Wednesday, April 14, 2010

शेवईचा दिवस

"शेवई" बिचारी आजकालच्या आधुनिक स्वयंपाकघरात माझ्या आईच्या आज्जेसासूच्या नथीसारखी झाली आहे. येतही असेल कदाचित अधूनमधून; पण ती सुद्धा चापाच्या नथीसारखी, ग्राहक पेठेतून! मला मात्र आईनी आजारपणात बनवलेली साजूक तुपातली खीर अजूनही लक्षात आहे. शेवईची खीरच बरी वाटते. तसे शेवईच्या पुनर्वसनाचे खूप प्रयत्न मराठी गृहिणींनी केले आहेत - जसा "शेवईचा उपमा". पुस्तक लिहिणा-या काकू नेहमी शेवईचा उपमा जास्त कल्पकतेनी लिहितात.
"हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे घालावेत (ऐपत असेल तर काजूही घालावेत). एका काचेच्या बशीत उपमा वाढावा. त्यावर लिंबू पिळून, खोबरं-कोथिंबीर भुरभुरावी. गरम गरम उपमा खायला द्यावा".
यातला शेवटचा भाग मला जाम खटकतो. खायला का म्हणून द्यावा! कुणाला द्यावा? तिथे काकूंनी थोडी कल्पकता वापरली असती तर चाललं असतं. एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.
माझ्या मते प्रत्येक पदार्थ कसा खावा हे सुद्धा लिहायला हवं.
जशी कांदा भजी नेहमी पाऊस बघत खावी, किंवा साबुदाण्याची खिचडी वरून साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी. पुरणाच्या पोळीत किती तूप घातलंय हे बघू नये. जर तळलेला पदार्थ खायची हिम्मत होत नसेल तर तो करूच नये. उगीच त्याला भाजून त्याचा दारुण पराभव करू नये.
पुढे नव्वदाव्या दशकातल्या नवोदित विवाहितांनी शेवईचं लग्न उत्तर भारतीय पदार्थांशी लावलं. शेवई-पनीर अपेटायझर वगैरे. मग शेवईनी सीमोल्लंघन केलं. आणि सीमेपलीकडच्या थोड्या आडव्या बांध्याच्या चिनी बहिणीची जागा घेतली. अल्फा गृहिणी ’शेवई मांचुरीयन’ करू लागल्या. पण खिरीपलीकडे मला शेवईचं कुठलही वेषांतर आवडत नाही.
कोल्हापुरात शेवई करायचा दिवस असायचा. "हल्लीच्या धकाधकीच्या जगात" हा प्रकार लोकांना अशक्य वाटेल पण साधारण सोळाच वर्षांपूर्वी हे अगदी मजेत घडायचं. सगळ्या शेजारणी मिळून शेवईचा दिवस ठरवायच्या. त्या दिवशी यच्चयावत कारटी गोळा केली जायची. कुणाचा पुतण्या, कुणाची नात, नातीची मैत्रीण सगळ्या मुलांना मदतीला घेतलं जायचं. आणि अनुभवी अज्ज्या पुढाकार घ्यायच्या. आमची ताजी अर्थातच शेवई-मंडळाच्या कार्यकारी समितीत असायची. कुणाची बेळगावहून आलेली सासू असायची. तिला ताजी लगेच, "वैनी तुमच्याकडं कशी पद्धत असते?" असं विचारून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करायची.
शेवई करायला एक लांब पाट लागतो. त्यावर बारीक रेषा असतात. त्या रेषांच्या मापाची शेवई होते. पाट मोठ्या पत्र्याच्या डब्यावर जमिनीला साधारण पंचेचाळीस अंशांच्या कोनात टेकवला जातो. डब्यावर अनुभवी सासू नाहीतर आज्जी बसून शेवई वळते तर डब्याखाली नवीन सून नाहीतर उपद्रवी कारटी ( दोघी एकाच वर्गात मोडतात) बसून ताटात शेवई गोळा करते. ताटावर शेवईच्या रांगोळ्या भरल्या की ताट उन्हात वळवायला ठेवतात. मग एखादी मोठ्या डोळ्याची मावशी सगळ्या पोरांना त्या शेवईपसून डोळे वटारून लांब ठेवते (तिच्या मते).
यातही, "पोरं खानार ओ. ज्यास्त कराया पायजे. तुमी किती बी भीती घाला त्यास्नी पन खात्यातच किनी बगा." हा अर्थशास्त्राचा नियम गृहीत धरला जायचा.
"तरी बगा, दोन पोरांत मिळून तरी येक ताट हुनार की".
मग आमच्यासाठी आधीच ताटं करून ठेवलियेत हे कळल्यामुळे आम्ही लगेच "साथी हाथ बटाना" सुरू करायचो.
जशी ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खायला मजा यायची, तशी शेवई खायला काही यायची नाही. त्यामुळे दोन पोरांमागे एक ताट हे गणित अचूक होतं. साबुदाण्याच्या पापड्यांना कुठलंही गणित लावता यायचं नाही. त्यांचं कावळ्यांपासून आणि पोरांपासून प्राणपणाने रक्षण करणे हे एकंच उत्तर होतं.
पण का करत असाव्यात शेवया? त्या काही पैसे वाचावेत किंवा घरच्या शेवया श्रेष्ठ म्हणून नाही करायच्या. शेवई करताना किती मैत्रिणी एकत्र यायच्या! त्यात सासवांना "सगळ्याच सुना नाठाळ असतात" हे सत्य उमगायचं तर सुनांना "सगळ्याच सासवा खाष्ट असतात" याचा साक्षात्कार व्हायचा. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी दुसरीच्या कानात हळूच काहीतरी सांगायची. आणि दोघी ओठावर पदर ठेवून खिदळायच्या. असंख्य कानडी आणि मराठी पाककृतींची अदलाबदल व्हायची. आणि आमच्याकडं याला हा शब्द वापरतात या वाक्याखाली कर्नाटकातून उडी मारून बरेच शब्द कोल्हापुरात दाखल व्हायचे. त्यात वर फोडणीसुद्धा असायची. कुठल्यातरी शूर सुनेची यशोगाथा. त्यावर सगळ्या सासवांची मुरडलेली नाकं आणि सुनांचे विजयी चेहरे. मग ताट वाळत ठेवायच्या मिषानी काही सुना बाहेर जायचा आणि "बरं झालं वैनी ईषय काढला तुम्ही. आमच्या मामींना कुनीतरी ऐकवायाच पायजे." अशा सून संघटनांच्या मूक आरोळ्या यायच्या.
आपापल्या नव-यांची सामुदायिक थट्टादेखील व्हायची।
शेवई-दिवसाची संध्याकाळ नेहमी पुन्हा भेटायच्या वचनानी व्हायची. आजकालच्या भिश्या, पार्ट्या तेव्हा नव्हत्या. पण घरातली कंटाळवाणी कामं करायला मैत्रिणी नेहमी एकत्र जमायच्या, आणि ही प्रथा जगभरातल्या सगळ्या महिला पाळत आल्यात. माझी आई कधीच या गटात बसली नसती. पण ती जेव्हा कामवाल्या मावशींना भाजी निवडू लागते तेव्हा मला तिच्यातली ही सुप्त शेवई करणारी मामी दिसते आणि मग ती मला दाखवल्याबद्दल माझी आई मला अजून जास्त आवडते!
----------------

संपादन आणि तपासणीसाठी गायत्रीचे आभार.

10 comments:

 1. australia madhe prayog kelela distoy shewaya karaycha!! :)

  ReplyDelete
 2. nahi ray baba..tevdha wel naiye. Mhanun 5-10 minta athvanit ramaycha. Memory and imagination are the best excuse for laziness. :P

  ReplyDelete
 3. मस्त. शेवया करतानाच्या गप्पा खरंच ऐकण्यासारख्या असतात. लहानपणी मी भाग घेतला होता एकदा या शेवई कार्यक्रमात. सगळ्यांच्या मस्त शेवया करून झाल्या तरी माझी आतापर्यंत काळीढुस्स झालेली शेवई शेवगाठीपेक्षा बारीक काही होत नव्हती :)

  ReplyDelete
 4. माझ्याकडे मागच्याच वर्षी आई कोल्हापुरच्या शेवया चांगली डब्बाभर घेऊन आलीय..माझी मावशी सांगली-कोल्हापुर सासर असणारी आहे त्यामुळे त्यांच्या काकू पाठवतात त्यातल्या..त्या खास बाळराजांसाठीच असतात आजकाल...या पोस्टमुळे त्यामागची एक रंजक कहाणीपण कळली...छान वाटलं...

  ReplyDelete
 5. Mazya tar nashibaat ch nahi aala asa Shevayeecha Diwas kadhi....!!!

  ReplyDelete
 6. उन्हाळ्याची सुट्टी खरचं किती छान असते.
  पापड, लोणची, कैऱ्या, आंबे..
  मला आठवतयं की शेवया करून माझी आजी एका दांडीवर (वाळत?) टाकायची.
  पोस्ट एकदम मस्त!

  ReplyDelete
 7. :)))))) mastch nehmeprmane.
  pan mala shevai chee kheer ajibaat awdt nahi. ann khaave tar laagtech :(

  ReplyDelete
 8. ajunahi amachi aaji ghari shewaya karate. ya warshi gharache bandhkam chalu ahe tyamule kathiwar tangalelya shewaya nahit tyamule chukalya chuklya sarakhe watate ahe

  ReplyDelete