Friday, March 5, 2010

मोठी झाल्यावर कोण होणार?

"सई, तू मोठी झाल्यावर कोण होणार?" हा प्रश्न मला अगदी चार वर्षांची असल्यापासून विचारण्यात येतोय. हो अजूनही. त्याचं उत्तर मात्र नेहमी बदलतं. हो अजूनही!!
लहानपणी "मोठं होणं" ही एक लठ्ठ काळी कुळकुळीत रेष होती. एक दिवस ती ओलांडायची, मग त्यानंतर आयुष्य खूप सोपं होणार होतं. महत्त्वाचे निर्णय जसं की जेवणाच्या वेळेला उडदाच्या पापडाच्या लाट्या खाव्यात की नाही, किंवा साधारणपणे किती वेळ आजारी न पडता हौदात खेळता येतं वगैरे घेता येणार होते. मोठं झाल्यावर बाबाची अंथरुणातून मला खसकन ओढून बाथरूममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी संपणार होती. तसंच मला पेल्यातलं दूध संपेपर्यंत न उडी मारता येणार्‍या उंच स्टुलावरही बसावं लागणार नव्हतं! आणि "चहा" या नावाखाली एक सहस्त्रांश चहा असलेलं भेसळयुक्त दूधही प्यावं लागणार नव्हतं!!
लहानपणी मला भांडी घासायची आणि धुणं धुवायची फार हौस होती. त्यामुळे पहिली काही वर्षं मला इस्त्रीचं दुकान काढायची इच्छा होती. कित्येक वेळेला आमच्या धुणंवाल्या सुमनमावशीकडे हट्ट करून मी दोन-तीन कपडे धुवायचे नळावर. ती बिचारी, "अगं तुझी आई आली तर मला रागवेल!", असं काकुळतीला येऊन म्हणायची. पण कपडे धुतल्याशिवाय मी गप्पच बसायचे नाही.
शाळेत जायला लागल्यावर खूप वर्षं मला शिक्षिका व्हायचं होतं. दुपारी घरी आले की मी नाडीवाली साडी नेसून, फळ्यावर माझ्या काल्पनिक वर्गाला शिकवायचे. कधी कधी बाबा माझा विद्यार्थी व्हायचा. मग त्याला आधी तो हुषार आहे की मठ्ठ हे सांगायचं, त्याप्रमाणे तो पुढे वागायचा. पण शिक्षिका होण्यासाठी सद्गुणी राहावं लागायचं. त्यामुळे लवकरच मला त्याचा कंटाळा यायचा.
एकदा शाळेत कुंभार आला होता. आम्हाला मातीची भांडी करून दाखवायला. तेव्हापासून मला कुंभार व्हायची फार इच्छा होती. तसे मी बागेत चिखलात प्रयोग सुद्धा केले. माझ्या संध्याकाळच्या ध्यानाकडे बघून आई नेहमी कपाळावर हात मारून घ्यायची. आईला निदान कमी राग यावा यासाठी विमल मावशी खराट्याच्या काडीनी माझी नखं साफ करायची. मी थेट निसर्गाकडे धाव घेऊ नये म्हणून मला आईबाबांनी चिकण माती आणून दिली. त्याला छान वास यायचा आणि खूप सारे रंगसुद्धा होते. पण त्यात काही मजा नाही. दोन दिवसांत मला त्याचा कंटाळा आला.
मग पुढे मला रामायणातली सीता व्हायचं होतं. ते करायला मी शिक्षिकेचीच साडी बिन पोलक्याची (अज्जीचा शब्द) घालायचे. वनवासातली सीता व्हायला. पण त्याचाही कंटाळा आला.
मग माधुरी दीक्षित आली. त्यानंतर खूप वर्षं मला ती व्हायचं होतं. नाच तर मी आधीपासून शिकायचे. तिच्यासारखा नाच करायचा आणि तिच्यासारखी नटी व्हायचं हे मी पक्कं ठरवलं होतं. पुढे नटी नाच बसवणारीचं ऐकते हे कळल्यावर मला सरोज खान व्हायचं होतं. एकदा मी माधुरीला प्रत्यक्ष भेटले. तेव्हा मी तिच्याकडे सरोज खानचा पत्ता मागितला!
लहानपणी मला राजीव गांधी फार म्हणजे फार आवडायचे . अगदी चार वर्षांची असल्यापासून. एकदा मी बाबाला माझ्यातर्फे "माझ्या राजीवला" पत्रं लिहायला सांगितलं. माझी भुणभूण थांबावी म्हणून त्यांनी लिहिलं देखील. मग एक दिवस आमच्या घरी पोस्टमन "पंतप्रधान" अशी मोहोर असलेलं पाकीट घेऊन आला! त्यात काय आहे हे बघण्याची त्याला इतकी उत्सुकता होती की बाबांनी ते उघडेपर्यंत तो तिथेच थांबला. मी तर बाबावर उड्या मारून सगळं घर डोक्यावर घेतलं!! आतमध्ये राजीव गांधींचा सहीवाला फोटो आणि एक खूप गोड पत्रं होतं!! माझ्यासाठी!! मला म्हणून आलेलं ते पहिलं पत्रं असेल!
राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा मी सात वर्षांची होते. सकाळी सकाळी मला झोपेतून उठवून बाबानी बातमी दिली. तेव्हा मी बाबाला मिठी मारून रडले होते!
आता वाटतं खूप वेळा, राजीव गांधी सारखं पुन्हा कुणीतरी आवडावं! पण तेव्हा जसा मला "माझा राजीव" आवडायचा तसा आता कुणीच आवडत नाही. :)
मग शाळा सुरू झाल्यावर सगळ्यांसारखी माझीही स्वप्नं तासली गेली. डॉक्टर, टीचर वगैरे वगैरे. पण मनात नेहमी काहीतरी जगावेगळं असतंच!! कधी मधेच मला स्वयंपाकी (मराठीत शेफ) व्हावसं वाटतं. आपलं हॉटेल असावं. फार मोठं नाही तसं, आटोपशीरच! तिथे लोकांनी गर्दी करावी. :)
किंवा, खूप निवांत वेळ मिळावा आयुष्यात आणि सगळे बांध तोडून लिहायची मुभा मिळावी. किंवा एखाद्या कोपर्‍यात छोटंसं कॉफी-शॉप असावं माझं. आणि तलफेची वेळ संपली की मला लिहिता यावं. :)
पुन्हा नाचता यावं, आणि हो, घराच्या मागल्या बाजूला एका कोपर्‍यात कुंभाराचं चाक असावं. :)

21 comments:

  1. अप्रतिम.. अशा प्रकारचे लेख बरेचदा वाचले आहेत पण हा खूपचं आवडला.. किती साधे शब्द आणि सोपी मांडणी.. उत्कृष्ठ !!

    ReplyDelete
  2. ते राजीव गांधींचं पत्र जमलं तर पोस्ट कर ना ब्लॉग वर... मला पण ते वाचायची उत्सुकता आहे.. उड्या मारून नाचावसं वाटतंय!! आणि राहुल गांधी अगदीच वाईट नाही.. बघ विचार करून!! :D

    ReplyDelete
  3. @ Bipin and Heramb,
    Thanks
    @Chaphya,
    Shodayla hava. Babakade asel. Hya..Rahul la Rajeevchi sar nahi.
    I loved the way Rajeev Gandhi used to say,
    "Hame kehna hain, hame kehne do!!" Or something like that. Don't remember now. Funny why I picked him as my childhood idol!!

    ReplyDelete
  4. Superb! shevat tar agdee sahee! khoop khoop aavadal manogat. :)

    ReplyDelete
  5. किती साध्या सोप्या शब्दात लिहलं आहे. मस्त. लहानपणी जवळपास सगळ्यांनाच अशी स्वप्ने पडत असतात आणि शाळेत गेल्यावर खरचं ती तासली जातात. अगदी अचूक शब्द वापरला आहे.
    आणि शेवटी मला तुमच्या पालकांचे कौतुक करावेसे वाटते. त्यांनी तुम्हाला चिकणमाती आणून दिली, राजीव गांधींना पत्र लिहलं. खरचं ग्रेट आहेत ते.

    ReplyDelete
  6. मस्तच इंग्रजी बरोबर मराठीही तेवढंच उत्तम लिहितेस.
    लहान्पणी तुला काय काय व्हावंस वाटत होतं! बाप रे ! छान लिहिलं आहेस. एवढं सगळं आठवतं वाटतं ! थोडे मोठे झाले तरी चालतील लेख. चांगलं लिहिल्यावर वाचायला कंटाळा नाही येत.

    ReplyDelete
  7. फारच छान!हे वाचताना डोळ्यासमोर माझी मुलगीच आली. आमच्याही घरात सध्या हे शिक्षिका, शेफ वगैरे बनण्याचे खूळ आहे. मुलगा धाकटा असल्याने मुलीच्या वर्गात बसायचे काम त्याच्यावर. आमची त्यातून सुटका.
    -निरंजन

    ReplyDelete
  8. सई, सुंदर पोस्ट...तुझ्या साध्या सोप्या पण खऱ्याखुऱ्या पोस्ट नेहेमी आवडतात...
    आणि शब्द नी शब्द पटला गं!......
    आमचं धाकटं ध्यान नुकतच शाळेत जातय सध्या, त्यामुळे ते अदॄष्य मुलांना शिकवणारी शिक्षिका आणि बाबाने विद्यार्थी होणे अगदी हुबेहुब!!!!!
    मोठ्याला वेळोवेळी वेगवेगळ्या गाड्यांचे ड्रायवर व्हायचे असते, पण खरं सांगते तुला त्याच्या घंटागाडी, ट्रक, रिक्षा, टॅक्सी वगैरे या स्वप्नांना लोक खरचं ’तासतात’ गं... उगाच बिचाऱ्याला त्यापेक्षा तू पायलट हो वगैरे जरा चांगले धेय सुचवले जातात.....

    ReplyDelete
  9. सई, नेहमीप्रमाणेच सहज-सुंदर लिखाण झाले आहे. आवडले.

    ReplyDelete
  10. सई, लेख वाचताना माझं बालपण डोळ्यांसमोर आलं.... जवळपास असंच.... खूप, खूप बेत होते लवकर लवकर मोठ्ठे व्हायचे.... आणि दर खेपेस 'मी कोण होणार' हे मात्र बदलत रहायचं...
    तू खूप छान लिहिलं आहेस....आवडलं! :-)

    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  11. WoW!!
    Khoop innocent ahe!!
    avadla!!

    ReplyDelete
  12. च्यैला, मला आठवतंच नाहीये मला मोठेपणी काय व्हायचं होतं ते --- आणि म्हणूनच मलापण भारी वाटतंय!

    ReplyDelete
  13. सई
    किती नोस्टेल्जिक करतेस मला! सगळी फिल्म परत रिवाईंड झाल्यासारख वाटतय!परत एकदा उद्योग बंगल्यात गेल्यासारख वाटल.
    "किंवा, खूप निवांत वेळ मिळावा आयुष्यात आणि सगळे बांध तोडून लिहायची मुभा मिळावी"
    हे मात्र खरच झाल. तू आता छान लिहू लागलीस. आता मला परत लोक ’सईचे बाबा’ म्हणूनच ओळखतील याचाच मला आनंद होईल.
    तूझ्या राजीवच पत्र व फोटो मी नीट जपून ठेवला आहे. स्कँन करून पाठवतो.

    ReplyDelete
  14. @ baba
    Kay he baba..tuzya commentchi me kittttti wat baghat hote!! 14vi comment ahe tuzi. He phar zala han!! :)
    Yes. I have recieved a few requests to read that letter and see the picture. :) So I would be happy to get that off you. :)
    Happy Weekend!!

    ReplyDelete
  15. saee I wonder you do not wish to be an innovative chemical engineer ---?In this list give at least a small place for this wish --
    just a joke --wonderful blog
    You also wanted to become a sadhi baaee
    AAee

    ReplyDelete
  16. Hahaha aai,
    "sadhee baee" should top the list actually. :-)
    But I can be a sadhee baee anyway. :D Just like you can. :D
    Science is boring. I think I am over it. Just ironic I realize this at the end of my PhD. :)
    But I can still be a scientist on the side perhaps..

    ReplyDelete
  17. I admire your posts but somehow I miss them to read regularly. So, instead of saying anything more, I would say, "asech lihit rahaa"
    Mangesh Nabar

    ReplyDelete
  18. saeee, tu ashky aahes! :D :D Zakkaas lihilys te hotelch lakshaat thev mi aajnm nokree karnaar nahiye! :) pune aani kolhapur madhyech shakhaa kadhuyaat mubait nako ajyaabat!

    mala pan havy aata te patr vachayla plzzz

    ReplyDelete
  19. What a delightful blog.
    Loved it. I felt like being a part of it all. Your Sunita Tai reminded me of my Bharati Mavshi(to Bha ma for short and then on to just Bharti). I now plan to visit my aatya's house near Devgarh when I visit India this summer.
    I revisiting my formative years through your blog. Kudos Saee!
    Hate to type it all in english. For some reason that marathi tool wont cooperate right now.

    ReplyDelete
  20. @Randomthoughts..
    Thanks for the praise. :)
    I am really glad that my characters echo with many others. Just makes them more powerful. :)
    Ofcourse this is just a documentation. The credit for this blog solely goes to the people that are in it. :)

    ReplyDelete