Thursday, November 5, 2009

मुद्दा सोडू नका!!

सगळ्या मुडशिंगीकरांना एक सवय आहे. काही खास सांगायचं असेल तर तिथपर्यंत
सरळ रस्त्यानी न जाता जोरदार नागमोडी वळणं घेत जातात. याचा मला
लहानपणापासूनच खूप राग यायचा. या सवयीचे जनक अर्थातच समस्त
मुडशिंगीकरांचे जनक वसंतराव आहेत हे सांगायला नको. पण नंतरच्या पिढीतला
मुद्दा लांबवण्यात पहिला नंबर आरूमामाचा असेल. तो कुठल्याही घरगुती
कहाणीची एकता कपूर सिरीयल करून टाकतो.
"कसं असतंय सई" अशी सुरवात तो करतो. या "कसं असतंय"चा सूर कोल्हापुरात
राहणारे लोकंच नीट वाचू शकतील.
"कसं असतंय" किंवा "त्याचं काय असतंय" याच्यापुढे कोल्हापुरी लोक नेहमी
कुठलंतरी वैश्विक सत्य सांगतात.
त्यामुळे आरूमामाच्या, "कसं असतंय सई" पुढे नेहमी घरातल्या स्त्रीगटाच्या
मानसशास्राचा सखोल अभ्यास करून काढलेला निष्कर्ष असतो. यात नेहमी मधूमामी
(राजामामाची बायको) ताजीला तिच्या बाजूला करून सुरेखामामीविरूद्ध कट करते
याचं विनोदी वर्णन असायचं. त्यात मूळ कटाचा विषय सोडून तो खूप वेळ इकडे-
तिकडे फिरायचा. मग मध्येच मी, "बरं कळलं पुढे काय झालं ते सांग आता" ,असं
म्हणल्यावर तो, "थांब गं !घाई करून माझा मोसम तोडू नकोस", असं म्हणायचा.
'मोसम' तोडणे हा "मोशन तोडणे"चा अपभ्रंश आहे. ट्रकवाले मध्येच गियर
बदलावा लागल्यामुळे कमी झालेल्या वेगाला "मोसम तोडणे" असं म्हणतात. आरूमामा
रोज संध्याकाळी त्याच्या मित्रांच्या गटात प्रवचनकाराची भूमिका
बजावायचा. अर्धा-पाऊण तासच त्याच्याबरोबर घालवायला लागल्यामुळे त्या
सगळ्यांमध्ये तो लोकप्रिय होता!
तसाच नरूमामासुद्धा एखाद्या गोष्टीचं कौतुक करायला लागला की बोलायचा
थांबतच नाही. त्याचं "माझ्याबद्दल" काय मत आहे हे मला पूर्ण ऐकवतसुद्धा
नाही. कारण त्याचं सगळं कौतुक जर खरं मानलं तर मी आत्ता जे काय करते आहे
ते करायला लागणं ही नियतीने माझी केलेली क्रूर चेष्टा आहे असं एखाद्याला वाटेल.
राजामामात आरूमामाचा वर्णनप्रभूपणा नाही किंवा नरूमामाचं मुद्दा सोडून
मार्केटींगसुद्धा नाही. राजामामा फटकळपणात पुढे आहे. कुणाला तो काय बोलेल
याचा काही नेम नाही. आणि माझे सगळे मामा आणि आजोबा फोनवर इतक्या जोरात
बोलतात की फोनशिवायसुद्धा त्यांचं बोलणं पलिकडच्या माणसाला ऐकू येईल.
आईसुद्धा काही खास बातमी असेल की तिला मागे-पुढे मीठ-मसाला लावते. पण
आईला मात्र मी "आई मुद्दा काय आहे? लवकर सांग" असं अगदी न संकोचता
सांगायचे. मग ती कधी कधी तसं केल्याबद्दल रुसून बसायची आणि सांगायचीच
नाही. मग तिची समजूत काढून थोडा मीठ-मसाला सहन करून बातमी काढून घ्यायला
लागायची.
पण सगळ्यात अतिरेकी वर्णन आजोबा करायचे. त्यांचा हस्तसामुद्रिक आणि
कुंडलीशास्त्राचा अभ्यास आहे. त्यामुळे बरेच लोक त्यांच्याकडे भविष्य
सांगून घ्यायला यायचे. पण मोठी होताना मला "ज्योतिष" हा आजोबांचा पिसारा
आहे हे लगेच लक्षात आलं. कुणीही भविष्यासाठी आलं की त्याला त्याचं भविष्य
सोडून सगळं आजोबा सांगायचे. कधी कधी मी "मी गणितात नापास नाही नं होणार?"
वगैरे जुजबी शंका घेऊन त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनी जायचे. मग ते ,
"बघतो हां, माझा पानाचा डबा आण आधी", असा हुकूम सोडायचे. मग अडकित्त्याने
सुपारी कातरत, "त्याचं काय आहे सई..." सुरू व्हायचं.
झालं, ते वाक्य आल्यावर पुढील तीन तासांचा बळी जायचा. हात बघताना ते
नेमक्या वेळेस अशी काही उत्कंठा जागृत करत असत की अगदी मराठी मालिकांच्या
जाहिरातींआधी, "थोड्याच वेळात" च्या चित्रफितीसुद्धा लाजून लाल होतील.
"हे बघ सई, हा गुरूचा उंचवटा बरंका! तुझ्या हातावर या उंचवट्यावर फुली
आहे. आणि हस्तसामुद्रिकांत कुठेही फुली असणे हे फार मोठ्या कुयोगाचे
लक्षण आहे.." तेवढ्यात त्यांच्या तोंडातली सुपारी तंबाखू त्यांना बोलणं
अशक्य करायची. मग ते मोरीकडे जाऊन येईपर्यंत माझ्या हातावरची ती फुली
माझ्या गणिताच्या पेपरावरचा गोळा बनायची.
परत आल्यावर, "हा मी काय म्हणत होतो, फुली इस द वर्स्ट साईन एनीव्हेयर
ऑन द पाम, एक्सेप्ट..." असं म्हणल्यावर त्यांचे डोळे लकाकायचे. क्षणभर
नाट्यमय शांतता आणि, "एक्सेप्ट गुरूचा उंचवटा! इथे फुली म्हणजे राजयोग
बरंका!"
यामुळे माझा जीव भांड्यात पडायचा.मी आजपर्यंत एकदाही माझं "भविष्य"
त्यांच्याकडून ऐकलं नाहीये. पण मी खूपवेळा तासंतास त्यांच्यासमोर
भविष्यासाठी बसलेली आहे. या भविष्याच्या पिसा-याकडे आकर्षित होऊन कित्येक
अजाण लोक त्यांच्या अध्यात्मावरच्या भाषणांचे गिनीपिग झालेत.
ब-याच वेळेस माझ्या अंगठ्याचा ते पाच मिनिटं अभ्यास करायचे. मग सगळ्या
प्रकारच्या अंगठ्यांचे वैशिष्ठ्य सांगायचे. त्यात शेवटी उद्दाम, क्रूर,
जुलमी, उर्मट, हट्टी आणि अप्पलपोटी माणसाचा अंगठा आणि माझा अंगठा सारखा
आहे असं मला सांगायचे. त्यापुढे लगेच हातावरच्या रेषा कर्तृत्ववान
माणसाला कशा बदलता येतात यावर अर्ध्या तासाचं भाष्य व्हायचं आणि त्यानंतर
मी माझा अंगठा कसा बदलू शकेन यावर सूचना!!
आजोबांची नेहमी माझ्याबद्दल एकच तक्रार असायची. मी त्यांना हवी तितकी
विनम्र नव्हते. आणि माझा "मुद्दा सोडू नका" हा मुद्दा त्यांना उर्मटपणा
वाटत असे. कदाचित असेलही तसं. पण आजोबांचं मुद्दा सोडणंही तितकच भीतीदायक
असायचं. एकतर त्यांचा व्यासंग दांडगा. त्यामुळे त्यांची नागमोडी वळणं
उपनिषदांमध्ये जायची. कधी बिचारी संस्कृत भाषाही कमी पडली तर ते अब्राहम
लिंकन, शॉ, चर्चिल या गो-या लोकांनाही मदतीला बोलवायचे. त्यामुळे दोन
तासांच्या अंती मी, "आजोबा आपण माझं भविष्य बघत होतो" अशी आठवण करून
द्यायचे.
चौदा पंधरा वर्षांची झाल्यावर त्यांच्या नकळत मी त्यांची सगळी भविष्याची
पुस्तकं वाचली. मग पुण्याला येऊन मी माझ्याजवळच्या खाऊच्या पैशातून आणि
आई-बाबांच्या भत्त्यातून "नवमांश रहस्य", "सुलभ ज्योतिषशास्त्र" वगैरे
पुस्तकं आणून कुडमुडी ज्योतिषीण झाले. पुढे खूप वर्षं नरूमामा त्याच्या
भविष्योत्सुक मित्रांना आधी माझ्याकडे आणत असे! मग मी त्यांना "काय
प्रश्न आहे तुमचा?" असा एकच प्रश्न विचारून त्याचं एकच उत्तर द्यायचे.
यात मला माझ्या "मुद्दा सोडू नका" आर्जवापासून मोक्ष मिळाला.
पण आता मोठी झाल्यावर समजू लागलं आहे की काही नागमोडी वळणंच मूळ मुद्दा
सुंदर बनवतात. जर सगळेच मुद्दा धरून बोलू लागले तर जगातलं खूप सारं काव्य
कमी होईल. आणि असे खूप मुद्दे असतात जे उत्सुकतेच्या हिरव्या द-यांतून,
विनोदांच्या खळखळणा-या धबधब्यांतून आणि हसून हसून डोळ्यांतून येणा-या
ओलाव्यातूनच जास्त लोभसवाणे वाटतात. त्यामुळे माझ्या नकळत मला गोष्टी
सांगायचे धडे दिल्याबद्दल या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!!

6 comments:

 1. माझा काका काकूला हेच सांगत असतो.. "अगं शेवटचं वाक्य बोल.. वर्णनं नकोत!!.. " पण प्रत्येकजण जर असा पट्कन मुद्द्याला यायला लागला, तर पंचाइतच होईल नाही? मग suspense सिनेमेच असणार नाहीत!!.. (तसं अजून बरंच काही होईल.. पण मला आपलं हेच सुचलं!!). blog मात्र एकदम to the point aahe बरं का!

  ReplyDelete
 2. वा वा सई,

  अप्रतिम लेख. झक्कास जमलाय. मजा आली.

  तुलाही आम्ही हेच सांगतोय. लेखनाचा मुद्दा सोडू नकोस.

  आपला,
  (संतुष्ट) धोंडोपंत

  ReplyDelete
 3. सई तूझ हे म्हणण म्हणजे मुडशिंगीकरांबद्दल मात्र अगदी मुद्याला धरुन आहे.अरूमामा इतकाच नरूमामा देखील मुद्दासोडू आहे.नमनाला घडाभर तेल ही म्हण कदाचित त्यांच्यासाठीच तयार केली असावी.त्यांच्या बोलण्यात नूसती नागमोडी वळण नसतात तर नागमॊडी वळणांचा आख्खा खंडाळ्याचा घाटच(जूना)असतो. अगदी मुद्देसूद वर्णन आहे!

  ReplyDelete
 4. हेहेहे असंच असतंय सई... सेम हिअर माझे बाबा, काका अन् सगळी करवीरवासिय मंडळी अशीच सुरूवात करतात. हां पण आईच मात्र अगदी मुद्देसूत.

  चालुदे सह्ही आहे

  स्वार्थी वाचक
  ;-)

  ReplyDelete
 5. त्याचे काय आहे सई.............जाऊंदे, कोल्हापूर आता खूप वर्षे मागे राहिले, तेंव्हा सरळ मुद्द्यावरच येतो......शेवट फर्मास जमला की आधीची सगळी वळणे छानच दिसू लागतात.

  मस्त मझा आला हा ब्लॉग वाचतांना.

  ReplyDelete