Sunday, June 20, 2010

साधी माणसं

कोल्हापुरात खूप वर्षं जयश्री गडकर मर्लिन मन्‌रोच्या पदावर होती. अरूमामासमोर तिचा विषय काढला की एक तास तरी सत्कारणी लागायचा.
"सई, जयश्री गडकर काय होती म्हणून सांगू!"
खरं तर ती काय होती हे मला लहानपणापासून छान समजलं होतं. पण अरूमामाला हे सांगण्यात काही अर्थ नसायचा.
"तुमची ती रेखा, ती जयाप्रदा, ती माला शिना, ती श्रीदेवी, सगळ्या बाद आमच्या गडकरबाईपुढं".
कोल्हापुरातले लोक 'बाद' हा शब्द जितक्या तिरस्काराने वापरतात तितके महाराष्ट्रातले दुसरे कुठलेही मराठी भाषिक वापरत नसतील.
कोल्हापुरात उन्हाळ्यातल्या दुधापासून ते तरुण वयातल्या लेकापर्यंत सगळं 'बाद' होऊ शकतं.
पुण्यात, "अहो बापटांचा थोरला मुलगा म्हणे वाया गेला! बारावीत फक्त सत्तर टक्के मिळाल्यामुळे त्याला बी. एस. सी. ला जावं लागलं म्हणे!"
हे वाक्य लोक दबक्या आवाजात बोलतात. पण कोल्हापुरात मात्र याच प्रकारचा संवाद असा होऊ शकतो.
"ते पाटलाचं दोन नंबरचं पोरगं म्हायताय काय तुला?"
"व्हय म्हायत्याय की. ते कुस्ती तेन शिकायचं त्ये न्हवं?"
"व्हय. पार बाद झालं."
यानंतर जवळच्या कोपर्‍यात तंबाखूची पिचकारी, आणि नाट्यमय शांतता.
"म्हंजी? काय क्येलं त्यानं?"
"बामनाच्या पोरीला पळीवलं आन्‌ मग दोगांचंबी बा त्यास्नी घरात घेईनात."
"आ?"
"आता पतपेढीत कारकुनी करतंय. कुस्ती बिस्ती पार बंद झाली. तब्येतबी लई उतरली या झंगटापाई!"
तीन तासाच्या सिनेमावर पुणेकर सहा तास टीका करू शकतात, पण कोल्हापुरातले लोक मात्र
"बाद हाय पिच्चर" या तीनच शब्दांत सिनेमाचं काम तमाम करतात.
आई मोठी होत असतानाचा काळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ होता. साधी माणसं, मराठा तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा, सांगत्ये ऐका, मानिनी हे सगळे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्या काळी बनले. तमाशाला मोठा रंगमंच मिळाला आणि प्रतिष्ठाही मिळाली. आमच्या घरात चित्रपट-वेड रुजवणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती म्हणजे ताजी. आई लहान असताना तिला काखोटीला मारून ताजी तिच्या मैत्रिणींबरोबर सिनेमाला जायची. त्या सगळ्या नेहमी आईच्या आणि तिच्या या प्रेमाची थट्टा करायच्या. पण आईला जशी गीता पाठ करायला लावणारी आणि शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावणारी सख्खी आई मिळाली, तशीच तिला कडेवर घेऊन जयश्री गडकरचे सिनेमे बघायला नेणारी ताजीसुद्धा मिळाली. मराठी "चित्रपटसृष्टीत" आणि आमच्या घरात फक्त एका गल्लीचं अंतर होतं, कारण दहाव्या गल्लीत ताजीची जवळची मैत्रीण राहायची आणि तिचे यजमान म्हणजे माधव शिंदे. त्यामुळे कुठला सिनेमा कधी येणार याची ताजीला आधीच खबर मिळायची, आणि कुठली नटी कुठल्या नटावर भाळली आहे हेदेखील तिला फिल्मफेअर वगैरे न वाचताच कळायचं!
तसंच सूर्यकांत मांढरेंची बायको आमच्या ताजीची सख्खी मैत्रीण होती. त्यांचं त्रिकूट सगळीकडे प्रसिद्ध होतं. या गाढ मैत्रीचं फळ म्हणून की काय, आमच्या घरातल्या सगळ्या पोरांना ’धर्मकन्या’ नावाच्या सिनेमात काम करायला मिळालं. आई तेव्हा नऊ वर्षांची होती आणि तिचं अभिनयकौशल्य सगळ्यात सरस असल्यानं तिला चिंगीचं काम मिळालं. ’कुटुंबनियोजन न केल्यामुळे होणारी फरफट’ हा त्या सिनेमाचा विषय होता, आणि त्यामुळे मिळतील तितकी पोरं कमी अशी गत होती. मग कुसुमअज्जीच्या सगळ्या शंकांचं निरसन करून आईला सिनेमात घेतलं. त्यासाठी तिला एक जुनं परकर-पोलकं ठिगळं लावून घालायला लागायचं. ते नेमकं तिच्या मोठ्या मावशीनं तिला शिवलं होतं. एके दिवशी आपली लेक सिनेमात गेलीये याचं कौतुक करायच्या आनंदात कुसुमअज्जीनी तिच्या बहिणीला, "अगं तू दिलेलं परकर-पोलकं तिच्या रोलमध्ये बरोब्बर बसलं बघ."
असं सांगितल्यावर तिच्या बहिणीनी, "याचा अर्थ काय समजायचा मी?" असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला होता!
आईच्या सिनेमाच्या गोष्टी माझ्या लहानपणी मी हजारोवेळा ऐकल्या असतील. त्यातली नटी अनुपमा प्रत्यक्षात किती सुंदर होती, तिचे केस किती लांब होते, नरुमामाला कसं एकट्यालाच श्रीमंत मुलाचं काम मिळालं होतं हे सगळं सारखं सारखं ऐकायला मला फार आवडायचं. आई शाळेतून परस्पर शूटींगला जायची कारण अज्जीनी शाळा बुडवून सिनेमात काम करायला बंदी केली होती. त्यात आई, ती घरी येऊन पुन्हा अभ्यास करून कशी झोपायची हे कपोलकल्पित वाक्य टाकून द्यायची माझ्यावर दबाव आणायला. पण ते मी या कानांनी ऐकून त्या कानांनी सोडून द्यायचे.
त्या सिनेमात चंद्रकांत गोखल्यांनी आईच्या बाबांचं काम केलं होतं. योगायोगाने पुढे आम्ही त्यांच्याच बिल्डींगमध्ये राहायला गेलो. तेव्हा आई पन्नाशीला आली होती आणि ते जवळपास नौव्वद वर्षांचे होते. पण ते आईला चिंगी म्हणूनच हाक मारायचे. दारात येऊन, "चिंगी कुठाय आमची?" म्हणून विचारायचे.

मोठी होताना मला आईनी हे सगळे चित्रपट आवर्जून दाखवले. आणि ते मला खूप भावलेदेखील. मग दरवर्षी अरुमामाच्या मळ्यात गेल्यावर तो मला मराठी गाणी म्हणायला लावायचा. मी आणि आई कधी कधी त्याच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांशेजारी बसून, "दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी, पाजिते रान सारं मायेची वयनी" म्हणायचो आणि अरूमामा अगदी भजन ऐकल्याच्या थाटात ते ऐकायचा.
जेव्हा जेव्हा आईचं "गोड गोजिरी लाज लाजरी" हे गाणं पाहते, तेव्हा मला उगीचच भरून येतं. असं सरळसोट बालपण मिळालेले लोक बघितले की आईच्या बालपणाचं खूप कौतुक वाटतं. आमच्या कोल्हापूरच्या घरात सगळ्यांकडे असतात तसे सबंध कुटुंबाचे सहलीवर काढलेले फोटो कुठेच दिसत नाहीत, किंवा एखाद्या खोलीत अज्जी-आजोबांच्या लग्नाचा फोटो सुद्धा दिसत नाही. पण त्या कुटुंबांनी मिळून जे जे काय केलं ते कुठल्याही चौकोनी कुटुंबांनी केलं नसतं. आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला. कधी एकाच माणसाच्या स्वार्थासाठी तर कधी सगळ्यांच्या हितासाठी, तर कधी फक्त आनंदासाठी. आणि प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकवून गेला. मी आणि माझी मामेभावंडं येईपर्यंत सगळी वादळं निवळली होती. पण तरीसुद्धा वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कुटुंबांनी किती असामान्य गोष्टी करून दाखवल्या आहेत हे पाहिलं की वाटतं, ’जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’ हे वाक्य नुसतं बरं वाटावं म्हणून नसतील म्हणत!

8 comments:

  1. "आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला." .. फार सुरेख! :)

    'उन्हाळ्याच्या सुट्टी'बद्दल तुला धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत :)

    ReplyDelete
  2. "आमच्या कोल्हापूरच्या घरात सगळ्यांकडे असतात तसे सबंध कुटुंबाचे सहलीवर काढलेले फोटो कुठेच दिसत नाहीत, किंवा एखाद्या खोलीत अज्जी-आजोबांच्या लग्नाचा फोटो सुद्धा दिसत नाही. पण त्या कुटुंबांनी मिळून जे जे काय केलं ते कुठल्याही चौकोनी कुटुंबांनी केलं नसतं. आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला. कधी एकाच माणसाच्या स्वार्थासाठी तर कधी सगळ्यांच्या हितासाठी, तर कधी फक्त आनंदासाठी. आणि प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकवून गेला. मी आणि माझी मामेभावंडं येईपर्यंत सगळी वादळं निवळली होती. पण तरीसुद्धा वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कुटुंबांनी किती असामान्य गोष्टी करून दाखवल्या आहेत हे पाहिलं की वाटतं, ’जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’ हे वाक्य नुसतं बरं वाटावं म्हणून नसतील म्हणत!"
    सई खुप छान व्यक्त केल आहेस! गोड गोजीरी अपलोड केल्याबद्द्ल धन्यवाद

    ReplyDelete
  3. तीन तासाच्या सिनेमावर पुणेकर सहा तास टीका करू शकतात, पण कोल्हापुरातले लोक मात्र
    "बाद हाय पिच्चर" या तीनच शब्दांत सिनेमाचं काम तमाम करतात. >> :haahaa: sahee lihilayes :)
    Tujha blog regular vachtoy :)

    - Deeps.

    ReplyDelete
  4. कोल्हापुरचे शब्दचित्र नेहमीप्रमाणेच उत्कटप्रकारे रंगवले आहेस. अजूनही मुंबई-पुण्याच्या जरा बाहेर पडले की बरेचसे सरळसोट जीणे बघायला मिळते. आपण ते नक्की कुठे व का हरवतो ते काही अजून उमगले नाही. ते उमगेपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये त्याचा आनंद घेणे एवढेमात्र नक्की करू शकतो.

    ReplyDelete
  5. @Mandar, Aww. Thank YOU. It is because of readers like you that writers are inspired to write. :)
    @Baba
    Tankoo. Sorry I forgot to call you on Father's day. :(. I don't follow all the days.
    @Pradeep
    Thanks. Welcome to the comment box. :D
    @Shrirang,
    Long time! Kuthe hotas??
    Thanks everyone again. :)

    ReplyDelete
  6. तीन तासाच्या सिनेमावर पुणेकर सहा तास टीका करू शकतात, पण कोल्हापुरातले लोक मात्र
    "बाद हाय पिच्चर" या तीनच शब्दांत सिनेमाचं काम तमाम करतात. -> हे एकदम बरोबर आहे आणि आवडलेही :)

    पण त्या कुटुंबांनी मिळून जे जे काय केलं ते कुठल्याही चौकोनी कुटुंबांनी केलं नसतं. आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला. कधी एकाच माणसाच्या स्वार्थासाठी तर कधी सगळ्यांच्या हितासाठी, तर कधी फक्त आनंदासाठी. आणि प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकवून गेला. मी आणि माझी मामेभावंडं येईपर्यंत सगळी वादळं निवळली होती. पण तरीसुद्धा वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कुटुंबांनी किती असामान्य गोष्टी करून दाखवल्या आहेत हे पाहिलं की वाटतं, ’जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’ हे वाक्य नुसतं बरं वाटावं म्हणून नसतील म्हणत! -> नेहमीप्रमाणे अप्रतिम climax ...

    BTW climax ला मराठी प्रतिशब्द सुचला तर नक्की सांग... कारण मला माहिती आहे तुझ्या ब्लॉगवरती प्रतिक्रिया देण्यासाठी मला सारखा सारखा त्याचा वापर करावा लागणार आहे :)

    ReplyDelete
  7. @ Satya,
    Mala mahit nahi. Apan Gayatrila vicharuya. :D
    Thanks for the comments. :)
    Manapasun!!

    ReplyDelete
  8. सई, हे वाचून २-४ दिवसात मी आई बाबांबरोबर सांगलीला गेले होते आणि टीवी वर पेशव्यांची सिरीयल चालू होती तेव्हा गप्पा मारताना माझा मामा म्हणाला "२ पेशवे एकदम बाद निघाले " मी हसून हसून लोळायची बाकी होते.

    ReplyDelete