Thursday, September 3, 2009

कुसूम अज्जी

आजपर्यंत कुसुम अज्जी खूप वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीवर डोकावली आहे. पण आज मात्र तिच्यासाठी खास ही जागा. काही काही माणसांचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व मोठं होताना नेहमी आठवतं. ती माणसं त्या वेळेस, त्या ठिकाणी नसती तर कदाचित आपण जसे आहोत तसे झाले नसतो. आणि त्या माणसांबरोबरच ती वेळही महत्वाची असते. तसंच माझं बालपण होतं. अज्जीचा अज्जीपणा मी जितका अनुभवला तितका कदाचित माझ्या आईनेही तिच्या या आईचा "आईपणा" अनुभवला नसेल. तसं तिचं नाव घेतलं की काय काय आठवतं. तिचे हात आठवतात. तिची बोटं लांब आणि कमालीची लवचिक होती. त्या हातानी ती दिलरूबा वाजवायची. त्याच्या राकट तारेवरून तिची बोटं फिरताना दिसली की आम्हाला फार मजा वाटायची. दुपारच्या वेळात खूपवेळा मी व स्नेहा तिचा दिलरूबा वाजवायचो. कुणाला हे वाद्य माहित पण नसेल. त्याला व्हॉयलिनसारखी एक लांब काठी होती. जिच्यावर हरणाच्या शेपटीचे केस लावले होते. तिला आम्ही गारगोट्यांनी साफ करायचो.
तिचे हात रोज सकाळी ताक करायचे. तिला ताक करायला फार आवडायचे. आणि ते आग्रहाने सगळ्यांना द्यायला त्याहूनही जास्त. ताकातलं लोणी काढून काढूनच कदाचित तिचे हात इतके मऊ झाले असावेत. मी भोकाड पसरून रडू लागले की, "रडू नकोस", म्हणून माझे ती त्या साय हातांनी डोळे पुसायची. मला ती लाडानी "साय" म्हणायची. मुलीची मुलगी म्हणजे दुधावरची साय, आणि माझं नावही सई!
तिनी मला जितक्या गोष्टी सांगितल्या, तितक्या बाबानी पण नसतील सांगितल्या. इसापनिती, पंचतंत्र, अरेबियन नाईट्स, रविंद्रनाथ टागोर या सगळ्यांची माझ्याशी ओळख कुसुम अज्जीने करून दिली. अज्जीची "राईचरण" मला अजुनही तशीच्या तशी आठवते. ती रविंद्रनाथांनी लिहिली आहे हे कळायलाही बरेच दिवस लागले. कुसुमाग्रज, भा.रा.तांबे, बालकवी, सुरेश भट आणि मोठी झाल्यानंतर आरती प्रभू या सगळ्यांशी माझा परिचय अज्जीने करून दिला. पण तिचा हा गुण चोरगुण होता. कारण मला या सगळ्या कविता कशा आवडायला लागल्या हे मला तिच्यापासून फार दूर गेल्यावर समजलं. तिनी हळूच जे माध्यमाचं काम केलं ते कदाचित तिला स्वत:ला सु्द्धा जाणवलं नसावं. कोल्हापुरातल्या तिच्या उबदार खोलीत पहाटे डोळे उघडताच ती योगासने करताना दिसायची. मग मी पण दात न घासताच तिच्या पावलावर पाऊल ठेवून आसने करू लागायचे. ती प्राणायाम करताना मात्र तिची नक्कल करू लागले की तिला मनापासून हसू येत असे. तिच्या मागून तिच्या मांजरीसारखीच मी सगळीकडे जायचे. मग एका मोठ्या कपात ती मला लवंग घातलेला चहा द्यायची. सकाळी तसा चहा प्यायला मला अजूनही आवडते.
अज्जी खूप विद्वान होती. नेहमी तिला तिच्यासारख्या लोकांची संगत मिळाली नाही. पण मग ती तिच्या खोलीत, तिच्या विश्वात खूप रमायची. वाचन करायची, तिच्या दूर देशातल्या भावंडांना पत्र लिहायची. त्यांच्या मुलांची खुशाली विचारायची. तिला तिच्या माहेरच्या लोकांचा फार लोभ होता. तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना कधी कधी तिचे डोळे पाणावायचे. मग मला उगीच अज्जीला ह्या गोष्टी सांगायला लावल्या असं वाटायचं. पण तसं म्हणताच, "नाही गं वेडाबाई, तुला नाही सांगणार ह्या गोष्टी तर कुणाला सांगणार मी?", असं म्हणून डोळे पुसायची. तिचे सगळे भाऊ अमेरिका, रशिया, इंग्लंडला जाऊन आले होते. त्यांची पत्र तिनी कपाटात जपून ठेवली होती. कधी कधी मला ती जुनी पत्र दाखवत असे. त्यातल्या मजकुरापेक्षा त्यातील कलाकृती बघण्यासारखी असायची. दादा मामा (अज्जीचे थोरले भाऊ) नेहमी काहीतरी गंमत करून पत्र पाठवायचे. कधी कागद गोल कापून त्यावर पत्र लिहायचे, कधी पूर्ण पत्र एक मोठी कविता असे! मला हे बघायला फार आवडायचे. पण त्या पत्रांमधून अज्जीचे आयुष्यभराचे शल्य पण परदेशी जात असे. ते मला आजकालच जाणवू लागले होते.
मला व स्नेहाला रोज दुपारी अज्जी साड्या नेसवून द्यायची. सहावारी साडी वरून दुमडून आमच्या छोट्याशा देहावर छान बसवून द्यायची. मग आमची भातुकली रंगली की अज्जी निवांतपणे झोपायची. एकदा तर बाहुला बाहुलीचं लग्न सुद्धा लावलं होतं. माझा बाहुला (पम्पकिन) आणि स्नेहाची बाहुली (रत्नावली) अशी जोडी होती. माझा बाहुला लठ्ठ आणि नकटा होता पण स्नेहाची बाहुली मात्र खूप देखणी होती. मग कुठेतरी समतोल साधावा म्हणून माझा बाहुला डॉक्टर आहे असं जाहीर करण्यात आलं. लग्नाची तारीख ठरली. त्या दिवशी आम्ही दोघी अज्जीबरोबर मंडईत गेलो. शेवंतीची खूप फुलं आणली व त्यांचे गजरे केले. मग नवरा-नवरीच्या डोक्याचे माप घेऊन त्यांच्यासाठी फुलांच्या मुंडावळ्यासुद्धा केल्या. अज्जीकडे तिच्या कुठल्याशा भाचीच्या लग्नातल्या मुंडावळ्या होत्या. त्या ही तिनी आमच्यासाठी तिच्या कपाटातल्या चोरकप्प्यातून बाहेर काढल्या. आदल्या दिवशी मला व स्नेहाला मंगलाष्टकं शिकवली. ती आम्ही घोकून पाठ केली. मग लग्नादिवशी बाहुलीला व आम्हाला अज्जीनेच साड्या नेसवून दिल्या! पम्पकिनला फेटा बांधण्यात आला. अंतरपाटावर मी व स्नेहानी स्वस्तिक काढले. मग सगळ्या शेजा-यांच्या साक्षीने आमचे, "लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा" सुरू झाले.
सुट्टी संपल्यावर मात्र सासूच्या नात्याने तिची बाहुली पुण्याला घेऊन जायचा बेत केल्यावर स्नेहाताईंनी माझ्याशी कडाक्याचं भांडण केलं!
अज्जीचा हा रसिकपणा तिच्या आयुष्यातील घडामोडी बघता फार आश्चर्यकारक होता. आईच्या लहानपणीची "दुसरी बायको" म्हणून त्रासलेली अज्जी माझ्या लहानपणी मात्र खूप शांत आणि रसिक झाली. सकाळी ती परडीभरून फुलं वेचायची. मग बाजारात जायची. कोवळे दोडके, नाजूक भेंडी, अळू, ताजा मुळा अशा त-हेत-हेच्या भाज्या आणायची. मग ताक करायची. दुपारी माझ्यासाठी खूप वेळ खमंग बेसन भाजून लाडू करायची. नेहमी आम्हांला अंबाबाईच्या देवळात घेऊन जायची. परत येताना आमचे सगळे बालहट्ट पूर्ण करायची. तिच्या आयुष्यातील हा नियमितपणासुद्धा कदाचित तिच्या रसिकतेचे कारण असावा. तिला मी कधीच दु:खी पाहिले नाही. तशी तिची कुणाकडून फारशी अपेक्षाही नसे. तिच्या खोलीतले तिचे आयुष्य ती नेमाने आणि आनंदाने जगायची.
कधी कधी गॅलरीत मी व अज्जी संगीत शारदा वाचायचो. त्यातलं "म्हातारा इतुका" मला फार आवडत असे. ती आईच्याच शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यामुळे तिच्या व आईच्या मजेदार गोष्टी सुद्धा ती खूपवेळा सांगायची. एकदा आईने वर्गातल्या दोन मुलींच्या वेण्या एकमेकींना घट्ट बांधून ठेवल्या. त्या कुणालाच सोडवता येईनात. तेव्हा आईला सगळ्या वर्गासमोर छान धम्मकलाडू मिळाला होता. ती गोष्ट अज्जीकडून ऐकायला मला फार आवडायचे.
तिला फुलांचं फार वेड होतं. तिच्या खोलीत एका उथळ बशीत कधी जाई, कधी सोनचाफा तर कधी बकुळीची माळ ठेवलेली असायची. मला देखील नकळत ही सवय लागली. मी सुद्धा माझ्या खोलीत अशी फुलं ठेवते.
अज्जीने खूप गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या शाळेचा, पुस्तकांचा खर्च अज्जी कुठलाही गाजावाजा न करता करीत असे. कित्येकवेळा आमच्या गवळ्याच्या मुलाच्या शाळेचे पैसे हळूच त्याला देताना मी अज्जीला बघितले आहे. कामवाल्या बाईला स्वत: चहा करून देणे, त्यांना पैशाची मदत करणे, वेळ प्रसंगी त्यांना मुलीला शाळेत घालण्यासाठी खडसावणे हे सगळे उपदव्याप स्नुषारोष पत्करून अज्जी करीत असे.
पण हे सगळं करूनही तिच्यात एक सुप्त विरक्ती होती. वैराग्य होतं. जे मला मोठी होताना कळू लागलं. तिचा कशावरही हक्क नव्हता. असेलही कदाचित. पण तो तिनी स्वत:हून सोडला होता. जे होईल त्यातून शांतपणे जायचा तिचा निग्रह होतो. तो तिनी शेवटपर्यंत कायम ठेवला. तिच्या शेवटच्या काही दिवसांत ती माझ्या आई-बाबांकडे होती. शेवटी शेवटी ती माझ्या आईला "आई" आणि बाबाला "बाबा" म्हणू लागली. लहानपणी आई माझ्यासमोर "हट्ट करायचा.." असं म्हणाली की मी ते वाक्य "नाही ssssss", म्हणून पूर्ण करायचे. तसंच अज्जीला तिच्या शेवटच्या दिवसांत आईने अशी खूप वाक्य पूर्ण करायला शिकवले. तिच्या सेवेसाठी खूप बायका ठेवल्या, तिच्या सगळ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण केल्या. आईस्क्रीम, पापड, मिरचीचा ठेचा, मोदक, शास्त्रीय संगीत, काव्य, नवीन कपडे असल्या सगळ्या छोट्या गोष्टींतून तिचं बालपण पुन्हा जागं झालं. आणि जशी माझी अज्जी थोडी लहान झाली तसे आई-बाबा अचानक मोठे झाले!
काल तिनी शेवटचा घास घेतला आणि या जगाचा सांगून निरोप घेतला. पण याला मरण म्हणता येणार नाही. "उन्हाळ्याच्या सुट्टीची" कल्पना मला अज्जीच्या आजारपणाने दिली. तिला तिच्या काही आठवणी गोष्टींमधून सांगायचा हा कार्यक्रम होता! पण ती जाताना मला इतक्या आठवणी देऊन गेली की आता तिच्या आठवणींसाठी ही जागाही अपुरी पडेल.
आमच्या घरात नेहमी अज्जीच्या लग्नाबद्दल खूप मतं व्यक्त केली जातात. कुणाच्या दु:खाचं तर कुणाच्या अपयशाचं ते कारण ठरतं. या सगळ्या व्यर्थ कोलाहलापासून तिची कायमची सुटका झाली. या लग्नानी ताजीला त्यागाची मूर्ती बनवले. कुसुम अज्जीच्या माहेरच्यांनीसुद्धा ताजीच्या या त्यागाचा खूप गौरव केला. आजोबांना लक्ष्मी मिळाली, सखी मिळाली, लेखनिक मिळाली, मानसिक आधार मिळाला, विद्वान श्रोता मिळाला. त्यांचा अभिमान, दुराभिमान जपणारी अर्धांगिनी मिळाली. पण अज्जीला मात्र या लग्नामुळे मोक्ष मिळाला. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टीच आपल्याला मोठे आनंद देऊ शकतात याचे जिवंत प्रतीक अज्जी बनली. राग, अश्रू,पश्चाताप या सगळ्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मला अज्जीने न बोलता दिली. तिच्या माझ्या आयुष्यातील या भूमिकेसाठी मी तिची आजन्म ऋणी राहीन.

15 comments:

 1. माझी आज्जी पण वाक्या वाक्यात डोकावून गेली.
  खुप खुप सुंदर..! दुसरे शब्दच नाहित.

  ReplyDelete
 2. सई,
  खूपच ह्रुदयश्पर्शी लेखन आहे. वाचून मला माझ्या आजीची खूप आठवण आली. बरेच दिवसानी डोळे मोकळे झाले.
  असच लिहीत जा.

  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 3. अतिशय हृदयस्पर्शी.

  ReplyDelete
 4. सई गं...कित्ती मखमली आठवणी आहेत तुझ्याकडे आजीच्या! मखमली हा शब्दही वापरावासा वाटण्याचं कारण तुझे शब्द..आणि त्यातली सहजता. ’उन्हाळ्याची सुट्टी’माझ्या काही खास ब्लॉगोबांपैकी एक झालाय.

  ReplyDelete
 5. "तिला तिच्या काही आठवणी गोष्टींमधून सांगायचा हा कार्यक्रम होता! पण ती जाताना मला इतक्या आठवणी देऊन गेली की आता तिच्या आठवणींसाठी ही जागाही अपुरी पडेल. "

  किती छान मांडतेस गं तू सर्व सई. आज मात्र डोळ्यातून पाणी आणलंस. इतके दिवस कळलंच नाही की तुझ्या अज्जी आजारी आहे...देव तिच्या आत्म्याला शांती देवो.

  ReplyDelete
 6. सुंदर
  अतिशय ओघवत्या शब्दात लिहिलं आहे. खुपच छान

  ReplyDelete
 7. Hi Sai

  Nehami pramane


  Toooooooooo goooood

  ReplyDelete
 8. तुझे लेख वाचताना तुझ्यासोबत हळवं न होणं खूप अवघड आहे सई. brilliant!!

  ReplyDelete
 9. मला कुठलीच आजी नाहिये... कधीच नव्हती... पण तुझा लेख वाचून आलेलं डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही बघ.
  अशीच छान लिहित रहा. अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 10. far surekh lihlays g.. mazihi inni aajji athvali...

  ReplyDelete
 11. saydee hi hi post phaarch halwe karte aahe g... can't even think of writing anything..

  ReplyDelete
 12. Khupch hrudgat lihile ahes hey post... tujhi Ajji ekdam dolysamor ubhi rahili...ashi aaji ani tujhya babatit ajya ani ajol labhayala kharach bhagya lagate...

  ReplyDelete
 13. प्रिय सईस,
  आत्ताच तुझा blog वाचला, किती सुंदर लिहीले आहेस.तुझ्या ताजी व कुसुमआजीबद्दल वाचताना नकळत माझ्या वयाची ४३ वर्षे
  गळून गेली,मी बनले १० वर्षांची पोर व गेले भोरला, माझ्या जन्मगावी.तेथे माझे बालपण माज्या तिन आज्या व दोन आजोबा यांच्या सहवासात
  फार छान गेले,पुण्याहून प्रत्येक सुट्टीला मी तिकडे पळ काढत असे. ज्यांना असा आजीआजोबांचा सहवास लाभतो ते सुदॆवी.त्या वयात बिनभिंतीच्या
  शाळेत असे काही शिकले जाते की शेवटपर्यंत ते पुरते. काळजाला भिडणारे, डोळ्यात आसू तर कधी हासू आणणारे असे कसे काय ग लिहू शकतेस ?
  लहानपणी अगदी सख्खा मॆत्रीणीकडच्या खजिन्यातील वस्तु पाहून जसा तिचा हेवा वाटायचा ना, अगदी तसाच हेवा वाटला तुझा.असेच या मॆत्रीणीला जळविण्यासाठी छान,छान लिही. प्रतिक्षेत.

  ReplyDelete
 14. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 15. @Vidya,
  Thanks for the comments. :)
  The more comments I get, the more I realize that these stories are everybody's stories. :)
  Keep visiting!
  Thanks
  Saee

  ReplyDelete