आमच्या कोल्हापूरच्या घरात खाली सुहासमामा राहायचा खूप वर्षं. "सुहास फाटक" आमच्या बाकीच्या "झांजीबारापेक्षा" खूप वेगळा होता. :)
आधी तो आणि त्याची आई (म्हणजे फाटक आजी) राहायचे. मग सुहासमामाचं लग्न झालं आणि वर्षामामी आली. मग थोडेच वर्षांत मानसी आणि अवधूत पण आले. सुहासमामाचं देवगडजवळ घर आहे. तिथे त्याची हापूस आंब्याची बाग आहे. त्याला कोकणात सगळे "वाडी" म्हणतात. आम्हांला उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी देवगड हापूस मिळायचा. त्यामुळे सुट्टीची मजा खूप वाढायची. पण एकदा मात्र हापूस आंब्याला आमच्याकडे बोलावण्यापेक्षा आम्ही हापूस आंब्याकडे जावं असं ठरलं! मग नरूमामानी गाडी केली आणि आम्ही सगळे कोकण दौ-यावर निघालो. लहानपणी अशी "गाडी करून" जायची काही वेगळीच मजा असायची. आम्ही सगळी भावंडं जीपच्या मागच्या जागेत बसायचो आणि जाता-जाता ट्रकवाल्यांना वेडावून दाखवायचो. कोल्हापुरातून कोकणात जाताना आंबा घाट ओलांडावा लागतो. त्या घाटात अचानक सृष्टी तिचं रूप बदलते. पायाखालची जमीन लाल होते आणि करवंदाच्या जाळ्या खुणावू लागतात. त्या जाळ्यांमधून मधेच एखादी गोड अनवाणी मुलगी टोपली घेऊन बाहेर येते. तिच्या टोपलीत काळी कुळकुळीत करवंदं असतात. आम्ही नेहमी करवंदं खायचो. त्यात आत लाल असेल तो कोंबडा आणि पांढरं असेल तर कोंबडी! नरूमामाला फोटो काढायची फार हौस आहे. त्यामुळे तो घाटात नेहमी "मोक्याच्या" ठिकाणी गाडी थांबवायचा. त्याचा एकूण आविर्भाव पट्टीच्या फोटोग्राफरसारखा असतो नेहमी. त्यामुळे सगळ्यांना उगीच आपण याच्यासमोर अगदीच "ह्या" आहोत असं वाटायला लागतं. त्याच्या फोटोत नेहमी वेगळ्या वेगळ्या वेशातला सूर्य असतो , कधी संध्याकाळचा थकलेला तर कधी सकाळचा, उकडलेल्या अंड्यासारखा!! आम्ही धबधब्यात आकंठ बुडायचो पण नरूमामा मात्र सगळा वेळ कधी झाडावरून, कधी झाडाखालून, सूर्य उजवीकडे ठेवून, मग डावीकडे ठेवून त्याचे फोटो काढायचा.
घाट संपल्या संपल्या एकदम हवेचं वजन वाढलंय असं वाटायला लागतं आणि कोकणाचा श्वास जाणवू लागतो. देवगडचं घर खूप सुंदर आहे. छोट्याश्या दारातून आत गेलं की मोठ्ठं अंगण आहे. त्या अंगणाच्या मध्यभागी दगडी पडवी आहे. आत गेल्या गेल्या झोपाळा आहे. तिथून आत गेलं की जेवायची खोली आणि अगदी शेवटी स्वयंपाकघर. झोपाळ्याच्या खोलीतून वर जायला जिना आहे. तिथे अजून खोल्या आहेत, आणि सगळ्या खोल्या सारवलेल्या आहेत. मला सारवलेली घरं फार आवडतात. त्यातल्या माणसांबरोबर घरही श्वास घेत आहे असं नेहमी वाटतं मला. सारवलेल्या जमिनीचा पायाला होणारा स्पर्श, हिरवळीचा स्पर्श आणि समुद्र किना-याचा स्पर्श हे मला एकाच वर्णन न करता येणा-या कुळातले वाटतात. कोकणातल्या उन्हाळ्यामुळे आधी हैराण व्हायला होतं. पण कोकणातला उन्हाळा कुठलीच पळवाट ठेवत नाही. त्यामुळे एकदा त्याला सामोरं गेलं आणि "हे आहे असं आहे" हे कबूल केलं की कोकणाची खरी मजा घेता येते. घराभोवती ना वारा ना पावसाची चाहूल. सगळं एखाद्या सुंदर चित्रासारखं स्तब्ध आणि शांत! याची लवकरच सवय झाली आम्हाला. आणि मग त्या निरव शांततेत आम्ही आमचा दंगा मिसळू लागलो. सकाळी सकाळी आम्हाला सुहासमामानी वाडीवर नेलं. वाडीवरच्या त्या नागमोडी वाटा चालताना तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की या वाटा आपल्याला इतक्या दूरवर घेऊन जातील. मधेच नारळी-पोफळीच्या झाडांमध्ये लपलेला एखादा साधा पूल यायचा. आणि त्या हिरवळीच्या शालीत उष्म्याचा थोडा विसर पडायचा. पण कोकणातला उकाडा मिठी मारणारा आहे. देशावरच्या उकाड्याची औपचारिकता तिथे दिसत नाही. त्यामुळे कसाही असला तरी उकाडादेखील आपलासा वाटायला लागतो.
आम्ही घामाघूम होऊन परत येऊ तोवर घरी गरम गरम पोहे तयार असायचे. मग सगळे मिळून गप्पा मारत मारत बाहेरच नाश्ता करायचो. मला फाटक आजींचा स्वयंपाक फार आवडायचा. कोल्हापूरच्या लसणीच्या फोडणीच्या आमटीला शह द्यायला त्यांची चिंच-गूळ घातलेली आमटी नेहमी तयार असायची. खूप वर्षं दोन्ही प्रकार खाल्ल्यावर माझं चिंच-गुळाच्या आमटीवर कायमचं आणि मनापासून प्रेम बसलं. आणि त्यांची बोलायची पद्धत पण मला फार आवडायची. त्यांच्या बोलण्याला चाल असायची. आणि शेवटचा शब्द नेहमी वाक्याची शेपूट एखाद्या गुबगुबीत उशीवर सोडून जायचा.
"मी म्हटलन् तिला असं करू नकोस बाई. पण ऐकताच नाही हो तर काऽऽय करणार?"
त्यांचे हेल इतके गोड असायचे की मी आणि स्नेहा त्यांची तासंतास नक्कल करायचो!
आणि फाटक आजी कुसुमअज्जी आणि मीनामामी दोघींच्याही खास होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंची मतं त्या नि:पक्षपातीपणे ऐकायच्या.
कोकणातल्या घराभोवती आम्हाला आमच्या आयुष्यातला पहिला विंचू दिसला होता! दगडाखाली दडलेला, लालचुटूक आणि तिरका तिरका चालणारा!
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळा दिवस झाडावर चढण्यात, झोपाळा बांधण्यात आणि लपाछपी खेळण्यात घालवायचो. संध्याकाळी समुद्र किना-यावर जायचो.
संध्याकाळचा समुद्र हीसुद्धा माझ्या मनातलीच एक जागा असावी. तसे समुद्र सगळीकडे सारखेच असावेत पण प्रत्येक समुद्र तरीही वेगळा वाटतो. आणि प्रत्येक समुद्राचं त्याच्या किना-याशी नातंही वेगळं असतं. कोकणातल्या त्या विरळ किना-यावर आम्ही सगळ्यांनी मिळून वाळूचा किल्ला बांधला. पण जशी संध्याकाळ स्थिरावू लागली तसा समुद्र जिवंत होऊ लागला. ते दृश्य हवसंही वाटतं आणि नकोसंही. कधी कधी संध्याकाळच्या समुद्रासमोर उगीचच आपण कुणीच नाहीयोत असं वाटतं. कधी त्या "कुणीनाहीपणाची" भीती वाटते तर कधी त्याचाच खूप आधार वाटतो. कदाचित तेव्हा मला असं बोट ठेवता येत नसावं. त्यामुळे मी अचानक बोलेनाशी व्हायचे. मग मला अज्जीची नाहीतर आईची आठवण येते आहे असं म्हणून लोक माझी समजूत काढायचे. :) पण लहानपणापासूनच एखादी जागा, एखादी संध्याकाळ, एखादा आठवणीतला सुगंध, एखादं गाणं आपल्याला अचानक इतक्या दूर कसं काय घेऊन जाऊ शकतं, याचं मला खूप अप्रूप वाटायचं.
मग रात्री आम्ही सगळे अंगणात मोठ्या सतरंजीवर झोपायचो. निरभ्र आकाशातल्या चांदण्या बघत. कोकणातल्या भुतांच्या गोष्टी फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आमच्यातली एखादी ताई कुठलीतरी बाई विहिरीपाशी तिचं डोकं बाजूला काढून ठेऊन स्वत:च्याच वेण्या घालत होती वगैरे गोष्टी सांगायची. पण दिवसभराच्या दंग्यामुळे घाबरायचाही उत्साह नसायचा. मग आकाशातल्या प्रत्येक नवीन चांदणीबरोबर आमच्यातलं एक-एक भूत झोपून जायचं! पण बाहेर झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग यायची आणि रात्री एका कोप-यात बघितलेल्या चांदण्या पहाटे चालून पुढे गेलेल्या असायच्या.चंद्रसुद्धा त्याची रात्रपाळी संपवून घरी चाललेला दिसायचा. पण संध्याकाळच्या समुद्राला सामोरं जाण्यापेक्षा रात्रीच्या आकाशाखाली झोपणं जास्त आवडायचं मला. :)
सुंदर!
ReplyDeleteसई, माझ्या लहानपणच्या (वय वर्षे २ ते १६) सर्व उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या. त्या सर्व तू वर्णन केलेल्या आंबा या गावातल्याच आहेत. घाटावर आहे म्हणून आंब्याची हवा वेगळी पण बाकी सर्व कोकणच आहे. पूर्वीचे आठवून खूप खूप मजा वाटली.
ReplyDelete:)
ReplyDeleteखूप सुंदर! :)
ReplyDeleteमिठी मारणारा उकाडा.. श्वास घेणारं घर.. समुद्र पाहून हरवून जाणं - मनातलं लिहिलंयंस.
ReplyDeleteसुरेख! :)
सई कोकणातल सगळ्च सुंदर वाटत.माझ्या कामा निमित्ताने मी सगळा सिंधूदुर्ग पिंजून काढला आहे. सुहासच्य़ा गावाला पण अनेक वेळा गेलो आहे आणि हे सगळ फिरण जास्त उन्हाळ्यातच झाल आहे.
ReplyDeleteत्या उकाड्यात दुपारी नारळी पोफळीच्या बागेत मात्र छान वाटत. तु लिहील्या प्रमाण प्रत्येक ठिकाणचा सूर्य मात्र वेगळा वाटतो.
तू आता परत आलीस की आपण कोकणची ट्रीप करूया
@Gouri,Sushant,Aniket
ReplyDeleteThanks. :)
@Mandar, Thanks for your comment and the feedback on gmail too. Cheers!
@baba
Yes. Nakki jaycha koknat. :D
@ Shrirang..
ReplyDeleteNext time I am back home, I think we should all meet up. So that we can go to Konkan via Amba and Kolhapur. That would pretty much sum up everyone's ajols. :)
sweet memories
ReplyDeleteyou really took me to Phatak family .They are all very nice people.I rememberd lines of a song
Kokanchi manasa sadhi bholi
kaljat tyanchya bharli shahali
Aaee
Hi aai,
ReplyDelete=) Thanks for the comment!!
ए सई... मी गुगल वर 'कोकणची माणसं साधी भोळी... काळजात त्यांच्या भरली शहाळी...' या गाण्याचे शब्द शोधात असताना तुझ्या ब्लॉगवर आलो आणि थांबलो... अडकलो.... कामाचे दोन-चार फोन मध्ये मध्ये माझी लिंक तोडू पाहत होते पण तरी मी पूर्ण वाचल्या शिवाय सुटलो नाही... :-)
ReplyDeleteमी कोकणचा नाही आणि माझं लहानपण पण तिथे गेलेलं नाही... पण अलीकडे आठ-दहा वर्षात काही वेळा गेलो आहे कोकणात आणि आवडू लागला आहे कोकण खूप....
शेणाने सारवलेल्या घरात आमच्या सुट्ट्या गेलेल्या आहेत... सो ती लिंक होती जरा जरा..
तुझ्या शब्दात स्वतःच्या च भावना सापडल्या...
"पण लहानपणापासूनच एखादी जागा, एखादी संध्याकाळ, एखादा आठवणीतला सुगंध, एखादं गाणं आपल्याला अचानक इतक्या दूर कसं काय घेऊन जाऊ शकतं, याचं मला खूप अप्रूप वाटायचं. " हे तुझं म्हणणं खूप आवडलं...
नेहमी लिहितेस का? नसशील तर लिहित जा...
सही लिहितेस... :-)
शुभेछा...
..अभिजित गांधी..
abhigandhi@gmail.com