Sunday, March 15, 2009

सुट्टी सुरू!!

रंगपंचमीनंतर मला कोल्हापुरचे वेध लागायचे. मग वार्षिक परिक्षा झाली कि आई किंवा बाबा मला कोल्हापुरला सोडायला यायचे. आई बरोबर एस्.टी. ने जाणे म्हणजे अवघड परिक्षा असे. कारण कात्रज यायच्या आतच आई आ वासून झोपून जाई. बरं,तिच्या झोपण्यात सुद्धा भारी निग्रह असे. कितीही हलवलं,भुण-भुण केली,चिमटे काढले,तिचे डोळे हाताने उघडायचा प्रयत्न केला तरी ती ठामपणे झोपून राही. मग पहिला अर्धा तास लोकाना तिची दया येत असे. पण नंतरचे पाच तास मात्र माझी कीव येत असे. क-हाडच्या आसपास आई खडबडून जागी होई. मग आपण अजून दीड तास झोपू शकतो या जाणीवेने ती माझ्याशी थोडावेळ बोलायचा प्रयत्न करीत असे. पण एकूण आई बरोबर जाणे आणि एकटे जाणे यात फारसा फरक नसे.
बाबा बरोबर पुणे-कोल्हापूर प्रवास म्हणजे खूप मजा. कारण स्वारगेटवर जरी "बाबा,पाॅप्पिन्स" असं म्हटलं तरी लगेच मिळत असे. 
बस-स्टॅन्ड वर बाबा जगातली सगळी वर्तमानपत्रं विकत घेत असे. मग बसमध्ये चढल्यावर बाबा मला माझ्या तिकिटाचे पैसे काढून देत असे. कंडक्टर कडून तिकीट काढून घेईपर्येंत मी शांत असे. मग एकदा का बस निघाली, की जेमतेम कात्रजपर्येंत माझा गुणी शांतपणा टिके! घाट सुरु होण्याआधी माझा पहिला प्रश्न," बाबा, कोल्हापूर कधी येणार?".
मग वेगवेगळ्या निमित्ताने हाच प्रश्न विचारला जाई.कधी कंटाळून, कधी फक्त संभाषण म्हणून तर कधी सवय म्हणून!
पण बाबा न कंटाळता फलंदाजी करत असे. "अाता कात्रज येणार बरंका सयडम्" (मला लाडाने बाबा सयडम्-खयडम्-डब्बा-डायडम् म्हणत असे!). 
"कात्रज म्हटल्यावर काय आठवतं सांग पाहू?"
"मला न आवडणारं पचपचीत दूध?"
हे उत्तर बहुधा बाबाला अपेक्षित नसावं. त्यामुळे थोडावेळ क्लीन बोल्ड झाल्यासारखा चेहरा करून "अजून काय सांग?" असा प्रश्न विचारी!
"बोगदा"
"बरोब्बर!"
मग प्रत्येक थांब्याचा इतिहास-भुगोल सांगण्यात बराच वेळ निघून जात असे. 
माझा भुगोलातला रस कमी झाला की माझे  इतर प्रश्न सुरु होत. जे बाबाला फारसे अावडत नसत. 
"अापण राजारामपुरीत रिक्षानी जायचं की चालत?"
"स्नेहा घरी असेल? मला बघितल्यावर ती काय म्हणेल?"
"तू परत जायच्या अाधी अापण रंकाळ्यात जाणार ना? अाणि सोळंकीत अाईस्क्रीम?"

मग थोड्यावेळाने बाबा नवीन युक्ती शोधून काढे.
"पुढच्या एक तासात जर एकही प्रश्न विचारला नाहीस तरच साता-यात तुला खाऊ मिळेल."
मग पंधरा मिनीट बळं गप्प बसून माझा सोळाव्या मिंटाला पुन्हा प्रश्न,"झाला एक तास?"
बस मधले  इतर लोक या प्रश्नावर हमखास हसत आणि मी त्यांच्याकडे,"चोमडे कुठले" अशा नजरेने बघून गाल फुगवत असे.

क-हाड अाल्यावर मला "अब कोल्हापूर दूर नही" वाटायला सुरवात होई. टोप नावाचं गाव अालं की अगदीच सुटका झाल्यासारखं वाटू लागे! कोल्हापूर बस-स्टॅन्ड वरचा "येळगुड दूध" असा बोर्ड दिसला की माझी सुट्टी ख-या अर्थाने सुरू होई!
मग रिक्षा राजारामपुरीतल्या अकराव्या गल्लीत शिरली कि माझा चेहरा खुलत असे. कारण पुढचे पूर्ण दोन महिने संपूर्ण दिवस स्नेहा बरोबर खेळण्यात अाणि अज्जीच्या गोष्टी ऐकण्यात जायचे. :)
अाज-काल पुणे-कोल्हापूर प्रवास ड्रायव्हर सहित हाॅन्डा सिटितून करायला मिळतो. आणि नव्या रस्त्यामुळे वेळही कमी लागतो. पण अजुनही एस्.टी च्या "लाल डब्यातून" केलेले प्रवास जास्त जवळचे वाटतात!
त्या बसमधल्या गजांचा लोखंडी वास अाणि टरटरीत रेग्झिनची बाकडी सुट्टी सुरु झाल्याच्या आनंदात विरुन जायची. आणि अाईच्या रोजच्या "भाजी खा.नुस्ता तूप-भात मिळणार नाही." मधून पण सुटका! अज्जी नुस्ता तूप-मीठ-भात लाडाने भरवत असे! आणि कोल्हापूरच्या हवेमुळे कि काय कोण जाणे,भाज्यांमधल्या व्हिटॅमिनची कमी सुट्टीत कधीच जाणवत नसे!



4 comments:

  1. सयडम खयडम डब्बाडायडम! मला तू परत तुझ्या लहानपणात घेऊन गेलीस!
    सई तू परत लहान होशील का?

    ReplyDelete
  2. नुस्ता तूप-मीठ-भात !! :)
    अजूनही बर्‍याचदा एकाच जेवणात मी चार वेळा तूप-मीठ-भात खातो.:P

    ReplyDelete
  3. hehehe good one :):) when I used travel by train it was fun but unfortunarely I missed the MAJJA of bus! :(

    ReplyDelete
  4. Hey Saee... Aga me attach ale tuzhya blog vr ani pahilyach fatakyat mala tuzha blog khup awadala :)
    chanch lihile ahe yathavakash bakiche vachin... pan mhatale tula lagech pratikirya devun shri ganesha karava.. :) ani same pinch gavala jatana mazhe baba pan mala पाॅप्पिन्स ghevun dyayache ...:)
    tuzha photohi cute ahe ekdam...

    ReplyDelete