Wednesday, August 25, 2010

फोना-फोनी

साधारण बारावं वर्ष ओलांडल्यानंतर आयुष्यात नवीन-नवीन घडामोडी सुरु होतात. त्यातलीच एक म्हणजे 'फोना-फोनी'. फोन माझ्या ’अल्लड बालिका’ अवस्थेतला फार महत्त्वाचा मित्र होता. आणि अर्थातच माझ्या आई-बाबांच्या ’सुजाण पालक’ अवस्थेतला मोठा शत्रू.
"एवढं काय फोनवर बोलायचं असतं जे शाळेत बोलता येत नाही?"
हा प्रश्न एखाद्या बोचर्‍या कॅक्टस सारखा माझ्या कानाच्या आणि फोनच्या मध्ये उगवायचा. आता या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची झाली तर मला आई-बाबांना एक अख्खी रात्र जागवून माझ्या शाळेतल्या आयुष्यातले सगळे डावपेच समजावून सांगावे लागले असते. आणि तसं करताना माझ्या मैत्रिणींची बरीच गुपितं त्यांना सांगावी लागली असती. त्यामुळे "मी अभ्यासाचं बोलतीये", हे वाक्य ठरलेलं असायचं. आम्ही शाळेतून सायकलवरून एकत्र घरी यायचो. माझ्या घराच्या फाट्यावरून बर्‍याच जणांना वेगळ्या दिशेला जावं लागायचं. त्यामुळे तिथे एका कोपर्‍यावर आम्ही मैत्रिणी घोळका करून थांबायचो. येणार्‍या-जाणार्‍या सुजाण नागरिकांच्या कुजकट नजरा झेलत आम्हाला आमची शेवटची खलबतं करावी लागायची. पण घरी आल्या आल्या मी लगेच अमेयाला फोन लावायचे, किंवा तिचा तरी यायचा.
मग चहा आणि खारी खात असताना फोन वाजला की बाबा, "नक्की अमेयाचा असणार हा फोन. काय एवढं बोलायचं असतं गं? आत्ताच आलीस नं शाळेतून?" असं म्हणत म्हणत फोनकडे जायचा. आणि खरंच तो फोन अमेयाचा असायचा. मग हातात फोनचा रिसीवर धरून बाबा त्याचे मोठे डोळे गोल-गोल फिरवायचा. आपल्याला कशी एखाद्या गोष्टीची सवय होते: कामवाली बाई वेळेवर न येणे, किंवा एखाद्या मैत्रिणीची नेहमी उशिरा यायची सवय, किंवा आजोबांची मोठ्या आवाजात टी.व्ही नाहीतर रेडियो ऐकण्याची सवय, हे सगळं थोडे दिवसांनी दिसेनासं होतं. तशी माझी फोनवर बोलायची सवय कद्धीच दिसेनाशी झाली नाही. उलट दिवसेंदिवस आई-बाबा अजूनच कडक होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या फोनच्या बिलांनी भरलेल्या डोक्यात आम्हाला घरी येऊन लगेच फोन का करावे लागत असतील याचा कुठलाही अंदाज यायचा नाही. त्यांना ते अस्वाभाविक वाटायचं.
पण शाळेत पाच जणींच्या गटात दहा प्रकारे मैत्री होऊ शकते हे आम्ही शाळेतच शिकलो होतो. खरं सांगायचं तर गणितातला तो भाग मला कुणाचं कुणाशी भांडण आहे हे आधी माहिती असल्यामुळे फार सोपा गेला होता. पण खर्‍या आयुष्यात काही पाच मुलींचं कसं जमू शकेल ते बाईंच्या गणितांनी सोडवता यायचं नाही. त्यामुळे कुठल्याही दोन मुली कुठल्याही तीन मुलींच्या विरुद्ध असू शकायच्या. आणि कधी कधी एक विरुद्ध चार अशीही वेळ यायची. त्यामुळे या सगळ्या संभाव्यता लक्षात घेता घरी आल्या आल्या तातडीनी फोन करायला लागणं काही विशेष नव्हतं. त्यात इयत्ता वाढेल तशी गणितंदेखील वाढत गेली. हायस्कूलमध्ये गेल्यावर अचानक मोठे गट तुटून छोटे झाले. आणि मग अंतर्गत भांडणांच्या जोडीला आंतरगट भांडणंदेखील उभी राहिली. त्या कोलाहलात अचानक वर्गातील मुलांशी मैत्री झाल्यामुळे तर परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली. अगदी सुरवातीला आम्ही फक्त कोण बरोबर कोण चूक याचे न्यायनिवाडे करायला फोन वापरायचो. मग शेवटी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फोन करून चूक असलेल्या मुलीची कानउघाडणी करायचा बेत रचायचो. पण नंतर मात्र मुला-मुलींच्या मैत्रीबद्दल इतरांचं काय मत आहे यावर आई-बाबांचे बरेच रुपये खर्ची पडले. मग वर्गातल्या सुंदर मुली आणि त्यांच्यासाठी देवदास बनलेली मुलं याचं बघ्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं विवेचन हा आमचा आवडता खेळ बनला.
मग कुणीतरी विश्वासानी अमेयाकडे सोडलेली मनातली गाठ ती मला विश्वासात घेऊन सांगायची. शाळेपासूनच माझ्याजवळ सगळे गाठी सोडायला यायचे. खरं तर शाळेतल्या या बॉलीवूड सिनेमा युगात माझी कधीच हिरॉईन झाली नाही. पण एकदमच एखादी मैत्रीण मला, "तुला एक गोष्ट सांगू? मी हे अजून कुणालाच सांगितलं नैये..पण.." असं काहीसं अदृश्य पदर हातात खेळवत म्हणू लागली की माझ्या पोटात गोळा यायचा. तसाच एखादा मित्र माझ्या एखाद्या मैत्रिणीवर भाळून कविता वगैरे करू लागायचा. त्यावर अभिप्राय द्यायची जबाबदारीदेखील माझ्यावरच यायची. मग जसे, "सई तो मला असं म्हणाला, मी काय करू?" असे फोन येऊ लागले तसेच मित्रांचे, "सई ती मला असं म्हणाली, याचा मुलींच्या भाषेत अर्थ काय?" असेही फोन येऊ लागले. त्यामुळे मी सायरा बानो झाले नसले तरी तिची घट्ट सलवार घालून सायकल वरून 'खेळायला' जाणारी हुशार मैत्रीण नक्कीच झाले होते. शाळेतल्या एका मुलीवर माझ्या एका मित्राच्या नावानी विनोदी कविता केल्याबद्दल माला मुख्याध्यापिकेच्या समोर उभं करण्यात आलं होतं. त्या कविता वाचून हसू लपवत मला रागावल्या होत्या. आणि त्याच भेटीत असले गुण उधळण्यापेक्षा मी संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता.
पण आमच्या वर्गात अगदी शहाणी, अभ्यासू मुलंदेखील होती. त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी आम्ही आमच्या या टगेपणाला 'समाजात वावरायची हुशारी' असं नाव दिलं होतं. आणि त्यावर आमच्या गटात नेहमी जोरदार चर्चा व्हायची. पण खरं सांगायचं झालं तर मला अभ्यासू लोकांबद्दल मनापासून आदर होता. आणि मी स्वत: अभ्यासू नाही याचं मला थोडं दु:ख व्हायचं. पण अमेया लगेच माझ्या या शंकांचं माझ्यावर दरडावून निरसन करायची. आजही कधी कधी "आपण तेव्हा अभ्यास करायला हवा होता" अशा वाक्यावर आम्ही चुकून येतो. पण त्यानंतर लगेच डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसूदेखील येतं. तेव्हाची फोनवर झालेली चर्चा आठवली की आई-बाबांची खरंच दया येते. का म्हणून त्यांचे एवढे पैसे वाया गेले असतील? आणि तेव्हा देवदास आणि मीना कुमारी झालेली मुलं-मुली आज मस्त सौख्यभरे नांदत आहेत.
तरी माझ्या आई-बाबांच्या पिढीला सेलफोनला चिकटलेली मुलं बघावी लागली नाहीत. आणि फेसबुक, स्काईप असले राक्षसही 'आमच्या काळी' नव्हते. आजची पिढी खलबतं करायला स्काईप कॉन्फरन्स करू शकत असेल त्याचा मला जाम हेवा वाटतो. आमच्या वेळी हे असतं तर सगळी भांडणं एका टिचकीत सोडवता आली असती.
परवा रात्री माझ्या फोनचं बिल पाहून अचानक माझे डोळे पांढरे झाले. एवढे फोन आपण कुणाला केले? आणि आता हे बिल भरून काढण्यासाठी किती तास हमाली करावी लागणार हे शोधून काढताना लक्षात आलं की ते सगळे महागडे फोन आईला केले होते. आणि मग बिलाकडे बघून, "एवढं आपण काय बोललो? आणि आईशी एवढं काय बोलायचं असतं?" असा प्रश्न पडला. आणि दुसर्‍या क्षणी आईचं ते कॅक्टससारखं वाक्य आठवलं आणि खूप छान वाटलं. :)

11 comments:

  1. ४च दिवसात पुढची पोस्ट? मज्जा आहे बुवा आमची. :)
    सई, नेहेमीप्रमाणे छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  2. @shraddha..
    haha. ho. Sadhya maza kam khup kantalvana ahe. So me madhe madhe posts lihite. :D
    Thanks!!

    ReplyDelete
  3. hahaha!! te divas jasechya tase dolyasamor ubhe rahile!! N Aaicha 'eh...attach bhetlat na? mug parat kay bolaycha asta??' mhantanacha chehra pun!
    Tyachyavar upay manje Aai baher geliye he me balconyt jaun confirm karayche and laggech phone kade dhavayche... N aaichya scootercha avaj ala ki phone khali!! :P hahaha!! ata athvun hasu yeta! But tyaveleschi ti sagli khalbata kiti 'mahatvachi' vataychi, nai?!
    Attachya kalche palak tar phone nahi, CELLphone vaparnari mula handle karat astil... So aple aai baba lucky hote asa mhanayla harkat nai na Saee?!!

    ReplyDelete
  4. wow. You are on a roll...keep it rolling

    ReplyDelete
  5. सई,हाच किस्सा मी परवा आँफीस मधे सांगीतला आणि लगेच तुझी त्यावर पोस्ट! काय योगायोग आहे ना!
    त्यात पुन्हा आज चक्क दस्तुरखूद्द अमेयाची काँमेंट! वा भाई वा,आजचा दिवस लई भारी!

    ReplyDelete
  6. आम्हा आई-बाबांची पिढी खूपच सुखी आहे. कारण आम्हाला फक्त external devices शी deal करायला लागले. I can not imagine what Gen Y will have to deal with when their Gen Z kids will come in this world with devices implanted into their brains ;-)))

    ReplyDelete
  7. सई, तुझ्यामुळे मला शाळॆतून घरी आल्याआल्या माझ्या मुलीला फोनवर काय बोलायच असतं ते समजलं.आमच्या वेळी फोन नव्हते पण रस्त्याच्या कोपऱ्यावर सायकली हातात घेवुन मारलेल्या गप्पांची त्या नंतर खाल्लेल्या बोलण्यांची आठ्वण झाली.बाकी तुझे पोस्ट नेहमीसारखेच सुंदर...

    ReplyDelete
  8. सई, किती सुन्दर लिहिले आहेस! तुझ्या पुढच्या लेखाची वाट पहात आहे.

    -मकरन्द कोपरकर

    ReplyDelete
  9. saai taai, mi gayatri natuchi maitrin ahe...nd prasad bokil maza dada ahe...mi yanda 10th madhe shikte
    tuzi goshta khup avadli...karan ti dusri konachi nasun mazi svathachi ahe ase vate....fb skype vagere alla tari bhandana phone varach sodvayla maaja yete ;) ani tu mhanlis tasa ghari allya allya home work vechartie hya karna khali phone kartat........pan parents na he kallatch nahi..:(
    tyanchahi barobar ahe mhana...tyanche bill va amcha vel jato...!!
    pan tuzya hya lekhat hun aaila maze phone var bolnyache karan samajle tari...:)
    thanks...:)

    ReplyDelete
  10. @makarand,
    Thanks..navin lekh lavkarach!!
    @maitreyee,
    Kitttii goad. :) Thanks for the comment. :)
    Tuzyasarkhya "fona-foni" jagat aslelya mulikadun comment mhanje mala mothich shabaski ahe. :)
    Pan jasti bolu nakos han. Yanda dahavicha varsha ahe na.. :)
    Thanks!
    Saee

    ReplyDelete