Sunday, June 27, 2010

अभ्यास

माझा अभ्यास हा आमच्या घरात युद्धाचा विषय असायचा. सकाळी सकाळी बाबा पळून यायचा आणि मला उठवायचा. सात ते साडेआठ ही वेळ माझ्या अभ्यासाची असायची. तसं भाषा, इतिहास-भूगोल, सामान्य विज्ञान वगैरेंशी माझं खास वैर नव्हतं. पण गणिताचं पुस्तक सकाळी सकाळी दिसलं की मी एखाद्या घोडीसारखी बिथरायचे! गणित मला यायचं नाही. पण ते येत नाही म्हणून मला त्याची जाम भीती वाटायची. शाळेत गणितात पैकीच्या पैकी मार्कं मिळणार्‍या मुला-मुलींचा वेगळाच तोरा असायचा. मला भाषेत नेहमी छान मार्क असायचे, पण भाषेचं कौतुक भाषा शिकवणार्‍या बाईंनाच असायचं फक्त. गणित आलं पाहिजे कारण गणित आल्याने आयुष्य खूप सोपं होतं, असा एक मतप्रवाह शाळेतल्या बहुतेक मुलांच्या पालकांमध्ये असायचा.
बाबाला मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं फार वाटायचं. पण ते त्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. निदान माझी गणिताबद्दलची भीती तरी जावी म्हणून 'हसत खेळत गणित’ सारखे खूप उपक्रम आमच्या घरात राबवण्यात आले. पण कशानेही माझ्या गणित-ग्रहणशक्तीत फरक पडला नाही. प्रत्येक इयत्तेसरशी माझं गणित अधिकच कच्चं होऊ लागलं. आणि त्याचबरोबर गणित किती महत्वाचं आहे याचे पुरावे आणखीनच बळकट होऊ लागले. आमच्या घरात दर वर्षी माझ्या गणितातील मठ्ठपणावरून बाबाच्या डोक्यात चिंता निर्माण होऊ लागल्या. आई मात्र शांत असायची. "सई, तू एकदा गणितात नापास होऊन बघ", असा सल्ला तिनी मला दिला होता. पण आई-बाबांच्या सुदैवाने ती वेळ माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली. आणि आली तेही बरं झालं.
सातवीनंतर बाबानी माझा अभ्यास घेणं बंद केलं आणि मला गणिताची गोडी लागावी म्हणून मंगलामामीकडे अभ्यासाला पाठवण्यात येऊ लागलं. मंगला नारळीकर, म्हणजे मंगलामामी माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे. तिच्याकडे मी सायकलवरून जायचे. पुणे युनिव्हर्सिटीचा तो शांत परिसर, आयुकातलं तिचं फुलांनी सजलेलं घर, तिच्या मोठ्या डायनिंग टेबलवर बसून पिवळ्या पिवळ्या कागदांवर लाल शाईनी सोडवलेली गणितं, हे सगळं माझ्या मनाच्या खाऊच्या कप्प्यात ठेवलंय मी! तिनी टाटा इनस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधून गणितात पी. एच. डी मिळवली आहे. तिची गणित शिकवण्याची पद्धत इतकी सोपी असायची की तिच्याकडे असेपर्यंत मी अजून पहिली-दुसरीचंच गणित शिकते आहे असं मला वाटायचं. दहावीत माझा भूमितीचा अभ्यास खूप छान झाला होता, कारण मंगलामामी मला सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले प्रत्यक्ष चित्र काढून समजावून सांगितले होते. कधी कधी आम्ही काढलेल्या त्रिकोणांच्या मध्यगा (मिडीयन) वापरून, एकसारखे पानभर त्रिकोण मी काढायचे आणि तेरा वर्षांच्या मुलीचा गणिताचा तास हा पाच वर्षांच्या मुलांचा चित्रकलेचा तास बनायचा. एखादा कांदा सोलत जावा तशी ती गणितं सोडवत जायची. कुठलीही एक पद्धत घोड्यासारखी न रेटता, सगळ्या रस्त्यांनी त्याच उत्तराकडे एखाद्या शूर शिपायासारखी मला न्यायची. तिची ही सवय मी गणितात नाही वापरू शकले. पण गणिताच्या परिघाच्या बाहेर, खर्‍या खर्‍या आयुष्यात ही पद्धत जास्त उपयोगी आहे हे मला आता कळू लागलं आहे.
ती दोन वर्षं माझे गणितातले मार्कं अचानक शिड्या चढू लागले. मला मंगलामामी गणित शिकवते याचा वर्गातल्या मुलांना हेवादेखील वाटू लागला. पण गणितापेक्षा खूप मोठ्या गोष्टी मी तिच्याकडून शिकले. तिचा साधेपणा, एखादी गोष्ट येत नाही याकडे बघण्याचं निखळ कुतूहल, ती का येत नाही याचा त्रागा न करता, तिच्या आजूबाजूला साठलेली भीती, आणि लाज आधी कमी करायची पद्धत, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. एका वेळी मंगलामामी साधारण पाच कामं करायची. माझ्याबरोबर तिच्या मोलकरणींच्या मुलांचाही अभ्यास एका बाजूला सुरु असायचा. मग कधी कधी तिची मोठी शिष्या म्हणून त्यांचा अभ्यास तपासायची जबाबदारी ती मला द्यायची. आम्ही सगळे आमचे आमचे अभ्यास करत असताना ती आमच्यासाठी केक बनवायची. तसंच तिचं फुलांचं वेड, जे मलाही वेड लावून गेलं. तिच्या टेबलवर नेहमी सोनटक्का, चाफा, फ्रेंच गुलाब, मोगरा, अनंत, आणि बाकी काहीच नसलं तर पारिजात तरी हमखास असायचा. आणि ती सुगंधी फुलं चहात टाकायची. मग मीपण घरी येऊन फुलांचा चहा करायचे.

तिच्या डोक्यात इतकी माहिती असूनदेखील, लिहिताना किंवा बोलताना अगदी सोपं, साधं आणि सुटसुटीत बोलायची.
तिला मी राजकारणावर वाद घालतानाही पाहिलं आहे. पण तिचा भर नेहमी मूळ अडचण काय आहे याकडेच असायचा. कुठल्याही वादामध्ये तिनी कधीही, कुठलाही एकाच "वाद" पकडून ठेवला नाही. आपण काहीतरी महान बोलतो आहे, आणि आपल्या बोलण्याने ही सगळी सभा खूप प्रभावित होणार आहे असा दर्प तिच्या कुठल्याच बोलण्यात नसायचा.
तिचा तास सुरु असताना कधीच मला माझ्या पुढच्या आयुष्याची भीती वाटायची नाही. आणि तिच्यासारखी गुरु मला तेव्हा भेटली यासाठी ’नियती’बाईंचे मानावे तितके आभार कमी आहेत. पुढे वाचन वाढल्यावर लक्षात येऊ लागलं, की सोपं लिहिणं, सोपं बोलणं आणि सगळ्यांना कळेल असं बोलणं खूप अवघड आहे. खास करून जेव्हा बोलणार्‍या किंवा लिहिणार्‍या माणसाचा व्यासंग वाचकांच्या मानाने खूप मोठा असतो, तेव्हा त्यांना कळेल असं बोलणं ही विषयाशी पूर्णपणे एकरूप झाल्याची पावतीच असते.
माझी गणिताची भीती अजूनही गेली नाही. पण त्याच्याशी लढता लढता मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा लोकांमध्ये अभ्यासाच्या पलीकडची हुशारी दिसू लागली. पुस्तकं वाचून शहाणे झालेले लोक खूप बघितले होते. पण प्रवास करून शहाण्या झालेल्या लोकांशी दोस्ती झाली तेव्हा, भारतात आपण कुठल्याच साच्यात बसलो नाही याचा खूप आनंद झाला. कधी कधी आपल्या बाळाचं आयुष्य सोपं व्हावं, त्याला आपल्यासारखे कष्टं करायला लागू नयेत म्हणून आपण नकळत त्यांच्या आजूबाजूला भिंती घालतो. पण भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे? कदाचित असेही देश दिसतील जे आपल्या त्रिज्येच्या बाहेर होते. अशी लोकं भेटतील, ज्यांचा पेहेराव, आहार, रूप-रंग सगळंच आपल्या अगदी विरुद्ध असेल. पण तरीही त्यांच्या मनात आपल्यासारखेच प्रश्न असतील. आपल्यासारखीच सुख-दु:ख असतील. आणि अभ्यास करून, यशाच्या शिड्या चढणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्यासारखाच आणि आपल्या अगदी विरुद्ध विचार करणारी माणसं बघणंही महत्वाचं आहे. आणि मग मंगलामामी जशी गणितं सोडवायची तशीच कुठल्याही देशातून, वेशातून पाहिलेली माणसं एकाच माणुसकीचं उत्तर देतात!

Sunday, June 20, 2010

साधी माणसं

कोल्हापुरात खूप वर्षं जयश्री गडकर मर्लिन मन्‌रोच्या पदावर होती. अरूमामासमोर तिचा विषय काढला की एक तास तरी सत्कारणी लागायचा.
"सई, जयश्री गडकर काय होती म्हणून सांगू!"
खरं तर ती काय होती हे मला लहानपणापासून छान समजलं होतं. पण अरूमामाला हे सांगण्यात काही अर्थ नसायचा.
"तुमची ती रेखा, ती जयाप्रदा, ती माला शिना, ती श्रीदेवी, सगळ्या बाद आमच्या गडकरबाईपुढं".
कोल्हापुरातले लोक 'बाद' हा शब्द जितक्या तिरस्काराने वापरतात तितके महाराष्ट्रातले दुसरे कुठलेही मराठी भाषिक वापरत नसतील.
कोल्हापुरात उन्हाळ्यातल्या दुधापासून ते तरुण वयातल्या लेकापर्यंत सगळं 'बाद' होऊ शकतं.
पुण्यात, "अहो बापटांचा थोरला मुलगा म्हणे वाया गेला! बारावीत फक्त सत्तर टक्के मिळाल्यामुळे त्याला बी. एस. सी. ला जावं लागलं म्हणे!"
हे वाक्य लोक दबक्या आवाजात बोलतात. पण कोल्हापुरात मात्र याच प्रकारचा संवाद असा होऊ शकतो.
"ते पाटलाचं दोन नंबरचं पोरगं म्हायताय काय तुला?"
"व्हय म्हायत्याय की. ते कुस्ती तेन शिकायचं त्ये न्हवं?"
"व्हय. पार बाद झालं."
यानंतर जवळच्या कोपर्‍यात तंबाखूची पिचकारी, आणि नाट्यमय शांतता.
"म्हंजी? काय क्येलं त्यानं?"
"बामनाच्या पोरीला पळीवलं आन्‌ मग दोगांचंबी बा त्यास्नी घरात घेईनात."
"आ?"
"आता पतपेढीत कारकुनी करतंय. कुस्ती बिस्ती पार बंद झाली. तब्येतबी लई उतरली या झंगटापाई!"
तीन तासाच्या सिनेमावर पुणेकर सहा तास टीका करू शकतात, पण कोल्हापुरातले लोक मात्र
"बाद हाय पिच्चर" या तीनच शब्दांत सिनेमाचं काम तमाम करतात.
आई मोठी होत असतानाचा काळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ होता. साधी माणसं, मराठा तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा, सांगत्ये ऐका, मानिनी हे सगळे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्या काळी बनले. तमाशाला मोठा रंगमंच मिळाला आणि प्रतिष्ठाही मिळाली. आमच्या घरात चित्रपट-वेड रुजवणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती म्हणजे ताजी. आई लहान असताना तिला काखोटीला मारून ताजी तिच्या मैत्रिणींबरोबर सिनेमाला जायची. त्या सगळ्या नेहमी आईच्या आणि तिच्या या प्रेमाची थट्टा करायच्या. पण आईला जशी गीता पाठ करायला लावणारी आणि शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावणारी सख्खी आई मिळाली, तशीच तिला कडेवर घेऊन जयश्री गडकरचे सिनेमे बघायला नेणारी ताजीसुद्धा मिळाली. मराठी "चित्रपटसृष्टीत" आणि आमच्या घरात फक्त एका गल्लीचं अंतर होतं, कारण दहाव्या गल्लीत ताजीची जवळची मैत्रीण राहायची आणि तिचे यजमान म्हणजे माधव शिंदे. त्यामुळे कुठला सिनेमा कधी येणार याची ताजीला आधीच खबर मिळायची, आणि कुठली नटी कुठल्या नटावर भाळली आहे हेदेखील तिला फिल्मफेअर वगैरे न वाचताच कळायचं!
तसंच सूर्यकांत मांढरेंची बायको आमच्या ताजीची सख्खी मैत्रीण होती. त्यांचं त्रिकूट सगळीकडे प्रसिद्ध होतं. या गाढ मैत्रीचं फळ म्हणून की काय, आमच्या घरातल्या सगळ्या पोरांना ’धर्मकन्या’ नावाच्या सिनेमात काम करायला मिळालं. आई तेव्हा नऊ वर्षांची होती आणि तिचं अभिनयकौशल्य सगळ्यात सरस असल्यानं तिला चिंगीचं काम मिळालं. ’कुटुंबनियोजन न केल्यामुळे होणारी फरफट’ हा त्या सिनेमाचा विषय होता, आणि त्यामुळे मिळतील तितकी पोरं कमी अशी गत होती. मग कुसुमअज्जीच्या सगळ्या शंकांचं निरसन करून आईला सिनेमात घेतलं. त्यासाठी तिला एक जुनं परकर-पोलकं ठिगळं लावून घालायला लागायचं. ते नेमकं तिच्या मोठ्या मावशीनं तिला शिवलं होतं. एके दिवशी आपली लेक सिनेमात गेलीये याचं कौतुक करायच्या आनंदात कुसुमअज्जीनी तिच्या बहिणीला, "अगं तू दिलेलं परकर-पोलकं तिच्या रोलमध्ये बरोब्बर बसलं बघ."
असं सांगितल्यावर तिच्या बहिणीनी, "याचा अर्थ काय समजायचा मी?" असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला होता!
आईच्या सिनेमाच्या गोष्टी माझ्या लहानपणी मी हजारोवेळा ऐकल्या असतील. त्यातली नटी अनुपमा प्रत्यक्षात किती सुंदर होती, तिचे केस किती लांब होते, नरुमामाला कसं एकट्यालाच श्रीमंत मुलाचं काम मिळालं होतं हे सगळं सारखं सारखं ऐकायला मला फार आवडायचं. आई शाळेतून परस्पर शूटींगला जायची कारण अज्जीनी शाळा बुडवून सिनेमात काम करायला बंदी केली होती. त्यात आई, ती घरी येऊन पुन्हा अभ्यास करून कशी झोपायची हे कपोलकल्पित वाक्य टाकून द्यायची माझ्यावर दबाव आणायला. पण ते मी या कानांनी ऐकून त्या कानांनी सोडून द्यायचे.
त्या सिनेमात चंद्रकांत गोखल्यांनी आईच्या बाबांचं काम केलं होतं. योगायोगाने पुढे आम्ही त्यांच्याच बिल्डींगमध्ये राहायला गेलो. तेव्हा आई पन्नाशीला आली होती आणि ते जवळपास नौव्वद वर्षांचे होते. पण ते आईला चिंगी म्हणूनच हाक मारायचे. दारात येऊन, "चिंगी कुठाय आमची?" म्हणून विचारायचे.

मोठी होताना मला आईनी हे सगळे चित्रपट आवर्जून दाखवले. आणि ते मला खूप भावलेदेखील. मग दरवर्षी अरुमामाच्या मळ्यात गेल्यावर तो मला मराठी गाणी म्हणायला लावायचा. मी आणि आई कधी कधी त्याच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांशेजारी बसून, "दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी, पाजिते रान सारं मायेची वयनी" म्हणायचो आणि अरूमामा अगदी भजन ऐकल्याच्या थाटात ते ऐकायचा.
जेव्हा जेव्हा आईचं "गोड गोजिरी लाज लाजरी" हे गाणं पाहते, तेव्हा मला उगीचच भरून येतं. असं सरळसोट बालपण मिळालेले लोक बघितले की आईच्या बालपणाचं खूप कौतुक वाटतं. आमच्या कोल्हापूरच्या घरात सगळ्यांकडे असतात तसे सबंध कुटुंबाचे सहलीवर काढलेले फोटो कुठेच दिसत नाहीत, किंवा एखाद्या खोलीत अज्जी-आजोबांच्या लग्नाचा फोटो सुद्धा दिसत नाही. पण त्या कुटुंबांनी मिळून जे जे काय केलं ते कुठल्याही चौकोनी कुटुंबांनी केलं नसतं. आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला. कधी एकाच माणसाच्या स्वार्थासाठी तर कधी सगळ्यांच्या हितासाठी, तर कधी फक्त आनंदासाठी. आणि प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकवून गेला. मी आणि माझी मामेभावंडं येईपर्यंत सगळी वादळं निवळली होती. पण तरीसुद्धा वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कुटुंबांनी किती असामान्य गोष्टी करून दाखवल्या आहेत हे पाहिलं की वाटतं, ’जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’ हे वाक्य नुसतं बरं वाटावं म्हणून नसतील म्हणत!

Tuesday, June 15, 2010

टिकली

माझ्या आयुष्यातल्या पहिल्या काही आठवणींमध्ये ताजीचा कुंकू लावायचा कार्यक्रम आहे. मुडशिंगीच्या तिच्या खोलीत सकाळी दारातून तिरकं ऊन यायचं. आमचं घरही कौलारू होतं, आणि दर दहा-बारा कौलांमागे एकाला काच बसवलेली असायची. त्या काचेतूनही ऊन यायचं. त्या उन्हाच्या झोतात असंख्य धुळीचे कणही दिसायचे. पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं. त्या पहिल्या उन्हात, ताजी आरशात बघून मन लावून कुंकू लावायची. आधी मेण, मग कुंकू, मग मेणाच्या हद्दीपलिकडलं कुंकू पुसून बरोब्बर गोल करायची. कधी कधी वाटायचं, ते तिरकं ऊन तिच्या भुवयांमधूनच येतंय! त्यामुळे मला लहानपणी टिकलीचं फार आकर्षण होतं. स्नेहा रोज टिकली लावायची, म्हणून मी पण लावू लागले. तिच्याकडे वेगवेगळी रंगीत गंधं असलेली एक मोठी डबी होती. त्यात छोट्या छोट्या बाटल्या होत्या आणि त्या सगळ्यांना एकच मोठं झाकण होतं. आम्ही त्या गंधाच्या बाटल्यांचा खूप सदुपयोग आणि दुरुपयोग केला. कधी झोपलेल्या चिकूदादाला मिशा काढायला तर कधी बाहुलीचं लग्न लावायला. पण टिकली हा माझ्या बाल-आयुष्यात कधीच वादाचा विषय नव्हता. कधी कधी अज्जीबरोबर फुलं वेचायला जाताना मी अंघोळ करून, परकर-पोलकं घालून, टिकली लावून जायचे. पण पुण्याच्या शाळेची हवा लागताच माझ्या मनात टिकलीबद्दल बरेच प्रश्न येऊ लागले. शाळेतल्या मुली टिकलीवाल्या मुलींना थेट काकू पदावर ठेवायचा. त्यामुळे टिकली लावणार्‍या मुलींचा वेगळा गट असायचा. एखाद्या दिवशी मजा म्हणून शाळेत टिकली लावून गेलं की तो सगळा दिवस, "आज टिकली का लावलीस?" आणि त्यानंतर एकमेकींकडे बघून केलेल्या खुणा पाहण्यात जायचा. टिकली न लावायची सवय होईपर्यंत सुट्टी यायची आणि मग पुन्हा टिकलीवाल्या जगात जावं लागायचं. बरीच वर्षं कपाळावरच्या या पिटुकल्या ठिपक्याची नेमणूक आणि बरखास्ती फार गाजावाजा न करता चालू होती. पण मग तेरा-चौदा वर्षांची झाल्यावर अचानक काय झालं माहिती नाही. कुणी "सई टिकली लाव", असं सांगितलं की डोक्यात एकदम वीजच चमकायची. कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा केंद्रबिंदू होऊन बसला होता!
'टिकली का लावायची?' या प्रश्नाची खूप उत्तरं मिळाली.
"आपण हिंदू आहोत सई."
"भारतीय संस्कृती आहे ती. जपायला हवी."
" मोकळं कपाळ अपशकुनी दिसतं."
"भरल्या घरात हातात बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली असावी!"
"तुझ्या भुवयांमध्ये देवानी जागा का सोडली असेल? टिकलीसाठीच!"
पण या कुठल्याच कारणानी टिकली माझ्या कपाळी टिकली नाही. मग काही वर्षं मला टिकली लावायचा, बांगड्या घालायचा आग्रह न करण्यात गेली. पण मग माझ्या मोकळ्या कपाळाकडे जराही लक्ष न देता माझ्या आजूबाजूच्या बायका टिकल्या लावत राहिल्या. कुणाचं कुंकू, कुणाची लांबुडकी डिंकवाली गडद लाल, कुणाची मोठ्ठी गोल, कुणाची पुरळवजा, कुणाची नवीन फॅशनेबल चांदणी, कुणाची पेशवेकालीन चंद्रकोर! आणि या टिकल्या माझ्याकडे बघून वेडावून दाखवतायत असं मला सारखं वाटू लागलं. मग सतरा-अठरा वर्षांची झाल्यावर मी हळूच पुन्हा टिकली लावू लागले. पण हे करताना आई-अज्जीच्या डोळ्यावर येणार नाही याची खात्री करावी लागायची. कारण माझ्या साध्या बदललेल्या मताला लगेच 'दुर्गा झाली गौरी' चा सूर यायचा. पण पुढे आयुष्यातले बाकीचे बिंदू जुळवण्यात टिकलीचा विसर पडला आणि तिचा तिटकारा आणि वेड दोन्ही संपुष्टात आले.
पण या टिकलीसारख्या आणखीही बर्‍याच गोष्टी होत्या ज्या लहानपणी उगीचच नाकारल्या गेल्या. आता त्याचं हसू येतं.
देव आहे की नाही हे ठरवण्यात माझं बरंच बालपण वाया गेलं. माझ्या मैत्रिणींच्या आया त्यांना बरोब्बर सहा वाजता 'शुभंकरोती' म्हणायला बोलवायच्या. पण माझे आई बाबा माझ्यावर असली काहीच वळण-प्रधान सक्ती करायचे नाहीत. आमच्याकडे देवाची पूजा व्हायची सकाळी तेवढंच. 'देवाचं करणे' या दोन शब्दांचा अर्थ मला अजून नीट कळला नाहीये. लहानपणी संस्कृत पाठांतर स्पर्धेत मी खूप स्तोत्रं म्हणायचे. पण तीच स्तोत्रं मी कधी देवासमोर बसून म्हटली नाहीत. देव माझ्या पुण्यातल्या आयुष्यात फार ढवळाढवळ करायचा नाही. त्यामुळे तो नसला तरी चालेल आणि नसेलही कदाचित असं मत होऊ लागलं होतं. पण ताजीची गौर बघितली की तिच्या गौरीपुरता तरी देव असावा असं वाटायचं. तिचा उत्साह, तिची गडबड, सुनांना सारख्या सारख्या दिलेल्या आज्ञा, साड्या, फराळ हे सगळं बघून मला आपली आई पण अशीच हवी होती असं वाटायचं. पण त्याचबरोबर, दोन मुखवट्यांसाठी केलेला हा खटाटोप पाहून, "हे नक्की कुणासाठी चाललंय?" असा प्रश्नही पडायचा. पण गौरी-गणपतीच्या वेळी कोल्हापुरात मला फार मजा यायची. त्यामुळे देव नसला तरी देवासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. पुढे मोठी झाल्यावर कुसुमअज्जीची शांत भक्ती मला बघायला मिळाली. तिचा शेगावच्या गजानन महाराजांवर फार विश्वास होता. कुठल्याही संकटातून ते तिला बाहेर काढू शकतात असं तिचं अगदी प्रामाणिक मत होतं. कधी अडचण आली की एखाद्या कोपर्‍यात ती शांतपणे त्यांची पोथी वाचत बसायची, आणि कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा.
माझे पी.एच. डीचे गाईड नास्तिक आहेत. ’देव नाही’ हे सिद्ध करायला त्यांनी इतकी पुस्तकं वाचलीयेत की देवसुद्धा गालातल्या गालात हसत असेल! लहानपणी प्रत्येक पुणे-कोल्हापूर प्रवास मनात एक छोटंसं परिवर्तन घडवून आणायचा. मग हळूहळू लोकांच्या देवाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या भक्तीकडे बघणं सोपं वाटू लागलं. एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले.
आणि मग आपण ज्या बुडबुड्यात वावरतो आहोत, त्या जगातल्या माणसांच्या भक्तीवर उगीच आधुनिक शास्त्राचे वार करू नयेत हे कळू लागलं. तसंच जेव्हा आधुनिक शास्त्राच्या बुडबुड्यात वावर असेल तेव्हा तिथल्या माणसांना निरागस भक्तीचा महिमा सांगण्यातही काही अर्थ नसतो, हेदेखील कळू लागलं. कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत.
त्यामुळे दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते!

Monday, June 7, 2010

एकला चोलो रे!

"तुला एकटीला कंटाळा नाही येत घरी?"
या प्रश्नाची लहानपणी मला सवय झाली होती. आणि मी अगदी दोन वर्षांची असल्यापासून त्याचं उत्तर ठाम ’नाही’ असं होतं. घरात किंवा घराच्या आजूबाजूला एकटं असण्यासारखं दुसरं सुख जगात नाही. एकटीने करायच्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. मग तो नाचाचा सराव असो किंवा मांजरीच्या पिलाशी खेळणे असो. मला तिथे दुस-या कुणाचाही सहभाग आवडायचा नाही. माझ्या या वृत्तीला घाबरून आई-बाबांनी माझं नाव "बालभवन" या खेळ-गृहात घातलं. तिथे म्हणे प्रवेश मिळायला खूप वेळ वाट बघावी लागायची. मला तो प्रवेश मिळाल्यावर आईला खूप आनंद झाला होता. पण तिथे जायला लागल्यापासून आठवड्याभरातच मला तिथे अज्जिबात जाऊ नये असं वाटू लागलं. मग विमलमावशी मला सोडायला जायला तयार होताच मी पलंगाखाली जाऊन बसायचे आणि बालभवन मधून परत यायच्या वेळेपर्यंत बाहेरच यायचे नाही. थोडे दिवसांनी मी त्या अडचणीच्या जागेत माझ्या बाहुल्या, भातुकली अशा सगळ्या वस्तू नेऊन ठेवल्या. शाळेत मला जी काय सामूहिक कृत्यं करावी लागायची ती माझ्या दृष्टीने माझ्यासाठी पुरेशी होती. घरी येऊन पुन्हा सामूहिक खेळात भाग वगैरे घ्यावा लागला की मला जाम रडू यायचं. पण मी "एकुलती एक" आहे हे माझ्या आई-बाबांच्या मनावर समाजाने पुन्हा पुन्हा बिंबवल्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत असतील कदाचित.
सगळ्यात आवडती एकटीने करायची गोष्ट म्हणजे गाणी ऐकणे. बाबांनी मला रवींद्रनाथ टागोरांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणल्या होत्या. घरी कुणी नसताना मी नेहमी बंगाली गाणी ऐकायचे. त्यातलं 'आमी चीनी गो चीनी' माझं सगळ्यात लाडकं गाणं! दुपारी शाळेतून घरी आले की मला ओट्यावर चढून चहा करायची फार हौस होती. बाबाचं बघून मी छोट्या किसणीने आलंसुद्धा घालायचे माझ्या चहात. मग आई-बाबांच्या खोलीच्या खिडकीत बसून मला चहा आणि खारी खाता यायची मन लावून. तसंच मला बाहेरच्या पेरूच्या झाडाचा पाला खायलासुद्धा फार आवडायचं! पेरूची पानं पेरुसारखीच लागतात!
आमच्या उद्योग बंगल्याच्या मागच्या बाजूला एक घसरगुंडीसारखं नारळाचं झाड होतं. त्या झाडावर चढायलाही मला फार आवडायचं.
माझ्याकडे थ्री लिटील पिग्स नावाचं गोष्टीचं पुस्तक होतं. त्यात तीन अतिशय गोड डुकराची पिल्लं घर सोडून जातात. त्यांचा हेतू घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहणे हा असतो. पण निघताना सामान भरायला दप्तर न घेता ती पिल्लं बोचकी घेतात. आणि प्रत्येक बोचक्याला एक लांब काठी लावलेली असते. ते बघून मीदेखील घर सोडून जायचं ठरवलं होतं. मग आई बाबा नसतील तेव्हा मी एका रुमालात माझ्या बांगड्या, पेन्सिली, सर्दी झाली तर व्हिक्स, अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवून बोचकं करायचे. आणि ते एका लांब काठीला लावून घराभोवती फिरायचे. एकदा विमलमावशी गिरणीत गेली होती. ती संधी साधून गेटवर चढून मी सरळ रस्त्यांनी माझं बोचकं घेऊन चालू लागले. कोप-यावर मला विमलमावशी भेटली. तिनी मला काही बोलायच्या आधी मीच, "अगं विमलमावशी, एकटी कुठे चालली आहेस? हरवशील!" असं वाक्य टाकून दिलं. त्यावरून अगदी परवापर्यंत घरात माझी थट्टा व्हायची!
एकटेपणातली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कलिंगड खाणे. कलिंगड खाण्यासाठी मी मला नको असलेल्या सगळ्या गोष्टी आधी संपवायचे. आणि आपण घरी एकटे असणार आहोत आणि आपल्याबरोबर आईनी चिरून ठेवलेलं कलिंगड आहे ही भावना फार सुंदर असायची. मग ती कलिंगडाची चंद्रकोर घेऊन मी पेरूच्या झाडाखाली जाऊन बसायचे. आणि बिया गालात साठवून ठेवायचे. मग शेवटी बियांचा फवारा हवेत उडवायचे. आंबा, कलिंगड, अननस असली फळं घरात खाणं म्हणजे त्यातली निम्मी मजा हिरावून घेण्यासारखं आहे. आंबा घरात बसून खाताना सारखा आईचा पहारा असायचा. भिंतीला हात लावायचा नाही, कपड्यांना हात लावायचा नाही, पलंगाच्या जवळ जायचं नाही, या आणि अशा अनेक अटी असायच्या. त्यामुळे बागेत बसून एकटीने असल्या गोष्टी करायला फार मजा यायची.
आमच्या घराबाहेर एक मोठा हौद होता. त्या हौदात पाय सोडून बसायला मला फार आवडायचं.
गच्चीत बसून साबणाचे फुगे उडवायलाही मला आवडायचं. ही गोष्ट मी स्नेहाबरोबरसुद्धा करायचे. पण एकटीने करण्यात वेगळीच मजा होती. हवेत फुग्यांचा घोळका सोडून त्याच्याकडे तो दिसेनासा होईपर्यंत बघायला मला खूप आवडायचं. त्यातले काही फुगे पाणी जास्त झाल्यामुळे लठ्ठ मुलांसारखे आधीच शर्यत हरायचे. काही मोठे होऊन इंद्रधनुषी बनायचे आणि हवेत नाहीसे व्हायचे अचानक! काही काही फुगे जुळे असायचे. आणि त्यांच्याकडे बघायला मला फार मजा वाटायची. मी नेहमी सारस बागेतून हट्ट करून फुगेवाल्याची ती साबणाची डबी विकत घ्यायचे. पण त्या तारेतून फुगेवाल्यासारखे फुगे कधीच निघायचे नाहीत माझ्याच्यानी. बाबा मात्र मस्त फुगे काढायचा त्यातून. मग त्यानी खोलीभर पसरलेले फुगे मी पकडायचा प्रयत्न करायचे.
मोठी होताना माझा हा एकटेपणा माझ्या मैत्रिणींनाही जाणवायचा. एखाद्या दिवशी मधल्या सुट्टीत बाहेर भटकण्यापेक्षा मला उत्सुकतेच्या शिखरावर नेणारं पुस्तक संपवावसं वाटायचं. मग सगळ्या मैत्रिणींना मी विचित्र आहे असं वाटायचं. पण दिवसातले काही तास एकटेपणात घालवले की उगीचच कुठूनतरी एक अदृश्य शक्ती मिळते. साहस, कष्ट, नियमितपणा, काटकसर, संयम असल्या प्रसिद्ध गुरूंच्या मानाने एकटेपणा फारच उपेक्षित आहे. पण काहीही न बोलता, कुणाशीही चर्चा न करता, पुन्हा पुन्हा तोच विचार वेगळ्या नजरेतून बघण्याची दिव्य शक्ती फक्त एकटेपणाच देऊ शकतो. त्याला आपला मित्र बनवलं की मनातली भीती, शंका, द्वेष हे सगळे नको असलेले शत्रू पळून जातात. आपल्यात दडलेल्या कवीशी, समीक्षकाची आपलीच ओळख होते. पण असा आनंदी एकटेपणा लगेच शिष्टपणा करू लागतो, महाग होतो! आणि एकटेपणाची भीती गेल्यानेच की काय कोण जाणे, एकटेपणापासून दूर नेणारे प्रेमळ सखे सोयरे भेटतात!