Tuesday, June 2, 2009

खाद्ययात्रा

तशा आम्ही मुली खोडसाळ नव्हतो कधीच. म्हणजे कुणाला ढकलणे, चोपणे, वस्तू काढून घेणे वगैरे प्रकार नाही केले कधी. पण काही काही खोड्या मात्र आम्ही हक्कानी करायचो! त्यात अग्रणीय म्हणजे पाठीमागच्या हौदात उतरणे. गच्चीच्या कोप-यात भांडी घासायची जागा होती. त्याला लागूनच एक पाण्याचा हौद होता. आठ-दहा वर्षाच्या असताना तो बरोब्बर आमच्या आकाराचा होता. त्यामुळे आत गेलं की फक्त डोकं वर रहायचं! काही दुपारी आम्ही पूर्ण हौदात घालवल्या आहेत! त्यात जर मामी बाहेर आली तर स्नेहाला ओल्या पाठीवर छान धपाटे मिळायचे. पण त्यामुळे तिचा उत्साह कधीच कमी झाला नाही. दुसरी खोडी म्हणजे चिकू दादाला गोट्यांच्या खेळात विजय मिळवून देणे. हा "विजय" बेइमान असायचा. गोट्यांचा डाव चालू असताना अनभिज्ञ चोर बनणे ही कला मी व स्नेहानी लवकर अवगत केली. मी तो चेहरा अजूनही कस्टमवाल्यांसाठी जपून ठेवलाय. तशी मी काही तस्कर वगैरे नाही हं. पण बॅग उघडायला लावून माझा वेळ जाऊ नये म्हणून मी तो निरागस चेहरा जपून ठेवला आहे!मे महिना म्हणजे पापड बनवायचा मोसम. तिसरी आवडती खोडी म्हणजे ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खाणे. सकाळी नऊ ला मामी व शेजारणी एकत्रच पापड्या घालायच्या. आम्ही पण मदत करायचो. पण साधारण दुपारी चार वाजता पापड्या वरून पूर्ण कोरड्या व्हायच्या पण आतून अजून ओल्या असायच्या. त्या खायला फार मजा यायची. प्लॅस्टीकच्या कागदावरून हळूच पापडी सोलून तिथेच फरशीवर बसून खायची. मग मामीला कळू नये म्हणून रिकामी जागा अजूबाजूच्या पापड्यांनी भरून टाकायची. सहा वाजेपर्यंत कागदाला मोठ्ठं भोक पडायचं. मग इकडून तिकडून कितीही पापड्या हलवल्या तरी मामीला कळणार हे निश्चित व्हायचं. मग आता मार खायचाच आहे तर अजून थोड्या खाऊ म्हणून शेवटली पंधरा मिनिटं भरपेट ओल्या पापड्या खायचो! तसंच वाळत घातलेल्या चिंचा, आवळे, उडदाच्या पापडाच्या लाट्या, मुरत ठेवलेलं कैरीचं लोणचं असे अनेक निषिद्ध पदार्थ आम्ही हडप केले आहेत. मे महिन्याची सुट्टी संपेतोवर आमचे दात कायम "कैरीचे" असायचे. हा शब्द-प्रयोग कदाचित मी शोधून काढला असेल. दिवसभर कैरी खाल्ली असेल तर दात कुर-कुर आवाज करतात. तसे आमचे दात सतत कुरकुरायचे. आंबा खाण्यासाठी आम्हाला घरादारापासून वेगळं करण्यात यायचं. दिवसाला प्रत्येकी फक्त एक अख्खा आंबा आणि जेवताना आमरस असं "रेशन" असायचं. त्यातही आंबा खाण्यासाठी वेगळे पेटिकोट ठेवण्यात आले होते. मग आंबा आणि आम्ही गॅलरीत जायचो. मामी आतून कडी लावून घ्यायची आणि "झालं की सांगा" असां वेगळीकडे देण्यात येणारा हुकूम देऊन जायची. मग काय! गाल, कोपरं,गुडघे, नखं सगळं आंबामय व्हायचं. कोय चाटून पांढरी होईतो आमचा आंबा-प्रकार चालायचा. मग हात, पाय, नाक, जे जे म्हणून चाटता येईल ते चाटायचो. सगळ्यात शेवटी एकमेकींची कोपरं! मग "आई झालं" अशी आरोळी! त्यानंतर मामी आम्हाला अंघोळ घालायची! तरीही आमच्या केसांना, नखांना आमरसाचा वास यायचा! तशी आमची खाद्ययात्रा खूप मोठी होती. स्वैपाकघरात थोडा आत्मविश्वास आल्यावर आम्ही दुपारी चोरून मॅगी करायचो. हा शेवईप्रधान प्रकार मामीच्या "निषिद्ध" यादीत नसला तरी मामीच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करता यायचा नाही. मग ती झोपली की आम्ही ओट्यावर चढून मॅगी बनवायचो! ती उठायच्या आत भांडी घासून, ताटल्या पुसून काही झालंच नाही असे चेहरे करून बसायचो. अज्जी मात्र दुपारच्या खादडीला पूर्ण पाठिंबा देत असे. मुगाचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू असे कितीतरी प्रकार ती स्वत: करायची. मग बाहेरून कधी चुरमु-याचे लाडू आणायची. त्यामुळे भूक आणि अज्जी यांचा खूप जवळचा संबंध असायचा. शनिवारी मामा बॅंकेतून लवकर यायचा. मग त्याच्या व्हेस्पावर बसून आम्ही दोघी खासबागेत मिसळ खायला जायचो. स्टीलच्या जरा उथळच ताटलीत तर्ररी असलेला झणझणीत मटकीचा रस्सा! त्यावर फरसाणाचा हात व बारीक चिरलेला कांदा! या सगळ्यावर छान लिंबू पिळायचं आणि मग पुढली पंधरा मिनिटं फक्त पाव आणि "कटाचा" समतोल साधण्यात जायची. "सूं सूं " आवाज करत मिसळ खायची आणि नंतर "मेवाड" नावाचं आईस्क्रीम!! येता येता आमचा अंबाबाबाईला पण दंडवत घालून यायचो. नरूमामाला प्रत्येक रस्त्यात कुणीतरी ओळखीचं भेटायचं. नुसतं स्कूटरवरून जाताना सुद्धा त्याला सोनिया गांधी सारखा हात करत जावं लागायचं. त्यामुळे आमची वरात खूप वेळा भर रस्त्यात कुणीतरी भेटलं की अडकायची! मग नेहमीचं , "अगं बाई! ही वसूची होय! किती मोठी झाली?" ही वाक्य असायची. या असल्या निरूपयोगी वाक्यांचा मला खूप राग यायचा. "मागे पाहिलं होतं तेव्हा एवढीशी होतीस!" मग तुम्ही पाहिलं नाही म्हणून मी वाढायचं थांबू का? "आईसारखी दिसत नाही अजिबात! बाबांकडे गेली आहे वाटतं"माझ्या बाबांना मिशा आहेत! आणि त्यांचं नाक खूप मोठं आहे! डोळे तपासून घ्या! असले शेरे ऐकून फार कंटाळा यायचा. नरू मामा मात्र "तांदळाचे भाव" ते "नरसिंह अण्णा पाटील" असल्या सगळ्या विषयावर आनंदाने टिप्पणी करत पुढे जायचा. पण पोटात मिसळ आणी आईस्क्रीम असल्यामुळे असले उशीर माफ व्हायचे!

5 comments:

 1. सईं,
  छान जमले हा पोस्ट, specially तो मिसळचा para वाचून माज्या तोंडाला पानीच आले....सीरियसली में hard core मिसल्चा फेन आहे, कामा निम्मित मी बंगलोर ला असतो त्यामुले मी मिसळ पाव ला मिस करतोय।
  मजा आली।
  गणेश

  ReplyDelete
 2. My Blog
  http://www.wretch.cc/blog/markacey
  Nice to meet you
  Hsinchu, Taiwan

  ReplyDelete
 3. अगं ए महामाये! ते ओल्या पापड्या, आंबे, तर्री, कैरीदात - सगळं आत्ता लिहायची गरज होती का? अजून विद्यापीठ हायस्कूलसमोरच्या गाड्यांवरलं चाट, भारत बेकरीची खारी, मंडईतले ओले हरबरे, रंकाळ्यावरची निखार्‍यात भाजलेली कणसं हे सगळंपण लिहायचं होतंस. म्हणजे इथे आम्ही उगाच हुळहुळायला मोकळे.
  जाऊ देत. किमान मिसळ तरी घरी करता येईल. (पण तिला खासबागेतल्या / फडतर्‍यांच्या / चोरग्यांच्या मिस्सळीची सर येईल कशी?)

  "झालं की सांगा" चा ’वेगळीकडे’ देण्यात येणारा हुकूम..हहजगलो!
  तू फार म्हणजे फार म्हणजे लईच भारी ल्हीतीस.

  सार्कं सार्कं ल्हीत जा काय.

  ReplyDelete
 4. tujhaa blog saapaDavun dilyabaddal gayatrila majhyatarfe ek peshal misaL. gayatri, ikade ye priyabarobar next time :D
  saee, lihit raha aani ho gayatrila pan usakavat rahach ;)

  ReplyDelete
 5. हे थोड ठीक आहे जून महिन्यातल्या सर्व ब्लोग्स मध्ये

  ReplyDelete