Saturday, May 29, 2010

जगात काय चाललंय..

लहानपणी नेहमी लवकर उठायला लागल्यामुळे काही गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. सकाळी सकाळी बाबा रेडियो सुरु करायचा. रेडियोचं आणि माझ्या आई-बाबांचं, इतकंच नव्हे तर अज्जी-आजोबांचं नातंही खूप खोल होतं. त्यांच्या लहानपणी टी.व्ही. नसल्यामुळे त्यांचं या बोलणाऱ्या खोक्याशी सख्य होतं. बाबा सकाळी सकाळी बी.बी.सी. रेडियो ऐकतो. त्याचं बी.बी.सी.वर फार फार प्रेम आहे. पण लहान असताना मला, रेडियोवर गप्पा मारणा-या माणसांच्या गप्पा ऐकण्याचं हे वेड अजिबात समजायचं नाही. सकाळी सकाळी बाबा आपला मस्त कानाला त्याचा छोटा ट्रान्सिस्टर लावून चालू लागायचा. मग त्यात गप्पा मारणा-या लोकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा. अशावेळी मला नेहमी आपल्या ऐवजी बाबाला शाळेत पाठवावं असं वाटायचं. त्याला दुसरं काही लाव म्हटलं की लगेच तो, "सई, जगात काय चाललंय ते कळायला नको का?", असा सवाल उपस्थित करायचा. मला तेव्हा खरंच जगात काय चाललं आहे यानी फरक पडायचा नाही, आणि अशी जगाच्या पावलावर पाऊल ठेवायची खुमखुमीदेखील नव्हती. देवानी चांगली रेडियो शोधून काढायची बुद्धी दिली आहे तर त्याचा पूर्ण फायदाही घेता आला पाहिजे, आणि रेडियोचा एकमेव फायदा म्हणजे हिंदी सिनेमाची गाणी ऐकणे, असं माझं त्या काळी ठाम मत होतं. सकाळी चांगला तासभर रेडियो ऐकून झाल्यावर बाबा घरी येऊन तासभर पेपरही वाचायचा. त्यातही तो वेगवेगळे पेपर विकत घ्यायचा. त्यामुळे बाबाचं जगावर फार प्रेम आहे हे मला लहानपणीच समजलं. मग आई-बाबा ऑफिसला जायला तयार होत असताना गाणी लागायची. पण नेमका तेव्हा माझा अभ्यास सुरु असायचा. त्यामुळे मला बाबाचा अजूनच राग यायचा. कोल्हापुरातल्या घरात रेडियो हा भोंग्याचं काम करायचा. सकाळी सकाळी आजोबा अभंग वगैरे जोरात लावून सगळ्या बच्चे कंपनीला उठवायचे. मी त्या घरात कायमची राहिले असते तर मी नक्की नास्तिक झाले असते. पण आजोबांच्या मारून-मुटकून ऐकायला लावलेल्या अभंगांपेक्षा बाबाची बी.बी.सी. खूप चांगली होती. कोल्हापुरात रेडियो सामुदायिक आहे. पण तरीही तो लहान मुलांच्या हाताबाहेर होता. त्यामुळे मला आणि स्नेहाला खुर्चीवर चढून त्याच्या कळा दाबाव्या लागत. तेवढ्यात कुणी मोठी व्यक्ती आली की बळंच आम्हाला ओरडून जात असे. मामी दुपारचे बायकांचे कार्यक्रम चवीनी ऐकायची. नंतर टी.व्ही. आल्यावर, दुपारी मामी टी.व्ही. समोर वही घेऊन बसायची. पाककृती लिहून घ्यायला. तशा रेडियोवरसुद्धा असायच्या. आणि "मैत्रिणींना" लिहून घेता यावं, म्हणून रेडीयोतली काकू थांबून थांबून बोलायची. तेव्हा मला स्नेहाचा फार हेवा वाटायचा. आपल्यालाही अशी घरी बसून पाककृती लिहून घेणारी आई हवी होती असं नेहमी वाटायचं. मी जेव्हा आईला तसं सांगायचे तेव्हा तिला मनापासून हसू यायचं. पण आपली आई कधीच अशा पाककृती लिहीत नाही, तरी ती इतका छान स्वयंपाक करते याचा अभिमानही वाटायचा. नरूमामा नेहमी सफाई करताना गाणी ऐकायचा. रात्री झोपायच्या आधी "भूले बिसरे गीत" ऐकायची त्याची नेहमीची सवय होती. त्यामुळे नरूमामा माझा खूप लाडका होता. त्याच्या खोलीत त्याचा वेगळा रेडियो होता. रात्री झोपायच्या आधी आम्ही नरूमामाच्या खोलीत खूप वेळ लोळायचो. कधी तिथेच झोपायचो. मग नरूमामा मला अज्जीच्या खोलीत आणून ठेवायचा. रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये "आपकी फरमाईश" लागायचं. त्यात लोकांना आवडणारी गाणी लागायची. आणि ती गाणी लावा असं सांगायला लोक रेडियोला पत्र लिहायचे. आणि प्रत्येक गाण्याआधी लांब यादी असायची. "इस गीत को सुनना चाहते हैं, भिलवाडा, राजस्थान से, चुन्नी, बिट्टू और उनके मम्मी-पापा".त्या कार्यक्रमात जितका भारताचा भूगोल समजायचा तितका शाळेतही समजला नाही. भारताच्या छोट्या छोट्या गावांमधून, छोटी छोटी माणसं आपल्या आवडीचं गाणं ऐकायला पत्र पाठवायची. आणि कदाचित फक्त रेडियोवर आपलं नाव घोषित व्हावं हे एकच प्रसिद्धीचं स्वप्नं उराशी असेल त्यांच्या. त्या माणसांचं मला खूप कौतुक वाटायचं. आणि बाबाच्या "जगात" अशी माणसं देखील आहेत हे ऐकून मला खूप मजा वाटायची. आणि असं कुठे लिहिलं आहे की "जगात काय चाललंय" हे फक्त पेपरमधून आणि रेडियोवरच्या, जगाची खूप काळजी असलेल्या, एकमेकांना दोष देणा-या, सूर्य कधी नष्ट होईल हे शोधून काढणा-या माणसांच्या गप्पांमधून कळतं! जगात काय चाललंय याची काहीही फिकीर नसलेले लोक जे करतात, तेसुद्धा जगातच चाललेलं असतं ना? पण मोठे होऊ तसं जगात काय चाललंय, आणि त्यावर आपलं काय म्हणणं आहे, याला उगीचच महत्व येतं. आणि मग आपल्यातलेच काही त्यांना काय वाटतं हे रेडियोवर जाऊन सांगतात. मग त्यांच्याशी सहमत नसलेले श्रोते, सहमत असलेल्या श्रोत्यांशी कॉफी पिता-पिता भांडतात. मोठ्यांच्या जगात रडारड न करता भांडायला "जगात काय चाललंय" हे माहिती असणं गरजेचं असतं. पण आजकाल जगाची बरीच माहिती गोळा करूनही माझं लहानपणीचं मत बदलेलं नाही. फरक फक्त एवढाच की "जगात काय चाललंय" हे सारखं सारखं माहिती करून स्वत:ची जगातली जागा शाबूत ठेवणा-या जमातीने माझा बळी घेतलाय.

13 comments:

  1. वा खुपच छान.....

    ReplyDelete
  2. Kitti chaan, sope, sutsutit aani arthpoorn lihiley...Hats off to YOU...!!!

    ReplyDelete
  3. एकदम झकास. "भूले बिसरे गीत" ची मझा काही औरच होती.
    शाळेत माझा एक वर्गमित्र एकदा अतिशय अभिमानाने सर्वांना सांगत होता की त्याचे व कुटूंबियांचे नाव "आपली आवड" मध्ये वाचले गेले. मी अरसिकपणे म्हटले "त्यात काय झाले?". यावर त्याने मला बदडून काढणेच शिल्लक ठेवले होते.

    ReplyDelete
  4. "इस गीत को सुनना चाहते हैं, भिलवाडा, राजस्थान से, चुन्नी, बिट्टू और उनके मम्मी-पापा".त्या कार्यक्रमात जितका भारताचा भूगोल समजायचा तितका शाळेतही समजला नाही.>> टू गूड हा हा हा


    मग आता तू ऐकतेस का रेडीओ? ;)

    ReplyDelete
  5. सई ह्ल्ली सकाळच्या व्यायामाच्या शेड्यूल मधे रेडीयोवरच बी.बी.सी.बसत नाही याच फार दुख: होतय!
    जाऊ देत जगात सकाळी बी.बी.सी.न ऎकणारी सुध्धा लोक असतातच की!
    मस्त लिहल आहेस.

    ReplyDelete
  6. सई तू सखीसहेलीला कशी विसरलीस?निम्मी मिश्र ,शेहनाज,रेणू.तू जीसी जवळ बसून ऐकायचीस---आता रेदिओ माझा खूप जवळ्चा दोस्त आहे.पहाटे साडेपाचलाच मी रेडिओ कानाला लाऊन मी फ़ाश्ट चालत सुटते.आँफ़िसला जाताना मी व गोपी एसी व रेडीओ लाउनच जातो.ठराविक जहिराती ठराविक ठिकाणी लागतात.त्य़ावरून आम्ही वेळेवर आहे का ते बघतो.मजा वाटते.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. मस्त! लहानपणी रेडू हे एकमेव मणोरंजणाचे साधण होते. नंतर टीव्ही आला..
    बरकाकाना से राजेश, सीमा, सुशीला, रमेश और उनके मम्मी-पापा,
    झुमरीतलैय्यासे डॉ. गिरिश और संजना :ड
    मी बीबीसीही ऐकायचो.. एक शब्दही कळायचा नाही पण
    ऐकयला मजा यायची. :)

    ReplyDelete
  9. @ everyone,
    Sorry for the late reply. Thanks a lot. :)
    @ Baba
    Long time. Kuthe ahes? Yeah I remember Sakhee Saheli. But forgot to mention in the flow of writing. =)
    @Raj..
    LOL@Jhumritallaiya. You had the weirdest names of towns in that segment. :)

    ReplyDelete
  10. UPSC करताना जगात काय चाललंय याची माहिती वास घेणा-या कुत्र्यासारखी हुंगत रहावी लागते आम्हाला.. श्या.. मला मात्र रेडियोवरच्या संस्कृत बातम्याच जास्ती आवडतात.. ती बाई ’इति वार्ताः’ बेश्ट म्हणते..!!

    ReplyDelete
  11. @Prasad,
    Ho mala pan sanskrut batmya avdaychya. :)
    Tu U.P.S.C detoys!! Bapre..:O

    ReplyDelete