Saturday, August 21, 2010

आमची यशोधन

मी लहान असताना कधीतरी शाळेतल्या एका अगाऊ पोरानी पुण्यातल्या श्रीमंतीचे स्तर समजावून सांगितले होते.
"ज्यांच्या आजोबांनी बंगला बांधलेला असतो ते गर्भश्रीमंत"
"ज्यांचे बाबा बंगला बांधतात ते खूप जास्ती श्रीमंत"
"ज्यांचे बाबा नवी चार चाकी गाडी घेतात ते खूप श्रीमंत"
"ज्यांचे बाबा सेकंड हॅन्ड चार चाकी गाडी घेतात ते नुसते श्रीमंत"

यात शेवटी "ज्यांचे बाबा गाडी, बंगला सगळं एकदम घेतात ते मराठी नसतात" असं टाकायला हवं होतं त्या पोराच्या बाबांनी. पण ही व्याख्या ऐकून माझ्या वर्गातल्या पोरांचं सामान्य ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही बरीच वर्षं श्रीमंतीच्या या कुठल्याच श्रेणीत नव्हतो. माझ्या बाबाकडे कायनेटिक होंडा होती. त्यावरून आम्ही तिघं मजेत फिरायचो. लहान असताना मला मध्ये बसवून आई-बाबा लांब फिरायला न्यायचे. त्यात फिरण्याची मजा घेण्यापेक्षा आईचं निम्मं लक्ष माझे बूट पायातून निसटून पडणार तर नाहीत, याकडेच असायचं. ही गैरसोय टाळण्यासाठी मला "बुटाचा ड्रेस" आणण्यात आला. त्याला विजारीखाली चिकटवलेले बूट होते. बाहेर जातान मला कपड्यासहित त्या बुटाच्या सुटात कोंबण्यात यायचं. आणि एवढं बांधून ठेवल्यामुळे मी स्कुटरवर बसल्या बसल्या झोपून जायचे. त्यामुळे मग आईचं सगळं लक्ष मला "झोपू नकोस" असं दरडावण्यात जायचं.
पण त्या दशकात मराठी माणूस श्रीमंत झाल्याचं पहिलं लक्षण म्हणजे सेकंड हॅन्ड गाडी. मग तो होतकरू मराठी माणूस नवी गाडी घ्यायचा. पण पहिली गाडी मात्र नवी नसायची. अर्थात माझ्या मित्राच्या व्याख्येनुसार गर्भश्रीमंत लोक नवी फियाट घ्यायचे.

त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या आई-बाबांनीसुद्धा सेकंड हॅन्ड चार चाकी घेतली. पण ती नक्की कितव्या हाती पडली होती हे मात्र गुपित होतं. असेना का! पण प्रश्न तोसुद्धा नव्हता. गाडी किती जुनी आहे यापेक्षा एक अत्यंत बोचरी गोष्ट माझ्या लगेच ध्यानात आली. त्या फियाटवर मागे "यशोधन" असं भगव्या रंगात ठसठशीत अक्षरांत लिहिलं होतं. आता गाडीच्या मागच्या काचेवर असं "यशोधन" का लिहावं? मला वाटलं बाबा ते नक्की काढून टाकेल. आहे काय त्यात? एक काच तर बदलायचीये.

पण गाडी कोल्हापुरात घेतली. त्यामुळे ती घरी आणताच ताजी आणि माझ्या माम्या तिची पूजा करायला आल्या. मग मागे ते लिहिलेलं बघून, "शिरीष हे बदलू नकोस बरंका. ज्या अर्थी असं लिहिलंय, त्या अर्थी नक्की या गाडीच्या पूर्वीच्या मालकाला काहीतरी खूप मोठा लाभ झाला असणार या गाडीमुळे",असं माझ्या तरुण होऊ घातलेल्या मनावर नांगर फिरवणारं मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे पुण्याला येईपर्यंत तरी "यशोधन" तसंच राहणार हे नक्की झालं. मला ना असले शकून बिकून अजिबात आवडत नाहीत. एखादं घर पाहून, "या घरात मला अतृप्त आत्म्यांचा वास येतोय", किंवा "या घरात नक्की गुप्तधन असणार" असं म्हणणारे लोक फार अस्वस्थ करतात. कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं. असू देत अतृप्त आत्मे. मला सांगू नका.

पण गाडीवर असं नाव लिहिलंय याचा मला सोडून कुणालाच त्रास होत नव्हता. स्नेहा सगळ्यांना, "काकी आमची यशोधन बघायला या ना!" म्हणून आमंत्रण देत सुटली. चिकूदादा आमच्याकडे शिकायला होता. तोही, "आत्या आपण पुण्याला यशोधनमधून जायचं?" असं विचारू लागला. त्यामुळे ते नाव हाणून पडायचा माझा बेत डळमळीत होऊ लागला. चार दिवस कोल्हापुरात वेगवेगळ्या देवांना जाऊन आल्यावर "यशोधन" आमच्यातलीच एक झाली. त्यामुळे बाबाला यशोधन नाव काढून टाक हे सांगणं म्हणजे मी किती दुष्ट आणि शिष्ट आहे याचा पुरावा देण्यासारखं झालं असतं. पुण्याला येईपर्यंत बाबासुद्धा, "आधी आपण यशोधनला सिंहगड दाखवूया", वगैरे बोलू लागला. त्यामुळे आपले आई-बाबा नुसत्या श्रीमंतांपासून खूप श्रीमंत होईपर्यंत काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं.

थोडेच दिवसात यशोधनने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. सिंहगडच्या चढावरच तिला पहिला घाम फुटला. मग आईनी गडावरचं मडक्यातलं दही खाऊन झाल्यावर प्यायला आणलेलं उकळलेलं पाणी तिला पाजण्यात आलं. मग प्रत्येक नव्या सफरीत यशोधन नवीन नाटक करू लागली. कधी कधी बाबा उत्साहानी मला शाळेत आणायला येतो म्हणाला की माझ्या पोटात गोळा यायचा. एकतर आमची गाडी उठून दिसायची. आणि एवढी यशोधन लिहिलेली गाडी बंद पडलेली बघायला लोकांना फार मौज वाटायची. ती दुसर्‍याची गाडी असती मलाही वाटली असती!

त्यानंतरच्या काही वर्षांत मोडकी गाडी नवरा-बायकोमध्ये तीव्र मतभेद घडवून आणू शकते याचं आमच्या घरात सातत्याने प्रात्यक्षिक होऊ लागलं. खरं तर नुसतं एका गाडीतून आधी न गेलेल्या ठिकाणी जाणं हेदेखील युद्धाचं कारण होऊ शकतं. त्यात माझी आई काही काही विनोदी प्रश्न विचारून त्या भांडणांमध्ये थोडा खुसखुशीतपणा आणायची.
"मागच्या वेळेस ही इमारत डावीकडे होती! आता उजवीकडे कशी आली?" -आई
"महापालिकेचा वेळ जात नव्हता. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी ती उचलून उजवीकडे ठेवली. पेपरमध्ये नाही का वाचलंस?" - बाबा

एकदा मी आणि बाबा पुण्यातल्या कुठल्यातरी अडचणीच्या पेठेतून चाललो होतो तेव्हा एक सायकलवाला मागून येऊन, "काय राव! एवढी चार चाकी गाडी आणि किती हळू चालवताय!" म्हणून पुढे निघून गेला होता. तेव्हा बराच वेळ बाबाला काय झालं हे नीट समजलंच नव्हतं.

बाबाला गाडीत रेडियो लावून त्याबरोबर गायची सवय आहे. यावरून आमच्या गाडीत खूप मतभेद होतात. शेवटी नेहमी बाबा, "घर की मुर्गी दाल बराबर" हा मुहावरा वापरून गाणं बंद करतो.

मी आणि आईनी यशोधन झेंडे करायचं ठरवलं होतं. जिथे जिथे ती बंद पडेल तिथे तिथे यशोधन झेंडा रोवायचा. आमच्या असल्या कल्पना बाबाला फार दु:खी करायच्या. कारण बाबाचं यशोधनवर फार प्रेम होतं. गाडी बंद पडून धक्का मारायची वेळ आली की ज्या भागात गाडी बंद पडली आहे त्या भागाच्या लोकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करता येतो. पुण्यात गाडी बंद पडली की बाबा बाहेर येऊन काय झालंय हे बघेपर्यंत आजूबाजूला चिक्कार रिकामटेकडे बघे असायचे. पण बाबांनी मदत करायला या अशा अर्थाचे हावभाव केल्याशिवाय कुणीही पुढे यायचं नाही. मदत करतानादेखील त्यांच्या चेहर्‍यावर, "कशाला एवढी गाडीतून फिरायची हौस मग!" असे भाव असायचे.
पण खेडेगावात मात्र गाडी बंद पडली आहे असं लक्षात आल्या आल्या लोक धावून यायचे. आणि आपल्या साथीदारांनाही बोलवायचे. त्यामुळे कधी कधी इतका मोठा धक्का मिळायचा की पहिलं फर्लांग यशोधन धक्क्यावरच चालायची. आणि तिच्या गतीमुळे तिच्यातून उतरलेल्या लोकांना चांगलाच व्यायाम घडायचा. कधी कधी धक्का देणारे लोक आम्हाला त्यांच्या घरात चहाला सुद्धा बोलवायचे. मग बाबा लगेच,

"बघा. गाडी बंद पडल्याची देखील जमेची बाजू आहे. नवीन लोक भेटतात! आपली जर नवी कोरी मारुती (त्या काळी मराठी माणूस मारुतीपलीकडे विचारच करू शकायचा नाही) असती तर आपण या खेड्यातून झुर्र्कन गेलो असतो आणि आपल्याला पाटील दादांना भेटताच आलं नसतं!"
पण आता मात्र मला ही गोष्ट पटते. एका शहरातून दुस-या शहरात झुर्र्कन जाऊच नये.

यथावकाश आम्ही मारुती घेतली. नंतर बदलत्या काळामुळे गाड्यासुद्धा बदलल्या. पण आता गाडी नुसती गाडीच असते. तिला 'यशोधन' असं नाव नसल्यामुळे तिच्याकडे प्रेमानी बघताच येत नाही. आणि कुठेही प्रवासाला जाताना "गाडी बंद पडली तर" हा विचारच होत नाही. यशोधनमुळे गाडी बंद पडली तर काय करायचं याचा खूप सराव झाला होता. त्यामुळे कधी झाडाखाली बसून पुस्तक वाचायचं, कधी जवळच्या कुल्फीवाल्याकडे जाऊन केशर-पिस्ता कुल्फी खायची, कधी गाडी बंद पडल्याचा भावनिक दबाव आणून आईकडून बर्फाचा गोळा उकळायचा, पेरुवाल्या अज्जींची मुलाखत घ्यायची, कुणाच्यातरी शेतात हुरडा खायचा, कासाराकडे बांगड्या भरायच्या, कोकरांशी खेळायचं असले कार्यक्रम करायला वेळच मिळत नाही. :)

आणि गाडी बंद पडल्याच्या या सगळ्या 'जमेच्या बाजू' आता, वेळ वाया घालवायला नको या सदरात येतात. त्यामुळे हल्ली बस उशिरा आली की तेवढा वेळ जास्त पुस्तक वाचायला मिळाल्याचा आनंद होतो. शेवटी सगळा वेळ 'सत्कारणी' लावायची काहीच गरज नसते!

13 comments:

  1. :) मस्त सई! मजा आली!

    ReplyDelete
  2. "कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं." मस्त मजा आली.

    ReplyDelete
  3. वा सई! यशोधनच्या आठवणी ताज्या केल्यास!पहिली गाडी खर तर पहिल्या प्रेमासारखीच असते,एकदम नाँस्टेलजिक!
    तिच्या जश्या बंद पडण्याच्या आठवणी आहेत तशाच तिच्या हैद्राबाद,अलिबाग,कोल्हापूर ट्रिपसच्या पण आठवणी आहेतच कि!

    तुला आठवतय,ताम्हणकर जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे अमेरिकेवरुन आले होते तेव्हा त्यांच्या दिमतीला यशोधनच होती. त्यांनी तिच नाव ’मोडका बाजार’ ठेवल होत.
    छान लिहल आहेस!

    ReplyDelete
  4. हे वाचून मला पण आमच्या यशोधन उर्फ रणगाडा ambassador ची आठवण आली. माझे बाबा मला आणि माझ्या बहिणीला गाडी पार्क केल्यावर सारखे उतारावर गाडी घसरू नये म्हणून दगड लावायला सांगायचे आणि मग आम्हाला टीन agers असल्याने embarassing वाटायचं. आता मात्र त्यांना hand break वर थोडा थोडा विश्वास ठेवावा आस वाटत बहुदा :)

    ReplyDelete
  5. @sushant, baba and Shrirang,
    Thanks.. :)
    Yes. I remember the trip we made to the ashtavinayak with aai's PhD guide. Maybe I can add that later. :)
    @Dhanashree
    hahaha..we had to do similar things. And especially when you are dressed to go to a wedding, it is really funny trying to find a big stone!!
    I preferred a breakdown on Pune-Kolhapur highway any day than in the city. You could even get a nap in the sugarcane fields. :D
    Thanks for the comment!

    ReplyDelete
  6. फार दिवसांनी लिहिलस , खूप आवडलं.
    मी सारखं इकडे चेक करत होतो ...

    ReplyDelete
  7. मस्त अनुभव... अर्थात वाचायला मजा आली तशी गाडी वापरायला आली नसणार.

    माझी छोटीशी लुना होती. पण विमानासारखी चालवायचा छंद.. असो. बरेचदा १००-१५० किमी दामटली होती. आता कळते, की जर मध्ये बंद पडलि असती तर ... ?

    पुण्याचे टिफिकल वर्णन... मी तिथे असतांना २ प्रसंग बघितले होते, असो ते केव्हा तरी पुन्हा ...

    तुम्ही regular लिहित नाहि का ?

    ReplyDelete
  8. sorry, तुम्ही regular का लिहित नाही, असं लिहायचं होतं ;)

    ReplyDelete
  9. @Pradeep,
    Thanks. I was busy with my thesis/experiments this month so could not write. :)
    @Vijay,
    I used to be regular but I have lost my inspiration in recent months. Hopefully I will get it back soon.

    ReplyDelete
  10. त्यात फिरण्याची मजा घेण्यापेक्षा आईचं निम्मं लक्ष माझे बूट पायातून निसटून पडणार तर नाहीत, याकडेच असायचं. ही गैरसोय टाळण्यासाठी मला "बुटाचा ड्रेस" आणण्यात आला. त्याला विजारीखाली चिकटवलेले बूट होते. बाहेर जातान मला कपड्यासहित त्या बुटाच्या सुटात कोंबण्यात यायचं. आणि एवढं बांधून ठेवल्यामुळे मी स्कुटरवर बसल्या बसल्या झोपून जायचे. त्यामुळे मग आईचं सगळं लक्ष मला "झोपू नकोस" असं दरडावण्यात जायचं.
    hahahaha!!! I can imagine a choti Saee wearing butacha dress and sleeping on the kinetic!!
    And- कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं.
    lol!! me khup hasle!!
    sahi lihilayes!! too good!!

    ReplyDelete
  11. ekada amachi TVS loona pawasat adakali...purnpane chikhalamadhe fasun basali...nemaka tevha nagar sarakhya dushkali bhagamadhe evadha pawun ala ki baas...mag kay, mummy-pappanchi ekmekanwar chid chid chalu zali...pan tya evadhyashya gadi war amhi 4 jan mast basun gawo-gawi jaycho :)

    chhan lihila ahe lekh khupach !!

    ReplyDelete