Wednesday, April 14, 2010

शेवईचा दिवस

"शेवई" बिचारी आजकालच्या आधुनिक स्वयंपाकघरात माझ्या आईच्या आज्जेसासूच्या नथीसारखी झाली आहे. येतही असेल कदाचित अधूनमधून; पण ती सुद्धा चापाच्या नथीसारखी, ग्राहक पेठेतून! मला मात्र आईनी आजारपणात बनवलेली साजूक तुपातली खीर अजूनही लक्षात आहे. शेवईची खीरच बरी वाटते. तसे शेवईच्या पुनर्वसनाचे खूप प्रयत्न मराठी गृहिणींनी केले आहेत - जसा "शेवईचा उपमा". पुस्तक लिहिणा-या काकू नेहमी शेवईचा उपमा जास्त कल्पकतेनी लिहितात.
"हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे घालावेत (ऐपत असेल तर काजूही घालावेत). एका काचेच्या बशीत उपमा वाढावा. त्यावर लिंबू पिळून, खोबरं-कोथिंबीर भुरभुरावी. गरम गरम उपमा खायला द्यावा".
यातला शेवटचा भाग मला जाम खटकतो. खायला का म्हणून द्यावा! कुणाला द्यावा? तिथे काकूंनी थोडी कल्पकता वापरली असती तर चाललं असतं. एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.
माझ्या मते प्रत्येक पदार्थ कसा खावा हे सुद्धा लिहायला हवं.
जशी कांदा भजी नेहमी पाऊस बघत खावी, किंवा साबुदाण्याची खिचडी वरून साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी. पुरणाच्या पोळीत किती तूप घातलंय हे बघू नये. जर तळलेला पदार्थ खायची हिम्मत होत नसेल तर तो करूच नये. उगीच त्याला भाजून त्याचा दारुण पराभव करू नये.
पुढे नव्वदाव्या दशकातल्या नवोदित विवाहितांनी शेवईचं लग्न उत्तर भारतीय पदार्थांशी लावलं. शेवई-पनीर अपेटायझर वगैरे. मग शेवईनी सीमोल्लंघन केलं. आणि सीमेपलीकडच्या थोड्या आडव्या बांध्याच्या चिनी बहिणीची जागा घेतली. अल्फा गृहिणी ’शेवई मांचुरीयन’ करू लागल्या. पण खिरीपलीकडे मला शेवईचं कुठलही वेषांतर आवडत नाही.
कोल्हापुरात शेवई करायचा दिवस असायचा. "हल्लीच्या धकाधकीच्या जगात" हा प्रकार लोकांना अशक्य वाटेल पण साधारण सोळाच वर्षांपूर्वी हे अगदी मजेत घडायचं. सगळ्या शेजारणी मिळून शेवईचा दिवस ठरवायच्या. त्या दिवशी यच्चयावत कारटी गोळा केली जायची. कुणाचा पुतण्या, कुणाची नात, नातीची मैत्रीण सगळ्या मुलांना मदतीला घेतलं जायचं. आणि अनुभवी अज्ज्या पुढाकार घ्यायच्या. आमची ताजी अर्थातच शेवई-मंडळाच्या कार्यकारी समितीत असायची. कुणाची बेळगावहून आलेली सासू असायची. तिला ताजी लगेच, "वैनी तुमच्याकडं कशी पद्धत असते?" असं विचारून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करायची.
शेवई करायला एक लांब पाट लागतो. त्यावर बारीक रेषा असतात. त्या रेषांच्या मापाची शेवई होते. पाट मोठ्या पत्र्याच्या डब्यावर जमिनीला साधारण पंचेचाळीस अंशांच्या कोनात टेकवला जातो. डब्यावर अनुभवी सासू नाहीतर आज्जी बसून शेवई वळते तर डब्याखाली नवीन सून नाहीतर उपद्रवी कारटी ( दोघी एकाच वर्गात मोडतात) बसून ताटात शेवई गोळा करते. ताटावर शेवईच्या रांगोळ्या भरल्या की ताट उन्हात वळवायला ठेवतात. मग एखादी मोठ्या डोळ्याची मावशी सगळ्या पोरांना त्या शेवईपसून डोळे वटारून लांब ठेवते (तिच्या मते).
यातही, "पोरं खानार ओ. ज्यास्त कराया पायजे. तुमी किती बी भीती घाला त्यास्नी पन खात्यातच किनी बगा." हा अर्थशास्त्राचा नियम गृहीत धरला जायचा.
"तरी बगा, दोन पोरांत मिळून तरी येक ताट हुनार की".
मग आमच्यासाठी आधीच ताटं करून ठेवलियेत हे कळल्यामुळे आम्ही लगेच "साथी हाथ बटाना" सुरू करायचो.
जशी ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खायला मजा यायची, तशी शेवई खायला काही यायची नाही. त्यामुळे दोन पोरांमागे एक ताट हे गणित अचूक होतं. साबुदाण्याच्या पापड्यांना कुठलंही गणित लावता यायचं नाही. त्यांचं कावळ्यांपासून आणि पोरांपासून प्राणपणाने रक्षण करणे हे एकंच उत्तर होतं.
पण का करत असाव्यात शेवया? त्या काही पैसे वाचावेत किंवा घरच्या शेवया श्रेष्ठ म्हणून नाही करायच्या. शेवई करताना किती मैत्रिणी एकत्र यायच्या! त्यात सासवांना "सगळ्याच सुना नाठाळ असतात" हे सत्य उमगायचं तर सुनांना "सगळ्याच सासवा खाष्ट असतात" याचा साक्षात्कार व्हायचा. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी दुसरीच्या कानात हळूच काहीतरी सांगायची. आणि दोघी ओठावर पदर ठेवून खिदळायच्या. असंख्य कानडी आणि मराठी पाककृतींची अदलाबदल व्हायची. आणि आमच्याकडं याला हा शब्द वापरतात या वाक्याखाली कर्नाटकातून उडी मारून बरेच शब्द कोल्हापुरात दाखल व्हायचे. त्यात वर फोडणीसुद्धा असायची. कुठल्यातरी शूर सुनेची यशोगाथा. त्यावर सगळ्या सासवांची मुरडलेली नाकं आणि सुनांचे विजयी चेहरे. मग ताट वाळत ठेवायच्या मिषानी काही सुना बाहेर जायचा आणि "बरं झालं वैनी ईषय काढला तुम्ही. आमच्या मामींना कुनीतरी ऐकवायाच पायजे." अशा सून संघटनांच्या मूक आरोळ्या यायच्या.
आपापल्या नव-यांची सामुदायिक थट्टादेखील व्हायची।
शेवई-दिवसाची संध्याकाळ नेहमी पुन्हा भेटायच्या वचनानी व्हायची. आजकालच्या भिश्या, पार्ट्या तेव्हा नव्हत्या. पण घरातली कंटाळवाणी कामं करायला मैत्रिणी नेहमी एकत्र जमायच्या, आणि ही प्रथा जगभरातल्या सगळ्या महिला पाळत आल्यात. माझी आई कधीच या गटात बसली नसती. पण ती जेव्हा कामवाल्या मावशींना भाजी निवडू लागते तेव्हा मला तिच्यातली ही सुप्त शेवई करणारी मामी दिसते आणि मग ती मला दाखवल्याबद्दल माझी आई मला अजून जास्त आवडते!
----------------

संपादन आणि तपासणीसाठी गायत्रीचे आभार.

Saturday, April 10, 2010

विसरभोळा बाबा

बाबा कधीही एकदाच घराच्या बाहेर पडत नाही. निदान तीन वेळा तरी परत आत येतो. आधी पाकीट विसरतो, मग घराची किल्ली, मग गाडीची किल्ली आणि शेवटी उगीच "काहीतरी विसरलंय" असं वाटलं म्हणून. एवढ्या खेपा घालून तो एकदाचा रवाना झाला की दहा मिनिटात घरात त्याचा फोन खणखणू लागतो. मी शाळेत असताना मला न्यायला रिक्षावाले काका यायचे. शनिवारी बाबाला सुट्टी असायची आणि माझी अर्धा दिवस शाळा असायची. मग बाबा मोठ्या प्रेमानी माझ्याबरोबर माझं दप्तर घेऊन रिक्षावाल्या काकांसाठी थांबायचा. रिक्षा आली की मी मागे बसायचे आणि बाबा माझं दप्तर घेऊन काकांना द्यायला जायचा. खूप वेळा त्यांच्याशी भलत्याच गप्पा मारायचा आणि शेवटी दप्तर द्यायलाच विसरायचा. मग शाळेत गेल्यावर अचानक काकांना माझं दप्तर बाबांनी दिलंच नाही हे लक्षात यायचं. मला त्याची सवय झाली होती. मी क्षणाचाही विलंब न लावता लोकांकडे वहीतल्या पानांची भीक मागू लागायचे. कुणी मला पेन्सिल द्यायचं, कुणी खोड रबर आणि वर्गात दप्तर न घेता आलेल्या शूर मुलीचा दिवस बघण्यात सगळे आनंदानी रमायचे. मग घरी येऊन वहीत त्या पत्रावळ्या उतरवायचे. त्यातही बाबा जमेची बाजू शोधायचा. "बघ! आता तुझी उजळणी पण झाली दप्तर विसरल्यामुळे".
"विसराळूपणाचे फायदे" यावर माझा बाबा प्रबंध लिहू शकेल. पण मला त्याची ही गोष्ट मनापासून आवडते. त्याच्या गाडी पासून घरापर्यंतच्या प्रत्येक खेपेला तो "व्यायाम" झाला असं म्हणतो. आई आणि बाबामध्ये मात्र हा विसराळूपणा राहू सारखा उभा असतो. माझ्या लहानपणी बॅग रिक्षात विसरणे, तिकीट घरी विसरणे, बिल भरायला विसरणे, चेक टाकायला विसरणे वगैरे गोष्टींनी आई बाबांच्या आयुष्याला चांगलीच फोडणी दिली होती. आम्ही गोव्याला गेलो तेव्हा माझे कपडे असलेली
बॅग बाबा रिक्षात विसरला होता. त्यामुळे मला खूप नवीन कपडे मिळाले होते एकदम. अशावेळेस मला बाबाच्या विसराळूपणाचा खूप आधार वाटतो.
मी पण काही कमी विसराळू नाहीये. पण तरी बाबा आणि आईचा मध्य आहे.
एकदा बाबाच्या नातेवाइकांच्यापैकी कुणाचतरी लग्न होतं. बाबांनी "हे लोक माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत" यावर खूप मोठं प्रवचन दिलं होतं आईला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या वेळी आई पैठणी वगैरे नेसून तयार झाली. कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. आईला वाटलं नेहमीप्रमाणे चुकीचं नाव वाचलं असेल बाबांनी. आणि बाबा पत्रिका पण घरी विसरला होता. मग गाडी परत घरी आली तेव्हा लक्षात आलं की लग्न आधीच्या आठवड्यात होतं. मग "महत्वाच्या" लोकांची माफी मागायला बाबाला आईनी फोन करायला लावला.
लहानपणी माझ्या शाळेची फी भरायला काहीतरी "चलन" नावाची भानगड असायची. मला नेहमी बाबा ते भरायला विसरला आणि बाईंनी सगळ्या वर्गासमोर आठवण केली तर काय होईल याची काळजी वाटायची. मग बाबाचा राग पत्करून, "बाबा तू माझं चलन भरलास का?" असं विचारावं लागायचं.
बाबाला गाण्याची फार आवड आहे. रविवारी सकाळी बाथरूममध्ये तो तासभर गातो. आणि कधीही कुणीही "गा" असं म्हणालं की लगेच बाबा तयार असतो. पण त्याला गाण्याच्या ओळी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे मधेच तो अचानक गुणगुणू लागतो. मी आणि आई अशावेळेस गालातल्या गालात हसायचो. त्यामुळे बाबाला प्रचंड राग यायचा. मग त्यांनी वही घातली. त्यात तो सगळी गाणी लिहून ठेवायचा!
बाबाला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. त्यामुळे त्याची थट्टा करताना आम्ही नेहमी "तो डॉक्टर झाला असता तर" अशी गोष्ट तयार करतो.
पेशंटचा पोट शिवून झाल्यावर अचानक बाबाच्या लक्षात येणार की एक सुरी कमी आहे. मग तो सगळ्या मदतनिसांना जमिनीवर रांगायला लावणार. सुरी सापडत नाही म्हटल्यावर सर्वानुमते पेशंट परत उघडायचा असं ठरणार. मग पेशंट उघडल्यावर तिथे काहीच दिसणार नाही. मग पुन्हा त्याला शिवून चिंतीत बाबा सहज खिशात हात घालणार आणि तिथून त्याची हरवलेली सुरी बाहेर येणार. अशा रितीने प्रत्येक पेशंटला दोन दोन वेळा शिवल्यामुळे बाबाची खूप छान उजळणी होणार आणि त्याला सर्वोत्कृष्ठ शिवणकामाचे बक्षीस मिळणार!
पण त्याच्या
विसराळूपणाचे खरंच फायदे आहेत. जसा तो वस्तू विसरतो, तसा रागही विसरतो. आणि त्याला भूतकाळातल्या सगळ्या सुंदर गोष्टीच आठवतात. त्या मात्र तो कधीच विसरत नाही. माझं लहानपण, आम्ही मिळून केलेली धम्माल, कॉलेजमधली छोटीशी, सारखी हसणारी आई आणि मी माझ्या घोग-या आवाजात गायलेली बंगाली गाणी. त्याला नेहमीच छान छान गोष्टी आठवतात. आणि तो विसरल्यामुळे आम्हीसुद्धा नको असलेल्या आठवणी विसरून जातो.

Monday, April 5, 2010

संध्याकाळचा समुद्र

आमच्या कोल्हापूरच्या घरात खाली सुहासमामा राहायचा खूप वर्षं. "सुहास फाटक" आमच्या बाकीच्या "झांजीबारापेक्षा" खूप वेगळा होता. :)
आधी तो आणि त्याची आई (म्हणजे फाटक आजी) राहायचे. मग सुहासमामाचं लग्न झालं आणि वर्षामामी आली. मग थोडेच वर्षांत मानसी आणि अवधूत पण आले. सुहासमामाचं देवगडजवळ घर आहे. तिथे त्याची हापूस आंब्याची बाग आहे. त्याला कोकणात सगळे "वाडी" म्हणतात. आम्हांला उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी देवगड हापूस मिळायचा. त्यामुळे सुट्टीची मजा खूप वाढायची. पण एकदा मात्र हापूस आंब्याला आमच्याकडे बोलावण्यापेक्षा आम्ही हापूस आंब्याकडे जावं असं ठरलं! मग नरूमामानी गाडी केली आणि आम्ही सगळे कोकण दौ-यावर निघालो. लहानपणी अशी "गाडी करून" जायची काही वेगळीच मजा असायची. आम्ही सगळी भावंडं जीपच्या मागच्या जागेत बसायचो आणि जाता-जाता ट्रकवाल्यांना वेडावून दाखवायचो. कोल्हापुरातून कोकणात जाताना आंबा घाट ओलांडावा लागतो. त्या घाटात अचानक सृष्टी तिचं रूप बदलते. पायाखालची जमीन लाल होते आणि करवंदाच्या जाळ्या खुणावू लागतात. त्या जाळ्यांमधून मधेच एखादी गोड अनवाणी मुलगी टोपली घेऊन बाहेर येते. तिच्या टोपलीत काळी कुळकुळीत करवंदं असतात. आम्ही नेहमी करवंदं खायचो. त्यात आत लाल असेल तो कोंबडा आणि पांढरं असेल तर कोंबडी! नरूमामाला फोटो काढायची फार हौस आहे. त्यामुळे तो घाटात नेहमी "मोक्याच्या" ठिकाणी गाडी थांबवायचा. त्याचा एकूण आविर्भाव पट्टीच्या फोटोग्राफरसारखा असतो नेहमी. त्यामुळे सगळ्यांना उगीच आपण याच्यासमोर अगदीच "ह्या" आहोत असं वाटायला लागतं. त्याच्या फोटोत नेहमी वेगळ्या वेगळ्या वेशातला सूर्य असतो , कधी संध्याकाळचा थकलेला तर कधी सकाळचा, उकडलेल्या अंड्यासारखा!! आम्ही धबधब्यात आकंठ बुडायचो पण नरूमामा मात्र सगळा वेळ कधी झाडावरून, कधी झाडाखालून, सूर्य उजवीकडे ठेवून, मग डावीकडे ठेवून त्याचे फोटो काढायचा.
घाट संपल्या संपल्या एकदम हवेचं वजन वाढलंय असं वाटायला लागतं आणि कोकणाचा श्वास जाणवू लागतो. देवगडचं घर खूप सुंदर आहे. छोट्याश्या दारातून आत गेलं की मोठ्ठं अंगण आहे. त्या अंगणाच्या मध्यभागी दगडी पडवी आहे. आत गेल्या गेल्या झोपाळा आहे. तिथून आत गेलं की जेवायची खोली आणि अगदी शेवटी स्वयंपाकघर. झोपाळ्याच्या खोलीतून वर जायला जिना आहे. तिथे अजून खोल्या आहेत, आणि सगळ्या खोल्या सारवलेल्या आहेत. मला सारवलेली घरं फार आवडतात. त्यातल्या माणसांबरोबर घरही श्वास घेत आहे असं नेहमी वाटतं मला. सारवलेल्या जमिनीचा पायाला होणारा स्पर्श, हिरवळीचा स्पर्श आणि समुद्र किना-याचा स्पर्श हे मला एकाच वर्णन न करता येणा-या कुळातले वाटतात. कोकणातल्या उन्हाळ्यामुळे आधी हैराण व्हायला होतं. पण कोकणातला उन्हाळा कुठलीच पळवाट ठेवत नाही. त्यामुळे एकदा त्याला सामोरं गेलं आणि "हे आहे असं आहे" हे कबूल केलं की कोकणाची खरी मजा घेता येते. घराभोवती ना वारा ना पावसाची चाहूल. सगळं एखाद्या सुंदर चित्रासारखं स्तब्ध आणि शांत! याची लवकरच सवय झाली आम्हाला. आणि मग त्या निरव शांततेत आम्ही आमचा दंगा मिसळू लागलो. सकाळी सकाळी आम्हाला सुहासमामानी वाडीवर नेलं. वाडीवरच्या त्या नागमोडी वाटा चालताना तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की या वाटा आपल्याला इतक्या दूरवर घेऊन जातील. मधेच नारळी-पोफळीच्या झाडांमध्ये लपलेला एखादा साधा पूल यायचा. आणि त्या हिरवळीच्या शालीत उष्म्याचा थोडा विसर पडायचा. पण कोकणातला उकाडा मिठी मारणारा आहे. देशावरच्या उकाड्याची औपचारिकता तिथे दिसत नाही. त्यामुळे कसाही असला तरी उकाडादेखील आपलासा वाटायला लागतो.

आम्ही घामाघूम होऊन परत येऊ तोवर घरी गरम गरम पोहे तयार असायचे. मग सगळे मिळून गप्पा मारत मारत बाहेरच नाश्ता करायचो. मला फाटक आजींचा स्वयंपाक फार आवडायचा. कोल्हापूरच्या लसणीच्या फोडणीच्या आमटीला शह द्यायला त्यांची चिंच-गूळ घातलेली आमटी नेहमी तयार असायची. खूप वर्षं दोन्ही प्रकार खाल्ल्यावर माझं चिंच-गुळाच्या आमटीवर कायमचं आणि मनापासून प्रेम बसलं. आणि त्यांची बोलायची पद्धत पण मला फार आवडायची. त्यांच्या बोलण्याला चाल असायची. आणि शेवटचा शब्द नेहमी वाक्याची शेपूट एखाद्या गुबगुबीत उशीवर सोडून जायचा.
"मी म्हटलन् तिला असं करू नकोस बाई. पण ऐकताच नाही हो तर काऽऽय करणार?"
त्यांचे हेल इतके गोड असायचे की मी आणि स्नेहा त्यांची तासंतास नक्कल करायचो!
आणि फाटक आजी कुसुमअज्जी आणि मीनामामी दोघींच्याही खास होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंची मतं त्या नि:पक्षपातीपणे ऐकायच्या.
कोकणातल्या घराभोवती आम्हाला आमच्या आयुष्यातला पहिला विंचू दिसला होता! दगडाखाली दडलेला, लालचुटूक आणि तिरका तिरका चालणारा!
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळा दिवस झाडावर चढण्यात, झोपाळा बांधण्यात आणि लपाछपी खेळण्यात घालवायचो. संध्याकाळी समुद्र किना-यावर जायचो.
संध्याकाळचा समुद्र हीसुद्धा माझ्या मनातलीच एक जागा असावी. तसे समुद्र सगळीकडे सारखेच असावेत पण प्रत्येक समुद्र तरीही वेगळा वाटतो. आणि प्रत्येक समुद्राचं त्याच्या किना-याशी नातंही वेगळं असतं. कोकणातल्या त्या विरळ किना-यावर आम्ही सगळ्यांनी मिळून वाळूचा किल्ला बांधला. पण जशी संध्याकाळ स्थिरावू लागली तसा समुद्र जिवंत होऊ लागला. ते दृश्य हवसंही वाटतं आणि नकोसंही. कधी कधी संध्याकाळच्या समुद्रासमोर उगीचच आपण कुणीच नाहीयोत असं वाटतं. कधी त्या "कुणीनाहीपणाची" भीती वाटते तर कधी त्याचाच खूप आधार वाटतो. कदाचित तेव्हा मला असं बोट ठेवता येत नसावं. त्यामुळे मी अचानक बोलेनाशी व्हायचे. मग मला अज्जीची नाहीतर आईची आठवण येते आहे असं म्हणून लोक माझी समजूत काढायचे. :) पण लहानपणापासूनच एखादी जागा, एखादी संध्याकाळ, एखादा आठवणीतला सुगंध, एखादं गाणं आपल्याला अचानक इतक्या दूर कसं काय घेऊन जाऊ शकतं, याचं मला खूप अप्रूप वाटायचं.
मग रात्री आम्ही सगळे अंगणात मोठ्या सतरंजीवर झोपायचो. निरभ्र आकाशातल्या चांदण्या बघत. कोकणातल्या भुतांच्या गोष्टी फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आमच्यातली एखादी ताई कुठलीतरी बाई विहिरीपाशी तिचं डोकं बाजूला काढून ठेऊन स्वत:च्याच वेण्या घालत होती वगैरे गोष्टी सांगायची. पण दिवसभराच्या दंग्यामुळे घाबरायचाही उत्साह नसायचा. मग आकाशातल्या प्रत्येक नवीन चांदणीबरोबर आमच्यातलं एक-एक भूत झोपून जायचं! पण बाहेर झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग यायची आणि रात्री एका कोप-यात बघितलेल्या चांदण्या पहाटे चालून पुढे गेलेल्या असायच्या.चंद्रसुद्धा त्याची रात्रपाळी संपवून घरी चाललेला दिसायचा. पण संध्याकाळच्या समुद्राला सामोरं जाण्यापेक्षा रात्रीच्या आकाशाखाली झोपणं जास्त आवडायचं मला. :)