Saturday, November 14, 2009

अंकली ते सांगली

उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी आम्ही ताजीच्या बहिणीकडे अंकलीला जायचो. अंकली सांगलीजवळचं छोटंसं गाव आहे. ताजीची बहीण सुमती (सुमा) अज्जी तिथे राहते. तिचं घर, शेत, वीटभट्टी सगळं तिथेच आहे. अंकलीला जाणे म्हणजे आमच्या सुट्टीचा खास भाग असायचा. तिची मुलं, सुना, नातवंडं आणि तिचा चित्रविचित्र प्राणीसंग्रह या सगळ्याचं आम्हांला फार कौतुक होतं. तिचं घरही खूप मजेदार आहे. एका अरूंद पण लांब जागेवर तिचं घर एखाद्या बोगद्यासारखं उभं आहे. दारातून आत गेल्यावर लांबच लांब बोळ आणि त्याच्या एका बाजूला क्रमाने देवघर, बैठकीची खोली, स्वयंपाकघर, न्हाणी अशा खोल्या आहेत. न्हाणीघराच्या दाराशी वर जायचा जिना आहे. तिथे तशाच एकापाठोपाठ एक आणि तीन खोल्या आहेत!

तो बोळसुद्धा जादूच्या गोष्टीतल्या चेटकीणीच्या घरासारखा आहे. कुठल्या खोलीतून कुठला प्राणी बाहेर येईल सांगता येत नाही. तिच्या दारातच पोपटाचा पिंजरा आहे. त्यातला पोपट मुलखाचा शिष्ट. पुण्यात तो पोपट असता तर चितळे आडनावाच्या पोपटिणीच्या पोटीच जन्माला आला असता. कुणी त्याच्याशी बोलायला आलं की सदैव डोळे पांढरे करून, "मला तुमच्याशी बोलण्यात काहीही रस नाही. उगीच इकडे उभे राहून स्वत:चा आणि माझा वेळ वाया घालवू नका", अशा अर्थाचा भाव त्याच्या चेह-यावर असायचा! तिच्या स्वयंपाकघरात चूल होती. तशी बर्शनची शेगडी पण होती, पण सुमा अज्जी जुन्या वळणाची असल्यामुळे ती नेहमी चुलीवरच भाकरी करायची. चुलीवरच्या भाकरीचा सावळा गावरान ठसका गॅसच्या शेगडीवरच्या ऎश्वर्या राय भाकरीला कुठून येणार? तिच्या चुलीशेजारी तिचं एक-कानी मांजर होतं. त्याला चुलीशेजारी बसायची फार हौस होती. एकदा आपण चुलीच्या किती जवळ आहोत याचा अंदाज चुकल्यामुळे त्याला एका कानाला मुकावं लागलं. पण सुमा अज्जी म्हणूनच की काय त्याचे जास्त लाड करायची. तिच्या घरी दिगू नावाचा कुत्रा होता. तो म्हणे दर गुरुवारी उपास करायचा. त्याला जेवायला दिलं तरी जेवायचा नाही. याची शहानिशा करून बघायसाठी मी गुरुवारपर्यंत तिथे रहायचा हट्ट केला होता.
तिला भाकरी करताना बघायला मला फार आवडायचं. तिच्या हातात निदान दोन डझन बांगड्या नेहमीच असायच्या. भाकरी थापताना त्यांचा हलका आवाज व्हायचा. आणि त्या बांगड्यांच्या कुंपणापलीकडे तिचं गोंडस, गोंदलेलं मनगट भाकरीच्या तालावरच नाच करायचं. खेड्यातल्या बायकांचे हात काय काय गोंदण-गोष्टी सांगतात! कुणाचं सालस तुळशी वृंदावन तर कुणाचा दिमाखात मागे वळून बघणारा मोर! आणि ते मऊ गव्हाळ, गोंदलेले हात लपवायला कासभर हिरव्या बांगड्या. मला सगळ्यांची गोंदणं बघायचा नादच होता. अगदी परवा मेल्बर्नमधल्या एका ऑस्ट्रेलियन काकूंच्या हातावर निळा गोंदलेला मोर पाहिला आणि या सगळ्याची आठवण आली.

काहीजणी त्यांच्या नव-याचं नाव गोंदून घेत असत. हे कळल्यावर इकडल्या ब-याच मुली , "ईन्डियन विमेन आर सो सप्रेस्ड!" असे उद्गार काढतात. पण स्वत:च्या नव-याचं नाव हातावर निरागस अभिमानाने लिहिणारी भारतीय नारी मात्र "सप्रेस्ड" आणि साधारणपणे दिसणार नाही अशा ठिकाणी फुलपाखरू काढणारी, आणि मग ते दाखवणारी पाश्चात्य महिला मात्र स्वतंत्र! हल्ली तर पुरुष लोकही त्यांच्या बायकांची नाव गोंदून घेऊ लागलेत! इकडे रस्त्यातल्या दर दुस-या व्यक्तीच्या हातावर गोंदण असतं. त्याला "टॅटू" म्हणतात! पण महानोरांनी बघितलेला तो "गोंदलेला हात मऊ टापटीपीचा" फक्त भारतातच बघायला मिळतो.
आणि सुमा अज्जी कुसुम अज्जीला फार प्रेमाने वागवायची. कुठेही न जाणारी कुसुम अज्जी अंकलीला यायला मात्र नेहमी तयार असायची. एरवी मुख्याध्यापिकेसारखी वागणारी अज्जी सुमा अज्जीच्या स्वयंपाकघरात चुलीशेजारी जमिनीवरच बसून तिच्याबरोबर चहा प्यायची. मला या नात्यांचं खूप अप्रूप वाटतं. माझ्या अज्ज्यांनी किती प्रकारच्या भावनांना प्रेमाचे लगाम लावले होते याचे हिशेब लागता लागणार नाहीत. आणि नात्यांमधले काही त्याग थंड आगीसारखे एकसारखे अहंकाराचे भस्म बनवत असतात. त्यापलीकडे गेलं की सगळंच चैतन्यमयी होऊन जातं. ताजी आणि कुसुम अज्जीची ही बाजू सहसा समोर यायची नाही.

सुमा आज्जीचा मळा मुडशिगीच्या मळ्यापेक्षा खूप जास्त मजेदार होता. तिच्याकडे ससे होते, गायी होत्या वर राखण करायला शिकारी कुत्रा सुद्धा होता. सश्याची पिलं हातात घ्यायला आम्हाला फार आवडायचं. आणि मळ्यातल्या कुणालाच सशांबद्दल आमच्याइतकी आपुलकी नव्हती. त्यांचे लाल-लाल डोळे, आणि गुबगुबीत पाठी फार सुंदर दिसायच्या. मळ्यातून घरी यायला बैलगाडी असायची. यापेक्षा अजून जास्त मजा काय असू शकते?
स्नेहाचं आजोळ सांगलीला आहे. एकदा सुमाअज्जी आणि तिच्या यजमानांबरोबर आम्ही (मी, मीनामामी आणि स्नेहानी) अंकली ते सांगली प्रवास बैलगाडीने केला होता. सकाळी सकाळी सुमाअज्जीने टोपलीत भाकरी, कोरडी मुगाची उसळ, कांदा, ठेचा असा नाश्ता भरून घेतला. मग बाप्पांनी बैलगाडीत आमचं सामान नीट लावलं. मग गाडीच्या चाकांमधल्या घुंगरांच्या तालावर आमची वरात सांगलीला निघाली. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ लागला असला तरी तो प्रवास मी कधीही विसरणार नाही. तसं खास काहीच नव्हतं, पण सगळंच खास होतं. रोजच्या दगदगीत, पळापळीत, जुळवाजुळवीत मला अधूनमधून नेहमी तो प्रवास आठवतो. आणि मग "हे मिळव ते मिळव" करणा-या मनाला त्याची जागा बरोबर दाखवली जाते. तसं जगात काहीच नसतं की जे मिळाल्यावर आपण कायमचे खूष होऊ, पण अशा किती गोष्टी आहेत ज्या इतक्या साध्या असून इतकी वर्षं खूष करतात.
एखाद्या थंडगार झाडाखाली बसून खाल्लेली फटफटीत मुगाची उसळ, मेथीची भाजी आणि त्याबरोबर मुठीने फोडून वाटलेला कांदा. मग त्यानंतर तिथेच काढलेली एक डुलकी! या सगळ्यापुढे आपण कोण आहोत, कुणाचे आहोत, कुठे चाललो आहोत आणि का चाललो आहोत, हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत. पण हे कळायला या सगळ्यापासून दूर जावं लागतं. रविन्द्रनाथ म्हणतात तसं, "सगळ्यात दूरचा प्रवासच आपल्याला स्वत:च्या सगळ्यात जवळ नेतो आणि प्रत्येक प्रवासी खूप अनोळखी दारे वाजवूनच स्वत:च्या आतल्या दाराकडे येऊ शकतो". पण माझ्यामधल्या खूप सा-या प्रवासांचा उदयास्त या अंकली ते सांगली प्रवासात झाला!

21 comments:

 1. सई, खूप छान लिहिलंस गं....तू एकदा लेखणी घेतलीस आणि आठवणींच्या राज्यात गेलीस की फ़क्त चौकार आणि षटकारच अधलं-मधलं काही नाही...लय भारी....:)

  ReplyDelete
 2. सई
  तुमची कुसुम आजी, नरु मामा सगळे कसे अगदी छान जवळचे मित्र मैत्रिणी असल्याप्रमाणे वाटतात. तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच आम्ही आता चांगलं ओळखु लागलो आहोत, आणि नेहेमी वाट पहात असतो, की आता सई नविन काय लिहिणार ते वाचायला.. :)
  आता लेख चांगला झाला हे लिहिणं आवश्यक आहे कां? नेहेमी प्रमाणेच मस्त!!

  ReplyDelete
 3. @ Aparna..haha I feel like Sachin Tendulkar now. :) Thanks a lot for the comments!!
  @Mahendra..
  You don't have to call me "tumhi"..:)
  माझं आजोळ सगळ्यांना आवडतंय याचा मला फार आनंद होतो. त्यामुळे अभिप्रायाबद्दल मी तुमची आभारी आहे !!
  यातली प्रत्येक व्यक्ती एक पुस्तक आहे.!!

  ReplyDelete
 4. Kitti chhan lihita tumhi. Kharech aatta tumachya gharatale sagale mala suddha javalache vaatayala laagale aahet. Mi niyamit pane tumacha blog vaachate. Tasha sagalyach post nehemich chhan astat pan aajachi jara jastach mast vaatali. Best.........:D

  ReplyDelete
 5. U really have very good writing skill. I wait for your articles. Really nice!

  ReplyDelete
 6. ये हुई ना बात! "तसं जगात काहीच नसतं की जे मिळाल्यावर आपण कायमचे खूष होऊ, पण अशा किती गोष्टी आहेत ज्या इतक्या साध्या असून इतकी वर्षं खूष करतात." हे खरंच मनापासून पटले तर आयुष्य सुखाचेच होईल नाही का?

  ReplyDelete
 7. Maithili
  Thanks, me pun tuzya comments chi wat baghte. :)
  @Madhuri
  Thanks for the compliments.
  @Shrirang
  Thats true. Although I wrote that I do not believe it all the time. :( Kalch me bhartat yachya aadhi mala paper submit karaycha tension alyamule aai la phone karun radle. :)

  ReplyDelete
 8. सई,
  लेख नेहमीप्रमाणे छान, मस्त झालाय हे वेगळं सांगायची गरज नाहीये.
  अपर्णा ने म्हणल्याप्रमाणे चौकार, षटकार करत तू प्रत्येक लेखात शतक नक्की करतेस.
  सहज, सोपी भाषाशैली, लहान-लहान गोष्टीत खूप जास्त आनंद शोधायची व्रुत्ती, केवळ वर्णन न करता त्यात काहीतरी वेगळा विचार व्यक्त करणे ह्या सगळ्यामुळे तुमचे लेखन नक्कीच आनंददायी होते.
  पुढील लेखाची वाट बघतोय. तुमच्या बटव्यातून काय नवीन बाहेर पडणारे ह्याची उत्सुकता आहे.

  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 9. नमस्कार

  नेहमीप्रमाणे मनाला भुरळ पाडणारा लेख.
  नॉस्टॅल्जिक व्हायला होत एकदम..

  मस्तच..

  ReplyDelete
 10. अनिकेत आणि सतिश,
  अभिप्रायाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद!
  आता पुढचे काही दिवस कठीण आहे. मी भारतात चालले आहे. पण बघुया कसं जमतंय.
  धन्यवाद,
  सई

  ReplyDelete
 11. सई,
  भारतात जात (येत) आहेस तर पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या कर.
  मान्य आहे की खूप गोष्टी बदलल्या असतील, आपल्या आठवणीतल्या आणि आत्ताच्या प्रत्यक्षतल्या. तरीही त्या माणसांना, वास्तूंना पुन्हा एकदा भेटून refresh हो.
  शुभ प्रवास.


  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 12. ऐश्वर्या राय भाकरी!! ह ह ज ग लो!! एक नंबर!! आणि हो! शेवटी तो कुत्रा उपास नक्की करायचा की नाही??

  चाफ्या

  ReplyDelete
 13. Kutra upas karaycha ki nai te me verify nahi karu shakle. But karat asel na evdhe sagle mhantayt tar! :)

  ReplyDelete
 14. ए किती सॉलीड आहेस यार तू...तुझा ’उन्हाळ्याची सुट्टी’ हा नुसता ब्लॉग नाही एक छान पुस्तक होईल पुस्तक!!
  Think about it :)

  ReplyDelete
 15. सई
  आहेस तरी कुठे?? बरेच दिवसात अंतर्जालावर वावर दिसला नाही?

  ReplyDelete
 16. सई
  आहेस तरी कुठे बरेच दिवसांपासुन अंतर्जालावर दिसली नाहिस? वर टायपो एरर आहे.. सॉरी.. प्लिज डीलिट कर वरची कॉमेंट!

  ReplyDelete
 17. Hi Mahendra..
  I was in Pune for the past 5 weeks. Just came back. Ata suchla kahi nawin ki lagech lihin. :)
  Cheers
  Saee

  ReplyDelete
 18. सईबाई,
  अहो, नेहमीप्रमाणेच मस्त खुसखुशीत.
  त्याग...अहंकाराचे भस्म...त्यापलीकडे सगळेच चैतन्यमयी’- आवडलं

  ReplyDelete
 19. @ Prasad
  Thank you. Somehow I am not finding inspiration to write on this blog. :(
  Maybe that was all. :(
  But thanks for the comment!! :)

  ReplyDelete
 20. खरच सुंदर. अगदी चित्रं डोळ्यापुढे उभं राहिलं. तुमच्या लिखाणाला एक अजून चाहता मिळून गेला :)

  ReplyDelete