परत येताना अंगणात मामी चवड्यांवर बसून रांगोळी काढताना दिसायची. मग मी अज्जीचा पदर सोडून मामी जवळ बसायचे!
असं रोजंच काही ठेवणीतली रांगोळी नसायची. कधी घाई असली कि तिची ठरलेली परडी असायची. आणि रंग भरायला वेळ नसला तर नुसतं हळद-कुंकू शिंपडत असे. तरी मला ते सगळंच सुंदर वाटत असे! कधी लाडात येऊन तिच्या रांगोळीत मी पारिजात भरत असे! मामीचा दिवसभर टिकणारा हिटलर-अवतार अजून सुरू झाला नसे म्हणून सकाळचे मामी दर्शन खूप गोड असायचे!
रांगोळीखाली नेहमी शेणाने सारवलेला चौकोन असायचा. तो बनवायला समोरच्या आऊच्या गोठ्यातून शेण आणावे लागत असे. पहिल्यांदा जेव्हा मामीने "शेण आणा गं"! असा हुकुम ठोकला तेव्हा मला तिचा सात्विक संताप अाला होता! आई अाल्यावर "तुझी वहिनी मला शेण आणायला लावते", असं ठणकवून सांगणार पण होते मी तिला! पण तिने असा हुकुम ठोकल्यावर स्नेहा पटकन बुट्टी घेवून गोठ्यात गेली अाणि छान बागडत शेण घेवून अाली! मग त्यात थोडे पाणी घालून चौकोन छान सारवून दिला! "बुट्टी" ही "टोपलीची" कोल्हापुरातली मामे बहीण!
दोन तीन वेळा मी बरोबर गेले पण माझा हात शेणाच्या गोळ्याच्या दोन इंच वर थांबायचा. तरी स्नेहाला का एवढा आनंद होतो हे पाहण्यासाठी एकदा मनाचा हिय्या करून शेणात हात घातला. त्या दिवशी गोठेवाल्या आऊच्या डोळ्यात माझ्यासाठी तिच्या म्हशींपेक्षा जास्त कौतुक होतं! त्या दिवसापासून शेण सारवण्यावरून माझी व स्नेहाची भांडणं होऊ लागली.
शेण खूप तल्लीन होऊन सारवता येते. त्यामुळे दिलेला चौकोन छान सारवायचा एवढं एकच ध्येय पुरेसं असायचं. मग गल्लीतल्या बायका कौतुकाने "वसुची न्हवं ही? बगा की कशी सारवायलिया! पुन्याची कोन म्हनंल!" असं म्हणायच्या. स्नेहाच्या छोट्याशा नाकावर मग थोडा राग येत असे माझं कौतुक झाल्यामुळे. ती तो नंतर संधी मिळताच व्यक्त करीत असे!
दिवाळीदिवशी अामच्या सगळ्या शेजारणी अाणि भाडेकरूंच्या बायका मामीला रांगोळी काढू लागत. तेव्हा मात्र मामीला आमची मदत म्हणजे लुडबुड वाटत असे. पण आम्ही नेटाने तिथेच बसून राहत असू.
पूर्ण झाल्यावर मात्र दादा लोकांच्या अॅटम बाॅम्ब पासून तिचे रक्षण करीत असू!
मग एका सुट्टीला मी नेहमीप्रमाणे कोल्हापुरला गेले तर स्नेहा एकदम बदलली होती! अशी एकदमच खूप शांत, लाजाळू अाणि मोठी झाली होती. तिला भातुकली खेळाण्यात पण रस नव्हता! सारखी अापल्या शाळेतल्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारायची! अाणि ज्या खिडकीच्या गजांमधून अाम्ही "कोंडलेली राजकन्या" बनून पळून जायचो त्या गजांमधे ती एकदम मावेनाशीच झाली!
मी मग जास्त वेळ अज्जीला चिकटायचे. तिला "स्नेहा भातुकली का खेळत नाही?" असं विचारायचे. मग "अता स्नेहा मोठी झाली. एक-दोन वर्षात तू सुद्धा होशील. मग तुम्ही परत एकसारख्या व्हाल!" असं उत्तर मिळायचं. त्यावर कधी रडून तर कधी रुसुन मी झोपून जायचे.
पण एकदा सकाळी मी डोळे चोळत गॅलरीत अाले तर अंगणात मामी ऐवजी स्नेहा सुंदर रांगोळी काढत होती!