Saturday, May 8, 2010

मन: स्ताप टाळण्याचे सोप्पे उपाय

अण्णाआजोबांची कित्येक सुभाषितं त्यांच्या अतिरेकामुळे मला तोंडपाठ झाली, पण कुसुमअज्जीचं एकच वाक्य मला आयुष्यभरासाठी पुरेल.
ती नेहमी म्हणायची, "सई, जगात असं काही नाही ज्याच्यामुळे आपल्याला मन:स्ताप किंवा पश्चा:ताप व्हावा." गंमत म्हणजे हे वाक्य तिला माझ्या बालचिंतांसाठी वापरावं लागत असे.
पण तिचं शांत, कुठल्याशा अदृश्य देवाशी एकरूप झालेलं रूप पाहिलं की खरंच वाटायचं, "कसली चिंता? अशी अज्जी आहे आपल्याला मग देव आपल्याबरोबरच असणार."
अज्जी मात्र मन:स्ताप होऊ नये म्हणून खूप विनोदी प्रकार करायची. ती म.ल.ग. हायस्कूलची मुख्याध्यापिका होती. पण तरीही शाळेतून कित्येक वेळा ती भिजत भिजत घरी यायची - कारण तिला छत्री बसमध्ये विसरून मन:स्ताप होईल याची काळजी वाटायची. घड्याळ तिनी कधीच घातलं नाही, कारण ते हरवून पुन्हा मन:स्ताप व्हायचा. पण ती कधीही कुठेही उशीरा पोहोचली नाही. आजकाल आपल्याकडे किती घड्याळं असतात. एक हातावर (भरमसाठ किमतीचं), एक मोबाईल फोनमध्ये, एक लॅपटॉपमध्ये आणि तरीही माझ्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी मला टांगून ठेवतात तासंतास!
कुठे जायचं असलं की अज्जी सकाळपासून तयारी करायची. तिला दिवसभरात जेवढा वेळ मिळेल तो न सांडता वापरायची कला अवगत होती. रात्री जागून अभ्यास करणे, मग सकाळी वाट्टेल तेव्हा उठणे या गोष्टी तिला फारशा आवडायच्या नाहीत. त्यामुळे तिच्या नेहमीच्या गांधीवादामुळे मला दिवस नीट वापरून रात्री लवकर झोपायची सवय लागली. या सवयीमुळे माझी समाजात जोरदार थट्टा होते ते वेगळं.
ट्रेन किंवा बस चुकणे हीसुद्धा अज्जी-आजोबांची मन:स्ताप टाळायची जागा होती. त्यामुळे कधी कधी ते ट्रेनच्या वेळेच्या आधी दोन-दोन तास स्टेशनवर जाऊन बसायचे. यावरून आमच्या घरात नेहमी युद्ध व्हायचं. बाबा त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार, "स्टेशन झाडायला जायचं का?" वगैरे सुरू करायचा, आणि मग आजोबांचं आणि त्याचं जोरदार भांडण व्हायचं. माझे आई-बाबा दोघेही कदाचित "दुसरी पिढी" असल्यामुळे बंडखोर होते. पण आई-बाबांच्या चुकलेल्या बशी आणि विमानं मोजली तर अज्जी-आजोबांचं काहीही चूक नाही हे लगेच लक्षात येतं. मलासुद्धा विमानाच्या वेळेच्या भरपूर आधी विमानतळावर जायला आवडतं. त्यामुळे मलासुद्धा आई-बाबांशी भांडूनच निघावं लागतं. माझ्या मनात भलत्याच शंका येतात ते वेगळंच.

आपल्या बॅगेचं वजन नियमापेक्षा जास्त झालं तर? हा माझा अतिशय फालतू पण कधीही न शमणारा प्रश्न असतो.
मग बाबा बॅग घेऊन वजनकाट्यावर उभा राहतो. बॅगेचं आणि बाबाचं एकत्र वजन नव्वद किलो भरतं, पण बाबाचं ठाम मत त्याचं वजन पासष्ठ आहे असं असतं. त्यामुळे माझी बॅग पाच किलोनी जड आहे ही भयावह परिस्थिती निर्माण होते. मग आई येते आणि बाबाला बॅगेशिवाय काट्यावर उभा करते. तेव्हा माझी बॅग पाच किलो हलकी आहे असं सिद्ध होतं. त्या आनंदात आई दोन किलो कनक गूळ आणि किलोभर गरम मसाला मागवून घेते. शेवटी विमानतळावर जायच्या आधी आम्ही माझी बॅग आईच्या ऑफिसमधल्या गुळाच्या काट्यावर वजन करून आणतो. ते केल्यावर आई-बाबा, "झाला का आत्मा शांत अज्जीबाई?" असे टोमणे मारत मला परत आणतात. परत आल्यावर काहीही नवीन टूम काढायची नाही असं वचन देऊनसुद्धा आई ऐनवेळेस काहीतरी नवीन बॅगेत टाकतेच. त्यामुळे जाताना पुन्हा वजनाचा प्रश्न माझ्या डोक्यात उड्या मारू लागतो. अशावेळेस मला अज्जीची खूप आठवण येते. ती असती तर, "नको गं वसू तिला त्रास देऊस. परदेशी ती चाललीये ना? मग तिला आराम वाटेल अशाच वस्तू तिला घेऊन जाऊदेत!" असं नक्की म्हणाली असती. विमानतळावर किती आधी जायचं यावर सल्ला द्यायला तर आमच्या घरात इतके लोक आहेत की तो प्रश्न मी जायच्या दिवशी सकाळीच प्रस्तुत करते. पुढे खूप संघर्षानंतर आई-बाबा आणि माझ्या वेळेचा मध्य गाठला जातो.

या परिस्थितीतून गेल्यावर माझ्या लक्षात येऊ लागलं की अज्जीला खरं काय म्हणायचं होतं.
"जे टाळण्यासारखे मन:स्ताप आहेत ते आधी टाळायला शिकावं. आणि जे अटळ आहेत, त्यांच्यापासून अलिप्त व्हावं."
अज्जीच्या आयुष्यातले जवळपास सगळे टाळता येणारे मन:स्ताप तिने खुबीने टाळले. पण तरीही तिच्या वाट्याला अनेक अटळ चिंता आणि मन:स्तापही आले. तिच्या तरुणपणी तिला ज्या गोष्टींचे ताप झाले असतील त्या आता कुठे मला दिसू लागल्या आहेत. पण त्या चिंतांनी तिला जसं एखाद्या पहाटेच्या संथ समुद्रासारखं शांत बनवलं तसं मलाही व्हायला आवडेल.
तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधी कधी माझी आई तिला, "आई तू हे लग्न का केलंस?" असं कधी दु:खाने तर कधी कुठल्याश्या अंतिम कुतूहलाने विचारायची. पण माझ्या आज्जीचं उत्तर कधीच बदललं नाही.
"अगं, तुझ्यासारखी मुलगी झाली मला. इतकी कर्तृत्ववान, कुशल, जगात मान मिळालेली. यापुढे सगळे ताप शून्य आहेत."
आणि आपण इथपर्यंत का आलो? हा प्रश्न नेहमी मागे वळूनच सोडवायचा असतो.
अज्जीची निग्रहाने शांत राहायची सवय सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेली, आणि कुठलेही प्रश्न उभे न करणा-या उर्मिलेसारखी ती आमच्या घराच्या रामायणात तिची अशी एक अटळ जागा बनवून गेली.

10 comments:

 1. प्रिय सई,
  उन्हाळ्याची सुटी हा तृझा ब्लॉग मी(तुझ्याशी परिचित नसूनही) वाचतो.आवडीने त्यातील माणसात रमतो. तुझा आणखी एक ब्लॉग इंग्रजी आहे.आणि त्यात तू एकदा श्रीमती मंगला(राजवाडे) नारळीकर यांच्यावर लिहिले होतेस.त्या मला १९६३-६४ मध्ये रुईया कॉलेजात गणिताच्या अध्यापक होत्या. ते मला खूप आवडले होते. त्याचा मला मराठीत अनुवाद करून कुठे तरी (तुझ्या नावाचा संदर्भ नावानिशी देउन)द्यावा असे वाटते. देऊ का ?
  तू आजच्या पिढीतील असूनही जुन्या लोकांचे स्वभाव,गुण किती न्याहाळतेस हे पाहून आश्चर्य वाटते.
  असेच लिहित राहा. धन्यवाद.
  मंगेश नाबर

  ReplyDelete
 2. आपण इथपर्यंत का आलो? हा प्रश्न नेहमी मागे वळूनच सोडवायचा - kharach ga. agadee khara. Aata he devnagareet ka lihila jaat nahiye tyacha manstaap mee nahi karoon ghet. :)

  ReplyDelete
 3. @ Mangesh
  Go ahead. :)
  Mangala mami is one of those people whose qualities can influence us. I have no problems whatsoever. :)
  Thanks for all the praise! Feels nice when someone likes what you do. :)
  cheers
  Saee

  ReplyDelete
 4. @Random thoughts and Maithili
  Thanks for the comments. :)

  ReplyDelete
 5. आयुष्यात आपल्या वाटयाला काय यावे हे आपल्या हाती किती हा मोठया चर्चेचा विषय होऊ शकतो. पण जे वाटयाला आले ते अटळ कसे स्विकारावे हे मात्र पूर्णपणे आपला हातात असते येवढे मात्र खरे. नेमके ते सूत्र तुझ्या अज्जीला सापडले होते असे दिसते. How lucky that she lived that formula !!!

  ReplyDelete
 6. सई,

  बढिया लिखा है |

  जे अटळ आहेत, त्यांच्यापासून अलिप्त व्हावं.>>>
  तुझ्या अज्जी सारखं करता आलं पाहिजे. ज्या गोष्टी मनस्ताप देऊ शकतात त्या टाळून पुढं जाणं शक्य आहे. :)

  ReplyDelete
 7. कुसूम आज्जी खरी अध्यात्मिक होती! अण्णा नुसतच सांगतात पण त्ती मात्र अध्यात्म जगली!

  ReplyDelete
 8. Hi saee,

  Haven't ever given any comment on your posts but have read all of them many times!! Your writing is so breezy, i love it! I wish I could write as good as you :)

  N yes, i guess we both are of same age, so many memories take me back in exactly the same period n i enjoy it the most..its like re-living my childhood though it was quite different :)

  Wish you all the best for all your endeavours!!

  --Sayali

  ReplyDelete
 9. मलापण खूप लवकर जायला आवडतं, पण त्याचं कारण वेगळं आहे. जर माझी काही वस्तू राहिली असेल (जी either राहिलेली असते, किंवा काहीतरी राहिलं आहे असं वाटत तरी असतं..) तर ती मला कोणीतरी आणून पोचवू शकेल एवढा वेळ बाकी ठेउन मी पोचतो.. :)हा अजून एक मनस्ताप टाळण्याचाच प्रकार.. आपला मनस्ताप दुस-याला दिला की झालं!!

  ReplyDelete