Saturday, June 20, 2009

कविता आणि लावणी

अज्जीनी मला खूप कविता शिकवल्या. पण तिची कविता शिकवायची नजाकत काही वेगळीच होती. एखादी खूप अस्वस्थ करणारी कविता शिकवली की लगेच तिचं अत्र्यांनी केलेलं विडंबन वाचून दाखवायची. त्यामुळे "महान काव्याची" मस्करी करू नये असा संदेश मला बिलकुल मिळाला नाही. उलट काहीही नवीन कानावर पडलं की त्याचं मूळ कवितेपेक्षा छान विडंबन कसं करावं याच्या मागे मी लगेच लागायचे. 
"हे कोण बोलिले बोला
राजहंस माझा निजला" 
याचं अत्रेंनी केलेलं
"हे कोण बोलिले बोला
चिंचेवर चंदू चढला"
हे विडंबन ऐकून त्यांचा खूप राग आला होता मला. आणि ते इतकं लीलया वाचून दाखवल्याबद्दल अज्जीचाही. पण कुसुम आणि ताई अज्जी दोघींकडे अप्रतीम विनोद बुद्धी होती. ताई अज्जी सुद्धा "मयतीचे" खास विनोद करायची. अगदी स्वत:च्या सुद्धा. 
तर अशा अनेक कविता मोडून मी कविता करायला शिकले. 
कुसुम अज्जीच्या माहेरी अनेक "कोटीभास्कर" होते. आईचे सगळे मामा विविध कोट्या करायचे. त्यामुळे त्यांच्या सहवासात नांदण्यासाठी मलासुद्धा ही कला शिकावी लागली. 
आज्जीच्या मोठ्या भावाने स्वत:च्या धाकट्या मुलाचं नाव "अलंकार" ठेवलं. याचा दुसरा अर्थ संस्कृतमध्ये "अलम्" म्हणजे "पुरे" असा होतो. तिच्या माहेरी नणंदा-भावजयांची शीतयुद्धं सुद्धा संस्कृतमध्ये होत असत. 
अज्जीला शब्दांचे वेड होते. सुंदर शब्द माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने सगळे मार्ग खुले ठेवले होते. अगदी लावणीचे सुद्धा. दहा-बारा वर्षांची असताना "तुला कुठली गाणी आवडतात?" या प्रश्नाला मी निरागसपणे "लावणी" असं उत्तर द्यायचे. त्यावेळी मी ऐकलेल्या आणि पाठ केलेल्या लावण्या म्हणजे होनाजी बाळा, अमर भूपाळी, रामशास्त्री असल्या खूप जुन्या चित्रपटांतल्या असत. अज्जीने व आई-बाबाने मला खास त्याच्या कॅसेट्स दिल्या होत्या. त्यामुळे पुण्यातली काही मंडळी चकित होत असत. त्यांच्या चेह-यावर "काय मुलगी आहे! म्हाता-या आजीसमोर सरळ लावणी म्हणायला तयार!" असे असायचे. 
पण "सुंदरा मनामधे भरली" न अडखळता, एका दमात, सुरात, तालात आणि स्पष्ट उच्चारासहित म्हणणे हे चर्पटपंचरी म्हणण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. थोडी मोठी झाल्यावर मी लोकांना याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवायचे. कारण मला एकेकाळी चर्पटपंजरी सुद्धा पाठ होती! 
झोपाळ्यामागे एक दगडी कट्टा आहे. कोल्हापुरातल्या खूप संध्याकाळी टी.व्ही न बघता ताजी, कुसुम अज्जी,मीना मामी आणि सगळ्या शेजारणी माझ्या लावण्या ऐकायला यायच्या. मग त्या कट्ट्यावर चढून मी सगळ्या जुन्या लावण्या म्हणून दाखवायचे. अगदी अजागळ हावभावासकट! मग लटपट लटपट अगदी "लटपटून" करून दाखवल्याबद्दल मला सगळ्या बायका मिठ्या मारायच्या! तसं दुस-यांना लावणी ऐकायची आहे म्हणून करून दाखवणे मला अजिबात आवडत नसे. पण मी लावणी करत असताना कुणी बघायला आलं की माझा उत्साह वाढत असे. 
होनाजी बाळातली एक लावणी मला फार आवडायची. तिचे शब्द अगदी शेला विणल्यासारखे गुंफले होते.
त्यात "नारी तुझी गजाची गं चाल" असं एक वाक्य होतं. तेव्हा मी हसून "म्हणजे कवी तिला हत्ती म्हणतोय?" असं विचारलं होतं. मग पुढल्यावेळी भवानी मंडपात हत्ती बघितल्यावर लक्षात आलं की "गजाची चाल" किती सुंदर असते! 
लहानपणीची काही वर्ष मी आगाऊ म्हणून प्रसिद्ध असणार.  कारण एवढसं, नकटं, शेमडं नाक उडवून जर कुणी 
"अरे जशी मनमथरती धाकटी
सिंहसम कटी उभी एकटी
गळ्यामधी हार..
कोण सरदार हिचा भर्तार" असं वयाला न झेपणारं गाणं म्हणू लागली तर जरा विनोदीच वाटेल.
पण थोड्याच दिवसांत माझे पाय करकरणा-या कोल्हापुरी जोड्यांमध्ये बसू लागले. तसं त्या सुंदर शब्दांचा अर्थसुद्धा कळू लागला. अजूनही कळतोय. 
पण शब्द सुंदर असतात हे मला शिकवण्यात अज्जीचा खूप मोठा हात आहे.
कुसुम अज्जीचं "सासरचं" नाव "अनुराधा" आहे. या नावाने तिला कुणीही बोलवत नाही. पण घराच्या पाटीवर मात्र ते नाव छान झळकतं. खूप सुंदर नाव  आहे. पण कधी कधी वाटतं, अजोबांनी राधे ला "अनु" लावून या सगळ्या मायाजाळाला एक गोंडस रूप द्यायचा प्रयत्न केला असावा. पण ताजी आणि अज्जी मध्ये नशीब सोडता कुठेच "अनु" लावता येणार नाही. 
आमच्या कोल्हापूरचा "वसंत" "कुसुम" आणि "मालती" मुळेच पूर्ण झाला. कोण आधी आणि कोण नंतर हे माझ्यासारख्या सख्ख्या-सावत्र नातीसाठी महत्वाचे नाही! कारण रोज एकदा तरी मला दोघींचीही आठवण येते!

ले.त.गा.आ =)

3 comments: