Wednesday, March 25, 2009

तेल-वेणी

कोल्हापुरला जाताना नेहमी एक दु:ख आसायचं. स्नेहाचे केस खूप मोठे झाले असणार. आई नेहमी "कोण वेण्यांचा व्याप करणार?" म्हणून माझे केस कापत असे. पण स्नेहाचे केस खूपच सुंदर होते. कुणालाच ते कापावेसे वाटायचे नाहीत. एकदा ती कंटाळून ब्यूटी-पार्लर मध्ये गेली केस कापायला. तर तिथल्या मुलीचे कात्री चालवायचे धाडसच होईना! मग स्नेहानी स्वत:च्या हाताने पहिला "वार" केला आणि तिला कात्री दिली.तर अशा केसाना शह द्यायचा म्हणजे किमानपक्षी लांबी तरी पाहिजे! 
पण कोल्हापुरात मुलींची "वेणी" घालणे हे मामीचे परम-कर्तव्य असायचे!
रोज सकाळी, "स्नेहा ऊठ! नाहितर तडाखा खाशील" अशा झणझणीत धमकीने सुरुवात व्हायची. "तडाखा" हा पुणेरी "धपाट्याचा" कोल्हापुरात राहणारा मामे भाऊ. या धमकीनंतर "वेळेत उठला नाहीत तर मी वेणी घालून देणार नाही", हे असायचं. मला या धमकीने खूप आनंद होत असे.मामी कडून वेणी घालून घेणे म्हणजे स्वत:च्या एकुलत्या एक डोक्याचा नारळ खोवून घेण्यासारखे असायचे! 
"हं बस खाली" असा हुकुम व्हायचा. 
"आई अाधिच सांगते. खसकन फणी फिरवायची नाही"
"मला वेळ नाहिये तुझ्या सुचना ऐकायला. बस म्हंटलं की बसायचं. सईची पण घालायचिये."

मग फणीच्या सगळ्यात बारीक बाजूने "वार" सुरु व्हायचे. तरी नशीब आमचे कायम तेल्या मारुती असायचे. साधारण दहा एक मिनीट नुस्तेच केस विंचरण्यात अाणि स्नेहाचे फुत्कार ऐकण्यात जायचे. त्यानंतर मामी दोन घट्ट वेण्या घालायची. त्यांचा घट्टपणा तपासण्यासाठी वेण्या घालून झाल्यावर त्या अोढून बघायची.हाच सगळा प्रकार माझ्यावरही करण्यात यायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट असायच्या कि कधी कधी अामच्या भुवया सुद्धा ताणल्या जायच्या बोटाॅक्स दिल्यासारख्या!
आम्ही दिवसभर कितीही दंगा केला तरी दुस-या दिवशी सकाळी सुद्धा वेण्या तशाच असायच्या. 
कधी अज्जी वेणी घालायची. ती मात्र कलाकार होती. तिचे मऊ हात अलगद चालायचे. कधी पाचपेडी तर कधी सातपेडी! कधी दोन वेण्या एकमेकांना कानाशी बांधून झोपाळा तर कधी गोफ. कधी परकर-पोलकं घातलं की खोपा!
मग अशावेळी अज्जी अम्हाला भवानी मंडपात घेऊन जात असे. दोघींच्या वेण्यांमध्ये बकुळीचे गजरे माळत असे. येता येता भेळ पण मिळायची!
वेण्या घालण्याइतकाच न्हाण्याचा कार्यक्रम अवघड असायचा. न्हाणीघरातल्या दगडावर दोघींना एकत्र बसवण्यात येत असे. "हं ..डोळे मिटा!" असा मामी-हुकूम येत असे. मग अाम्ही जिवाच्या अाकांताने डोळे मिटायचो. मग शिकेकाई, रिठे, संत्र्याची साल याचा कढत वस्त्रगाळ अर्क अमच्या डोक्यांवर अोतला जाई. हे तरी सोपं असायचं. नंतर वस्त्रात उरलेलं प्रकरण हाता-पायावर खसाखसा घासण्यात येई! आणि हे कमी म्हणून कि काय शेवटी बटाटे उकडावेत  इतके गरम पाणी डोक्यावर अोतण्यात येई. या सगळ्या प्रकारा आधी जमेल तितके तेल आमच्या शरिरांमध्ये मुरवण्यात येत असे. रविवारची ही महा-अंघोळ अटोपल्यावर मामी टी.व्ही. वर रामायण बघत असे.एवढी संगीत अंघोळ झाल्यावर मी दोन तास डाराडुर झोपत असे. त्यामुळे माझं रामायण कच्चं राहिलं!
पुण्यात माझं अाणि मला सांभाळणा-या विमल मावशीचं मेतकूट होतं. जसं ती तिच्या मुलाला अज्जीनं कापडात गुंडाळून काचेच्या बरणीतून पाठवलेलं लोणचं देते हे मी अाईला सांगायचे नाही तसंच ती मी दिवसभर चिखलात खेळते, गळ्यात झिंजा घेऊन फिरते, रस्त्यातली मांजरं उचलून आणते हे सांगत नसे! मग अाई घरी यायच्या बरोब्बर पंधरा मिनीट आधी माझी वेणी व्हायची. आईची पाच फुटी मूर्ती कोप-यावर दिसली की मी एकदा शेवटची नखं साफ करीत असे. 
त्यामुळे रोज नेमक्या वेळेला जुलमी अधिकाराने घातलेली वेणी मला अजिबात अावडत नसे!
पण सोमवारी सकाळी उशीला जो शिकेकाईचा वास यायचा तो आठवला कि अजुनही उगीच डोळ्यात पाणी वगैरे येतं!
आज माझी कुणी तशी वेणी घालून देणार असेल तर मी एका पायावर तयार आहे!

8 comments:

 1. tu kiti chhan lihites! sagala mast dolyasamor ubha rahata... :)

  ReplyDelete
 2. मस्त लिहीले आहेस सई! फार आवडलं!
  ते खसकन फणी फिरवणं, आईवर "जास्त जोरात ओढू नकोस" वगैरे ओरड्णं एकदम ओळखीचे !! :)

  लिही लवकर! मराठीतले तुझे पोस्ट्स वाचायला मजा येतीय! :)

  ReplyDelete
 3. लै भारी!
  सगळ्याच नोंदी छान आहेत. पण मुरंबा ची जास्ती आवडली. आणखीही येऊ द्या.
  कोल्हापूरचं वर्णन वाचून कधी एकदा घरी जातोय असं झालंय.

  ReplyDelete
 4. सई मी कशी नाही वाचली ही पोस्ट!
  मला तूम्ही दोघी लहानपणीच्या अगदी डोल्यासमोर येता.

  ReplyDelete
 5. मित्रांनो धन्यवाद!
  @बाबा
  तू हल्ली फार बिझी असतोस! ही पोस्ट अज्जीला वाचून दाखवशील का?

  ReplyDelete
 6. saee great lihilyes maama, maami, aajol vagaire anubhvaayla milaal lucky aahes :D

  ReplyDelete
 7. आज अगदी खजिना गवसल्यासारखं तुझ्या पोस्ट वाचतेय. तू खूप छान लिहितेस. मराठी भाषा किती साधी-सरळ आहे असं तुझ्या लिहिण्यातून कुणीही सांगेल. काय गं सगळ्याच मुलींचा वेण्यांच्या बाबतीत असाच अनुभव असतो का? मी ह्या गच्च वेण्या प्रकाराला कंटाळुन केस कापले आणि मग बरेच वर्षांनी पस्तावले कारण नंतर ते वाढत नाहीत..असो...सुटीची आठवण करुन दिल्याबद्द्ल खूप आभार.

  ReplyDelete
 8. G Saee.. Kharach tuzhi bhasha khup sunder ani oghavati ahe ha.. veni ghalun ghene .. ha kharach anubhva kharach sagalyancha sarakhach asava.. samadukhi ya sabdasarakhach 'Samveni'. ase nav deta yeil tyala.. tuzhya tanalelya bhuvaya ani danga ghalunhi na visakatalelya.. takka venya .. khup hasale me :)

  ReplyDelete