Sunday, February 21, 2010

पावसाच्या कला

लहानपणी नेहमी जुलै महिना सुरु व्हायची मी खूप आतुरतेने वाट बघायचे. एकवीस जुलैला माझा वाढदिवस असतो. तो जवळ येईल तशी माझी कळी खुलत जायची. पण जुलैतला पाऊस आईला मात्र बेजार करून टाकायचा. माझ्या वाढदिवसाची तयारी नेहमी लक्ष्मी रोडवरचा चिखल तुडवत सुरू व्हायची. पावसाचं ते बालिश किरकिर करणारं रूप माझ्या मनाच्या कोपर्‍यात खूप खोलवर रुतून बसलं आहे. जशी मी होते तसाच पाऊस होता. मधेच पिरपिर करणारा, मग मनासारखं झालं नाही की बळंच आभाळ काळं करून रुसून बसणारा! कधी आईनी महागाचा फ्रॉक घ्यायला नकार दिला की धो धो कोसळणारा. पण कसाही असला तरी तेव्हा मला पाऊस फार आवडायचा. जुलैच्या एक तारखेपासून डक बॅगचा रेनकोट घालून शाळेत जायची वेगळीच मजा असायची. या महिन्यात आपला वाढदिवस, मग सगळ्या वर्गाला आपण गोळया आणि पेन्सिली वाटणार! आपल्या घरी आपल्या खास मैत्रिणी येणार! या सगळ्या विचारांत ते वीस भिजलेले दिवस भुर्रकन उडून जायचे.
कोल्हापूरचा पाऊस पुण्याच्या पावसापेक्षा खूप वेगळा असायचा. तिकडच्या कौलारू घरांवर तो लावणीतल्या एखाद्या ढोलकीवाल्यासारखा बरसायचा. मग थोडा उघडला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला बुचाच्या फुलांचा सडा पडायचा. अज्जीबरोबर त्या दोन पावसांच्या मधल्या वेळेत बाहेर जायला फार मजा यायची. मग रस्त्याकडेला कुडकुडत बसलेल्या एखाद्या केविलवाण्या कुत्र्याची मला पोटातून दया यायची. आणि, "अज्जी तू इतकी कठोर कशी होऊ शकतेस गं?" या मूलभूत प्रश्नावर आमच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. मग शेवटी कुत्रा मोठा झाला की घरच्या माऊला खाऊन टाकेल या वाक्याने समेट व्हायचा. तो पाऊस मला खूप आवडायचा. तो जर माणसाच्या रूपात आला असता नं तर आमच्या पुण्यातल्या शेजारच्या चित्रे बाबांसारखा असता. खादीचा झब्बा घातलेला, चष्मेवाला आणि खूप खूप प्रेमळ. पुण्यातला पाऊस तसा तुसडा असायचा. रिक्षावाल्यांच्या आणि "पादचार्‍यांच्या" हुज्जतीसारखा! त्याला पडायला अशी मोकळी जागाच मिळायची नाही. मग जिथे पडायचा तिथे गृहपाठाच्या वहीतून फाडलेल्या कागदांच्या बोटी सोडून जायचा बिचारा.
स्नेहानी आणि मी असे किती पावसाळे पहिले एकत्र. पण प्रत्येक वर्षी आमच्याबरोबर पाऊसही मोठा व्हायचा. गॅलरीतल्या पत्र्यावरून पाऊस पकडायचे दिवस सरले आणि त्याच गॅलरीत आम्ही तासंतास पावसाशी गप्पा मारू लागलो, न भेटलेल्या सख्याशी माराव्यात तशा.
लहानपणी चिखलात खेळायला बोलावणारा पाऊस अचानक कविता बनू लागला. कधी खूप दिवसांच्या पावसानंतर कपड्यांना, केसांना तो न सांगता येण्यासारखा थंड वास यायचा. अशावेळी मात्र पाऊस खिन्न वाटायचा. मनात "पाऊस कधीचा पडतो" वाजू लागायचं! आणि मग पावसाच्या गार थेंबामध्ये माझ्या डोळ्यातले गरम थेंब मिसळायचे. पण तो एकाकी कवी पाऊसही मला फार आवडायचा. अशावेळी आल्याचा चहा मनावरचं ते अबोल ओझं घालवायला खूप मदत करायचा.
एखाद्या दिवशी असा पाऊस पडला पुण्यात, की मी कॉलेजला दांडी मारून माझ्या खोलीतल्या खिडकीत वाचत बसायचे पावसाबरोबर. तेव्हा माझ्या पुस्तकातल्या गोष्टीबरोबर पाऊसही हळवा व्हायचा. विसाव्या वर्षापर्यंत पाऊस फार छंदी होता. पुढे पावसाच्या मनस्वीपणाची सवय झाली. आणि पाऊस काहीही म्हणत असला तरी आपलं काम करत राहायची (वाईट) सवय लागली.
तसा भारतातला चार महिने गुंतवणारा व्यावसायिक अभिनेता-पाऊस कुठे आणि ब्रीस्बनमधला उन्हाळ्यात पाट्या टाकायला येणारा पाऊस कुठे! इथला पाऊस मेला अरसिक, आडदांड! नेमका पडायच्या वेळेला पडतो आणि काम चोख करून जातो. पण तो जर मानवी रूपात आला तर इकडच्या धटिंगण कामगारासारखा येईल. तरीही मला तो आवडतोच. त्याच्या रुक्ष रूपातही कुठेतरी लय सापडते आणि मग थेट कोल्हापूरच्या पावसाची आठवण होते.
वाटतं, शेवटी वर्षानुवर्षं पृथ्वीवर तोच पाऊस पडतोय की!! मग आत्ता जो या छत्रीची छेड काढू पाहतोय तो कदाचित कोल्हापूरचाच खट्याळ पाऊस असेल! मला शोधत आलेला. :)

11 comments:

  1. आमच्या इकडे पावसाला लोक जाम टरकून असतात. पण इथे बर्फाचा अगदी कोरा करकरीत नवीन अनुभव घेता आला. बर्फ पडताना कसलं मस्तं वाटतं! नंतर विकेट उडते अर्थात, पण तेवढं चालतंय.

    ReplyDelete
  2. Aphaaat sunder lihilay.....
    kharetar shabd naahiyet mazyakade hya post che koutuk karanyasathi.... Just suppperrbbb.....!!!

    ReplyDelete
  3. वाचल्यावर असं वाटलं, आजूबाजूच्यांना म्हणावं.. श्श्श. जरा दोन मिनिटम एकदम शांत बसा.. जे वाचलं ते डोळे बंद करून दिसतं क ते पाहुया...

    आणि पावसाबद्दल म्हणशील तर मला भर पावसात आपण एका गाडीमधे आहो.. आजूबाजूचे सगळे बिजत आहेत, आणी आपण ठार कोरडे आहोत.. ही situation खूप आवडते..!!

    ReplyDelete
  4. aaila khooooop vaachaaychy ghaaite aata vaachto :D mag commenteto :P

    ReplyDelete
  5. सई
    पाऊस हा विषयच भाव भावनांचा कँडिलोस्कोप आहे.पावसाची वेगवेगळी रुप वेगवेगळ्या वयात जशी भावतात ते सगळ छान लिहल आहेस. पाउस म्हंणजे वसंत बापटांच्या बालगीता पासून महानोरांच्या श्रृंगारीक कविता ते थेट ग्रेस च्या कविता पर्यंत आपल्याला घेउन जातो.
    असा पाउस दिल्या बद्द्ल धन्यवाद

    ReplyDelete
  6. सई खूप छान लिहिले आहेस.पावसाच्या आठवणीत एक महत्वाची आठवण म्हणजे २१ जूल्लैला(साल गुपित)धोधो पाउस पडत असताना मी एका लठ्ठ गो-या लंब केसाच्या गोड मुलीला जन्म दिला.

    ReplyDelete
  7. हा हा , आई तेव्हापासून बारीक व्हायचा प्रयत्न करते आहे, अजून नीट जमलं नाही!!

    ReplyDelete
  8. नुस्तं छान, सुरेख म्हणायचं नाहीये मला, पण इतक्या गोड आणि हळुवार लिहिलेल्या पावसाच्या नोंदीवर काहीच न म्हणण्यापेक्षा ते बरं!
    खूSSSSप आवडली :)
    जियो!

    ReplyDelete
  9. Hi mandar,
    Khup thankyouuu. :)

    ReplyDelete
  10. चंद्राच्या कला पाहिल्या होत्या. आता पावसाच्याही कला या वाचनातून अनुभवल्या.

    ReplyDelete