माझ्या आयुष्यातल्या पहिल्या काही आठवणींमध्ये ताजीचा कुंकू लावायचा कार्यक्रम आहे. मुडशिंगीच्या तिच्या खोलीत सकाळी दारातून तिरकं ऊन यायचं. आमचं घरही कौलारू होतं, आणि दर दहा-बारा कौलांमागे एकाला काच बसवलेली असायची. त्या काचेतूनही ऊन यायचं. त्या उन्हाच्या झोतात असंख्य धुळीचे कणही दिसायचे. पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं. त्या पहिल्या उन्हात, ताजी आरशात बघून मन लावून कुंकू लावायची. आधी मेण, मग कुंकू, मग मेणाच्या हद्दीपलिकडलं कुंकू पुसून बरोब्बर गोल करायची. कधी कधी वाटायचं, ते तिरकं ऊन तिच्या भुवयांमधूनच येतंय! त्यामुळे मला लहानपणी टिकलीचं फार आकर्षण होतं. स्नेहा रोज टिकली लावायची, म्हणून मी पण लावू लागले. तिच्याकडे वेगवेगळी रंगीत गंधं असलेली एक मोठी डबी होती. त्यात छोट्या छोट्या बाटल्या होत्या आणि त्या सगळ्यांना एकच मोठं झाकण होतं. आम्ही त्या गंधाच्या बाटल्यांचा खूप सदुपयोग आणि दुरुपयोग केला. कधी झोपलेल्या चिकूदादाला मिशा काढायला तर कधी बाहुलीचं लग्न लावायला. पण टिकली हा माझ्या बाल-आयुष्यात कधीच वादाचा विषय नव्हता. कधी कधी अज्जीबरोबर फुलं वेचायला जाताना मी अंघोळ करून, परकर-पोलकं घालून, टिकली लावून जायचे. पण पुण्याच्या शाळेची हवा लागताच माझ्या मनात टिकलीबद्दल बरेच प्रश्न येऊ लागले. शाळेतल्या मुली टिकलीवाल्या मुलींना थेट काकू पदावर ठेवायचा. त्यामुळे टिकली लावणार्या मुलींचा वेगळा गट असायचा. एखाद्या दिवशी मजा म्हणून शाळेत टिकली लावून गेलं की तो सगळा दिवस, "आज टिकली का लावलीस?" आणि त्यानंतर एकमेकींकडे बघून केलेल्या खुणा पाहण्यात जायचा. टिकली न लावायची सवय होईपर्यंत सुट्टी यायची आणि मग पुन्हा टिकलीवाल्या जगात जावं लागायचं. बरीच वर्षं कपाळावरच्या या पिटुकल्या ठिपक्याची नेमणूक आणि बरखास्ती फार गाजावाजा न करता चालू होती. पण मग तेरा-चौदा वर्षांची झाल्यावर अचानक काय झालं माहिती नाही. कुणी "सई टिकली लाव", असं सांगितलं की डोक्यात एकदम वीजच चमकायची. कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा केंद्रबिंदू होऊन बसला होता!
'टिकली का लावायची?' या प्रश्नाची खूप उत्तरं मिळाली.
"आपण हिंदू आहोत सई."
"भारतीय संस्कृती आहे ती. जपायला हवी."
" मोकळं कपाळ अपशकुनी दिसतं."
"भरल्या घरात हातात बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली असावी!"
"तुझ्या भुवयांमध्ये देवानी जागा का सोडली असेल? टिकलीसाठीच!"
पण या कुठल्याच कारणानी टिकली माझ्या कपाळी टिकली नाही. मग काही वर्षं मला टिकली लावायचा, बांगड्या घालायचा आग्रह न करण्यात गेली. पण मग माझ्या मोकळ्या कपाळाकडे जराही लक्ष न देता माझ्या आजूबाजूच्या बायका टिकल्या लावत राहिल्या. कुणाचं कुंकू, कुणाची लांबुडकी डिंकवाली गडद लाल, कुणाची मोठ्ठी गोल, कुणाची पुरळवजा, कुणाची नवीन फॅशनेबल चांदणी, कुणाची पेशवेकालीन चंद्रकोर! आणि या टिकल्या माझ्याकडे बघून वेडावून दाखवतायत असं मला सारखं वाटू लागलं. मग सतरा-अठरा वर्षांची झाल्यावर मी हळूच पुन्हा टिकली लावू लागले. पण हे करताना आई-अज्जीच्या डोळ्यावर येणार नाही याची खात्री करावी लागायची. कारण माझ्या साध्या बदललेल्या मताला लगेच 'दुर्गा झाली गौरी' चा सूर यायचा. पण पुढे आयुष्यातले बाकीचे बिंदू जुळवण्यात टिकलीचा विसर पडला आणि तिचा तिटकारा आणि वेड दोन्ही संपुष्टात आले.
पण या टिकलीसारख्या आणखीही बर्याच गोष्टी होत्या ज्या लहानपणी उगीचच नाकारल्या गेल्या. आता त्याचं हसू येतं.
देव आहे की नाही हे ठरवण्यात माझं बरंच बालपण वाया गेलं. माझ्या मैत्रिणींच्या आया त्यांना बरोब्बर सहा वाजता 'शुभंकरोती' म्हणायला बोलवायच्या. पण माझे आई बाबा माझ्यावर असली काहीच वळण-प्रधान सक्ती करायचे नाहीत. आमच्याकडे देवाची पूजा व्हायची सकाळी तेवढंच. 'देवाचं करणे' या दोन शब्दांचा अर्थ मला अजून नीट कळला नाहीये. लहानपणी संस्कृत पाठांतर स्पर्धेत मी खूप स्तोत्रं म्हणायचे. पण तीच स्तोत्रं मी कधी देवासमोर बसून म्हटली नाहीत. देव माझ्या पुण्यातल्या आयुष्यात फार ढवळाढवळ करायचा नाही. त्यामुळे तो नसला तरी चालेल आणि नसेलही कदाचित असं मत होऊ लागलं होतं. पण ताजीची गौर बघितली की तिच्या गौरीपुरता तरी देव असावा असं वाटायचं. तिचा उत्साह, तिची गडबड, सुनांना सारख्या सारख्या दिलेल्या आज्ञा, साड्या, फराळ हे सगळं बघून मला आपली आई पण अशीच हवी होती असं वाटायचं. पण त्याचबरोबर, दोन मुखवट्यांसाठी केलेला हा खटाटोप पाहून, "हे नक्की कुणासाठी चाललंय?" असा प्रश्नही पडायचा. पण गौरी-गणपतीच्या वेळी कोल्हापुरात मला फार मजा यायची. त्यामुळे देव नसला तरी देवासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. पुढे मोठी झाल्यावर कुसुमअज्जीची शांत भक्ती मला बघायला मिळाली. तिचा शेगावच्या गजानन महाराजांवर फार विश्वास होता. कुठल्याही संकटातून ते तिला बाहेर काढू शकतात असं तिचं अगदी प्रामाणिक मत होतं. कधी अडचण आली की एखाद्या कोपर्यात ती शांतपणे त्यांची पोथी वाचत बसायची, आणि कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा.
माझे पी.एच. डीचे गाईड नास्तिक आहेत. ’देव नाही’ हे सिद्ध करायला त्यांनी इतकी पुस्तकं वाचलीयेत की देवसुद्धा गालातल्या गालात हसत असेल! लहानपणी प्रत्येक पुणे-कोल्हापूर प्रवास मनात एक छोटंसं परिवर्तन घडवून आणायचा. मग हळूहळू लोकांच्या देवाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या भक्तीकडे बघणं सोपं वाटू लागलं. एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले.
आणि मग आपण ज्या बुडबुड्यात वावरतो आहोत, त्या जगातल्या माणसांच्या भक्तीवर उगीच आधुनिक शास्त्राचे वार करू नयेत हे कळू लागलं. तसंच जेव्हा आधुनिक शास्त्राच्या बुडबुड्यात वावर असेल तेव्हा तिथल्या माणसांना निरागस भक्तीचा महिमा सांगण्यातही काही अर्थ नसतो, हेदेखील कळू लागलं. कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत.
त्यामुळे दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते!
खूप सुंदर, टिकली वरून सुरु होऊन कधी मनात पोहोचलं कळलच नाही. हे टिकलीच व्रत आमच्या घरी पण अगदी कसोशी नि पाळलजात. मला आठवत नाही US ला यायच्या आधी मी टिकली लावली नाही असा एकही दिवस नसावा. आता इथे मीटिंग ला skirt वर टिकली कोण लावण शक्य नाही म्हणून.. पण पोस्ट चा फ्लॉव खूप सुंदर आहे, टिकली लावण्यावरून ते देवावरच्या श्रद्धेपर्यंत.. BTW शेगावच्या गजानन महाराजांवर माझा पण प्रचंड विश्वास आहे. जमल तर इथे नक्की भेट देऊन पहा.
ReplyDeletehttp://manatun.wordpress.com/2009/11/14/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80/
hehehe Dev aahe hyavar an naahiye hyavar khoop vachly pan jyachee shraddha aahe tyachyasaathi dev aahech he patly!
ReplyDeleteदरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते!
>> :D :D
Mastach...!!!
ReplyDelete>>>दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते! he khoopach aawadale.... :)
कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा केंद्रबिंदू होऊन बसला होता!
ReplyDeleteHAHAHA....
टिकली जर कपालावर नाही टिकली तर ती कसली टिकली
ReplyDeleteमहान अस्तित्वचाचा केन्द्रबिन्दु त्याचेच अस्तित्व हरवुन बसला.आता तुम्ही मुलीनीच टिकली बचाव मोहीम सुरु करायला हवी.
सुंदर. शेवटचा संपूर्ण परिच्छेद खूप आवडला.. !!
ReplyDelete>>कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत.
हे तर खासच..
"कधी अडचण आली की एखाद्या कोपर्यात ती शांतपणे त्यांची पोथी वाचत बसायची, आणि कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा."
ReplyDeletehow nice.. n how true..
हाय सई
ReplyDeleteआई ने काँमेंट लिहला तेव्हाच मी लिहीणार होतो पण राहून गेल.
साध्या टिकलीच्या माध्यमातून तू मांड्लेल तत्वज्ञान भावल.
"लहानपणी प्रत्येक पुणे-कोल्हापूर प्रवास मनात एक छोटंसं परिवर्तन घडवून आणायचा. मग हळूहळू लोकांच्या देवाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या भक्तीकडे बघणं सोपं वाटू लागलं. एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले."
अप्रतीम!
सई केवळ अप्रतिम,
ReplyDeleteकिती छान आणि साध्या भाषेत पण तितकेच मना - मनातले लिहितेस ...
माझ्या आजीचाही कुंकू लावायचा सोहळा मला आठवतोय तीही अशीच साग्रसंगीत कुंकू लावायची आधी मेण मग कुंकू वगैरे...
काही आवडलेली वाक्ये ->
1) पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं.
2) पण पुढे आयुष्यातले बाकीचे बिंदू जुळवण्यात टिकलीचा विसर पडला आणि तिचा तिटकारा आणि वेड दोन्ही संपुष्टात आले.
3) कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा.
4) एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले.
5) आपण ज्या बुडबुड्यात वावरतो आहोत, त्या जगातल्या माणसांच्या भक्तीवर उगीच आधुनिक शास्त्राचे वार करू नयेत हे कळू लागलं. तसंच जेव्हा आधुनिक शास्त्राच्या बुडबुड्यात वावर असेल तेव्हा तिथल्या माणसांना निरागस भक्तीचा महिमा सांगण्यातही काही अर्थ नसतो, हेदेखील कळू लागलं. कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत. -> हा तर अप्रतिम Climax आहे ...
तसा मला काही फारसा कळत नाही .. पण ह्या लेखाचा साहित्यिक मूल्य तुझ्याच इतर लेखांपेक्षा काकणभर जास्तच असेल असा आपला मला वाटून गेलं ...
@manatun, Deep, maithili, makarand and Heramb
ReplyDeleteThanks for the comments
@Aai,
Thankoo aai, we will try our best. :P
@Jadi Thanks..:) Finally you figured out how to comment. :P
@Baba
Kuthe hotas itke diwas!! Thankoo. :)
@Satya,
Haha, bapre sahityik mulya wagaire shabda aikle ki mala bhiti watte. :)
But thanks a lot for all your comments. It really inspires me to keep going and all comments really mean a lot to me. Although these days PhD is keeping me on my toes and not letting me reply to the comments right away.
Thanks everyone. :)
खूप छान! देव आहे की नाही याविषयी वाद घालण्यापेक्षा जे छान वाटतं, मनाला आनंद, समाधान आणि शांतता देतं ते मान्य करणं जास्त सोपं, प्रामाणिक असतं. ते तू खूप सुंदर रीत्या मांडलं आहेस....
ReplyDelete@Amruta,
ReplyDeleteThanks. :)
Ithe navin ahes ka? I saw a visit from Milpitas,CA. Do you live there?
Cheers
Saee