Sunday, March 21, 2010

प्रवास

आमच्या ताईअज्जीला प्रवासाची भारी आवड! ती एक आणि सिनेमाची दुसरी. पण कुठेही जायचं म्हटलं की ताजी एका पायावर तयार असायची. मुडशिंगीहून अंकलखोपला जायचं म्हटलं तरी तिचे डोळे चमकायचे. तिच्याबरोबर प्रवासाला जाण्यात खूप मजा असायची, कारण तिथे पोहोचायच्या आधी ती सगळ्याचं वर्णन करायची. कुठल्यातरी गोष्टीच्या पुस्तकाची पानं भराभरा उलटल्यासारखं सगळं वातावरण डोळ्यासमोर उभं करायची.

"सई, आपल्या अंकलखोपला नदी आहे बरंका! आपण गेल्या गेल्या नावाडी आहे का ते बघूया हं. म्हणजे नदीच्या त्या कडेला जाता येईल."
लगेच माझ्या डोक्यात नाव, नावाडी, मग तो गाणं म्हणेल का नुसताच मठ्ठपणे बसून राहील ह्या सगळ्या गोष्टी चमकायच्या. मग कधी कधी कौलावर माकडं येतात हे पण सांगून मला नवीन खेळ द्यायची.
पुण्याला आली की ताजी आणि बाबा एका गटात सामील व्हायचे. बाबापण भटका आहे. त्याला भटकणार्‍यांची संगत मिळाली की तोही खूष असतो. मग आमच्या कायनेटिकवरून बाबा आणि ताजी भरपूर भटकायचे. सातार्‍यापर्यंतच्या परिघात जे जे म्हणून नातेवाईक आहेत त्यांना ताजी कायनेटिकवरून भेटायला जायची. कधी कधी मलाही मध्ये बसवून घेऊन जायची. गाडीवरही आपण कुणाकडे चाललोय, ती माणसं कशासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांचं आणि माझं नक्की नातं काय आहे वगैरे वगैरे गोष्टी माझ्या डोक्यातल्या संगणकाला भरवत जायची. तिच्या त्या प्रस्तावनेमुळे माझी उत्सुकता नेहमी टिकून राहायची. आई-बाबा कुठे जाताना आधी मला, "जास्त प्रश्न विचारायचे नाहीत" अशी ताकीद करून न्यायचे. तरीही तिकडे जाईपर्यंत मी प्रश्न विचारून त्यांची डोकी रिकामी करायचे.
"बाबा आपण चाललोय तिकडे कुत्रा आहे?"
"नाही"
"मग मांजर?"
"नाही"
" ते आपल्याला काय खायला देणार?"
"मला माहीत नाही पिल्लू. पण तू काही मागू नकोस"
"नाही मागणार. पण तरी ते देतीलच ना? आपण पाहुणे आहोत!"
"हो देतील"
"ते उप्पीट नाही ना देणार? दिलं तर मला खावं लागेल का?"
" हो अर्थातच"
"शी बाबा. उप्पीट असेल तर मी थोडंच खाणार हं!"
"त्यांनी मला चहा दिला तर तू त्यांना 'हिला चहा देऊ नका' असा सांगणार का?"
"तू प्रश्न बंद केलेस तरच नाही सांगणार"
"त्यांना माझ्याएवढी मुलगी आहे का?"
"नाही त्यांना दोन मुलं आहेत. एक तुझ्याएवढा आहे"
"शी बाबा. मग मी कुणाशी खेळणार?"
"तुझे एवढे प्रश्न संपण्याइतका वेळ आपण तिथे थांबणार नाहीयोत. त्यामुळे बस कर आता."

मग मी हिरमुसली होऊन उरलेला वेळ गाल फुगवून घालवायचे. ताजी मला प्रश्न विचारायची संधीच द्यायची नाही. त्यामुळे मला तिच्याबरोबर जायला खूप मजा यायची. ताजीची लहान बहीण लीलाअज्जी पुण्याजवळ नीरेला राहायला होती. एकदा मी, ताजी आणि बाबा गाडीवरून तिच्याकडे गेलो. तिच्या घराच्या आजूबाजूला खूप शेळ्या होत्या. त्या दिवशी मी एक कोकरू उचलून घरात आणलं होतं. त्यानी घाबरून घरात उच्छाद मांडला! तो नंतर लीलाअज्जीला निस्तरावा लागला होता. पण अजूनही मला भेटले की ते सगळे त्या दिवसाची आठवण काढतात. ताजीला मात्र माझं त्या दिवशी खूप कौतुक वाटलं होतं. आई असती तर यल्लम्मासारखे मोठ्ठे डोळे करून भीती घातली असती मला!
एकदा मी, ताजी आणि अण्णाआजोबा रेल्वेनी शिर्डीला गेलो होतो. आजोबांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पहिल्या वर्गाचा मोफत पास आहे रेल्वेचा. त्याचा त्यांना फार अभिमान आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर प्रवासदेखील ते रेल्वेनीच करतात. त्यांच्या पासमध्ये दोन लोकांना जायला मिळतं पण मी छोटी असल्याने मलादेखील जाता आलं! आजोबा ताजीच्या मानानी फारच अरसिक. आम्ही गेलो त्या रात्री देवळात कीर्तन होतं. ताजीला ते ऐकायची फार इच्छा होती. पण आजोबांनी, "रात्रीचं कसलं कीर्तन करतात! दहा ही काय कीर्तन करायची वेळ आहे का? गप झोपा खोलीत!" म्हणून धमकी दिली.मग आम्ही दोघी "गप झोपलो". जसा जसा आजोबांच्या घोरण्याचा आवाज वाढू लागला तशी ताजी उठली. मला पण उठवलं. मग आम्ही चपला हातात घेऊन खोली बाहेर आलो. ताजीनी हे आधीच ठरवलं असणार कारण माझा स्वेटर आणि मोजे तिनी तिच्या पिशवीत टाकले होते. मग बाहेर आल्यावर तिनी सरळ खोलीला कडी घातली! मला आजोबांना कोंडल्याचा काय आनंद झाला होता! बाहेर आल्यावर आम्ही भर भर चपला घातल्या. मला आधी मोजे घालून वर चपला घालाव्या लागल्या! देवळाजवळ गेल्यावर दोघींनाही हसू काही केल्या आवरत नव्हतं! त्या रात्री साडे बारापर्यंत आम्ही कीर्तन ऐकलं! आणि परत खोलीत जाऊन होतो तशा झोपलो! सकाळी आजोबांना काही कळलं सुद्धा नाही. दोन दिवसांनी आजोबांचा मूड पाहून ताजीनी त्यांना आमची गम्मत सांगितली. तेव्हा आजोबादेखील खो खो हसले होते!!
खूप वेळा, "कसला जळला मेला यांचा पास! एखादा असता तर दोन्ही बायकांना आलटून पालटून काश्मीर, कन्या कुमारी, माथेरान दाखवलं असतं" म्हणून ताजी रेकोर्ड सुरु करायची. त्यातलं मला दोन बायकांना आलटून पालटून हे खूप भारी वाटायचं!! ताजीचा स्वभावच तसा होता पण.
तिला परदेशी जाण्याचे फार अप्रूप होते. आई अमेरिकेला गेली तेव्हा ताजी मला सांभाळायला आली होती. मग आईचा फोन आला की तिला मी लहान असताना विचारायचे तसेच प्रश्न ताजी विचारायची.
"होय गं वसू (माझ्या आईचे नाव वसुधा आहे) तिकडं रस्ते आपल्यासारखेच असतात?"
"तिकडच्या बायका काय घालतात गं? साडी नसतीलच घालत.!"
आई परत आली तेव्हा तिला माझ्याजोडीला ताजीही प्रश्न विचारून हैराण करायला होती. तिच्या अमेरिकन मैत्रिणीचा फोटो बघून
"काय गं बाई! पुरुषाला उचलून घेईल की गं ही!" असं म्हणून तोंडाला पदर लावून खूप वेळ हसली होती. मुलगी पाच फुटापेक्षा जरा उंच असली की ताजीच्या भाषेत लगेच ती पुरुषी व्हायची!
मी पंधरा वर्षाची असताना अमेरिकेला गेले. खरं तर मी सुट्टीला गेले होते. तरीही ताजीला माझा खूप अभिमान होता.
"एकटी अमेरिकेला गेली माझी नात!" म्हणून येईल त्याला ती सांगायची.
" सईनी हा गुण मात्र माझ्याकडून घेतलाय" असं ती सगळ्यांना सांगायची. आणि खरंच आहे ते. प्रवासाबद्दल माझ्या मनात पहिलं कुतूहल ताजीनीच रुजवलं. कुसुमअज्जीचे प्रवास पुस्तकांतून असायचे. तिला भटकणं फारसं आवडायचं नाही, आणि माझ्यातही कुठेतरी प्रवासाबद्दल तो कंटाळा आहे. पण माझं नशीब नेहमी मला त्यातून खेचून आणतं, आणि प्रत्येक प्रवासात मला माझ्यातली ताजी दिसते.
कुठलाही नवीन देश, नवीन वेश दिसला की मला उगीचच ताजी यावर काय म्हणाली असती याची कल्पना करावीशी वाटते. तिचं ते निरागस पण तितकंच उत्सुक रूप आठवलं की नेहमी ती जिथे आहे तिथे तिला माझा प्रवास दिसू दे अशी प्रार्थना करावीशी वाटते. मग विमानात बसताना ते हवेत झेप घेताना नेहमी आपल्याशेजारी ताजी असती तर काय बहार आली असती असा विचार येतो. तिनं मात्र बैलगाडीपासून ते रेल्वेपर्यंत सगळ्या प्रवासात मला पुढल्या प्रवासाची झलक दाखवत नेलं. तिला एकदातरी विमानातून कुठेतरी दूर नेता आलं असतं तर तिच्याच भाषेत, फिटांफीट झाली असती!

4 comments:

  1. सई आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच हे प्रेझेंट मनापासून आवडल!
    नेहमी प्रमाणेच अप्रतिम!
    आपल्याकड आज चक्क लिलामावशी व काका आले आहेत.
    मी ही पोस्ट लिलाआज्जीला वाचून दाखवली!
    तिला खूप आवडल तूझ लिखाण.तूझ मनापासून अभिनंदन केल आहे!

    ReplyDelete
  2. खूप मस्त! खूप ओघवतं लिहितेस तू..! आणि ते 'प्रश्न' hilarious आहेत! :)

    ReplyDelete
  3. @Aniket, Thanks. :)
    @Baba..wow what a cool luck.:)
    @Sushant, thanks a lot. :D Keep visiting!!

    ReplyDelete
  4. तिला एकदातरी विमानातून कुठेतरी दूर नेता आलं असतं तर तिच्याच भाषेत, फिटांफीट झाली असती! ....khup bhawala...ani majhya ajjichi faar aathwan jhali....

    ReplyDelete