Saturday, May 29, 2010

जगात काय चाललंय..

लहानपणी नेहमी लवकर उठायला लागल्यामुळे काही गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. सकाळी सकाळी बाबा रेडियो सुरु करायचा. रेडियोचं आणि माझ्या आई-बाबांचं, इतकंच नव्हे तर अज्जी-आजोबांचं नातंही खूप खोल होतं. त्यांच्या लहानपणी टी.व्ही. नसल्यामुळे त्यांचं या बोलणाऱ्या खोक्याशी सख्य होतं. बाबा सकाळी सकाळी बी.बी.सी. रेडियो ऐकतो. त्याचं बी.बी.सी.वर फार फार प्रेम आहे. पण लहान असताना मला, रेडियोवर गप्पा मारणा-या माणसांच्या गप्पा ऐकण्याचं हे वेड अजिबात समजायचं नाही. सकाळी सकाळी बाबा आपला मस्त कानाला त्याचा छोटा ट्रान्सिस्टर लावून चालू लागायचा. मग त्यात गप्पा मारणा-या लोकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा. अशावेळी मला नेहमी आपल्या ऐवजी बाबाला शाळेत पाठवावं असं वाटायचं. त्याला दुसरं काही लाव म्हटलं की लगेच तो, "सई, जगात काय चाललंय ते कळायला नको का?", असा सवाल उपस्थित करायचा. मला तेव्हा खरंच जगात काय चाललं आहे यानी फरक पडायचा नाही, आणि अशी जगाच्या पावलावर पाऊल ठेवायची खुमखुमीदेखील नव्हती. देवानी चांगली रेडियो शोधून काढायची बुद्धी दिली आहे तर त्याचा पूर्ण फायदाही घेता आला पाहिजे, आणि रेडियोचा एकमेव फायदा म्हणजे हिंदी सिनेमाची गाणी ऐकणे, असं माझं त्या काळी ठाम मत होतं. सकाळी चांगला तासभर रेडियो ऐकून झाल्यावर बाबा घरी येऊन तासभर पेपरही वाचायचा. त्यातही तो वेगवेगळे पेपर विकत घ्यायचा. त्यामुळे बाबाचं जगावर फार प्रेम आहे हे मला लहानपणीच समजलं. मग आई-बाबा ऑफिसला जायला तयार होत असताना गाणी लागायची. पण नेमका तेव्हा माझा अभ्यास सुरु असायचा. त्यामुळे मला बाबाचा अजूनच राग यायचा. कोल्हापुरातल्या घरात रेडियो हा भोंग्याचं काम करायचा. सकाळी सकाळी आजोबा अभंग वगैरे जोरात लावून सगळ्या बच्चे कंपनीला उठवायचे. मी त्या घरात कायमची राहिले असते तर मी नक्की नास्तिक झाले असते. पण आजोबांच्या मारून-मुटकून ऐकायला लावलेल्या अभंगांपेक्षा बाबाची बी.बी.सी. खूप चांगली होती. कोल्हापुरात रेडियो सामुदायिक आहे. पण तरीही तो लहान मुलांच्या हाताबाहेर होता. त्यामुळे मला आणि स्नेहाला खुर्चीवर चढून त्याच्या कळा दाबाव्या लागत. तेवढ्यात कुणी मोठी व्यक्ती आली की बळंच आम्हाला ओरडून जात असे. मामी दुपारचे बायकांचे कार्यक्रम चवीनी ऐकायची. नंतर टी.व्ही. आल्यावर, दुपारी मामी टी.व्ही. समोर वही घेऊन बसायची. पाककृती लिहून घ्यायला. तशा रेडियोवरसुद्धा असायच्या. आणि "मैत्रिणींना" लिहून घेता यावं, म्हणून रेडीयोतली काकू थांबून थांबून बोलायची. तेव्हा मला स्नेहाचा फार हेवा वाटायचा. आपल्यालाही अशी घरी बसून पाककृती लिहून घेणारी आई हवी होती असं नेहमी वाटायचं. मी जेव्हा आईला तसं सांगायचे तेव्हा तिला मनापासून हसू यायचं. पण आपली आई कधीच अशा पाककृती लिहीत नाही, तरी ती इतका छान स्वयंपाक करते याचा अभिमानही वाटायचा. नरूमामा नेहमी सफाई करताना गाणी ऐकायचा. रात्री झोपायच्या आधी "भूले बिसरे गीत" ऐकायची त्याची नेहमीची सवय होती. त्यामुळे नरूमामा माझा खूप लाडका होता. त्याच्या खोलीत त्याचा वेगळा रेडियो होता. रात्री झोपायच्या आधी आम्ही नरूमामाच्या खोलीत खूप वेळ लोळायचो. कधी तिथेच झोपायचो. मग नरूमामा मला अज्जीच्या खोलीत आणून ठेवायचा. रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये "आपकी फरमाईश" लागायचं. त्यात लोकांना आवडणारी गाणी लागायची. आणि ती गाणी लावा असं सांगायला लोक रेडियोला पत्र लिहायचे. आणि प्रत्येक गाण्याआधी लांब यादी असायची. "इस गीत को सुनना चाहते हैं, भिलवाडा, राजस्थान से, चुन्नी, बिट्टू और उनके मम्मी-पापा".त्या कार्यक्रमात जितका भारताचा भूगोल समजायचा तितका शाळेतही समजला नाही. भारताच्या छोट्या छोट्या गावांमधून, छोटी छोटी माणसं आपल्या आवडीचं गाणं ऐकायला पत्र पाठवायची. आणि कदाचित फक्त रेडियोवर आपलं नाव घोषित व्हावं हे एकच प्रसिद्धीचं स्वप्नं उराशी असेल त्यांच्या. त्या माणसांचं मला खूप कौतुक वाटायचं. आणि बाबाच्या "जगात" अशी माणसं देखील आहेत हे ऐकून मला खूप मजा वाटायची. आणि असं कुठे लिहिलं आहे की "जगात काय चाललंय" हे फक्त पेपरमधून आणि रेडियोवरच्या, जगाची खूप काळजी असलेल्या, एकमेकांना दोष देणा-या, सूर्य कधी नष्ट होईल हे शोधून काढणा-या माणसांच्या गप्पांमधून कळतं! जगात काय चाललंय याची काहीही फिकीर नसलेले लोक जे करतात, तेसुद्धा जगातच चाललेलं असतं ना? पण मोठे होऊ तसं जगात काय चाललंय, आणि त्यावर आपलं काय म्हणणं आहे, याला उगीचच महत्व येतं. आणि मग आपल्यातलेच काही त्यांना काय वाटतं हे रेडियोवर जाऊन सांगतात. मग त्यांच्याशी सहमत नसलेले श्रोते, सहमत असलेल्या श्रोत्यांशी कॉफी पिता-पिता भांडतात. मोठ्यांच्या जगात रडारड न करता भांडायला "जगात काय चाललंय" हे माहिती असणं गरजेचं असतं. पण आजकाल जगाची बरीच माहिती गोळा करूनही माझं लहानपणीचं मत बदलेलं नाही. फरक फक्त एवढाच की "जगात काय चाललंय" हे सारखं सारखं माहिती करून स्वत:ची जगातली जागा शाबूत ठेवणा-या जमातीने माझा बळी घेतलाय.

Thursday, May 20, 2010

बिनतात्पर्याच्या गोष्टी



लहानपणी नेहमी मला एक चिंता भेडसावायची. आई किंवा बाबा या दोघांपैकी कुणी एक "बिन-तात्पर्याच्या गोष्टीत शिरलं तर?". आता ही गोष्ट म्हणजे काय हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अशा गोष्टी ऐकायला मिळतात. या गोष्टीचा नेमका हेतू नेहमी धूसर असतो. पण गोष्ट म्हणून तिचा दिलखुलास असा आस्वाद काही केल्या घेता येत नाही. हेतू स्पष्ट नसला तरी ती गोष्ट कुठेतरी टोचत राहते, आणि हे आख्यान बंद झालं तर आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक फरक पडेल असंही वाटत राहतं मनाच्या एका कोप-यात. लहानपणी आई किंवा बाबांबरोबर एकटं बाहेर जाताना मला नेहमी या गोष्टींची भीती वाटत राहायची; आणि बँकेत खूप मोठी रांग दिसली की लगेच बाबा असल्या गोष्टी सुरु करायचा.
"सई, मी लहान असताना मला माझ्या बाबांबरोबर असं भटकता नाही यायचं. आम्ही नाना आजोबांना घाबरायचो. तुझ्यासारखं टाकली ढांग स्कूटरवर आणि गेलो बाबाबरोबर बाहेर असं नव्हतं आमच्या वेळेस."
आता, यात चूक कुणाची? मी जर जन्माला आल्यापासून तुमच्या ताब्यात आहे तर मला घाबरवणं सर्वस्वी तुमच्या हातात होतं. होतं की नाही? मग त्यावर विचार करून अमलात आणायला हवं होतं ना!
" सई, आम्ही लहान असताना आई-वडलांबरोबर कध्धीच सिनेमाला गेलो नाही तुझ्यासारखे. मी दर महिन्याची रद्दी विकायचो आणि त्यातून जे पैसे येतील त्यात त्या काळी बाल्कनीचं तिकीट मिळायचं. आत्तासारखे मल्टीप्लेक्स सुद्धा नव्हते त्या काळी".
रद्दी विकून सिनेमा पाहिल्याची गोष्ट बाबा आंबेडकरांनी रस्त्यातल्या दिव्याखाली बसून अभ्यास केल्याच्या गोष्टीसारखा सांगायचा. सिनेमाच पहिला ना शेवटी? आणि हल्ली तिकिटांवर करमणुकीचे कर लावतात त्यात आमची काय चूक? आणि मल्टीप्लेक्स निघाले यात आजच्या नवीन पिढीचा काय दोष? या गोष्टीमुळे आधी माझ्या बालमनात करुणरसाचे स्राव होत असत. पण नंतर माझ्या अतिशय मोंड पण तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावर मात केली.
"आम्हाला तुमच्यासारख्या रिक्षा करता यायच्या नाहीत उठसूठ. आम्ही सगळीकडे चालत जायचो. त्यामुळे आम्हाला वाचलेल्या पैशातून खासबागेत मिसळ खाता यायची."
या गोष्टीच्या विणीतही खूप सारी भोकं राहिली आहेत. एक तर मला बाबाच्या कॉलेजची सगळी टोळी माहित आहे. त्यातला एकही चेहरा मिसळ खाण्यासाठी पायपीट करणा-या सालस चेह-यांपैकी नाही. आईच्या मैत्रिणी तर महा "चमको" आहेत. त्यामुळे यातलं कुणीही श्रावण बाळ नाही हे मला अगदी चार वर्षाची असल्यापासून माहिती होतं. आणि "चैन" करण्यासाठी केलेले "त्याग" हे "शिक्षणासाठी" केलेल्या त्यागांपुढे फार छोटे वाटतात. अज्जी-आजोबांचे शिक्षणविषयक त्याग अजूनही नित्यनेमाने ऐकावे लागत असल्यामुळे आई-बाबांचे चैनविषयक त्याग कृत्रिम वाटायचे.
बाबाच्या गोष्टी थोडा विचार करून सोडून देता यायच्या, कारण बाबाला मनापासून त्यानी फार त्याग वगैरे केलेत असं वाटत नसावं. मुलांना असलं काहीतरी अधून मधून सांगायचं असतं असं त्याला आईनी सांगितलं असेल कदाचित. आईच्या गोष्टी मात्र हृदयद्रावक असायच्या. पण त्या दुस-या टोकाच्या असल्यामुळे अती झालं आणि हसू आलं अशी गत व्हायची.
कधी मी लाल भोपळ्याची भाजी बघून नाक मुरडलं की आई लगेच तिची नेहमीची करुण कहाणी उपसायची.
"सई, किंमत नाहीये तुला. लाल भोपळ्यात बीटा कॅरोटीन असतं. असं पोषण मला तुझ्याएवढी असताना मिळायचं नाही. आमच्या घरात ताई आणि आईच्या भांडणात कुणाचं माझ्याकडे लक्षच नसायचं."
आता मला मान्य आहे की हे अडचणीचं होतं. पण ही आयुष्यातली अडचण लाल भोपळ्याची भाजी खपवायला का वापरावी? आणि माझ्या बाबांना दोन बायका नाहीत म्हणून माझं आयुष्य सोपं आहे ही गोष्ट माझ्या हाताबाहेर होती. माझं आयुष्य सगळीकडून किती सोपं आहे हे ऐकून माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अवघड गोष्टी होत्या त्यांनाही ग्रहण लागायचं. आपल्याला आजोबांसारखं कावडीतून पाणी आणायला लागत नाही, बाबासारखी रद्दी विकावी लागत नाही, आईसारख्या दोन आया आणि त्यांची भांडणं बघावी लागत नाहीत; त्यामुळे आपण आहे त्या उत्तम परिस्थितीत त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेलं पाहिजे!
आईची अजून एक आवडती गोष्ट म्हणजे तिची पी. एच. डी.
ती पी. एच. डी. करत असतानाच मी झाले. त्यामुळे तिला मी व्हायच्या अगदी दोन आठवडे आधीपर्यंत लॅबोरेटरीत जावं लागत असे. मग तो प्रवासही ती चालत करायची. सकाळी सहा वाजता निघायची वगैरे वगैरे सांगायला तिला फार आवडायचं. माझ्या पी. एच. डी.त मी काटकसर (थोडीफार) सोडल्यास काही महान दिव्यं केली नाहीत. त्यामुळे तिथेही मला मैलोनमैल चालत गेल्याचं कौतुक सांगता येत नाही. एकूण तात्पर्य काढायचंच झालं तर ते असं की माझं आयुष्य फुलासारखं मजेत चालू आहे आणि माझ्याकडे अशा कुठल्याच करुणरसपूर्ण गोष्टी नाहीत. फुलासारखं गेलंय हे तर मी नक्कीच मान्य करीन, पण या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाही. :)

Saturday, May 8, 2010

मन: स्ताप टाळण्याचे सोप्पे उपाय

अण्णाआजोबांची कित्येक सुभाषितं त्यांच्या अतिरेकामुळे मला तोंडपाठ झाली, पण कुसुमअज्जीचं एकच वाक्य मला आयुष्यभरासाठी पुरेल.
ती नेहमी म्हणायची, "सई, जगात असं काही नाही ज्याच्यामुळे आपल्याला मन:स्ताप किंवा पश्चा:ताप व्हावा." गंमत म्हणजे हे वाक्य तिला माझ्या बालचिंतांसाठी वापरावं लागत असे.
पण तिचं शांत, कुठल्याशा अदृश्य देवाशी एकरूप झालेलं रूप पाहिलं की खरंच वाटायचं, "कसली चिंता? अशी अज्जी आहे आपल्याला मग देव आपल्याबरोबरच असणार."
अज्जी मात्र मन:स्ताप होऊ नये म्हणून खूप विनोदी प्रकार करायची. ती म.ल.ग. हायस्कूलची मुख्याध्यापिका होती. पण तरीही शाळेतून कित्येक वेळा ती भिजत भिजत घरी यायची - कारण तिला छत्री बसमध्ये विसरून मन:स्ताप होईल याची काळजी वाटायची. घड्याळ तिनी कधीच घातलं नाही, कारण ते हरवून पुन्हा मन:स्ताप व्हायचा. पण ती कधीही कुठेही उशीरा पोहोचली नाही. आजकाल आपल्याकडे किती घड्याळं असतात. एक हातावर (भरमसाठ किमतीचं), एक मोबाईल फोनमध्ये, एक लॅपटॉपमध्ये आणि तरीही माझ्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी मला टांगून ठेवतात तासंतास!
कुठे जायचं असलं की अज्जी सकाळपासून तयारी करायची. तिला दिवसभरात जेवढा वेळ मिळेल तो न सांडता वापरायची कला अवगत होती. रात्री जागून अभ्यास करणे, मग सकाळी वाट्टेल तेव्हा उठणे या गोष्टी तिला फारशा आवडायच्या नाहीत. त्यामुळे तिच्या नेहमीच्या गांधीवादामुळे मला दिवस नीट वापरून रात्री लवकर झोपायची सवय लागली. या सवयीमुळे माझी समाजात जोरदार थट्टा होते ते वेगळं.
ट्रेन किंवा बस चुकणे हीसुद्धा अज्जी-आजोबांची मन:स्ताप टाळायची जागा होती. त्यामुळे कधी कधी ते ट्रेनच्या वेळेच्या आधी दोन-दोन तास स्टेशनवर जाऊन बसायचे. यावरून आमच्या घरात नेहमी युद्ध व्हायचं. बाबा त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार, "स्टेशन झाडायला जायचं का?" वगैरे सुरू करायचा, आणि मग आजोबांचं आणि त्याचं जोरदार भांडण व्हायचं. माझे आई-बाबा दोघेही कदाचित "दुसरी पिढी" असल्यामुळे बंडखोर होते. पण आई-बाबांच्या चुकलेल्या बशी आणि विमानं मोजली तर अज्जी-आजोबांचं काहीही चूक नाही हे लगेच लक्षात येतं. मलासुद्धा विमानाच्या वेळेच्या भरपूर आधी विमानतळावर जायला आवडतं. त्यामुळे मलासुद्धा आई-बाबांशी भांडूनच निघावं लागतं. माझ्या मनात भलत्याच शंका येतात ते वेगळंच.

आपल्या बॅगेचं वजन नियमापेक्षा जास्त झालं तर? हा माझा अतिशय फालतू पण कधीही न शमणारा प्रश्न असतो.
मग बाबा बॅग घेऊन वजनकाट्यावर उभा राहतो. बॅगेचं आणि बाबाचं एकत्र वजन नव्वद किलो भरतं, पण बाबाचं ठाम मत त्याचं वजन पासष्ठ आहे असं असतं. त्यामुळे माझी बॅग पाच किलोनी जड आहे ही भयावह परिस्थिती निर्माण होते. मग आई येते आणि बाबाला बॅगेशिवाय काट्यावर उभा करते. तेव्हा माझी बॅग पाच किलो हलकी आहे असं सिद्ध होतं. त्या आनंदात आई दोन किलो कनक गूळ आणि किलोभर गरम मसाला मागवून घेते. शेवटी विमानतळावर जायच्या आधी आम्ही माझी बॅग आईच्या ऑफिसमधल्या गुळाच्या काट्यावर वजन करून आणतो. ते केल्यावर आई-बाबा, "झाला का आत्मा शांत अज्जीबाई?" असे टोमणे मारत मला परत आणतात. परत आल्यावर काहीही नवीन टूम काढायची नाही असं वचन देऊनसुद्धा आई ऐनवेळेस काहीतरी नवीन बॅगेत टाकतेच. त्यामुळे जाताना पुन्हा वजनाचा प्रश्न माझ्या डोक्यात उड्या मारू लागतो. अशावेळेस मला अज्जीची खूप आठवण येते. ती असती तर, "नको गं वसू तिला त्रास देऊस. परदेशी ती चाललीये ना? मग तिला आराम वाटेल अशाच वस्तू तिला घेऊन जाऊदेत!" असं नक्की म्हणाली असती. विमानतळावर किती आधी जायचं यावर सल्ला द्यायला तर आमच्या घरात इतके लोक आहेत की तो प्रश्न मी जायच्या दिवशी सकाळीच प्रस्तुत करते. पुढे खूप संघर्षानंतर आई-बाबा आणि माझ्या वेळेचा मध्य गाठला जातो.

या परिस्थितीतून गेल्यावर माझ्या लक्षात येऊ लागलं की अज्जीला खरं काय म्हणायचं होतं.
"जे टाळण्यासारखे मन:स्ताप आहेत ते आधी टाळायला शिकावं. आणि जे अटळ आहेत, त्यांच्यापासून अलिप्त व्हावं."
अज्जीच्या आयुष्यातले जवळपास सगळे टाळता येणारे मन:स्ताप तिने खुबीने टाळले. पण तरीही तिच्या वाट्याला अनेक अटळ चिंता आणि मन:स्तापही आले. तिच्या तरुणपणी तिला ज्या गोष्टींचे ताप झाले असतील त्या आता कुठे मला दिसू लागल्या आहेत. पण त्या चिंतांनी तिला जसं एखाद्या पहाटेच्या संथ समुद्रासारखं शांत बनवलं तसं मलाही व्हायला आवडेल.
तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधी कधी माझी आई तिला, "आई तू हे लग्न का केलंस?" असं कधी दु:खाने तर कधी कुठल्याश्या अंतिम कुतूहलाने विचारायची. पण माझ्या आज्जीचं उत्तर कधीच बदललं नाही.
"अगं, तुझ्यासारखी मुलगी झाली मला. इतकी कर्तृत्ववान, कुशल, जगात मान मिळालेली. यापुढे सगळे ताप शून्य आहेत."
आणि आपण इथपर्यंत का आलो? हा प्रश्न नेहमी मागे वळूनच सोडवायचा असतो.
अज्जीची निग्रहाने शांत राहायची सवय सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेली, आणि कुठलेही प्रश्न उभे न करणा-या उर्मिलेसारखी ती आमच्या घराच्या रामायणात तिची अशी एक अटळ जागा बनवून गेली.