लाकडी जिन्यावरून (पायाचा अावाज न करता) वरती गेलं कि मोठा दिवाणखाना होता. पण तिथे फक्त अाजोबांचे पाहुणे बसायचे. बाकी सगळे लोक थेट स्वयंपाकघरात हजर व्हायचे! दिवाणखान्याला अाणि त्याला लागून असलेल्या मामाच्या खोलीला जोडणारी लाकडी गॅलरी होती. गलरीतून समोरचा रस्ता दिसायचा. तिला लागून तुतूचा वेल होता. रोज काळ्या तुतूंसाठी माझं अाणि स्नेहाचं भांडण होत असे. मग मी मोठा गळा काढून जिंकत असे!
दिवाणखान्याच्या अातल्या बाजूला एक लांब अरुंद बोळ होता अाणि त्याला लागून एक लाकडी पार्टिशन होतं. त्या पार्टिशन पलिकडली जागा म्हणजे "अज्जीची खोली"! बोळाच्या पलिकडच्या बाजूला मात्र भिंत होती. त्या भिंतिपल्याड समस्त मुडशिंगीकरांचा अड्डा जमत असे. कारण त्या खोलीत टी.व्ही. या अराध्य दैवताची प्रतिष्ठापना झाली होती! घराच्या अगदी शेवटी मोठंसं स्वयंपाकघर होतं अाणि त्याला लागून अाजोबांची खोली. त्यातच अामच्या घरातला देव्हारा होता. स्वयंपाकघरातून बाहेर गच्चीकडे जायच्या अाधी मोठा झोपाळा होता. त्यावरच अामची बरीचशी करमणूक अवलंबून असायची. मागल्या जिन्यानी खाली गेलं, कि भाडेकरूंचा "चौक" होता. तिथे सगळ्या बायका धुणी-भांडी करायच्या! कोल्हापुरात बायकांची संभाषणे खूप मजेदार असायची. तिथे पुण्याची, "अाज पाव-भाजी केली. त्या निमित्तानी मुलांच्या पोटात दुधी भोपऴा जातो", वगैरे वाक्य नसतात.
"काय वैनी, धुनं झालं?..बर् त्ये न्हवं, भाजी काय केली अाजच्याला?"
"अाज होय (अामची मामी बामनी बोलते). काल अामचे मोठे भाऊजी अाले होते, त्यांनी वरण्याच्या शेंगा अाणल्या हो! मग अाज त्याचा झणझणीत भात केला. हे फार खूष झाले!"
"त्ये न्हवं, तुमचे सासरे कसे हायेत? अामचा गन्या बगा, अजून तीन वर्साचा न्हाई तर काल म्हन्ला, त्ये मुशिंकर अजोबा लई जोरात बोलत्यात. भांडन झालतं व्हय?"
"कसलं हो भांडण! नेहमीचच!"
सगळ्यांना सगळं ऐकू येतं. पण उगीच न ऐकून नंतर स्वत:चा पुणेरी मिसळ-मसाला न घालता सरळ विचारतात! मला कोल्हापूरची ही गोष्ट फार अावडते. कुणीही "माय पर्सनल स्पेस" वगैरे तत्व मुळात मानतच नाहीत. त्यामुळे अापली फजिती, प्रगती, अधोगती छान मिळून-मिसळून खाता येते!
मागल्या दारानी मागच्या बोळात जाता यायचं. पण गॅलरीसमोरचा रस्त्याची शोभा त्या बोळाला नव्हती. गच्चीवर नेहमी पतंग उडवायचा कार्यक्रम व्हायचा. त्यात मी व स्नेहा मांजा धरून "मांजा-डिस्पेन्सर" चे काम करायचो. साधारण अर्धा तास तसं केल्यावर पाच मिनीट पतंग उडवायला मिळायचा. मी या अन्यायाला वाचा फोडायचा खूप प्रयत्न केला पण मला कुणी फारसं महत्व दिलं नाही. तशी लहानपणापासूनच मी खूप बंडखोर होते. पण माझी उंची व चण बघता माझं बंड "भोकाड" या शब्दापलीकडे कधी गेले नाही. मी रडायला लागले कि बाबा माझी समजूत न काढता सगळ्यांसमोर जोरात घोषणा करायचा," अाता लोकहो, अापल्यासमोर येत अाहेत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सई केसकर. त्या सादर करीत अाहेत राग रडदारी. त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करुया." मग सगळे माकडाचा खेळ पाहिल्यासारखे खरंच टाळ्या वाजवायचे!
कधी कधी अज्जी,"नको रे रडवूस तिला" असं कळकळीने म्हणायची! पण बाबा अज्जिबात माझ्या रडण्याला भाव देत नसे!
अज्जीच्या खोलीत एक खोल खिडकी अाहे. त्याला लोखंडी गज अाहेत. त्या खिडकीत मी अजूनही पूर्ण मावते. त्यात बसून बेसनाचा लाडू खायचे मी दुपारी. "गादीवर सांडू नकोस" या सुचनेनंतर उगीच कशाला प्रयोग न सांडायचे म्हणून लाडू मन लावून खाता यावा म्हणून मी खिडकीत बसायचे! त्या खिडकीत सकाळी मऊ ऊन यायचं अाणि रात्री ताटलीसारखा चंद्र दिसायचा! त्या खिडकीवर माझ्या अाईचंही खूप प्रेम होतं.
हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या खिडकीत बसून मी वुडहाऊस वाचलं अाणि अगदी परवाच्या सुट्टीत अमर्त्य सेन! पण स्नेहाची हाक अाली कि लगेच टुणकन उडी मारून बाहेर पळायचे! :)
तिच्याशी भांडले कि रुसून मी खिडकीतच बसायचे. मग ती,"बोल कि गं सयडे", म्हणून मला खूप विनवायची! तसं तीही रुसायची. पण माझं खिडकितलं रुसणं मला फार अावडायचं! अजूनही गेल्या गेल्या अाधी खिडकीचं दर्शन घ्यावसं वाटतं!