Thursday, October 29, 2009

कुसूम आणि मालती

कुसुमअज्जी आणि ताईअज्जी दोघी ब-याच बाबतीत सारख्या होत्या पण तो सारखेपणा कधी जाणवलाच नाही. कारण दोघींचे तीच गोष्ट करायचे मार्ग अगदी वेगळे असायचे. ताजी जितकी बोलकी होती तितकी कुसुमअज्जी शांत. दोघींनाही फुलांचं फार वेड होतं. पण ताजीचं बागकाम म्हणजे निम्मं गप्पाकाम असायचं. तिची बाग सकाळी हीराक्काच्या मिशरीबरोबर खुलायची. मग दुपारी आमचा धोंडीराम गवळी आला की त्याच्याकडून कोल्हापुरातल्या बातम्या काढत तिचे वेल मांडवावर चढायचे. संध्याकाळी रॉकेलसाठी आलेल्या बायकांच्या चुगल्यांच्या जोडीनं तिचा अंगणातला सडा व्हायचा. कोणाचा नवरा पिऊन येतो, गावातल्या कुठल्या अल्लड बालिकेचं कुठल्या होतकरू सुकुमाराशी सूत जुळतंय, पाटलाच्या बायकोच्या अंगावरचे किती दागिने खरे आहेत वगैरे खास बातम्या मिळवत तिची बाग उमलायची. त्यात तिच्या बागेत विविध नातेवाईकांकडून आणलेली कलमं असायची. अगदी कुसुमअज्जीच्या माहेरच्यांकडूनही तिनी गुलाब, अनंत, मोगरा, ब्रम्हकमळ वगैरेंची रोपं आणली होती.
कुसुमअज्जीचं बागकाम म्हणजे तिची ध्यान करण्याची पद्धत होती. तिच्याही बागेत सुंदर गुलाब, मोगरा, चाफा, शेवंती असायचे. पण कुणालाही न दिसेल अशा गच्चीच्या एका शांत कोप-यात तिची बाग होती. तिथे ती मन लावून बागकाम करायची. कधी नरूमामाला मदतीला घ्यायची. ती धापा टाकत कुंड्या उकरत असताना तिच्या चेह-यावर एक वेगळीच शांतता असायची. त्यामुळे तिला मदत करायला जावं की नाही असा प्रश्न पडायचा.
ताजी आणि कुसुमअज्जी दोघीही कमालीच्या नीटनेटक्या होत्या. त्यांच्या खोल्यांकडे बघून अण्णाआजोबांच्या निवडीचा हेवा वाटायचा. पण यातही दोघींचे मार्ग वेगळे होते. कुसुमअज्जीच्या नीटनेटकेपणात गांधीजींची अहिंसा होती आणि हिटलरचा आग्रह होता! पुण्यात आई भुंग्यासारखी सारखी मागे लागायची. "सई, अभ्यासाचं कपाट आवरलंस का?"
"ऊठ आत्ता आवर!", अशा वाक्यांमध्ये माझी स्वच्छता चालायची. पण कुसुमअज्जी असं काहीही म्हणायची नाही. सकाळी उठल्यावर माऊची विचारपूस करायला पाच मिनिटं बाहेर जाऊन येईतो माझी रजई घडी घालून ठेवलेली असायची. अंघोळीहून आल्यावर मामीच्या आमटीच्या वासाने कधी पंचा जमिनीवर टाकून स्वयंपाकघरात गेले तर परत आल्यावर पंचा मच्छरदाणीच्या दांडीवर वाळत घातलेला असायचा. त्याची चारही टोकं कुठल्याशा आक्रमक भावनेने एकमेकांना बरोब्बर जुळवलेली असायची. टेबलावर चहा पिताना कपाचा ठसा उठला की अज्जी हातानी तो लगेच पुसायची. तिच्या या अगतिकतेचा मला विलक्षण संताप यायचा. मग तिनं माझं कुठलंही काम करू नये या तिरीमिरीत मीच माझी सगळी कामं तिच्याआधी उरकायचे. तिचा हा गांधीवाद माझ्या आईच्या दटावणीपेक्षा खूप प्रभावी ठरला!
ताजीसुद्धा खूप निटनेटकी होती. पण ती मात्र एकसारखी बोलायची. बाहेरून आलं की आमचे पाय तपासायची. कधी मुडशिंगीत चिंचा-आवळे काढून परत आलो की माझ्याकडे बघून, "काय हे सई! काय अवतार केलायस बघ बरं! एक वेणी सोडलेली तर एक तशीच! काय म्हणतील लोक तुला बघितल्यावर. तूच अरशात बघून ये", असं ऐकवायची.

तिच्या खोलीत मळक्या पायानी गेलो की ती सरळ बाहेर घालवायची.
दोघींनाही साड्या सुंदर घडी घालायची कला अवगत होती. पण ताजीचं घडी घालणं दुपारच्या मालिका बघण्यात, सुनांबरोबर गप्पा मारण्यात असायचं. कुसुम अज्जी मात्र तिच्या खोलीत मन लावून साड्या आवरायची. जणू काही ती देवपूजाच आहे अशा भावनेनं!
बोलणं आणि न बोलणं या एकाच गोष्टीमुळे दोघी खूप वेगळ्या वाटायच्या. ताजीला बोलायला ओळख, वेळ, जात, भाषा, धर्म हे कुठलेही नियम लागू नव्हते. रेल्वे प्रवासात कित्येकवेळा अर्धवट हिंदीत ताजी गुजराथी बायकांशी बोलायची. ओळखी काढायची तिला फार हौस होती. ती एक आणि दुसरी लग्न जमवायची. माझ्या आईच्या कित्येक "कु." मैत्रिणींची लग्न माझ्या बाबाच्या मित्रांशी जमवायचा ताजीने प्रयत्न केला. तिच्या तरुणपणी काही लोकांना घरातून पळून जाऊन लग्न करायलाही ताजीनी मदत केली होती. तरी नशीब तिचा वर जायचा नंबर लवकर लागला नाहीतर आत्तापर्यंत माझं तिनी वीसएकवेळा लग्न ठरवलं असतं. कुसुम अज्जी मात्र या बाबतीत ढ होती. संध्याकाळी ती झोपाळ्यावर बसायची. तेव्हा तिला प्रश्न विचारून त्रास दिला तर ती, "शांत बस जरावेळ. वा-याचा आवाज कसा येतो ते बघ", असं सांगायची. ताजी पण संध्याकाळी झोपाळ्यावर बसायची. पण ती मात्र सगळ्या गावाला घेऊन बसायची.

मला नक्की खात्री आहे की ताजी स्वर्गात गेल्या गेल्या तिथे खूप बदल झाले असणार. सगळ्यात आधी तिनं नारदाला आणि कार्तिकेयाला लग्न करायला भरीस पाडलं असणार.
"मी काय म्हणते नारदमुनी, असं किती दिवस खाली-वर करणार तुम्ही? इकडच्या तिकडं काड्या लावण्यापेक्षा एखादी इंद्राची अप्सरा धरा की! एवढ्या बायका अन् एकटा इंद्र बरं नाही दिसत!"
कार्तिकेयाला लग्नाचा सल्ला देण्याचं धाडस ताजीच करू शकली असेल.
"काय हे कार्तिकस्वामी! तुमचा मोरसुद्धा तुमचा डोळा चुकवून रोज नवीन लांडोर फिरवतोय! निदान तुम्ही लग्न केलंत तर त्याला तरी चोरी होणार नाही! आणि बायकांचा राग वगैरे तुमच्या मनात आहे हो! एकदा संसारात पडलात की सगळं आवडायला लागेल. अगदी बायकोसकट! तुमचा भाऊ बघा कसा दोन दोन बायका घेऊन बसतो! आमच्या ह्यांनी पण दोन केल्या! काही वाईट होत नाही!"

एखाद्यावेळी शंकर नुकताच तांडव करून शांत झाला असताना त्याच्या खोलीत जाऊन त्यालाही शिस्त लावेल.
"काय हे महादेवा! बघ जरा काय अवतार केलायंस! जटा पिंजारल्यास कशा ते तूच बघ. आणि तुझा डमरू एकीकडं, गळ्यातली रूद्राक्षं बघ कशी खोलीभर सांडलीत! गंगेचं पाणी झालंय कसं बघ सगळीकडं. कुणी भेटायला आलं तुला तर घसरेल की नाही तूच सांग. तुझा नागोबा पण पलंगाखाली घाबरून बसलाय. इतका राग बरा नव्हे. आमचे हे पण असेच दंगा करायचे. आता मी पण वर आले आणि कुसुमताईपण नुकत्याच आल्यात. कोण आता त्यांचा दंगा सहन करणार? पार्वती आहे म्हणून तुझे हे असले लाड चाललेत!"
त्याच्या जटांकडे बघून , "आणि काय रे? तुमच्याकडं खोबरेल तेल मिळत नाही? काय अवतार केलायंस केसांचा! उद्या तेल घेऊन येईन. मग तुझ्या डोकीत कडकडीत तेल घालून तुला न्हायला घालीन", असं सुद्धा म्हणाली असेल.
कुसुमअज्जी मात्र एखाद्या इंद्रधनुषी ढगाच्या टोकावर बसून ग्रेस किंवा महानोर वाचत असेल नक्की!

6 comments:

 1. हेलो

  २-३ दिवसाधीच तुमच्या ब्लॉग वाचण्यात आला.
  सगळा नोंदी एका बैठकीतच वाचल्या.
  निव्वळ अप्रतिम..... खर सांगायाच तर शब्दच नाहीयेत...

  एकदम डोळ्यासमोर चित्र उभे करता तुम्ही.....

  खूपच छान..

  अशाच लिहीत राहा :)

  ReplyDelete
 2. सई ताई स्वर्गात गेल्यावरच वर्णन अगदी मस्त आहे.स्वर्गात आत्ता नक्कीच नारदाच,कार्तिकेयाच लग्न झालेल असेल(बिचा-या मोराच सूध्दा).महादेव व त्याच्या जटा निटनेटक्या असतील.
  कुसूमअज्जी व ताजी मधला विरोधाभासातून सारखेपणा तू छान लिहला आहेस.
  आईला वाचून दाखवला व ताजीच स्वर्गातल वर्णन ऎकून ती पहाटे पहाटे खदाखदा हसली

  ReplyDelete
 3. सई नेहेमीप्रमाणे मस्त मस्त आणि मस्त....दुसरे शब्द सुचायला मी ताजी नाही किंवा तिची नातही नाही...तेव्हा मज बापडीचे हे कौतूकाचे बोल गोड मान!!!!

  ReplyDelete
 4. Hey Satish..
  Thanks a lot for your comments. :)
  I am glad you like it.
  Baba,
  Thankoo. Aai called me later to tell me how embarrassingly loud she laughed. :D
  Tanvi
  Aga, tuzya comment chi me halli wat baghte. :) Mazya fidjit war "Dubai" asa zenda disla ki mala khup anand hoto!!
  Gandhali Tai,
  Thanks. :) Glad you liked it.
  Cheers Everyone!!

  ReplyDelete
 5. :D :D

  sayee tu katha hi sahii lihu shksheel. I loved this 1.

  ReplyDelete