मी व स्नेहा अशा कितीतरी प्रसंगांतून पळ काढायचो. पण या कामांतही काही सोपी कामं आम्ही फक्त कौतुक व्हावं या एकाच हेतूने आनंदाने करायचो. त्यात अज्जीची जवळपास सगळी कामं असायची. अज्जी नेहमी साधी कामं सांगायची. कुठेतरी पळत जात असेन तेव्हा तिची, "ए साय", अशी गोड हाक यायची. मग तिच्या खोलीत गेलं की ती सुई-दोरा घेऊन बसलेली दिसायची. "मला एवढा दोरा ओवून दे गं" असं मऊ बोलायची. त्याला नाही म्हणताच यायचं नाही. उलट दोन तीन वेळा दोरा ओवता आला असता तर अजून बरं झालं असतं असं वाटायचं. मग मी अगदी एका क्षणात दोरा ओवून द्यायचे. त्यावर, "तुझे डोळे नुसतेच सुंदर नाहीत, तर किती उपयोगी आहेत!" असं ती सांगायची.
आणखी एक अज्जी-काम म्हणजे झाडांना पाणी घालणे. हे काम मी स्वत:हून करायचे नाही, पण ते सांगितल्यावर करायला ’नाही’सुद्धा म्हणायचे नाही. उन्हाळ्यात सकाळपासून तापलेल्या गच्चीवर पाण्याचा पाईप घेऊन जायला खूप मजा यायची. मग गरम गच्चीवर पहिल्यांदा पाणी ओतलं की सिमेंटचा वास यायचा. मग कुंड्यांमध्ये पाणी घालताना मातीचा! तहानलेली माती सगळं पाणी शोषून घ्यायची. ते पहायला मला फार आवडायचं. गुलाबाच्या फुलांवर पाणी शिंपडून त्यांना तजेलदार बनवायलाही मला खूप आवडायचं.
आजोबांची कामं पण सोपी असायची. ते सकाळी उठल्यापासून खूप वेळा त्यांची जागा बदलत असत. सकाळी झोपाळ्यावर, मग दहाच्या सुमाराला समोरच्या गॅलरीत, दुपारी जेवायला स्वयंपाकघरात, मग संध्याकाळी गच्चीवर. त्यांच्यामागून त्यांचा उकळलेल्या पाण्याचा तांब्या घेऊन जायचं काम आम्हाला मिळायचं. ते करायला काही वाटायचं नाही. ’कधी आजोबा व्याख्यानाला निघाले की त्यांचे बूट आणून द्यायचे’ हेही काम मला खूप आवडायचं. त्यांच्या सुपारीच्या डब्याची ने-आणसुद्धा मी करायचे. मग कधी खूष होऊन ते मला सुपारी अडकित्त्याने कातरून द्यायचे. ते बघायला मला फार आवडायचं. ते नसताना खूप वेळा मी मला अडकित्ता वापरता येतो का ते बघायचे.
पण मीनामामीची कामं मला अजिबात म्हणजे अजिबात आवडायची नाहीत. कारण ती तिला नको असलेली किचकट कामं आमच्या गळ्यात घालते अशी माझी थोड्याच दिवसांत खात्री झाली होती. त्यामुळे तिच्यासमोर मी नेहमी मरगळलेला चेहरा ठेवायचा प्रयत्न करायचे. मी व स्नेहा जरा खुशीत दिसलो की, "काय हासताय गं मुल्लींनो! इकडे या" असा हुकूम व्हायचा!
मग गेलं की , "स्नेहा कणीक मळ आणि सई लसूण सोल" असा आदेश व्हायचा लगेचच!
तसंच चित्रहार बघायला बसलं की "शेंगा फोडायचा" कर भरावा लागत असे. पण यातसुद्धा ’सोललेले दाणे खायचे नाहीत’ ही अट असायची. कोवळे मटार सोलायचे पण खायचे नाहीत! असल्या बोच-या कामांना माझा विरोध होता.
मीनामामी सकाळी उठून खूप वेळ पाणी उकळायची. पंचेचाळीस मिनिटं तिची घागर शेगडीवर असायची. माझ्या बाबानी या अकारण पाणी उकळण्याच्या सवयीचा बिमोड करण्यासाठी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला. पण ती तासभर पाणी उकळायचीच. कधी कधी तिनी उकळलेल्या पाण्याच्या वाफेचे ढग बनून पाऊसही पडून जायचा पण तिचे पाणी उकळणे थांबायचे नाही. हे पाणी गार झाल्यावर फिल्टरमध्ये घालायची जबाबदारी कधी कधी आमच्यावर यायची. तीही मला आवडायची नाही. कारण त्यासाठी मला ओट्यावर चढावे लागे. एवढ्या उकळेल्या पाण्याला परत फिल्टरमध्ये घालून आम्ही बहुधा पेल्यातून पाण्याचा आत्मा पीत असू!
नरूमामा स्कूटर धुवायला आमची मदत घ्यायचा. तो अंगणात आणि नळ गॅलरीत. त्यामुळे 'योग्य वेळी' पाणी सोडणे आणि बंद करणे हे काम आमचे असायचे. मग नरूमामा लाडका असल्याने ते मी मुद्दाम अयोग्य वेळी करायचे आणि त्याला भिजवायचे.
तुझ्या पहिल्याच वाक्याशी आपण एकदम सहमत आहे.. आता मी चांगला तुझा blog वाचतोय तेवढ्यात मला आईने तिच्या ’कायनेटिक’चं कसलंसं काम करायला सांगितलंय.. मोठ्यांना असुरी आनंद मिळतो की काय कुणास ठाउक!! लेख नेहमीप्रमाणे झकासच.. ते आता दर वेळी वेगळं लिहायला नको.. :D
ReplyDeleteप्रसाद,
ReplyDeleteThanks!! पुण्यात माझ्याकडे नेहमी दूध आणायचं काम असायचं कारण मी "लाडावून" ठेवलेली मांजर नेहमी दुधात तोंड घालायची!!
सई,
ReplyDeleteमी तुझा ब्लॉग नेहेमी वाचते. सगळे लेख खुप छान आहेत. प्रत्येक लेखात मला माझ्या आजोळची आठवण होते. असेच लिहीत रहा.
सोनाली
Khupach maja aali vachun...saee
ReplyDeleteho ani nehami nehami tuze kautuk karayala..
mazi vocab far kami ahe : )
U write really engrossing thats what I love...
Keep writing always..
hehe kittti kaam kart hotees tu :)))
ReplyDeletePanyacha Atma! Nice.
ReplyDeleteLike english posts, these are also very good. But dont ever go Awachat Way (somebody mentioned him). When possible, may be you read Asha Bage or Anand Vinayak Jategaonkar (he does not write these days I believe) for similar kind. GA, Nemade ani Guy (the Maupassan) tar apale ahetach.
उकळलेल्या पाण्याच्या वाफेचे ढग बनून पाऊसही पडून जायचा
ReplyDeleteanni
पेल्यातून पाण्याचा आत्मा पीत असू!
You write just amazing... :)
Hi Saee, geli kityek varsha me ha blog vaachte aahe...khup sadhya, soppya shabdat lihila aahes tyamule vachtana sagla chitra dolyansamor ubha raahta. kadhi melbournela yaycha plan asel tar jarur kalav. tula bhetayla khup aavdel :)
ReplyDelete