Sunday, May 31, 2009

नापास झालो! हा हा हा!

लहानपणी दुस-याच्या आठवणी म्हणजे आमच्या गोष्टी असायच्या! त्यात सुद्धा अामची आवड-निवड असायची!
आजोबा नेहमी "मी लहानपणी कावडीने पाणी आणायचो" ही गोष्ट सांगायचे, जी आम्हाला फारशी आवडायची नाही. आजोबांनी खूप कष्टात दिवस काढले. त्यांचे शिक्षण बरेचसे नातेवाईकांच्या घरी काम करत, संकोच करत झाले. पुढे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी क्रांतिका-यांना बरीच मदत केली. चिकूला त्यांच्या बॉम्ब बनवायच्या गोष्टी फार आवडायच्या . पण आमचं आयुष्य कसं छान आहे आणि तरी आम्ही दंगा करतो यासाठी सांगितलेल्या गोष्टी मात्र कुणालाच आवडायच्या नाहीत. पण तरी आजोबा रंगात आले की आमच्या गोलात बसून खूप कहाण्या सांगायचे. तेव्हा वाटायचं, "आपण कधी म्हातारे होणार? मग आपण पण आपल्या नातवंडांना असंच तासंतास उपदेश करू शकू!" कधी कधी आपल्याला पण कावडीने पाणी आणायला लागलं तर किती बरं होईल असंही वाटायचं. म्हणजे आजोबांच्या समोर आपण अगदीच सूक्ष्म तरी वाटणार नाही.
अज्जी मात्र खूप गमती-जमती सांगायची. तिचं माहेर भेंडे गल्लीत होतं! त्यांचा खूप मोठा वाडा होता. अज्जीला पाच भाऊ व दोन बहिणी होत्या. त्या सगळ्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकण्यात वेळ कसा निघून जायचा ते कळायचंच नाही.
मला आणि स्नेहाला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे अज्जीच्या आईचं लग्न. अवघ्या बाराव्या वर्षी तिच्या आईचं लग्न लावून दिलं. पण लग्नात छोट्या नवरीला दिलेला पेहराव आमच्या मनात अगदी कोरला गेला होता. पुढे एकदा त्या लग्नात काढलेला एकमेव फोटो बघायला मिळाला आणि अज्जीच्या वर्णन शैलीचे खूप कौतुक वाटले होते! अर्थात, ह्या गोष्टी अज्जीलाही तिच्या आईनं सांगितल्या होत्या.
छोट्या नवरीला भरजरी साडी नेसवली होती. पण पदर मात्र दिला नव्हता. खणाचं पोलकं होतं व त्यावर पदर लाजेल इतके दाग-दागिने होते. लांब चपलाहार, ठुशी, पाच पदरी जोंधळी पोत आणि त्यातून डोकावणारं मणी-मंगळसुत्र!
हातात पाटल्या, बिलवर आणि अगदी काचेच्या बांगड्यांसारखे पेरलेले गोठ! फोटोत तिचे केस मागून दिसत नव्हते पण अज्जीच्या गोष्टीत तिच्या लांब वेणीच्या प्रत्येक पेडात एक सोन्याचं पाणी दिलेलं चांदीचं फूल होतं! कानात सोन्याचे मोर होते. पायात झुपकेदार पैंजण. आणि फोटोत नवरा एका टोकाला तर नवरी कुणाच्यातरी मांडीवर दुस-या टोकाला!
याशिवाय वाड्याची रचना, वेगवेगळ्या खोल्या, त्यांचे निरनिराळे उपयोग हा सुद्धा आमच्या आवडीचा विषय होता. वाड्यात एक लोणच्यांची व पापडांची खोली होती. बंबाचे जळण ठेवण्यासाठी वेगळी खोली होती.
ताजीच्या माहेरच्या गोष्टी सुद्धा खूप छान असत. तिच्या माहेरी बग्गी होती. बग्गीत बसून शाळेला जायच्या गोष्टी सुद्धा आम्हाला फार आवडायच्या . ताजीला सुद्धा खूप भावंड होती. पण त्यांचा रंगच वेगळा होता.
कुसुम अज्जीचे भाऊ अमेरिकेच्या वा-या करणारे तर ताजीचे भाऊ पंढरपूरच्या. पण दोन्ही बाजूंची नजाकत काही वेगळीच होती. एकीकडे नाजूक लवंग-लतिका बनायच्या तर दुसरीकडे खमंग झुणका.
ताजीच्या बहिणीकडे गेलं की आधी एक घट्ट मिठी आणि शंभर एक पापे मिळायचे! मग मामा लोक शेतावर घेऊन जायचे. तिथे ससे, वासरं, मांजरं असे खूप प्राणी खेळायला मिळायचे. कुसुम अज्जीच्या बहिणीकडे गेलं की मोग-याची फुलं वापरून केलेला चहा मिळयचा! पुस्तकं वाचायला मिळायची आणि वाड्याच्या खूप गोष्टी ऐकायला मिळायच्या. कुणाकडे सतार असायची, कुणाकडे बासरी तर कुणाकडे तबला!
पण आजोबांचा एक अनुभव मात्र मला खूप उपयोगी पडला. एकदा नाचाच्या परिक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे मी परिक्षेला जायला घाबरत होते. नाचाचीच परिक्षा आहे, शाळेची नव्हे म्हणून तिला दांडी मारता येते का याची तजवीज करत होते. पण माझ्या बाबानी त्याला सक्त नकार दिला. म्हणून मी घाबरून कोप-यात बसले होते. तेव्हा आजोबांनी मला त्यांच्या वकिली परिक्षेची गोष्ट सांगितली. त्यांनी वकिलीची परिक्षा एक वर्ष काही अभ्यास न करता दिली. त्यावेळी पास झालेल्या लोकांची नावं वर्तमानपत्रात छापून येत असत. त्यांच्या भोचक शेजा-यानी आधीच पेपर वाचून खात्री करून घेतली होती. अाजोबा गल्लीत परत अाले तेव्हा जोरात अोरडून त्याने विचारले "काय वसंतराव, काय म्हणतो निकाल?"
तसं आजोबांनी उत्तर दिलं, "निकाल काय म्हणणार! नापास झालो!" आणि त्यांच्या रावण हास्याने पूर्णविराम दिला!
अजूनही कधी अपयशी होईन असं वाटलं की मी ही गोष्ट आठवते!
चिकुचं प्रगती-पुस्तक बघून कळवळणारे आजोबा मला खुशाल नापास हो म्हणून सांगायचे! कुठल्याही चाकोरीत न अडकणारा त्यांचा स्वभाव मला खूप दिवस कळलाच नव्हता! पण धीट कसं व्हायचं हे मला आई, आजोबा आणि बाबांनी लहानपणापासून नकळत शिकवलं! तसंच कुसुम अज्जीकडून छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे मोठे आनंद मिळवायला शिकले आणि ताजीने मात्र खूप हसायला शिकवलं!

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. aa nit nahi disate g.. vachayla tras hotoy.. change kar na..

    ReplyDelete
  3. Chaan lihites ga... ekdam dolyasamor chitra ubha rahata...keep up the good work...besties

    ReplyDelete