एकदा शाळेत मराठीच्या तासाला आम्हांला "आई म्हणोनी कोणी" ही कविता शिकवायला घेतली होती बाईंनी. माझं खरं तर कवितेवर भारी प्रेम. लहानपणापासूनच मी कविता करायचे आणि वाचायचे. त्यात अज्जीचा खूप मोठा हात होता हे सांगायला नकोच! त्यामुळे रसग्रहण मला फार फार आवडायचं. आमच्या मराठीच्या इनामदार बाईसुद्धा खूप मनापासून शिकवायच्या. त्या तासाची मी खूप आतुरतेनी वाट बघायचे नेहमी. पण त्या दिवशी त्यांनी ती कविता शिकवायला घेतली आणि झालं! सगळ्या मुली पाच मिनिटांत मुसमुसून रडू लागल्या. पहिलं कडवं होईपर्यंत रंगानी "जरा उजव्या" असलेल्या सगळ्या मुलींची नाकं लाल झाली होती. मला वाटलं मला जरा उशीरा रडू येईल पण कुठलं काय! मला रडूच येईना. मग दुसरं कडवं सुरु झालं. त्यात "आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी" ही ओळ आली. त्या ओळीवर खिशातून रुमाल बाहेर येऊ लागले. आपल्या वर्गभगिनी किती हळव्या आहेत हे बघून वर्गबंधूंचा आदर वाढू लागला. त्यामुळे भगिनीमंडळाची रडायची मोहीम आणखीनच बळावली. मला फार वाईट वाटू लागलं मनातून. आपण निर्दयी आहोत का? आपल्याला का बरं रडू येईना? इनामदार बाई शांतपणे रसग्रहण करत होत्या. त्या रडायला लागू नयेत एवढी एकच माफक अपेक्षा मी उराशी बाळगून होते. मग पुढे गेलो "ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी". या ओळीला मात्र मला कवीचा राग येऊ लागला. बिचारा देव. आपल्याला काय माहीत त्याला आई आहे की नाही. आणि नसली तरी त्याला असं भिकारी का म्हणावं? पण या तर्कापुढे आजूबाजूची डझनभर नाकं आणि दोन डझन डोळे भारी ठरले. मग मी मनात असले दुष्ट विचार करण्यापेक्षा एकदा शेवटचं रडू येतंय का ते पाहायचा प्रयत्न केला. मनातल्या मनात आई खरंच घरी नाही आणि मी आणि बाबा स्वयंपाक करतोय असं चित्रं उभं केलं. पण त्या चित्रातही आई आली, "शिरीष बाजूला हो. तू फार पसारा करतोस स्वयंपाकघरात" असं म्हणत. मग मी भावनांच्या मागे न लागता शारीरिक माध्यमांनी रडू येतंय का ते पहायचा प्रयत्न केला. डोळ्यांची उघडझाक केली. पण रडू येईच ना! हे होईपर्यंत नुकत्याच "भिकारी" झालेल्या देवालासुद्धा माझी दया आली नाही आणि इनामदार बाईसुद्धा रडू लागल्या. हे फारच झालं!
माझा नेहमीचा गोंधळ आहे. जेव्हा फार गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा मला खूप हसायलाच येतं. हे मी आईकडून घेतलं असावं. आईलापण असं कुठेही हसू येतं. एकदा नुकतंच लग्न झालेलं असताना बाबा आईला त्याच्या नातेवाईकांकडे घेउन गेला होता. तेव्हा तिथे कुणीतरी "अक्कुर्डी" हा शब्द उच्चारला म्हणे. तर माझ्या आईला त्यावर इतकं हसू आलं की बाबाची फजिती झाली. मग त्याला "त्रास" नको म्हणून आई त्यांच्या बाल्कनीत जाउन एकटीच हसत बसली. अशा खूप प्रसंगांमध्ये मी आणि आईनी बाबाला अवघडायला लावलं आहे.
त्यामुळे आपल्याला काही केल्या रडू येत नाही याचं मला हसू येऊ लागलं. तेवढ्यात तासाची घंटा झाली आणि माझी त्या अतिअवघड प्रसंगातून सुटका झाली. त्यादिवशी मी मनाशी पक्कं ठरवलं, लोकांना रडू येईल असं काही लिहायचं नाही. कारण ज्यांना रडू येत नाही त्यांची उगीच पंचाईत होते. योगायोगाने अज्जी तेव्हा पुण्यातच होती. मी घरी येऊन तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती गोड हसून म्हणाली, "अगं एवढंच ना! नाही आलं रडू तर नाही! याचा अर्थ काय तुझं आईवर कमी प्रेम आहे असं नाही काही वेडाबाई. माझी आई मी खूप लहान असतानाच गेली. पण म्हणून काही मला असं वाटलं नाही. आणि माझ्या आईची मला अजूनही आठवण येते. आणि लोकांना रडवणं खूप सोप्पं असतं लाडूबाई. लोकांना हसवायला शिकलीस तर खरी मजा आहे".
आणि हे अज्जीचं म्हणणं मला सोळा आणे पटतं! अज्जी कधी कधी मला "राजहंस माझा निजला" आणि "चिंचेवर चंदू चढला" एका पाठोपाठ एक वाचून दाखवायची. पण राजहंस वाचून झालेलं दु:ख अत्र्यांच्या कवितेने लगेच हलकं व्हायचं. ती आणि ताजी नेहमी परिस्थितीमधला विनोदच शोधायच्या. अज्जी तिच्या साहित्यिक दृष्टीने तर ताजी तिच्या खट्याळ निरागस स्वभावाने. ताजीचा आवडता खेळ म्हणजे ती गेल्यावर कोण कोण कसं कसं रडेल याची नक्कल करून दाखवणे. आजोबांना हा खेळ "अभद्र" वाटायचा. आणि मुलांसमोर मरणाबद्दल बोलू नये असं त्यांना वाटायचं. पण आम्हाला मृत्यूपेक्षा नक्कल करण्यातच रस असायचा.
"आमचा न-या कसा रडेल?" नरूमामाला ताजी लाडानी न-या म्हणायची.
"न-या हळवा आहे पण रडताना देखील भांग विस्कटणार नाही याची काळजी घेईल तो". मग नरू मामा रडतोय आणि हळूच केसांवरून हात फिरवतोय त्याची नक्कल करून दाखवायची. लगेच मुलांमध्ये हशा पिकायचा. :)
"हिराक्का कशी रडेल?"
"ग्येली गं ऽऽ माझी ताईऽऽऽ!" असं दारातूनच ओरडत येणार ती.
"आता कुनाच्या पम्पावर पानी भरू गऽऽऽऽ बाईऽऽऽऽ!!"
हिराक्कासारखी गुडघा मानेत खुपसून बसायची. आणि तिच्या या मरण-काव्यावर आम्ही खूप हसायचो!
"ताजी कुसुम अज्जी कशी रडेल?" - मी (मी नेहमीच अवघड प्रश्न विचारायचे)
"बाई होय! बाई अशा हळू हळू चालत येतील" मग अज्जीच्या पायाचा आवाज न करता चालायच्या सवयीची नक्कल करायची.
"फार चांगल्या होत्या हो ताई! वसूवर आणि सईवर फार जीव होता त्यांचा." अज्जीची मान तिरकी करून बोलायची लकब बरोब्बर टिपायची आणि मग पदर नाकाला लावून कोप-यात उभी राहायची अगदी कुसुम अज्जीसारखी. आणि तिचं नेहमीचं कोल्हापुरी वळण सोडून बामणी बोलायची. यावर बच्चे कंपनी फार खूष व्हायची.
एकदा नरूमामाच्या मित्रांसमोर अशी नक्कल करताना त्यातला एक मित्रं खरच रडायला लागला होता. त्याला ताजीनी जाउन घट्ट मिठी मारली होती.
माझ्या बालपणीच्या या गोष्टी कदाचित नेहमीच्या जगात थोड्या विचित्र वाटतील पण मला भावतो तो त्यामागचा निखळ निरागस उद्देश. ताजी जेव्हा खरंच गेली तेव्हा तिच्या सुतकात आम्ही मुडशिंगीच्या घरात पत्रावळ्या लावत बसायचो. आणि सगळ्यांना तिच्या या नकला आठवायच्या. तेव्हा आम्ही मुली मोठ्या झालो होतो. आणि त्यावेळी मला या सगळ्या विनोदामागचा क्रूर विरोधाभास जाणवला. पण तिची आठवण काढताना त्या सुतकात देखील आम्ही खिदळलो होतो. आणि मग पुन्हा एकमेकींना मिठी मारून रडलो होतो.
मग परीक्षा जवळ आली तेव्हा तोंडी परीक्षेसाठी मी तीच कविता घोकू लागले. इनामदार बाईनी चालपण लावून दिली होती. एका रविवारी मी ती कविता घोकत असताना माझी आई खोलीत आली. आणि माझी ती कविता म्हणण्याची आत्मीयता बघून, माझी चाल ऐकून आणि परीक्षेपुढे मी चारी मुंड्या चीत झालेली बघून की काय आईला हसू जाम आवरेना. आणि प्रत्येक कडव्यानिशी तिचं नेहमीचं खो खो हास्यकारंजं सुरू झालं. आपली आईसुद्धा ही कविता ऐकून हसते आहे हे पाहून माझ्या जीवात जीव आला. :)
"लोकांना रडवणं खूप सोप्पं असतं लाडूबाई. लोकांना हसवायला शिकलीस तर खरी मजा आहे" हे तर खरे आहेच. पण लोकांना हसवता हसवता एकदम काळजाला भिडणे हे जास्त अवघड आहे. ते जमल्याची पावती म्हणजे हसता हसविता श्रोते व वक्ता, किंवा वाचक व लेखक, या दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी उभे रहाणे. आणी ही पावती तर येथील लेखांच्या पाना-पानांवर दिसते आहेच. आणखी काय लिहू ? असेच लिहीत रहा.
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteसई, सकाळपासून मूड जरा खराब होता, तुझ्या या पोस्टमुळे solid हसले.
keep writing.
सोनाली
Saee, ekaach post madhye amhala hasawNa aNi DoLyat paNihi aNana tulaach jamoo shakta.
ReplyDeletekhoop surekh! :)
Khupach Sundar.. Shabdach nahit kahi lihayala.
ReplyDeletemi tuzi ek ani ek gostha wachate. Konati jast changali he kadhich tharawata yet nahit. Saglyach ekdam weglya tari pan manala bhidnarya ahet.
सई तूला दोन्ही जमत! हसवण आणि रडवंण! याच कारण म्हणजे तू जे काही लिहीतेस ते आत्मियतेने लिहीतेस. "बाबा","सुनिताताई" या दोन्ही पोस्ट वाचून डोळे भरून आले होते. एकात आनंदाने तर दुस-यात वियोगाने!
ReplyDeleteनेहेमीप्रमाणेच सुंदर! रडवण्यापेक्षा हसवणं अवघड आहे हे खरंच.
ReplyDeleteक्या बात है! खासंच!
ReplyDeleteतुझ्या ताजीसारखं व्यक्तिमत्व असावं बघ..!
Nehmi pramanech mast....!!!
ReplyDelete