Tuesday, August 25, 2009

अण्णा आजोबा

लहानपणी बरीच वर्षं "घरातला बागुलबुवा" म्हणून अण्णा आजोबांचा वापर होत असे.मोठ्यांना उपद्व्याप होईल अशी कुठलीही गोष्ट करायचा बेत केला की " अण्णा रागवतील" ही सबब सांगून अज्जी आणि मामी आम्हाला कटवत असत. पण अण्णा आजोबांचा अभ्यास करायला मला फार आवडायचे. रोज सकाळी चार वाजता उठून आजोबा वाचन आणि लिखाण करीत असत. "कुसूम" अशी खणखणीत हाक पहाटे चार वाजता आमच्या कानावर पडत असे. मग अज्जी खूप केविलवाण्या आवाजात, "आले हो. हाक मारू नका एवढ्यानी, मुलं झोपलीत"!" असं म्हणायची. 
मग मुलांनी सुद्धा कसं चार वाजता उठलं पाहिजे यावर ते त्याहीपेक्षा जोरात भाषण द्यायचे. पाच-सहा वाजता त्यांची "न्याहरी" असायची. त्यात आदल्या दिवशीची भाकरी, बारीक (अज्जीने उठून चिरलेला) कांदा,  झणझणीत तिखट किंवा ठेचा, दही आणि शेंगदाणे असायचे. सकाळी पाच वाजता असला शेतकरी आहार फक्त अण्णाच घेऊ शकतात. पण का कोण जाणे, त्यांना जेवताना बघून नेहमी मला पण जेवायची इच्छा होत असे. मग पुन्हा त्यांचा अभ्यास सुरू व्हायचा. त्या वेळात अज्जी एखादी डुलकी काढायची की परत तिला समन्स यायचे. अज्जीने आजन्म आजोबांची लेखनिक म्हणून काम केलं. त्यांचा गीतेचा फार मोठा अभ्यास होता. गीता, गीताई, कठोपनिषद, ईशावास्य उपनिषद, पातंजलीची योगसूत्रं या सगळ्यांचा आजोबांनी खूप अभ्यास केला. अज्जी मात्र खाली मान घालून त्यांची प्रत्येक ओळ लिहून द्यायची. आजोबांची "हौस" अज्जीला मात्र सक्तीची होती. 
मग आम्ही उठलो की अचानक अण्णांमधला प्रवचनकार जागा होत असे. आम्हाला पकडून गीता सांगायची त्यांना फार हौस होती. पण अज्जीइतके आम्ही सोशीक नव्हतो. घरातल्या अनेक दारांमधून आम्ही त्यांना चुकवून पळ काढायचो. अज्जी सुद्धा आम्हांला यात मदत करीत असे. ते खोलीत यायच्या आधी, "पळा आता अण्णा येणारेत", अशी दबक्या आवाजात आठवण करून द्यायची. मग लगेच आम्ही पळ काढायचो. पण या सगळ्यांतून कधी कधी पकडले पण जायचो. मग लगेच त्यांचे डोळे चमकायचे. कधी कधी मी पळून जायचे नाही. तसे चमकलेल्या डोळ्यांचे आजोबा अचानक लहान मुलासारखे दिसायचे. त्यांना काहीतरी नवीन गम्मत कळाली आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर असायचा. तो बघायला मला कधी कधी फार आवडत असे. 
"सई, तुला मी आता गीताईतला एक श्लोक सांगणार बरंका!" म्हणून माझ्या दंडाला धरून मला खुर्चीत बसवत असत.
मग, "इंद्रिये वर्तता स्वैर, राग द्वेष उभे तिथे, वश होवू नये त्याते, ते मार्गातिल चोरची।" अशी सुरवात व्हायची. त्यानंतर रोजच्या आयुष्यातली बरीच उदाहरणे देऊन त्यांचे प्रवचन रंगायचे. कधी कधी मी पेंगू लागायचे. मग "झोपू नकोस. झोप ही सुद्धा इंद्रियांची माया आहे" असं सांगून मला जागं करायचे. 
पण त्यांचं निरूपण ऐकून तासभर झाला नसेल तोवर त्यांच्या खोलीतून "हरामखोर!! चाबकानं फोडीन त्याला!" अशी गर्जना ऐकू येत असे! त्यांचा राग मात्र त्यांच्या गीतेवर मात करून गेला! त्यांचा राग सगळ्या गल्लीभर प्रसिद्ध होता. पलिकडचे परीट, समोरची आऊ, शेजारचे वाटवे या सगळ्यांना त्यांच्या रागाची सवय झाली होती. त्यामुळे मामी बाहेर पडली की, "काय वैनी! आज पारा जरा जास्तच वर गेलता न्हवं!" म्हणून पृच्छा होत असे. मामी पण, "काय सांगू आता! नेहमीचंच झालंय" अशा अर्थाची मान हलवत असे!
पुढे जेव्हा मी स्वत:चं असं वाचन करू लागले तेव्हा ते मला "सत्व, रज आणि तम या प्रवृत्तींचा मानवी मनाशी कसा संबंध आहे" हे शिकवायचे. मग मी दंगा करू लागले की मी तमरसाने कशी भरलेली आहे हे मला पटवून द्यायचे. त्यांना हात पाहून भविष्य सांगता येतं. त्यामुळे मी कधी कधी, "मला दहावीला किती मार्क मिळतील?" असले फालतू प्रश्न विचारायच्या मोहात पडायचे. मग, "भवसागर दुस्तर आहे", किंवा त्याच प्रकारच्या भयानक वाक्यानी सुरवात करून ते भविष्य न सांगताच पुन्हा उपदेश वाहिनी सुरू करायचे! 
त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं असेल तर ते त्यांचं वाचन! रिटायर झाल्यानंतरही शाळा-कॉलेज मधल्या तरूण मुलांसारखं वाचन ते करायचे. त्यांच्या एकाही मुलाला किंवा नातवंडाला त्यांच्यासारखं वाचन जमलं नाही. प्रत्येक पुस्तकात त्यांच्या हस्ताक्षरातल्या छान टिपा असतात. त्यांच्याकडून एखादं पुस्तक घेतलं की त्या पुस्तकाबरोबर अजून खूप पुस्तकांची त्यांच्या टिपांमधून झलक मिळते. त्यांच्या खोलीत त्यांचं "वाचनालय" आहे.त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला वर्तमानपत्राचे छान कव्हर असते. मग पुस्तक अगदीच जुनं असेल तर त्याला आतमध्ये "दवा-पट्टी" केलेली असते. पुस्तकांची पानं अगदी एखाद्या घायाळ पक्षिणीचे पंख गोंजारावेत तसे ते गोंजारतात. जगात त्यांचं पूर्ण कोपरहित प्रेम जर कुणावर असेल तर ते त्यांच्या पुस्तकांवर आहे!
बाबाबरोबर राजकारणावर चर्चा करता करता त्यांनी कित्येकवेळा त्याच्याशी जोरदार भांडण केले आहे. कुणीतरी आपल्याशी सहमत नाही हे एक कारण त्यांच्या रागासाठी पुरे असायचं. मग समोरचा माणूस आपला खूप मोठा अपमान करत आहे असं त्यांना वाटू लागे. कोल्हापूरच्या घरातली मोठ्या माणसांची भांडणं फार मजेदार असायची. सगळ्या मुलांनी आजोबांचे बाकी कुठलेही गुण घेतले नाहीत पण त्यांची भांडण करण्याची कला मात्र सगळ्यांना मिळाली. प्रत्येकानी ती त्याच्या स्वभावाप्रमाणे बदलली देखील! ताट भिरकावणे हा आमच्या घरातला आवडता निषेध. आजोबांनी इतरवेळी कितीही "अन्न हे पूर्णब्रम्ह" वगैरे  शिकवणी दिली तरी संतापाच्या आवेगात नेहमी त्यांच्या हातून हे पाप घडायचे. मग आम्ही आ वासून त्या रूद्रावताराकडे बघत असू. दुसरा आवडता निषेध म्हणजे वाद टिपेला गेला की भोवळ येणे. हे नेमकं त्या वेळेला कसं घडायचं हे मला आजपर्यंत कळलं नाही.मला फक्त गणिताच्या पेपराच्या आधी चक्कर यायची. आणि त्यावर माझा काहीही ताबा नसायचा. 
 एका प्रसिद्ध (मुडशिंगीकर संप्रदायात) भांडणामध्ये तर कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर पाण्यानी भरलेली घागर रिकामी केली होती म्हणे! खूप वर्षं मला सगळे लोक चिडले की असेच वागतात असं वाटायचं. 
या सगळ्या घडामोडींमध्ये अज्जी मात्र शांतपणे एखाद्या कोप-यात उभी असे. तिला मी कधी रडताना पाहिलं नाही की कधी चिडताना. "सई जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जिचा आपल्याला मन:स्ताप व्हावा", हे एकच वाक्य तिनी मला उपदेशपर दिलं. आजोबांच्या गीतेतील "सुख दु:खे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ" ह्या वाक्याचे मानवी प्रतिबिंब अज्जी झाली. 
पण आजोबांच्या उपदेशांमुळे रोजच्या आयुष्यातील ब-याच अडचणींवर छान मात करता येते. त्यांच्या पुस्तकांमधून वाचलेले बरेच काही सहज जसेच्या तसे जिभेवर येते. आजकाल आजोबा खूप हळवे झाले आहेत. पूर्वी रागानी लकाकणारे त्यांचे डोळे आता सारखे पाणावतात. पण त्यांची ती नाजूक, स्वच्छ, नीट-नेटकी मूर्ती डोळ्यासमोर आली की त्यांच्या अश्रूंच्या पलिकडची विद्वत्ता दिसू लागते!

4 comments:

  1. saee khoopach chhan ajuni manase tyana chukaun palun jatat .Narumama mhanato 'tyancha vara pan mala kalato va mi dusarya darane palun jato; aaee

    ReplyDelete
  2. सई मस्तच जमल आहे रसायन! खर तर अण्णा जरी अधात्म्य वाचत सांगत असले तरी ते आजवर अध्यात्मिक वृत्तीचे मात्र होऊ शकले नाहीत पण त्यांच्या संपर्कात जास्त काळ कोणी रहायल तर त्या व्यक्तीला अध्यत्मिक होण्याशिवाय पर्यायच नसतो!

    ReplyDelete
  3. @aai-baba
    Thankoo. You only seem to agree with the bad points though. :P

    ReplyDelete
  4. त्यांच्या कडे चांगले गुण खूपआहेत या बाबतीत दूमत नाही पण ते इतर गूणांमूळे झाकोळले जातात हे सत्य आहे.

    ReplyDelete