Sunday, June 27, 2010

अभ्यास

माझा अभ्यास हा आमच्या घरात युद्धाचा विषय असायचा. सकाळी सकाळी बाबा पळून यायचा आणि मला उठवायचा. सात ते साडेआठ ही वेळ माझ्या अभ्यासाची असायची. तसं भाषा, इतिहास-भूगोल, सामान्य विज्ञान वगैरेंशी माझं खास वैर नव्हतं. पण गणिताचं पुस्तक सकाळी सकाळी दिसलं की मी एखाद्या घोडीसारखी बिथरायचे! गणित मला यायचं नाही. पण ते येत नाही म्हणून मला त्याची जाम भीती वाटायची. शाळेत गणितात पैकीच्या पैकी मार्कं मिळणार्‍या मुला-मुलींचा वेगळाच तोरा असायचा. मला भाषेत नेहमी छान मार्क असायचे, पण भाषेचं कौतुक भाषा शिकवणार्‍या बाईंनाच असायचं फक्त. गणित आलं पाहिजे कारण गणित आल्याने आयुष्य खूप सोपं होतं, असा एक मतप्रवाह शाळेतल्या बहुतेक मुलांच्या पालकांमध्ये असायचा.
बाबाला मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं फार वाटायचं. पण ते त्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. निदान माझी गणिताबद्दलची भीती तरी जावी म्हणून 'हसत खेळत गणित’ सारखे खूप उपक्रम आमच्या घरात राबवण्यात आले. पण कशानेही माझ्या गणित-ग्रहणशक्तीत फरक पडला नाही. प्रत्येक इयत्तेसरशी माझं गणित अधिकच कच्चं होऊ लागलं. आणि त्याचबरोबर गणित किती महत्वाचं आहे याचे पुरावे आणखीनच बळकट होऊ लागले. आमच्या घरात दर वर्षी माझ्या गणितातील मठ्ठपणावरून बाबाच्या डोक्यात चिंता निर्माण होऊ लागल्या. आई मात्र शांत असायची. "सई, तू एकदा गणितात नापास होऊन बघ", असा सल्ला तिनी मला दिला होता. पण आई-बाबांच्या सुदैवाने ती वेळ माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली. आणि आली तेही बरं झालं.
सातवीनंतर बाबानी माझा अभ्यास घेणं बंद केलं आणि मला गणिताची गोडी लागावी म्हणून मंगलामामीकडे अभ्यासाला पाठवण्यात येऊ लागलं. मंगला नारळीकर, म्हणजे मंगलामामी माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे. तिच्याकडे मी सायकलवरून जायचे. पुणे युनिव्हर्सिटीचा तो शांत परिसर, आयुकातलं तिचं फुलांनी सजलेलं घर, तिच्या मोठ्या डायनिंग टेबलवर बसून पिवळ्या पिवळ्या कागदांवर लाल शाईनी सोडवलेली गणितं, हे सगळं माझ्या मनाच्या खाऊच्या कप्प्यात ठेवलंय मी! तिनी टाटा इनस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधून गणितात पी. एच. डी मिळवली आहे. तिची गणित शिकवण्याची पद्धत इतकी सोपी असायची की तिच्याकडे असेपर्यंत मी अजून पहिली-दुसरीचंच गणित शिकते आहे असं मला वाटायचं. दहावीत माझा भूमितीचा अभ्यास खूप छान झाला होता, कारण मंगलामामी मला सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले प्रत्यक्ष चित्र काढून समजावून सांगितले होते. कधी कधी आम्ही काढलेल्या त्रिकोणांच्या मध्यगा (मिडीयन) वापरून, एकसारखे पानभर त्रिकोण मी काढायचे आणि तेरा वर्षांच्या मुलीचा गणिताचा तास हा पाच वर्षांच्या मुलांचा चित्रकलेचा तास बनायचा. एखादा कांदा सोलत जावा तशी ती गणितं सोडवत जायची. कुठलीही एक पद्धत घोड्यासारखी न रेटता, सगळ्या रस्त्यांनी त्याच उत्तराकडे एखाद्या शूर शिपायासारखी मला न्यायची. तिची ही सवय मी गणितात नाही वापरू शकले. पण गणिताच्या परिघाच्या बाहेर, खर्‍या खर्‍या आयुष्यात ही पद्धत जास्त उपयोगी आहे हे मला आता कळू लागलं आहे.
ती दोन वर्षं माझे गणितातले मार्कं अचानक शिड्या चढू लागले. मला मंगलामामी गणित शिकवते याचा वर्गातल्या मुलांना हेवादेखील वाटू लागला. पण गणितापेक्षा खूप मोठ्या गोष्टी मी तिच्याकडून शिकले. तिचा साधेपणा, एखादी गोष्ट येत नाही याकडे बघण्याचं निखळ कुतूहल, ती का येत नाही याचा त्रागा न करता, तिच्या आजूबाजूला साठलेली भीती, आणि लाज आधी कमी करायची पद्धत, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. एका वेळी मंगलामामी साधारण पाच कामं करायची. माझ्याबरोबर तिच्या मोलकरणींच्या मुलांचाही अभ्यास एका बाजूला सुरु असायचा. मग कधी कधी तिची मोठी शिष्या म्हणून त्यांचा अभ्यास तपासायची जबाबदारी ती मला द्यायची. आम्ही सगळे आमचे आमचे अभ्यास करत असताना ती आमच्यासाठी केक बनवायची. तसंच तिचं फुलांचं वेड, जे मलाही वेड लावून गेलं. तिच्या टेबलवर नेहमी सोनटक्का, चाफा, फ्रेंच गुलाब, मोगरा, अनंत, आणि बाकी काहीच नसलं तर पारिजात तरी हमखास असायचा. आणि ती सुगंधी फुलं चहात टाकायची. मग मीपण घरी येऊन फुलांचा चहा करायचे.

तिच्या डोक्यात इतकी माहिती असूनदेखील, लिहिताना किंवा बोलताना अगदी सोपं, साधं आणि सुटसुटीत बोलायची.
तिला मी राजकारणावर वाद घालतानाही पाहिलं आहे. पण तिचा भर नेहमी मूळ अडचण काय आहे याकडेच असायचा. कुठल्याही वादामध्ये तिनी कधीही, कुठलाही एकाच "वाद" पकडून ठेवला नाही. आपण काहीतरी महान बोलतो आहे, आणि आपल्या बोलण्याने ही सगळी सभा खूप प्रभावित होणार आहे असा दर्प तिच्या कुठल्याच बोलण्यात नसायचा.
तिचा तास सुरु असताना कधीच मला माझ्या पुढच्या आयुष्याची भीती वाटायची नाही. आणि तिच्यासारखी गुरु मला तेव्हा भेटली यासाठी ’नियती’बाईंचे मानावे तितके आभार कमी आहेत. पुढे वाचन वाढल्यावर लक्षात येऊ लागलं, की सोपं लिहिणं, सोपं बोलणं आणि सगळ्यांना कळेल असं बोलणं खूप अवघड आहे. खास करून जेव्हा बोलणार्‍या किंवा लिहिणार्‍या माणसाचा व्यासंग वाचकांच्या मानाने खूप मोठा असतो, तेव्हा त्यांना कळेल असं बोलणं ही विषयाशी पूर्णपणे एकरूप झाल्याची पावतीच असते.
माझी गणिताची भीती अजूनही गेली नाही. पण त्याच्याशी लढता लढता मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा लोकांमध्ये अभ्यासाच्या पलीकडची हुशारी दिसू लागली. पुस्तकं वाचून शहाणे झालेले लोक खूप बघितले होते. पण प्रवास करून शहाण्या झालेल्या लोकांशी दोस्ती झाली तेव्हा, भारतात आपण कुठल्याच साच्यात बसलो नाही याचा खूप आनंद झाला. कधी कधी आपल्या बाळाचं आयुष्य सोपं व्हावं, त्याला आपल्यासारखे कष्टं करायला लागू नयेत म्हणून आपण नकळत त्यांच्या आजूबाजूला भिंती घालतो. पण भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे? कदाचित असेही देश दिसतील जे आपल्या त्रिज्येच्या बाहेर होते. अशी लोकं भेटतील, ज्यांचा पेहेराव, आहार, रूप-रंग सगळंच आपल्या अगदी विरुद्ध असेल. पण तरीही त्यांच्या मनात आपल्यासारखेच प्रश्न असतील. आपल्यासारखीच सुख-दु:ख असतील. आणि अभ्यास करून, यशाच्या शिड्या चढणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्यासारखाच आणि आपल्या अगदी विरुद्ध विचार करणारी माणसं बघणंही महत्वाचं आहे. आणि मग मंगलामामी जशी गणितं सोडवायची तशीच कुठल्याही देशातून, वेशातून पाहिलेली माणसं एकाच माणुसकीचं उत्तर देतात!

12 comments:

  1. Hi Saee
    Nice blog!
    you write awesome!...ekdam manatun
    Keep writing

    ReplyDelete
  2. सई मस्तच लिहले आहेस!
    "यशाच्या शिड्या चढणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्यासारखाच आणि आपल्या अगदी विरुद्ध विचार करणारी माणसं बघणंही महत्वाचं आहे."
    आयुष्यात खर तर पुस्तक वाचता येण्यापेक्षा माणस वाचता आली पाहीजेत.त्यासाठी तुम्हाला अनुभव समृध्ध होण गरजेच आहे. अनुभव चांगले असोत वा वाईट तुम्हाला समृध्ध्च करतात.

    ReplyDelete
  3. saee-- excellent we are fortunate to have Mangalamami.I also call her in every difficulty assuming she has solution for every problem and she always prooves it .Today morning i called her and told about your blog . ती म्हणाली सई मला हरभर्याच्या झाडावर चढ्वते---

    ReplyDelete
  4. As usual good, specially last para is just 2 good

    ReplyDelete
  5. किती सुरेख लिहिलंयंस, सई!
    "मध्यगा" फारच छान शब्दय :)

    तुला गणितातली आणि बाहेरचीही खूप कोडी पडू दे, आणि ती सोडवत राहण्याचा आनंदही :)

    ReplyDelete
  6. @Deep and Prasad,
    Thanks :)
    @Aai-baba
    Thanks for separate comments. :D And also for letting Mangala mami know. :) Although I feel a little bit embarrassed now.
    @Yawning dog
    Thanks. :D You write well too. I am a fan. :)
    @Mandar
    "madhyaga" ha shabda Gayatri madam ni ghatlay tithe. So we have to thank her. For the word and also for checking my post. Thanks a lot. :)
    Cheers!
    Saee

    ReplyDelete
  7. फारच छान. कुठल्याही एका वाक्याचे अथवा विचाराचे कौतुक करणे म्हणजे लेखातील इतरांवर अन्याय करणे ठरेल.

    ReplyDelete
  8. @ Maithili
    Thanks..
    @Shrirang
    Thanks so much for the encouragement. :)
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  9. किती सुंदर लिहीलय!!!
    मला कांद्याच उदाहरण खूपच आवडलं.माझे एक सर "Real analysis " शिकवताना 'दोर्याच्या गुंत्याच' उदाहरण द्यायचे .
    आणि मंगला मामी सारख्या शिक्षिकेची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

    ReplyDelete
  10. Very nice... same filling for my maths teacher mr kulkarni, jarag nagar kolhapur..... it is our pleasure to have such nice personality around us.. we should pray to god to avail such persons a healthy life to inspire peoples around them .... and make our soul also of same nature ..... thanks for this nice blog

    ReplyDelete