माझ्या आणि स्नेहाच्या स्नेहात सिनेमांचा खूप मोठा वाटा होता. मी चार वर्षाची असताना माधुरी दीक्षित नावाचं दैवत आमच्या आयुष्यात आलं. मग सुट्टीनंतरचे दहा महिने आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमचा सिनेमा व्यासंग वाढवत असू. त्यातही माधुरी आम्हाला खूप आवडायची. तिचे नाच बारकाईने पाहून तसेच्या तसे करायचा आम्ही प्रयत्न करायचो. मला पुण्यात तितके सिनेमे बघायला मिळायचे नाहीत. कारण माझा आठवडा नाचाचे क्लास, गाण्याचा क्लास, अभ्यास आणि बाबाबरोबर पेशवे बागेत जाणे यात संपून जायचा. पण स्नेहा मात्र चित्रहार, छायागीत वगैरे मधून तिचं शिक्षण चालू ठेवायची.
सुट्टीला जायच्या आधी मी बघितलेल्या सिनेमांची यादी डोक्यात करून ठेवायचे. भेटल्या भेटल्या आधी माझी बॅग उघडली जायची. मग मी काय काय कपडे नेले आहेत व त्यातले कुठले कुठले "अदला-बदलीत" ठेवायचे याचे महत्वाचे निर्णय आम्ही आधी घ्यायचो. मग स्नेहा पण मला तिनी घेतलेले नवीन कपडे दाखवायची. मी तिचे कपडे घालावेत असं तिला फार वाटत असे. बाहेर जाताना नेहमी आधी तिचे कपडे दाखवायची. मग मी सुद्धा लाडोबासारखी काय हवं ते छान घालायचे. स्नेहाकडे नेहमी "साजन" ड्रेस, "राम-लखन" ड्रेस वगैरे बॉलिवूड प्रेरित कपडे असायचे. माझी आई मी सात आठ वर्षाची होईतो माझे सगळे कपडे शिवायची. तिच्याकडे असली फिल्मी मागणी केली की तिचा पारा चढायचा. म्हणून स्नेहाचे फिल्मी कपडे मला फार आवडायचे. मग ड्रेस घातला की त्याला मॅचिंग रीबीन, बांगड्या, टिकली सगळं स्नेहाकडे असायचं!
त्यानंतर मात्र मला अगदी न आवडणारा प्रकार सुरू व्हायचा. सिनेमाची स्टोरी! मला सिनेमे बघायला आवडायचं पण सिनेमा पाहून आल्यावर त्याची गोष्ट कुणाला सांगायला मला अज्जीबात आवडायचे नाही. पण स्नेहाचा हा आवडता छंद होता. कधी कधी तिनी न पाहिलेला सिनेमा मी पाहिला असेल तरी मी ते तिच्यापासून लपवून ठेवायचे. तसंच मला न पाहिलेल्या सिनेमाची गोष्ट ऐकायलाही आवडत नाही. पण हे सगळं स्नेहाला जाम आवडायचं. खूप दिवसांनी भेटल्यावर करायच्या पहिल्या काही कामांमध्ये तिला मला तिनी पाहिलेल्या सिनेमांच्या स्टोर्या सांगायला आवडायचे.
तिची तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी सहा तास चालायची. आधी सिनेमा पहायचं कसं ठरलं यापासून सुरूवात व्हायची.
"अगं सयडे तुला माहितच आहे की पप्पांची सगळी कामं कशी असतात! तिकिटच घेऊन आले! मग मी आणि आई अक्षरश: दहा मिनिटात तयार झालो. वाटेत किल्लेदार काकी भेटल्या. त्यांच्याशी बोलत बसले गं पप्पा त्यामुळं जाहिराती चुकल्या."
मग प्रत्येक शॉट, त्यात हिरॉईनचे कपडे,केशभूषा, दागिने सगळ्यासकट तिची स्टोरी असायची. त्यातही काही खास नवीन अदा वगैरे असल्या तर ती स्वत: करून दाखवायची. एखादं गाणं खूप प्रसिद्ध झालं असेल तर सिनेमाच्या ज्या भागात ते आहे तिथे त्याचा नाच पण करून दाखवायची कॅसेट लावून. त्यामुळे मला सिनेमापेक्षा जास्त करमणूक फुकटात मिळायची.
मी काही पूर्ण पाच सहा तास तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही. तिचा खूप महत्वाचा सीन चालू असताना नेहमी माझ्या डोक्यात, "अज्जीने बेसनाचे लाडू कुठल्या डब्यात ठेवले असतील?" वगैरे प्रश्न यायचे. तिला जरा जरी कुणकूण लागली की माझं लक्ष उडालंय तर ती लगेच "अत्ता मी काय सांगितलं सांग पाहू" असं खडसावायची. मग मी सफाईदारपणे आधीच्या तीस सेकंदांतल्या सगळ्या ओळी म्हणून दाखवायचे. मला स्नेहामुळे कानानी ऐकणे व डोक्यानी वेगळाच विचार करणे ही अतिशय उपयोगी सवय लागली. अजूनही माझ्या "भवितव्याबद्दलच्या" माझ्या गाईडच्या कल्पना ऐकताना मी सोयिस्करपणे वेगळा विचार करते. :)
दुसरा आवडता फिल्मी विरंगुळा म्हणजे माधुरीच्या गाण्यावर नाच बसवणे. मला सिनेमातला नाच तसाच्या तसा करायला आवडायचे नाही. कारण मग मधे मधे जेव्हा हीरो हिरॉईन हिमालयात वगैरे नाच न करता जातात तेव्हा आमच्याकडे करायला काहीच नसायचं. आणि त्यात आमच्या डोक्यानी काही बसवलं की ते खूप विनोदी दिसायचं. त्यामुळे मी सगळा नाच स्वत:च बसवायचे. यावरून बरेचदा माझं आणि स्नेहाचं भांडण व्हायचं. पण वाटाघाटीतून काहीतरी तोडगा निघायचा. कधी कधी आम्ही दिवसभर नाच बसवायचो. मग शनिवारी नरूमामा लवकर आला की अज्जी,मीना मामी, मामा सगळ्यांना नाच करून दाखवायचो.
मधेच कधीतरी स्नेहाला "आपल्याला सईसारखं भरतनाट्यम् येत नाही" याची अचानक जाणीव व्हायची. मग मी तिला शिकवायचे. पण नाच करण्यापेक्षा दंगाच जास्त व्हायचा. सुट्टीला जाताना आई नेहमी माझ्याबरोबर भरतनाट्यमचा सराव करायची वही वगैरे पाठवायची. पण ते दोन महिने मी कुठलेही नियम न पाळता नाचायचे. तो नाच मला सगळ्यात जास्त आनंद देऊन गेला. :)
सुट्टी संपताना आम्हाला दोघींनाही वाईट वाटत असे. आता परत शाळा या विचारानी तर वाईट वाटायचंच पण रोज नाच बसवायला मिळणार नाही याचंही दु:ख होत असे. मला शाळा कधीच मनापासून आवडली नाही. शाळेतल्या माझ्या (दंगेखोर) मैत्रिणी नेहमी मला,"शाळा कशी काय आवडू शकत नाही तुला?" असा टोमणावजा प्रश्न विचारायच्या. पण शाळेतले ते "गट", सगळ्यात हुषार कोण, सगळ्यात प्रसिद्ध कोण आणि थोडं मोठं झाल्यावर सगळ्यात सुंदर कोण याचे निकष मला अजिबात पटायचे नाहीत.आणि का कोण जाणे शाळेत खूप मैत्रिणी असूनही मला शाळा भूमितीच्या पुस्तकासारखीच निरस वाटायची. आणि मग मार्च महिन्याअखेरी कुठल्यातरी मराठी कवितेची शेवटची उजळणी करताना माझे कान कविता ऐकायचे आणि मन मात्र वर्गाच्या खिडकीतून अडीचशे किलोमीटर ओलांडून कोल्हापूरला जायचं. जिथे माझी सर्वात सुंदर जिवाची सखी तिच्या शाळेच्या बाकावर मला सांगायच्या सिनेमा स्टोर्यांची यादी बनवत बसलेली असे!