अशी मनातल्या मनात मी खूप पिल्लं पाळली होती. बाबाबरोबर पेशवे बागेत गेलं की, "ए बाबा आपण वाघाचं पिल्लू पाळूया ना!" अशी मागणी व्हायची. मग बाबा मला आधी समजावायचा प्रयत्न करायचा. पण माझा एकूण उत्साह बघता, "हो पाळूया हं. आईला विचारू आधी", अशी समजूत घालायचा. केरळमधल्या जंगलात मला हत्तींचा कळप दिसला. लगेच मला हत्तीचं पिल्लू पाळायचे डोहाळे लागले. सोलापुरात गाढवाचं पिल्लू बघूनसुद्धा मी "कित्ती गोड!" म्हणायचे. तसंच काही दिवस मला आपल्या घरात जिराफाचं पिल्लू असावं असंही वाटत होतं!
माझ्या कल्पनेतील 'पाळीव' प्राणी बघून मी वास्तवात फक्त रस्त्यातली कुत्र्याची आणि मांजराची पिल्लं घरी आणू शकते ही माझ्या जन्मदात्यांसाठी खूपच चांगली बातमी होती. रोज संध्याकाळी मी आणलेली पिल्लं विमलमावशीचा नवरा (दौलतमामा) पोत्यात घालून सोडून यायचा. मग सकाळी उठल्यावर माझा पुन्हा प्राणीशोध सुरू व्हायचा.पण प्राण्यांशी खेळण्यात जी मजा यायची ती मला दुस-या कुठल्याही गोष्टीत सापडली नाही. मांजरीच्या पिल्लासमोर दो-याला बांधलेली बांगडी नाचवायला मला फार आवडायचं. मांजराची पिल्लं तासंतास त्याच गोष्टीशी खेळतात. सुरुवातीला पंज्याने बांगडीला डिवचतात. मग जसजसा खेळ अवघड होत जाईल तसतसे त्यांचे प्रयत्नही बळावतात. कधी कधी माऊचं पिल्लू दोन्ही पंज्यांनी बांगडी पकडायला जायचं आणि तिच्यात अडकून बसायचं. मग अपमान झाल्यासारखं दूर जाऊन बांगडीकडे दुर्लक्ष करायचं. पण डोळ्याच्या कोप-यातून नेहमी तिच्यावर नजर ठेवून असायचं. मग बांगडी जरा सुस्तावली (म्हणजे बांगडीच्या सूत्रधाराला खेळ वाढवायची हुक्की आली) की पिल्लू दबा धरून बांगडीवर चाल करून यायचं. मला ही चाल फार म्हणजे फार आवडायची. त्यात मांजराची गती एखाद्या नर्तिकेसारखी किंवा एखाद्या चढत्या तानेसारखी वाढायची. आणि कधी कधी ते दर्शन मला दिल्याबद्दल मी ती बांगडी सोडून द्यायचे. त्या पिल्लाचा फार हेवा वाटायचा. किती एकाग्र चित्ताने त्या बांगडीचा पाठलाग करायचं ते! इतकी शक्ती, इतकी आशा - ती पण एका फडतूस दो-याला टांगलेल्या बांगडीसाठी! पण त्याची कीव पण यायची. ’काय वेडं बाळ आहे!’ असंही वाटायचं.
नंतर मोठी झाल्यावर असाच एक खेळ खेळताना लक्षात आलं की देवपण आपल्या प्रत्येकाला अशीच एक बांगडी देत असतो, आणि आपल्या एखाद्या अशाच डौलदार चालीसाठी आपल्यावर ती बांगडी आनंदाने भिरकावीत असतो!
जसं मांजराच्या बाळाच्या थिरथिरेपणाचं मला कौतुक वाटायचं तसंच मला राजामामाच्या गोठ्यातल्या गाईच्या संथपणाचंही कौतुक वाटायचं. खूप वर्षं मला गाईलाच का देवाचा दर्जा देतात हा प्रश्न पडला होता. अज्जीने दूध, दही, ताक, लोणी, तूप व त्यातून फुटणा-या चवदार पदार्थांच्या फांद्या मला खूपवेळा समजावल्या होत्या. तसंच बागेतले सुगंधी गुलाब शेणखतामुळे तितके खुलतात हेसुद्धा सांगितले होते. पण मग हे सगळं आऊच्या म्हशीमुळे पण होऊ शकेल असं मला वाटायचं. त्यामुळे माझी गाडी गाय आणि म्हैस या एका फाट्यावर येऊन अडकायची.पण मग अशाच एका निरभ्र दुपारी मामाच्या मळातल्या बोधिवृक्षाखाली मला उलगडा झाला. मामाची गाय तासंतास रवंथ करायची. आपल्यालाही अशी नंतर चावायची सोय असती तर रोज रात्री आईपासून सुटका तरी झाली असती असं मला नेहमी वाटायचं. तिच्या शेपटीवरच्या माश्यांना जमेल तितका वेळ ती तिथे राहू द्यायची. मग शेपटीच्या अगदी हलक्या झटक्याने त्यांना उडवायची. कधी कधी मांडीवरची कातडी दुधावरच्या सायीसारखी हलवून माशा उडवायची. मिळेल तो चारा कुठल्याशा अध्यात्मिक तंद्रीत रवंथ करणारी ती गरीब गाय कुठे आणि आऊच्या नाकी नऊ आणणारी तिची नाठाळ म्हैस कुठे!
आऊच्या म्हशीच्या पायात मोठा ओंडका होता. आऊच्या घराची तटबंदी तोडून कित्येक वेळा तिची म्हैस गाव भटकायला जात असे. बिचारी आऊ मग ज्याला त्याला, "माझी म्हस दिसली का?" म्हणून विचारत जात असे.
त्यामुळे लवकरच मला गाईचा महिमा लक्षात आला!
तसंच पोपटाशी बोलायला मला फार आवडायचं. आमच्या उद्योग बंगल्यात घरमालकांचा पोपट होता. त्याच्याशी बोलण्यात मी मांजराच्या पिल्लाइतकीच चिकाटी दाखवायचे. तो पहिला अर्धा तास कितीही शीळ वाजवली तरी किर्र्र् अशा अंगावर शहारे आणणा-या आवाजाखेरीज काही बोलायचा नाही. पण मग धीर न सोडता शीळ वाजवत राहिलं की अचानक तो तश्शीच शीळ वाजवायचा. त्याच्यामुळे मी खूप लहान वयात छान शीळ वाजवायला शिकले. एकदा बागेत खेळत असताना मला गुलाबांच्या झुडपांत कबुतराचं एक छोटं पिल्लू जखमी होऊन पडलेलं मिळालं. मग त्यानंतरचे तीन दिवस त्याला कापसात गुंडाळून चमच्यानी भाताची पेज पाजण्यात गेले. आई बाबा पण माझ्या मदतीला आले. पण तिस-या दिवशी पिल्लाने धीर सोडला. त्यानंतर खूप प्राणी आले आणि गेले, पण ते पिल्लू मात्र मला फार लळा लावून गेलं.
अजूनही मी व बाबा बाहेर गेलो आणि रस्त्यात एखादं गाढवाचं किंवा मांजराचं पिल्लू दिसलं की बाबाच "कित्ती गोड!" असं ओरडतो! जर लहानपणी माझे सगळे प्राणीहट्ट पूर्ण केले असते तर आज बाबाला सगळी पेशवे बाग सांभाळायला लागली असती!
ekadam zakas lihatay bagha tumhi, asach lihat ja.best luck.
ReplyDeleteब्लॉगची भट्टी यावेळी नेहमीसारखी छान जमली आहे.
ReplyDeleteएकाच व्यक्तीच्या आयुष्यात एवढे वेगवेगळॆ अनुभव येतात काय, तिला ते व्यवस्थित आठवतात काय आणि ती ते अत्यंत प्रभावीपणे लोकांसमोर मांडते काय!! thank you रे देवा!! ग्रेट blog सई!!
ReplyDeleteसये..हाच शब्द योग्य आहे गं तुझ्याकरता. केवढया आठवणी आहेत.,आणि त्या फक्त तुझ्या शब्दांतच वाचण्याजोग्या आहेत.
ReplyDeleteNeedless to say..nice 1 :)
कित्ती गोड!सई असच म्हणाव लागत आहे परत.मला तू पून्हा उद्योग बंगल्यातली छोटीशी सई दिसू लागली आहेस.सगळी पिल्ल डोळ्यासमोर येऊ लागली आहेत.बाबा आपण उंट पाळायचा का? सारखे निरागसपणे विचारलेले प्रश्न ऎकू येऊ लागले आहेत.
ReplyDeleteसई पून्हा आपण तसच होऊ यात ना!
@Gmatrix
ReplyDeleteKolhapurche kay tumhi?? :)
Thanks
@Shrirang
Thanks. :)
@Prasad
Haha. I am not sure it is that good. I really really need to improve my language. :) Thanks for the compliments. :)
@Sakhee
Saee = Sakhi. :) So nice to have found a twin.
@Baba
Ho! unta rahilach ki! Me kadhihi lahan whayla tayar ahe. :) As long as I don't have to go to school all over again.
Good post!
ReplyDeleteसयी, तुझ्या माजर प्रेमाचा अनुभव मी ही घेतला आहे.. आठवते की तू एका छोटयाश्या पील्लाच नाव "पराज्झ्पे" ठेवल होतस.. मल अजुन्हि "पजान्जपे" नाव कुठे एकले की त्या पील्लाचीच आठवण होते.. You are so funny always..
ReplyDelete@gandhali tai
ReplyDeletehaha..i almost forgot about that. It was called "paranjpey" because it was snow white with blue eyes!! I am such a 'cast'iest. :P
Thanks for the comment. :)
" देवपण आपल्या प्रत्येकाला अशीच एक बांगडी देत असतो, आणि आपल्या एखाद्या अशाच डौलदार चालीसाठी आपल्यावर ती बांगडी आनंदाने भिरकावीत असतो!" saydee sahii lihilys he vishesh awdle :D :D
ReplyDeleteaisahi likha karo bhut badhiya hai :)