Friday, March 27, 2009

रांगोळी

मामी रोज सकाळी अंगणात रांगोळी घालत असे. हा प्रकार पुण्यात फक्त दिवाळीत दिसायचा. म्हणून मला सकाळी लवकर उठून रांगोळी बघायचा भारी उत्साह असायचा. पहाटे साधारण साडेपाच वाजता अज्जी फुलं गोळा करायला बाहेर पडत असे. तिच्या नाजुक पावलांची चाहूल लागल्यावर मी डोळे चोळत बाहेर येत असे. मग आम्ही दोघी गल्लीच्या दोन्ही कोप-यांपर्येंत चालत फुलं वेचायचो. एकदा सकाळी पारिजातकाचा खूप सुंदर सडा पडला होता घराबाहेर. अामच्या आधी कदाचित कुणी तो पाहिला सुद्धा नसेल. न हलवलेल्या,गवळ्याच्या सायकलिने न चिरडलेल्या सड्याची मजा वेगळीच असते. तसा तो होता! अज्जी त्या सड्याकडे पाहून म्हणाली,"माणिक मोत्यांची पायाशी घालूनी बरसात, बसे संन्यस्थ पारिजात"! पुन्हा एकदा पुण्यात असाच सडा पडला होता. तो पाहून मी ह्या आोळी म्हंटल्या तर अज्जीला केवढा आनंद झाला होता! एवढीशी चिमुरडी आणि पाठांतर बघा!
परत येताना अंगणात मामी चवड्यांवर बसून रांगोळी काढताना दिसायची. मग मी अज्जीचा पदर सोडून मामी जवळ बसायचे!
असं रोजंच काही ठेवणीतली रांगोळी नसायची. कधी घाई असली कि तिची ठरलेली परडी असायची. आणि रंग भरायला वेळ नसला तर नुसतं हळद-कुंकू शिंपडत असे. तरी मला ते सगळंच सुंदर वाटत असे! कधी लाडात येऊन तिच्या रांगोळीत मी पारिजात भरत असे! मामीचा दिवसभर टिकणारा हिटलर-अवतार अजून सुरू झाला नसे म्हणून सकाळचे मामी दर्शन खूप गोड असायचे! 
रांगोळीखाली नेहमी शेणाने सारवलेला चौकोन असायचा. तो बनवायला समोरच्या आऊच्या गोठ्यातून शेण आणावे लागत असे. पहिल्यांदा जेव्हा मामीने "शेण आणा गं"! असा हुकुम ठोकला तेव्हा मला तिचा सात्विक संताप अाला होता! आई अाल्यावर "तुझी वहिनी मला शेण आणायला लावते", असं ठणकवून सांगणार पण होते मी तिला! पण तिने असा हुकुम ठोकल्यावर स्नेहा पटकन बुट्टी घेवून गोठ्यात गेली अाणि छान बागडत शेण घेवून अाली! मग त्यात थोडे पाणी घालून चौकोन छान सारवून दिला! "बुट्टी" ही "टोपलीची" कोल्हापुरातली मामे बहीण!
दोन तीन वेळा मी बरोबर गेले पण माझा हात शेणाच्या गोळ्याच्या दोन इंच वर थांबायचा. तरी स्नेहाला का एवढा आनंद होतो हे पाहण्यासाठी एकदा मनाचा हिय्या करून शेणात हात घातला. त्या दिवशी गोठेवाल्या आऊच्या डोळ्यात माझ्यासाठी तिच्या म्हशींपेक्षा जास्त कौतुक होतं! त्या दिवसापासून शेण सारवण्यावरून माझी व स्नेहाची भांडणं होऊ लागली.
शेण खूप तल्लीन होऊन सारवता येते. त्यामुळे दिलेला चौकोन छान सारवायचा एवढं एकच ध्येय पुरेसं असायचं. मग गल्लीतल्या बायका कौतुकाने "वसुची न्हवं ही? बगा की कशी सारवायलिया! पुन्याची कोन म्हनंल!" असं म्हणायच्या. स्नेहाच्या छोट्याशा नाकावर मग थोडा राग येत असे माझं कौतुक झाल्यामुळे. ती तो नंतर संधी मिळताच व्यक्त करीत असे!
दिवाळीदिवशी अामच्या सगळ्या शेजारणी अाणि भाडेकरूंच्या बायका मामीला रांगोळी काढू लागत. तेव्हा मात्र मामीला आमची मदत म्हणजे लुडबुड वाटत असे. पण आम्ही नेटाने तिथेच बसून राहत असू. 
पूर्ण झाल्यावर मात्र दादा लोकांच्या अॅटम बाॅम्ब पासून तिचे रक्षण करीत असू!
मग एका सुट्टीला मी नेहमीप्रमाणे कोल्हापुरला गेले तर स्नेहा एकदम बदलली होती! अशी एकदमच खूप शांत, लाजाळू अाणि मोठी झाली होती. तिला भातुकली खेळाण्यात पण रस नव्हता! सारखी अापल्या शाळेतल्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारायची! अाणि ज्या खिडकीच्या गजांमधून अाम्ही "कोंडलेली राजकन्या" बनून पळून जायचो त्या गजांमधे ती एकदम मावेनाशीच झाली! 
मी मग जास्त वेळ अज्जीला चिकटायचे. तिला "स्नेहा भातुकली का खेळत नाही?" असं विचारायचे. मग "अता स्नेहा मोठी झाली. एक-दोन वर्षात तू सुद्धा होशील. मग तुम्ही परत एकसारख्या व्हाल!" असं उत्तर मिळायचं. त्यावर कधी रडून तर कधी रुसुन मी झोपून जायचे.
पण एकदा सकाळी मी डोळे चोळत गॅलरीत अाले तर अंगणात मामी ऐवजी स्नेहा सुंदर रांगोळी काढत होती!

4 comments:

  1. वा!सई वा!फारच मस्त रंगली ही रागोळी.

    ReplyDelete
  2. Very nice! I liked your this blog also. Keep it up!
    Mangesh Nabar

    ReplyDelete
  3. i read your blogs written in English language. A language cannot be a barrier to express thoughts. But in a way it looks that you have a good command on english than marathi. Your vocabulary and its perfect use is your strength in essay writing. Sai tujhya marathi blogmadhye suddha tasa bharivpana aanayacha prayatna karavas. (chalak shikat aahe. Tyaas tips :)
    have you read marathi writer G A Kulkarni. Try to 'read' him. Baaki mi ugaach sshanpatti karnara kon? Tu chhanach lihites.

    ReplyDelete