्षांच्या नातीला कुणीतरी इतकं मनापासून पत्रं लिहितंय हे बघून कदाचित तिला तिचं आज्जीपण सार्थ झाल्याचा आनंद होत असेल! मग मी ते वाचून कधी कधी विसरून जायचे. आज्जी मग मला आठवण करून द्यायची उत्तर पाठवायची. तो सगळा सोहळा आठवला की अजून डोळे भरून येतात. आज्जीच्या खिडकीत बसून, मिळेल त्या कागदावर पेनाचं झाकण चावत चावत लिहिलेली सगळी पत्रं आठवतात!! मधेच, "अज्जी काच "कवड्या" की "कौड्या" गं?" असे प्रश्न विचारले जायचे. मग नेहमीप्रमाणे मराठीचा कंटाळा करून इंग्लिशमध्ये पूर्ण करायचे. ती ही पत्रं येताना बरोबर घेऊन यायचे. :)
पत्रांच्या साखळ्या फार बिलंदर असतात. आपल्या निरुपद्रवी रूपाने त्या खूप छान भुलवतात. आणि एक दिवस अचानक आपल्याला त्यांनी घट्ट बांधून ठेवलं आहे हे लक्षात येतं. तसंच काहीसं झालं. शाळा सुटली आणि आमच्या खास मैत्रिणींच्या खास असण्याच्या परिभाषाही बदलल्या. पण आमचं पत्रप्रेम काही संपलं नाही. कागदाची जागा नंतर मोबाईल फोनने घेतली. पण फोन करण्यापेक्षा आम्हाला एस एम एस पाठवणेच जास्त प्रिय होते. अजूनही आम्ही पत्रं लिहितो. आता चिंतांचे परीघ वाढले आहेत, आणि स्वप्नांनाही आताशा वास्तवाच्या नाजूक किनारी लागल्या आहेत. पण ते सगळं पत्रांत गुंफणारे हात अजून त्याच उत्कटतेने चालतात. आणि ते वाचणारे डोळेही त्याच हळवेपणाने ओलावतात. अशी मैत्रीण मिळण्यासाठी नक्कीच मागच्या जन्मीचं संचित लागत असणार. हे नातं अनुभवलं की या सगळ्या जन्मोजन्मीच्या नात्यांवर विश्वास ठेवावासा वाटतो.
तिची आठवण येत नाही असा खूप थोडा काळ असतो माझ्या दिवसात. पण तिची आठवण आली की नेहमी मला शांताबाईंची कविता आठवते.
एक तरी मैत्रीण हवी
कधीतरी तिच्यासंगे कडकडून भांडायला
मनामधल्या सार्‍या गमती तिच्यासमोर मांडायला!
एक तरी मैत्रीण हवी
शाळेमधे एका डब्यात एकत्र बसून जेवायला
घासामधला अर्धा घास अलगद काढून ठेवायला!
एक तरी मैत्रीण हवी
झाडाखाली गुलगुल गोष्टी किलबिल किलबिल बोलायला
कधी कधी लाडात येऊन गळ्याची शप्पथ घालायला!

11 comments:

 1. Apratim, Altimate...
  Kase jamate ho tumhala itke sunder lihayalaa????
  Mazya babtit pan agdi SAME asech zalele. Mhanaje Aadhi aagau vatanaari mulgi nantar khaas maitrin hone, mag aadhichya maitrinina te na aavadane, Aani mag sunder patrpatri....
  Khoop sunder.... Agdi mazich gosht konitari lihilyasarakhe vaatatay....

  ReplyDelete
 2. सई लई भारी!
  "पत्रांच्या साखळ्या फार बिलंदर असतात. आपल्या निरुपद्रवी रूपाने त्या खूप छान भुलवतात. आणि एक दिवस अचानक आपल्याला त्यांनी घट्ट बांधून ठेवलं आहे हे लक्षात येतं."
  अप्रतिम!

  ReplyDelete
 3. @ maithili
  Thanks g. :) I am glad you can identify with it. I guess everyone has a friend like Ameya sometime or other.
  Thank you for your kind words. :)
  @Baba
  Thankoo..Aai la pan wachun dakhaw. She might see vrinda moushi in it!!
  Cheers
  Saee

  ReplyDelete
 4. "अजूनही आम्ही पत्रं लिहितो. आता चिंतांचे परीघ वाढले आहेत, आणि स्वप्नांनाही आताशा वास्तवाच्या नाजूक किनारी लागल्या आहेत. पण ते सगळं पत्रांत गुंफणारे हात अजून त्याच उत्कटतेने चालतात. आणि ते वाचणारे डोळेही त्याच हळवेपणाने ओलावतात."
  सुरेख :)
  फार गोड लिहिलंयंस! मला स्वत:ला पत्र लिहायला खूप आवडतं. पत्रं, आणि नंतर emails मधून मैत्री बनत-सजत गेली आहे.

  असंच सुंदर लिहीत राहा :)

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. सई गं!!! केवढं छान लिहितेस गं...नकळत डोळयात पाणी आणलंस. ई-पत्रांनी सोबत करणार्‍या मैत्रिणीची आठवण करुन दिलीस. एकमेकांना खरीखुरी पत्रं लिहिण्याचं प्रॉमिस करुन दोघीही सध्या हरवलोय.
  थॅंक्स!!!!

  ReplyDelete
 7. हे बाकी खरं आहे सई.. एक तरी मैत्रीण हवी!!! (असो. हा आपला माझा चावटपणा.. तू लक्ष नको देऊ.. ) असंच भारी लिहीत रहा.. :D

  ReplyDelete
 8. @ Mandar..haha mazya likhanala "goad" mhannara tu ektach ahes. Sahi ahe he adjective. :) ilike!!
  @ Sakhee..
  Mug ata athwan zalich ahe tar uchal to kagad ani lihiti ho!! :) Thanks for the praise..
  @Chaphya..
  Milel ho..tuzi sagli "GATE" ughdun zali ki milel. :P :)

  ReplyDelete
 9. This is indeed divine stuff.

  I have no words beyond.

  ReplyDelete
 10. Afat ahes ga tu ekdam :)... khup chan lihile ahes.. maitrin hi gostch etaki god aste na.... ani yogayog mhanje mazhya shaletalya ani atta paryntachya sarvat javalachya maitriniche navhi saeech ahe .. shaletale 'gat' ani tyatun haluch chalu asaleli patrapatri..:) same pinch...

  ReplyDelete
 11. Hi,
  Very nice & touching..
  My daughter of your age, now in Chicago, recommended me to read this blog. I do know, how she reached here..
  Keep writing.. we will love to read it..

  Dinesh Kumthekar
  Chief Engineer, Kuwait Airways, Kuwait

  dinesh.saswad@gmail.com

  ReplyDelete