Thursday, May 20, 2010

बिनतात्पर्याच्या गोष्टीलहानपणी नेहमी मला एक चिंता भेडसावायची. आई किंवा बाबा या दोघांपैकी कुणी एक "बिन-तात्पर्याच्या गोष्टीत शिरलं तर?". आता ही गोष्ट म्हणजे काय हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अशा गोष्टी ऐकायला मिळतात. या गोष्टीचा नेमका हेतू नेहमी धूसर असतो. पण गोष्ट म्हणून तिचा दिलखुलास असा आस्वाद काही केल्या घेता येत नाही. हेतू स्पष्ट नसला तरी ती गोष्ट कुठेतरी टोचत राहते, आणि हे आख्यान बंद झालं तर आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक फरक पडेल असंही वाटत राहतं मनाच्या एका कोप-यात. लहानपणी आई किंवा बाबांबरोबर एकटं बाहेर जाताना मला नेहमी या गोष्टींची भीती वाटत राहायची; आणि बँकेत खूप मोठी रांग दिसली की लगेच बाबा असल्या गोष्टी सुरु करायचा.
"सई, मी लहान असताना मला माझ्या बाबांबरोबर असं भटकता नाही यायचं. आम्ही नाना आजोबांना घाबरायचो. तुझ्यासारखं टाकली ढांग स्कूटरवर आणि गेलो बाबाबरोबर बाहेर असं नव्हतं आमच्या वेळेस."
आता, यात चूक कुणाची? मी जर जन्माला आल्यापासून तुमच्या ताब्यात आहे तर मला घाबरवणं सर्वस्वी तुमच्या हातात होतं. होतं की नाही? मग त्यावर विचार करून अमलात आणायला हवं होतं ना!
" सई, आम्ही लहान असताना आई-वडलांबरोबर कध्धीच सिनेमाला गेलो नाही तुझ्यासारखे. मी दर महिन्याची रद्दी विकायचो आणि त्यातून जे पैसे येतील त्यात त्या काळी बाल्कनीचं तिकीट मिळायचं. आत्तासारखे मल्टीप्लेक्स सुद्धा नव्हते त्या काळी".
रद्दी विकून सिनेमा पाहिल्याची गोष्ट बाबा आंबेडकरांनी रस्त्यातल्या दिव्याखाली बसून अभ्यास केल्याच्या गोष्टीसारखा सांगायचा. सिनेमाच पहिला ना शेवटी? आणि हल्ली तिकिटांवर करमणुकीचे कर लावतात त्यात आमची काय चूक? आणि मल्टीप्लेक्स निघाले यात आजच्या नवीन पिढीचा काय दोष? या गोष्टीमुळे आधी माझ्या बालमनात करुणरसाचे स्राव होत असत. पण नंतर माझ्या अतिशय मोंड पण तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावर मात केली.
"आम्हाला तुमच्यासारख्या रिक्षा करता यायच्या नाहीत उठसूठ. आम्ही सगळीकडे चालत जायचो. त्यामुळे आम्हाला वाचलेल्या पैशातून खासबागेत मिसळ खाता यायची."
या गोष्टीच्या विणीतही खूप सारी भोकं राहिली आहेत. एक तर मला बाबाच्या कॉलेजची सगळी टोळी माहित आहे. त्यातला एकही चेहरा मिसळ खाण्यासाठी पायपीट करणा-या सालस चेह-यांपैकी नाही. आईच्या मैत्रिणी तर महा "चमको" आहेत. त्यामुळे यातलं कुणीही श्रावण बाळ नाही हे मला अगदी चार वर्षाची असल्यापासून माहिती होतं. आणि "चैन" करण्यासाठी केलेले "त्याग" हे "शिक्षणासाठी" केलेल्या त्यागांपुढे फार छोटे वाटतात. अज्जी-आजोबांचे शिक्षणविषयक त्याग अजूनही नित्यनेमाने ऐकावे लागत असल्यामुळे आई-बाबांचे चैनविषयक त्याग कृत्रिम वाटायचे.
बाबाच्या गोष्टी थोडा विचार करून सोडून देता यायच्या, कारण बाबाला मनापासून त्यानी फार त्याग वगैरे केलेत असं वाटत नसावं. मुलांना असलं काहीतरी अधून मधून सांगायचं असतं असं त्याला आईनी सांगितलं असेल कदाचित. आईच्या गोष्टी मात्र हृदयद्रावक असायच्या. पण त्या दुस-या टोकाच्या असल्यामुळे अती झालं आणि हसू आलं अशी गत व्हायची.
कधी मी लाल भोपळ्याची भाजी बघून नाक मुरडलं की आई लगेच तिची नेहमीची करुण कहाणी उपसायची.
"सई, किंमत नाहीये तुला. लाल भोपळ्यात बीटा कॅरोटीन असतं. असं पोषण मला तुझ्याएवढी असताना मिळायचं नाही. आमच्या घरात ताई आणि आईच्या भांडणात कुणाचं माझ्याकडे लक्षच नसायचं."
आता मला मान्य आहे की हे अडचणीचं होतं. पण ही आयुष्यातली अडचण लाल भोपळ्याची भाजी खपवायला का वापरावी? आणि माझ्या बाबांना दोन बायका नाहीत म्हणून माझं आयुष्य सोपं आहे ही गोष्ट माझ्या हाताबाहेर होती. माझं आयुष्य सगळीकडून किती सोपं आहे हे ऐकून माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अवघड गोष्टी होत्या त्यांनाही ग्रहण लागायचं. आपल्याला आजोबांसारखं कावडीतून पाणी आणायला लागत नाही, बाबासारखी रद्दी विकावी लागत नाही, आईसारख्या दोन आया आणि त्यांची भांडणं बघावी लागत नाहीत; त्यामुळे आपण आहे त्या उत्तम परिस्थितीत त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेलं पाहिजे!
आईची अजून एक आवडती गोष्ट म्हणजे तिची पी. एच. डी.
ती पी. एच. डी. करत असतानाच मी झाले. त्यामुळे तिला मी व्हायच्या अगदी दोन आठवडे आधीपर्यंत लॅबोरेटरीत जावं लागत असे. मग तो प्रवासही ती चालत करायची. सकाळी सहा वाजता निघायची वगैरे वगैरे सांगायला तिला फार आवडायचं. माझ्या पी. एच. डी.त मी काटकसर (थोडीफार) सोडल्यास काही महान दिव्यं केली नाहीत. त्यामुळे तिथेही मला मैलोनमैल चालत गेल्याचं कौतुक सांगता येत नाही. एकूण तात्पर्य काढायचंच झालं तर ते असं की माझं आयुष्य फुलासारखं मजेत चालू आहे आणि माझ्याकडे अशा कुठल्याच करुणरसपूर्ण गोष्टी नाहीत. फुलासारखं गेलंय हे तर मी नक्कीच मान्य करीन, पण या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाही. :)

17 comments:

 1. 'monD' aNi '...goshTa upasayachi' la vegaLa "Like"

  ReplyDelete
 2. Good one as usual. We all say that we will not do certain things that our parents did but then we eventually come back a full circle and do or say the exact same things :)
  Trust me.Been there done that. Never say never.
  :)

  ReplyDelete
 3. एकदा माझा चुलत भावाला त्याची आई म्हटली," अरे, तो झोपडपट्टीतला मुलगा बघ, दहावीत पहिला आला. आम्ही तुला एवढं देतो, तु पण पहिला आला पाहिजेस." ह्यावर अत्यंत बाणेदारपणे माझा भाऊ म्हटला," मग त्यात काय झालं? मी झोपडपट्टीत रहात असतो तर मीही पहिला आलो असतो!" पुन्हा काकू त्याला असलं काही सांगायला गेली नाही हे वेगळं सांगायला नकोच..
  वडिलांना घाबरण्याचा मुद्दा एकदम मान्य. आता कधीकधी मी बाबांना गुदगुल्या करतो. हो मान्य आहे करतो. त्यावर ते म्हणतात "अरे, आम्ही आमच्या बाबांना घाबरत होतो. तू गुदगुल्या कसल्या करतोस? " ह्यातलं दुसरं वाक्य ठीक आहे, पहिलं कशाला हवं?
  कदाचित आमची पिढी (पक्षी: आम्ही) तुमच्या पिढीपेक्षा (पक्षी: तुमच्यापेक्षा) कशी जास्त चांगली होती, हे दाखवण्याची खट्याळ सुप्त इच्छा असावी का?

  ReplyDelete
 4. @Bipin
  Thanks :)
  @ Randomthoughts
  Mazya dokyat nehmi meter chalu asto ek. To compare myself with my mom. And you are right. As I grow older I am turning into her at a very fast rate. :)
  @Prasad
  Hahaha..sahi. saglyach pidhyanna asa abhiman asto. When I get in the train and see 12 year old Aussie school girls wearing fake eyelashes and using fancy cellphones, I turn into my mom too.
  "Amchya weles 12 warshache astana amhi landline wapraycho!" :D

  ReplyDelete
 5. सई,
  तु लिहिलेले बहुतेक मुद्दे हे सर्वच घरात नेहमी घडणारे आहेत. ह्यात बहूदा जुन्या पिढीला(आई बाबांना) अस वाटत की आपल्यापेक्षा ह्या नवीन पिढीला (मुलांना) खूप जास्त सोयी, स्वातंत्र्य मिळतय. आपल्याला हे मिळल नव्हतं. मुलांनी हे स्वातंत्र्य सुखाने उपभोगणे म्हणजे त्यांच्या पोटात अजून दुखतं. त्यांच दु:ख कमी करण्यासाठी ते अश्या सुखात कायम काहीतरी कडू घालतात जेणेकरून आपण हे सर्व सुखाने उपभोगू शकत नाही.
  तेव्हडच त्यांना समाधान. बाकी काही नाही.

  तु तुझ्या मुलांना अश्या बिन तात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाहीस असे म्हणतेस. सद्ध्या हे ठीक आहे.
  मुले झल्यावर काय होतय ते कळेलच. ;)

  ReplyDelete
 6. एकदम पटलं ... ‘आमच्या वेळी’ चे किस्से भाचरांना ऐकवण्याची हुक्की मला पण येते कधी कधी :)

  ReplyDelete
 7. @Aniket
  Hahaha. Ho. I don't think the feeling is as extreme (pot dukhing) as you think. It is just the fact that people never step out of their youth. It is a constant state of mind. So everything else that changes around them seems like an outrage. :)
  My parents were relatively very cool. Since they themselves were kids most of the times even when I was growing up. :)

  ReplyDelete
 8. नमस्कार सई (बाई),
  बाई बद्दल sorry पण मराठीत madam ला मला हाच प्रतिशब्द (नेहमी) सापडतो...
  असो...

  मी काल आणि आज मिळून सगळा ब्लॉग वाचून काढला.... तसा माझा आणि तुझा परिचय नाही पण मी ही मुळ कोल्हापुरचाच आणि पहिल्यांदा अभियांत्रिकी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेलो आहे आणि गायत्री नातुचा बालमित्र आहे एवढी ओळख पुरे झाली मला वाटते.... तुझ्या तिच्या ब्लोगवरच्या प्रतिक्रियांमधून मी पहिल्यांदा तुला "पाहिले" होते .. आणि काल अगदी अचानक तुझ्या ब्लोगवर येऊन पडलो... आणि स्वतःलाच दुषणे दिली की आधी का हा ब्लॉग वाचनात आला नाही म्हणून....

  तुझं मनापासून कौतुक तर सर्वांनी केलेले आहेच पण मला राहवत नाहीये म्हणून हा प्रतिक्रिया प्रपंच..
  सगळ्यात पहिल्यांदा मला तुझं कौतुक करायचय ते तुझं निरीक्षणशक्तीबद्दल ... ती केवळ अफलातून आहे.....
  नंतर मला जे काही कौतुक करायचय ते तुझ्या ओघवत्या भाषाशैलीबद्दल.. ती केवळ वर्णनात्मक नसून ती आम्ही कधी न पाहिलेल्या निर्जीव (?) गोष्टी जसे की तुमचा वाडा, तुमची ती खिडकी, वगैरे जसे समोर उभी करते तसच तुझ्या घरातल्या व्यक्तिरेखाही त्यांच्या गुण वैशिष्ट्यांसकट उभी करतेस त्या करता तुला केवळ सलामच करता येऊ शकतो...

  प्रत्येक व्यक्ती रेखेबद्दलचे तुझे असलेले "judgement " (जसे की दुपारच्यावेळी काही खायचे असेल तर ती तुझी जबादारी असायची कारण तुला कोणी नाही नाही म्हणणार किवा तुझे पाहुण्यांसमोर जे कौतुक व्हायचे त्याने स्नेहाला राग यायचा आणि मग त्याची नंतर भरपाई व्हायची!! ) एवढ्या लहान वयातील ते सुद्धा निव्वळ perfect!!!

  तुझे किंवा स्नेहाचे विचार / उपद्व्याप हे बाल मानसिकतेचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत.... प्रत्येक लहान मूल थोड्या फार फरकाने असाच विचार करत असते पण ते शब्दबद्ध करणे तुला छानच सांधले आहे... :)

  मला फक्त जाता जाता एवढेच म्हणायचे आहे की तू किंवा आपल्या पिढीने नक्कीच आपले भावविश्व ज्या लोकांनी समृद्ध केले त्यांचे आपण आभारी असले पाहिजे जरी आपल्याला तेव्हा कळत नव्हते की आपल्याला आपल्या आयुष्यभराची शिदोरी मिळतेय...

  बाकी काय लिहू तुझं ब्लॉग माझ्या मनाला भिडलाय म्हणून आता ह्या ब्लॉगवर ( परत परत ) येईनच आणि वाचत राहीनच.. जसे सगळे तुझ्या नवीन लिखाणाची वाट पाहतात तसच आता मी ही पाहत जाईन... :)

  माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा केवळ ब्लॉग साठीच नाहीत तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रासाठीच... :)

  ReplyDelete
 9. पण या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार >>hehehee good! :)

  ReplyDelete
 10. सत्या,
  कौतुकाबद्दल खूप खूप आभार.
  पण या सगळ्या व्यक्तिरेखा मूळ व्यक्ती म्हणूनच इतक्या सक्षम आहेत की माझ्यातल्या लेखिकेला फार काही करावं लागत नाही.
  अर्थात, या लेखनामध्ये माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींचाही खूप मोठा हातभार आहे. आणि गायात्रीसारख्या विद्वान (विदुषी) लेखिकेची मदत. :)
  फार छान वाटलं सकाळी सकाळी अशी मोठ्ठी कॉमेंट वाचून.
  थांक्यू :)
  सई
  @Deep
  Thanks. :)

  ReplyDelete
 11. Sahiye....!!! Khoop khoop khoop mast...!!!
  Mi muddamun mazya baba la suddha vachun dakhawala... :)
  " या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाही. :) "
  Haha...bhari...!!!
  "Amchya weles 12 warshache astana amhi landline wapraycho!" :D..COOL ONE...

  ReplyDelete
 12. hehe..mast ch aahe :)
  i hv already started telling my kid cousins that when i was their age, there was no orkut/fb n even when i was in college, i didn't hv cellphone :D
  i didnt realize this till i read this :D
  --Sayali

  ReplyDelete
 13. मस्त! किती सहज लिहितेस..! :)
  हा लेख आपल्या आधीच्या पिढीच्या प्रत्येकाला वाचायला दिला पाहिजे!

  ReplyDelete
 14. Hey Saee,

  Although its your modesty to say that you need not to do "much", whatever least part you perform as an author, it is still plaudible :)...

  & regarding Gayatri, she is been confirmed as pundit at that time in schools when we were asked to enrich our essays contentwise and she was being told by our teachers that write in some simplified manner so that generically any assesser can assess you!!! :) :)

  ReplyDelete
 15. तू लिहिल आहेस ,"या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाही. "
  कुणी सांगावं, कदाचित तुझी मुले आम्च्या आईबाबांनी आम्हाला अशा गोष्टी सांगितल्याच नाहित म्हणून तुम्हाला बोलतील.कारण आईबाबांनी केलेल्या गोष्टी न पटणे हा प्रत्येक पिढीचा जन्मसिध्द गुण असतो.
  तुझे सगळेच लेख छान असतात मला आवडतात.

  ReplyDelete
 16. सई तुझ्यासारखंच ठरवलं होतं की 'आमच्यावेळेस' असं सुरुच करायचं नाही पण चक्क दोन वर्षांच्या (आत्ताच थोडीफ़ार भाषा कळु लागलेल्या) माझ्या मुलाला जेव्हा असलं काही सांगायचं सुचलं तेव्हा इतकं हसु आलं की पुढे त्या बिनतात्पर्याच्या गोष्टीचं रुपांतर विनोदी तात्पर्यात करुन टाकलं...
  बघ हं नाहीतर कदाचित तुझीच काही वर्षांनी एखादी बिनतात्पर्याची गोष्ट यायची... :)

  ReplyDelete
 17. मस्त!!! एकूणच स्वतः आई-वडील झाल्यावर लोकांना सतत शिक्षकाच्या भूमिकेत शिरायला फार आवडत असावं.

  ReplyDelete